07 July 2020

News Flash

सांगली जिल्हा नगर वाचनालय

मदतीच्या धनादेशांचा ओघ आमच्या राज्यभरातील कार्यालयांकडे सुरू आहे. या संस्थांची पुन्हा थोडक्यात ओळख..

(संग्रहित छायाचित्र)

‘लोकसत्ता’च्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमाचे यंदाचे नववे वर्ष. यंदाही काही उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या संस्थांची आम्ही गणेशोत्सवादरम्यान वाचकांना ओळख करून दिली. त्यात अलीकडे आलेल्या महापुरामुळे मोठी हानी पोहोचलेल्या संस्था, दुर्मीळ ज्ञानभांडार जतन करणाऱ्या, संगीतप्रसार करणाऱ्या संस्था, गरीब, रुग्णांसाठी काम करणारे सेवाव्रती, वंचित, अंध, अपंगांच्या आधारवड बनलेल्या आणि प्राण्यांसाठी, जलसंवर्धनासाठी झोकून देऊन काम करणाऱ्या संस्थांचा समावेश होता. या संस्थांच्या विधायक कार्याला समाजातील दानशूरांचे पाठबळ लाभावे, यासाठी सुरू केलेल्या या उपक्रमाला यंदाही वाचकांचा भरभरून प्रतिसाद लाभत आहे. मदतीच्या धनादेशांचा ओघ आमच्या राज्यभरातील कार्यालयांकडे सुरू आहे. या संस्थांची पुन्हा थोडक्यात ओळख..

सांगली जिल्हा नगर वाचनालय

सांगलीत १८६३ मध्ये ‘धुंडीराज बुक क्लब’ या नावाने वाचनालय सुरू करण्यात आले. या वाचनालयाला १८७९ मध्ये सार्वजनिक स्वरूप देण्यात आले आणि स्वातंत्र्यानंतर १९५० मध्ये त्याला जिल्हा नगर वाचनालयाचे स्वरूप प्राप्त झाले. सध्या साखळी वाचनालयासाठी महत्त्वाची कामगिरी बजावत असलेल्या या वाचनालयाकडे सुमारे सव्वा लाखाहून अधिक ग्रंथसंपदा आहे.

या वाचनालयाच्या संग्रही विविध विषयांचे संदर्भग्रंथ तर आहेतच, पण त्याचबरोबर आयुर्वेदावर भाष्य करणारे दुर्मीळ ग्रंथही आहेत. सांगली शहराला यापूर्वी २००५ मध्ये महापुराचा तडाखा बसला होता. त्या वेळची पूररेषा गृहीत धरून या वेळी वाचनालयाच्या तळमजल्यावरील पुस्तके हलविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, यापूर्वीची पूररेषा ओलांडून यंदा साडेचार फूट जादा पाणी आल्याने ग्रंथसंपदा वाचवण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. आता या पुस्तकांचे डिजिटलायझेशन करणे गरजेचे आहे. जुन्या पोथ्या, हस्तलिखिते, आयुर्वेदावर भाष्य करीत आयुर्विज्ञान सांगणारी पुस्तके यांचे जतन करण्यासाठी डिजिटलायझेशन आवश्यक आहे. वैचारिक भूक भागविण्याबरोबरच अभिरुचीपूर्ण समाजनिर्मितीसाठी हे अक्षरलेणे अक्षय राखण्यासाठी मदतीचा हात हवा आहे.

धनादेश या नावाने काढावा : ‘सांगली जिल्हा नगर वाचनालय’

Sangli Jilha Nagar Vachanalay

न्यू इंग्लिश स्कूल, तिवरे

जुलैमध्ये धरणफुटीने चिपळूण तालुक्यातील तिवरे गावाला मोठा फटका बसला. या धरणफुटीत एक अख्खी वाडी नामशेष झाली आणि २२ जण प्राणांना मुकले. अशा  परिस्थितीत जगण्याची उमेद टिकवली ती ‘न्यू इंग्लिश स्कूल’ या शाळेने. या भीषण संकटात गावकऱ्यांच्या मानसिक आधारात मोठी भूमिका शाळेने बजावली. गावातील दसपटी विभाग रामवरदायिनी शिक्षण संस्था संचालित ही परिसरातली नामांकित शाळा धरणफुटीच्या संकटात गावाच्या पाठीशी ठामपणे उभी होती.

