18 November 2017

News Flash

ग्रंथवैभव जतनाचा ध्यास

हल्ली वाचतंय कोण आणि मुळात वाचायला वेळ कोणाला आहे..

विनायक करमरकर | Updated: September 3, 2017 3:56 AM

‘पुणे नगर वाचन मंदिरा’त शेकडो दुर्मीळ ग्रंथ, पुस्तके योग्यरीत्या जतन करून ठेवण्यात आली आहेत.

हल्ली वाचतंय कोण आणि मुळात वाचायला वेळ कोणाला आहे.. हा अगदी सर्रास विचारला जाणारा प्रश्न. कोणाला काही वाचायलाच नको आहे.. अशीही चर्चा नेहमी केली जाते. ‘हल्ली वाचतंय कोण’ या प्रश्नाचं उत्तर ज्यांना हवं असेल किंवा अशी शंका ज्यांच्या मनात असेल त्यांनी ‘पुणे नगर वाचन मंदिरा’ला आवर्जून भेट द्यावी. पुस्तकांचं आणि ग्रंथांचं भवितव्य काय, वाचायला वेळ कोणाला आहे.. यांसारख्या प्रश्नांची उत्तरं इथे मिळतील..

पु ण्याच्या नावलौकिकात आणि सांस्कृतिक वैभवात ज्या संस्थांनी मोलाची भर घातली त्यात ‘पुणे नगर वाचन मंदिर’ हे नाव अग्रक्रमानं घ्यावं लागेल. ज्ञानप्रसाराच्या क्षेत्रातील एक मातब्बर आणि ख्यातकीर्त संस्था अशी ओळख असलेल्या नगर वाचन मंदिराची पुढच्या वर्षी १७० व्या वर्षांतील वाटचाल सुरू होईल. सन १८४८ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेचं सर्वात मोठं वैशिष्टय़ हे की, संस्था केवळ टिकली पाहिजे म्हणून ती चालवायची अशी ही संस्था नाही. वैचारिक संपन्नतेचा दीड शतकाचा वारसा जपत काळाच्या बरोबर राहून संस्थेने प्रत्येक टप्प्यावर बदल केले आणि वाचकांसाठी, ज्ञानसाधकांसाठी, अभ्यासकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी जे जे उपक्रम सुरू केले, ज्या योजना राबवल्या, त्यामुळे वाचनप्रेमींनी बहरलेली संस्था असंच तिचं स्वरूप कायम आहे.

स्थापन झाली तेव्हाची ही ‘पूना नेटिव्ह जनरल लायब्ररी.’ लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांचा नगर वाचन मंदिराच्या स्थापनेत मोलाचा सहभाग होता आणि न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे ग्रंथालयाचे पहिले, तर डॉ. सर रामकृष्ण गोपाळ भांडारकर हे दुसरे अध्यक्ष. ग्रंथालयाची ही आदरणीय त्रयी. तत्कालीन ‘प्रभाकर’ मासिकात लोकहितवादींची ‘शतपत्रे’ प्रसिद्ध होत असत. लोकहितवादींनी २६ मार्च १८४८ च्या ‘पत्रा’त या ग्रंथालयाच्या स्थापनेचा सविस्तर वृत्तान्त लिहिला आहे.