शाळेत आठवी ते दहावीचा प्रत्येकी एक वर्ग असून ९३ विद्यार्थी इथे शिक्षण घेत आहेत. त्यामध्ये मुलींचे प्रमाण जास्त- म्हणजे ५१ आहे. त्याचबरोबर एकूण विद्यार्थ्यांपैकी इतर मागासवर्गीय, अनुसूचित जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांची संख्या ५७ आहे.  सध्याच्या युगातील स्पध्रेला तोंड देण्यासाठी विद्यार्थी घडविण्याच्या दृष्टीने आवश्यक शैक्षणिक सुविधांची शाळेत वानवा आहे. त्यासाठी आवश्यक वास्तू उभारण्यासाठी शाळेकडे स्वत:ची जमीन आहे, पण निधी नाही. तो उपलब्ध झाला तर सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळा, क्रीडा संकुल, संगणक कक्ष इत्यादी सुविधा निर्माण करण्याची संस्थेची इच्छा आहे.

धनादेश या नावाने काढावा :  ‘दसपटी विभाग रामवरदायिनी शिक्षण संस्था’

Daspati Vibhag Ramvardayini Shikshan Sanstha

साने गुरुजी रुग्णालय

राज्याच्या अनेक दुर्गम भागांत आजही आरोग्य व्यवस्थेचा प्रश्न गंभीर आहे. किनवटसारख्या भागात २५ वर्षांपूर्वी आरोग्यप्रश्न अधिकच बिकट होता. त्या वेळी थोर समाजसेवक बाबा आमटे यांच्या प्रेरणेतून डॉ. अशोक बेलखोडे यांनी १९९५ च्या सुमारास किनवटमध्ये ‘साने गुरुजी रुग्णालया’ची स्थापन केली. त्यामुळे रुग्णालयाने जवळपास ४०० गावांतील रुग्णांसाठी रोगनिदान आणि उपचारांसोबतच एका मोठय़ा आधार केंद्राचे स्थान प्राप्त केले.

या रुग्णालयात जेमतेम २५ खाटांची सोय व्यवस्थापनाला करता आली, पण रुग्ण तपासणी, उपचारांसोबतच अनेक आजारांवरील शस्त्रक्रिया आदी सुविधांमुळे किनवटपासून दीडशे ते तीनशे कि.मी. दूर असलेल्या शहरी भागातील रुग्णालयांत धाव घेऊन उपचार घेण्याचा रुग्णांवरील प्रसंग टळला. रुग्णसेवेच्या झपाटलेपणातून उभारलेली ही संस्था विज्ञान प्रसार, आरोग्य, शिक्षण-प्रशिक्षण, संशोधन आदी बहुविध क्षेत्रांत अत्यंत प्रतिकूल स्थितीत कार्यरत आहे. डॉ. बेलखोडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नियोजित ‘मल्टिस्पेशालिटी’ रुग्णालयासाठी दोन लाख चौरस फूट जागा मिळविली. सुसज्ज रुग्णालय उभारण्याचा संस्थेचा मनोदय आहे.  तिथे उच्चशिक्षित, तज्ज्ञ डॉक्टर, प्रशिक्षित कर्मचारी रुग्णसेवेसाठी उपलब्ध होऊ शकतील.

धनादेश या नावाने काढावा : ‘भारत जोडो युवा अकादमी’

Bharat Jodo Yuva Academy

शाश्वत कन्सेप्ट स्कूल, अमरावती

विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याबरोबरच त्यांना कर्तव्यशील नागरिक बनविण्याच्या व्यापक भूमिकेतून चालवल्या जाणाऱ्या ‘शाश्वत कन्सेप्ट स्कूल’मधून विद्यार्थी थेट प्रयोगातून, व्यवहारज्ञानातून विविध विषयांचे शिक्षण घेतात. वर्ग, गणवेश, वेळापत्रक यात अडकून न पडता निरीक्षण आणि विचारमंथनातून शाळेत पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण दिले जाते.

विद्यार्थ्यांना विज्ञाननिष्ठ कृतिशील शिक्षण देणाऱ्या या शाळेने आता ‘शाश्वत इंडिया फेलोशिप’ देण्याचा निर्णय घेतला आहे. फेलोशिपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षणापर्यंत लागणाऱ्या पुस्तकांचा खर्च दिला जाणार आहे.  विविध सामाजिक, वैज्ञानिक आणि तांत्रिक आव्हाने स्वीकारण्यास सक्षम तरुणांची पिढी घडवणे हा उद्देश त्यामागे आहे. पुढल्या वर्षी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये फेलोशिपचा विस्तार करण्याचा शाळेचे संचालक अतुल गायगोले यांचा मानस आहे.

धनादेश या नावाने काढावा :

‘जयहिंदू एज्युकेशन फाऊंडेशन, अमरावती’

Jaihind Education Foundation, Amravati

स्नेहवन

मराठवाडय़ातील परभणीजवळील एका खेडय़ात जन्मलेला, तिथेच वाढलेला आणि संगणक अभियांत्रिकीची पदवी घेऊन चांगल्या पगाराच्या नोकरीवर पुण्यात स्थिरावलेल्या पंचविशीतल्या अशोक देशमाने नावाच्या तरुणाला मराठवाडय़ातील दारिद्रय़, दुष्काळ, नापिकी, कर्जबाजारीपणा व आत्महत्या या दुष्टचक्राने अस्वस्थ केले.  पिचलेल्या कुटुंबांतील मुलांसाठी आपले आयुष्य झोकून द्यायचे असे ठरवून त्याने चांगली नोकरी सोडली. पुण्यात भोसरी येथे अडीच खोल्यांचे एक घर मिळविले आणि मराठवाडय़ातील आत्महत्याग्रस्त, शेतमजूर, गरीब कुटुंबांतील होतकरू मुलांचा शोध घेतला. पित्याच्या मायेने त्यांचा सांभाळ करण्याचे आणि त्यांना शिकवून शहाणे करण्याचे वचन देऊन त्याने ती मुले भोसरीला घरी आणली.. आणि ‘स्नेहवन’चा जन्म झाला! स्नेहवन हे सुरुवातीस २० मुलांचे कुटुंब होते. गेल्या चार-पाच वर्षांत हे कुटुंब आणखी विस्तारले आहे. स्नेहवनात ५० निवासी मुले आहेत. भोसरीतीलच नंदी समाजातील मुलींच्या शिक्षणाची जबाबदारीही अशोकने घेतली आहे.  भोसरीतीलच डॉ. रवींद्र आणि स्मिता कुलकर्णी या दाम्पत्याने अशोकला आपल्या जमिनीतील दोन एकर जमीन देणगी म्हणून देऊन टाकली. गेल्या दीड वर्षांत तेथे स्नेहवनचे आनंदभुवन साकारते आहे. या ठिकाणी सुसज्ज शाळा, प्रयोगशाळा, संगणक केंद्र, संस्कार केंद्र, वाचनालय, गोशाळा, सौरऊर्जा, आदी सुविधा उभारण्याचे आव्हान आता स्नेहवनसमोर आहे.

धनादेश या नावाने काढावा : ‘स्नेहवन’

Snehawan

नवशिक्षण प्रसारक मंडळ, पन्हाळा

यंदा ऑगस्टमध्ये कोल्हापुरात पावसाने थमान घातले. ऐतिहासिक पन्हाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या ‘नवशिक्षण प्रसारक मंडळा’च्या प्रशालेची इमारत त्यात पूर्णपणे कोसळली. पन्हाळ्याच्या पायथ्याशी बुधवारपेठ या ग्रामपंचायतीच्या हद्दीत १९९२ मध्ये ‘कन्या हायस्कूल’ या नावाने आठवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण देणारी प्रशाला सुरू झाली. पुढे मुलींसोबतच मुलांनाही शाळेत प्रवेश दिला जाऊ  लागला. १९९६ मध्ये शाळेला अनुदान मंजूर झाले. त्यानंतर शिक्षकांनी लोकसहभागातून पाच खोल्यांची इमारत बांधली. बहुतांश वष्रे शाळेचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला. गेल्या वर्षी जुलै महिन्यात पावसामुळे इमारतीच्या दोन खोल्या कोसळल्या. यंदाच्या पावसात इमारतीतील उर्वरित तिन्ही खोल्या जमीनदोस्त झाल्या. सध्या दोन वेगवेगळ्या ठिकाणी भाडय़ाच्या इमारतींमध्ये शाळेचे वर्ग सुरू आहेत. शाळा स्वत:च्या मालकीच्या इमारतीच्या प्रतीक्षेत आहे.