‘‘पुणे येथील पुस्तकगृहाविषयी वर्तमान आपल्यास लिहितो. पुण्यासारखे शहरांत विद्याशाळा बऱ्याच आहेत. परंतु, ग्रंथ वाचण्याची जागा अद्याप लोकांस माहित नवती व तिचा उपयोग कोणा नेटिव लोकांस माहित नव्हता; परंतु, सांप्रतचे गवरनर साहेब सर जार्ज क्लार्क यांणी लोकांचे सुधारणेकडे लक्ष देऊन जड्जसाहेब हेन्री ब्राँज् यास सुचविलें कीं, पुण्यांत लायब्ररी स्थापण्याचा बेत करावा. त्याजकरून त्यांनी तारीख २८ जानेवारी सालमजकुरी सर्व लोकांची सभा जमवून त्यांस हा मजकूर निवेदन केला. तेव्हां बुधवारचे वाडय़ांतील इंग्रजी शाळेंतील अभ्यासी लोकही पुष्कळ हाजीर होते. त्या सर्वानी अनुमोदन दिलें व अदालतीकडील चाकरमंडळी व सरदार लोक यांणीही ‘‘बरें आहे’’ असें म्हटलें..’’ असा वृत्तान्त या ‘पत्रा’त वाचायला मिळतो. याच ‘पत्रा’त ४ फेब्रुवारी रोजी लायब्ररी स्थापनेसाठी दुसरी सभा कशी भरली, तोवर किती वर्गणी जमली होती आणि ७ फेब्रुवारी १८४८ रोजी लायब्ररी कशी सुरू झाली याचं सविस्तर वर्णन केले आहे. ‘‘हल्लीं लायब्ररींत ३०० बुकें आहेत व अखबारा चार आहेत. बरेंच चाललें आहे, व पुढें सुधारेल अशी आशा आहे.’’ या वाक्याने लोकहितवादींनी या ‘पत्रा’चा समारोप केला आहे.

वाचकांचा उत्तम प्रतिसाद

नगर वाचन मंदिरानं गेल्या काही वर्षांत अनेक आघाडय़ांवर जोमदार विस्तार केला आहे. संस्थेनं नावीन्याची आणि आधुनिकतेची कास धरल्याचं प्रकर्षांनं जाणवतं. संगणकीकरणामुळे ग्रंथालयाचा कारभार वाचकांबरोबरच आणि व्यवस्थापक, कर्मचारी यांच्यासाठी सोयीचा झाला आहे. इथली ग्रंथ वा पुस्तकांची संपूर्ण देवघेव संगणकीकृत यंत्रणेवर होते. ग्रंथालयात दाखल झालेली नवी पुस्तकं आणि ग्रंथ आदींची माहिती दर महिन्यातून दोन वेळा सर्व सदस्यांना ई-मेलवरून पाठवली जाते. ग्रंथालयाच्या संकेतस्थळावर ग्रंथालयात असलेल्या ७० हजार ग्रंथ व पुस्तकांची माहिती उपलब्ध आहे. त्यामुळे लेखकाचं नाव किंवा पुस्तकाचं नाव किंवा विषय या माहितीवरून आपण पुस्तकाचा अचूक क्रमांक शोधू शकतो आणि तो क्रमांक ग्रंथपालाकडे दिला की काही क्षणात तुमच्या हाती तुम्हाला हवं असलेलं पुस्तक सोपवलं जातं. ‘कोहा’ या संगणक प्रणालीत हे काम चालतं. अत्यल्प मासिक वर्गणी हेदेखील इथलं वैशिष्टय़ं. हजारो पुस्तकं या ग्रंथालयात असली तरी वाचकांसाठी दर वर्षी नव्यानं सहा ते सात लाखांची पुस्तकं खरेदी केली जातात. सभासद झाल्यानंतर पुस्तकांसाठी मासिक तीस रुपये वर्गणी आकारली जाते. पुण्याचा विस्तार लक्षात घेऊन संस्थेनं पुण्याच्या वेगवेगळ्या भागांत शाखा सुरू केल्या आहेत. बिबवेवाडी, वारजे, कोथरूड या भागांत या शाखा असून, तेथे वाचकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. त्याबरोबरच ‘ग्रंथ घरपोच योजना’ ही संस्थेची एक लक्षणीय योजना. या योजनेतील सभासदांच्या घरी संस्थेचा प्रतिनिधी आठवडय़ातून एकदा पुस्तकं घेऊन जातो. घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या या पुस्तक देवघेवीलाही उत्तम प्रतिसाद मिळत आहे. वेगवेगळ्या भागांतील वाचकांना पुस्तकांची, ग्रंथांची किती गरज आहे, हे त्यावरून सहजच लक्षात येतं. संस्थेतील अभ्यासिकाही नाममात्र शुल्कात चालवली जाते. पदवी परीक्षेचे तसेच स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी या अभ्यासिकेचा लाभ पन्नास रुपये महिना एवढय़ा अल्प शुल्कात घेतात. रोज अर्धा तास विनामूल्य ‘नेट’, शिवाय लॉकर, अभ्यासासाठी आवश्यक पुस्तकं अशा सुविधा देणारी ही अभ्यासिका चौदा तास खुली असते. इथला ‘वाचन हॉल’ही भव्य आहे. ग्रंथालयाचा बालविभागही समृद्ध असून त्याचाही लाभ शालेय विद्यार्थी मोठय़ा संख्येनं घेतात. संस्थेचा दिवाळी अंक उपक्रम अवघ्या शंभर रुपये वर्गणीत चालवला जातो आणि त्याचा लाभ पाच महिने घेता येतो. संस्थेने वाचकांसाठी सुरू केलेला कोणताही उपक्रम असो, त्याला वाचकांचा भरभरून प्रतिसाद मिळतो. मग तो वाचलेल्या पुस्तकांवर चर्चा करण्यासाठी दर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी सकाळी भरणारा वाचक कट्टा असो किंवा संस्थेतर्फे चालवल्या जाणाऱ्या नैमित्तिक व्याख्यानमाला असोत. महापुरुषांच्या जयंतीचे कार्यक्रम असोत, महिलांसाठी चालवले जाणारे उपक्रम असोत किंवा संस्थेतर्फे प्रदान केल्या जाणाऱ्या पुरस्कारांचे कार्यक्रम असोत, अशा प्रकारच्या सर्व कार्यक्रमांना वाचकांची छान साथ लाभते. ‘‘उत्तम वाचक आजही आहेत, अभ्यासू, जिज्ञासू वाचकही आहेत. लोकांना वाचायलाही आवडतंय. फक्त नव्या जमान्याचा विचार करून साहित्यसंपदा वाचकांपर्यंत योग्य रीतीनं पोहोचवण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्यामुळे नवे वाचक मोठय़ा संख्येनं ग्रंथालयाशी जोडले गेले, असा आमचा अनुभव आहे,’’ असं संस्थेचे कार्यवाह अरविंद रानडे सांगतात.