धनादेश या नावाने काढावा : ‘नवशिक्षण प्रसारक मंडळ, पन्हाळा’

Navshikshan Prasarak Mandal, Panhala

स्वरांकित

वसई-नालासोपाऱ्यातील रसिकांना संगीत श्रवणानंद मिळावा आणि त्याद्वारे भारतीय शास्त्रीय संगीताचा प्रसार आणि प्रचार व्हावा, उदयोन्मुख कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, या हेतूने नालासोपाऱ्यातील आठ संगीतप्रेमींनी १९९५ मध्ये ‘स्वरांकित चॅरिटेबल ट्रस्ट’ ही संस्था स्थापन केली. कमलाकर नेने, डॉ. रोहित दंडवते, डॉ. वर्षां दंडवते, मधुसूदन आपटे, मनीषा आपटे, दत्तात्रय देशमुख, सुरेश पवार, रमेश काणे या संगीतप्रेमींनी सेवाभावी वृत्तीने नालासोपाऱ्याला एक सांस्कृतिक ओळख देण्याच्या ईष्रेने स्वरांकितच्या उभारणीसाठी परिश्रम घेतले. संस्थेचा विस्तार, प्रामुख्याने निधी संकलन आणि संस्था संगीतप्रेमींमध्ये लोकप्रिय करण्यात कमलाकर नेने यांचे मोठे योगदान आहे. स्वरांकितने विविध महोत्सवांद्वारे संगीतातील एका वेगळ्या विश्वाचा अनुभव संगीतप्रेमींना दिला आहे.

संगीत कार्यक्रमांव्यतिरिक्त संगीतविषयक साहित्यनिर्मितीतही स्वरांकितने मोलाची भूमिका बजावली. संगीतप्रेमी, शिक्षक, विद्यार्थी यांच्यासाठी अनेक पुस्तके प्रकाशित करून ती विविध अभ्यासिकांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

स्वरांकितने प्रसिद्ध केलेले ‘१४ विद्या, ६४ कला’ हे पुस्तक मुंबई विद्यापीठात संदर्भग्रंथ म्हणून मान्यताप्राप्त झाले आहे. संस्थेचा ‘युवा संमेलन’ हा उपक्रम नवोदितांना संधी देणारा आणि त्यांना नावारूपाला आणणारा ठरला आहे.

धनादेश या नावाने काढावा : ‘स्वरांकित चॅरिटेबल ट्रस्ट’

Swarankit Charitable Trust

पाणवठा-अपंग प्राण्यांचे अनाथाश्रम

जुलैमध्ये मुसळधार पावसामुळे उल्हास नदीला महापूर आला. नदीतील पाण्याने पात्र सोडले आणि ते आसपासच्या गावांत घुसले. महापुराच्या तडाख्यात बदलापुरातील चामटोली गावही सापडले. जलप्रलयाने ‘पाणवठा-अपंग प्राण्यांचे अनाथाश्रमा’ची हानी केलीच, पण तेथील दहा प्राण्यांचाही बळी घेतला.  महापुरात प्राण्यांचे खाद्य आणि औषधे वाहून गेली. पिंजऱ्यांचे नुकसान झाले. पुरामुळे कोलमडून पडलेला ‘पाणवठा’ मदतीकडे डोळे लावून बसला आहे. त्याच्या पुर्नउभारणीसाठी संचालक गणराज जैन यांना आर्थिक साह्य़ाची गरज आहे.

पुरामुळे पाणवठय़ाची लोखंडी शेड मोडली आहे. औषधे ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या रेफ्रिजरेटरचे नुकसान झाले. प्रकल्पाचे सर्व कुंपण, पाण्याची मोठी टाकी पुरात वाहून गेली आहे. बायोगॅस युनिटचीही हानी झाली आहे. त्यासाठी अर्थसाह्य़ हवे आहे. पाणवठा प्रकल्पात अपंग प्राण्यांचा सांभाळ केला जातो. आजारी प्राण्यांवर उपचार करून त्यांना कायमस्वरूपी आसरा दिला जातो. मात्र, निधीअभावी त्यांच्यावरील उपचारांवर मर्यादा येतात. कूपनलिकेची सुविधा उपलब्ध झाल्यास पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटू शकतो.

धनादेश या नावाने काढावा : ‘पाणवठा फाऊंडेशन’

Panvatha Foundation

नॅशनल असोसिएशन फॉर द वेल्फेअर ऑफ फिजिकली चॅलेंज्ड

स्वत: अंध असलेले राहुल देशमुख नगर जिल्ह्य़ातील एकरुखे या गावचे. उच्चशिक्षित होण्याच्या इच्छेने अकरावीसाठी ते पुण्यात आले; पण अंध असल्यामुळे त्यांना वसतिगृहात प्रवेश मिळाला नाही. अनेक अडचणी सोसत त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून नंतर अनेक पदव्याही मिळवल्या. शिक्षण घेण्यासाठी आपल्याला जे कष्ट सोसावे लागले, तसे इतरांना सोसावे लागू नयेत म्हणून राहुल यांनी स्वत:च अंध, अपंग, गतिमंद, कर्णबधिरांसाठी संस्था स्थापन केली. तेव्हा ते बारावीत शिकत होते.

नॅशनल असोसिएशन फॉर द वेल्फेअर ऑफ फिजिकली चॅलेंज्ड (एनएडब्ल्यूपीसी) संस्थेतर्फे अंध, अपंग महाविद्यालयीन विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी संगणक प्रशिक्षणापासून संगीत-वाद्यवादनापर्यंत आणि इंग्रजी संभाषणापासून स्पर्धा परीक्षांपर्यंत अनेक प्रकारचे प्रशिक्षण वर्ग चालवले जातात. विद्यार्थी-विद्यार्थिनी मिळून सुमारे दीडशे जण संस्थेत एकाच वेळी वेगवेगळ्या अभ्यासक्रमांचे शिक्षण घेतात.

संस्थेतर्फे युवकांसाठी वसतिगृहही चालवले जाते. २५ युवक त्याचा लाभ घेतात; पण संस्थेची स्वत:ची जागा नसल्यामुळे युवतींसाठी ही सुविधा गरज असूनही संस्था देऊ शकत नाही. युवतींच्या निवासाची व्यवस्था झाली तर अनेक अभ्यासक्रम, उपक्रम सुरू करता येणार आहेत. मात्र, ही योजना पुढे सरकू शकलेली नाही. राहुल यांची डोळस पत्नी देवता अंदुरे-देशमुख याही उच्चशिक्षित असून त्या राहुल यांच्याबरोबरीने पूर्णवेळ संस्थेचे काम करतात.

धनादेश या नावाने काढावा :

‘नॅशनल असोसिएशन फॉर द वेल्फेअर ऑफ फिजिकली चॅलेंज्ड’

NAWPC

वसुंधरा संजीवनी मंडळ

मुंबईसह परिसरातील शहरांना रोज कोटय़वधी लिटर पाणी पुरवणाऱ्या ठाणे जिल्ह्य़ातील शहापूर आणि मुरबाड या दोन तालुक्यांत उन्हाळ्यातील चार महिने भेडसावणाऱ्या भीषण पाणीटंचाईचे विघ्न दूर होऊ शकते, हे ‘वसुंधरा संजीवनी मंडळ’ या संस्थेने गेल्या चार वर्षांत राबविलेल्या उपक्रमांनी दाखवूून दिले आहे. ‘पाणी अडवा, जिरवा आणि वापरा’ या जल- व्यवस्थापनातील मूलभूत तत्त्वाचा विसर पडल्याने मुसळधार पाऊस पडूनही धरणांचा हा प्रदेश मार्च ते जून या काळात कोरडा असतो. जलव्यवस्थापन आणि कॉर्पोरेट क्षेत्रात उच्चपदे भूषवून निवृत्त झालेल्या काही तज्ज्ञांनी ‘वसुंधरा’च्या माध्यमातून शहापूर आणि मुरबाड तालुक्यातील काही निवडक गावांमध्ये जलसंधारणाचे उपक्रम राबवले.

संस्थेने दोन्ही तालुक्यांत महाविद्यालयीन विद्यार्थी आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने शेकडो वनराई बंधारे बांधले. त्या माध्यमातून जल संवर्धनाविषयी मोठय़ा प्रमाणात जनजागृती झाली. गावाजवळून वाहणाऱ्या जलस्रोतांची देखभाल आणि दुरुस्ती स्थानिकांनीच केली पाहिजे, हे त्यांनी गावकऱ्यांना पटवून दिले. संस्थेने ‘सीएसआर’ निधीतून गेल्या चार वर्षांत दहा काँक्रीटचे बंधारे बांधले आहेत. पुढील चार वर्षांत ५० काँक्रीटचे बंधारे बांधण्याची संस्थेची योजना आहे.

धनादेश या नावाने काढावा : ‘वसुंधरा संजीवनी मंडळ’

Vasundhara  Sanjivani  Mandal

धनादेश येथे पाठवा..

एक हजार किंवा त्याहून अधिक रुपयांची देणगी देणाऱ्यांची नावे ‘लोकसत्ता’त प्रसिद्ध केली जातील.

मुंबई कार्यालय

लोकसत्ता, संपादकीय विभाग,मफतलाल सेंटर, सातवा मजला, नरिमन पॉइंट, मुंबई – ४०००२१,  ०२२-६७४४०२५०

महापे कार्यालय

संपादकीय विभाग, प्लॉट

नं. ईएल १३८, टीटीसी इंड. एरिया, एमआयडीसी, महापे, नवी मुंबई – ४००७१०.  ०२२-२७६३९९००

ठाणे कार्यालय

संपादकीय विभाग, कुसुमांजली बिल्डिंग, दुसरा मजला, गोखले रोड, नौपाडा, ठाणे.  ०२२-२५३९९६०७

पुणे कार्यालय

संपादकीय विभाग,

एक्स्प्रेस हाऊस, प्लॉट

नं. १२०५/२/६, शिरोळे

रस्ता, पुणे – ४११००४.  ०२०-६७२४११२५

नाशिक कार्यालय

संपादकीय विभाग, स्टेडियम कॉम्प्लेक्स नं. ६, पहिला मजला, महात्मा गांधी मार्ग, नाशिक – ४२२००१.  ०२५३-२३१०४४४

नागपूर कार्यालय

संपादकीय विभाग,

प्लॉट नं. ३८, अ‍ॅडिसन ट्रेड सेंटर, अंबाझरी, नागपूर – ४४००१०, ०७१२ झ्र् २२३०४२१

औरंगाबाद कार्यालय

संपादकीय विभाग, १०३, गोमटेश मार्केट, गुलमंडी,  औरंगाबाद. दूरध्वनी क्रमांक ०२४०-२३४६३०३, २३४८३०३

नगर कार्यालय

संपादकीय विभाग, १६६, अंबर प्लाझा, स्टेशन रोड, अहमदनगर. ०२४१-२४५१५४४/२४५१९०७

दिल्ली कार्यालय

संपादकीय विभाग, द इंडियन एक्स्प्रेस बिल्डिंग, बी१/ बी, सेक्टर १०, नॉएडा- २०१३०१.

०११-२०६६५१५००

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 15, 2019 2:50 am

Web Title: sarva karyeshu loksatta 2019 abn 97
Next Stories
1 किरण नगरकर.. मराठीतले आणि इंग्रजीतले!
2 व्यक्तिस्वातंत्र्याचा खंदा शिपाई
3 चाँदनी चौकातून : दिल्लीवाला
Just Now!
X