वास्तूचे वैभव

पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावर बेलबाग चौकात असलेली संस्थेची वास्तू ऐतिहासिक वारसा वास्तू असून, साडेतीन हजार चौरस फूट क्षेत्रफळाच्या दोन मजल्यांवर ग्रंथालयाचे कामकाज चालते. ग्रंथसंग्रहाबरोबरच इथली लाकडी कपाटे, भव्य टेबल्स, लाकडी खुच्र्या, तैलचित्रं, मराठी आकडे असलेलं दुर्मीळ घडय़ाळ या आणि अशा अनेक गोष्टी जुन्या काळाची साक्ष देतात. जुन्या काळात स्थापन झालेल्या संस्था कशा होत्या, त्यांची रचना कशी होती, याचा अभ्यास करायचा झाल्यास पुणे नगर वाचन मंदिराला भेट आवश्यकच.

यासाठी मदतीची गरज

नगर वाचन मंदिरातील दुर्मीळ ग्रंथ आणि पुस्तकांचं कायमस्वरूपी जतन करायचं झाल्यास या ग्रंथ व पुस्तकांच्या लाखो पृष्ठांचं डिजिटायझेशन करणं अत्यावश्यक आहे. त्यासाठी संस्थेने प्रयत्न सुरू केले असून शतकोत्तर वाटचाल करत असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील इतर ग्रंथालयांमधील दुर्मीळ ग्रंथसंपदेचंही जतन डिजिटायझेशनच्या माध्यमातून पुणे नगर वाचन मंदिराकडून करून दिलं जाणार आहे. हे काम खर्चीक पण महत्त्वपूर्ण असल्याने संस्थेला अर्थसाहाय्याची गरज आहे. हा संपूर्ण प्रकल्प दानशूरांच्या मदतीवरच चालणार आहे.

शासकीय अनुदान नाही

या संस्थेच्या आणखी एका वैशिष्टय़ाचा उल्लेख आवर्जून करावा लागेल. संस्था कोणत्याही प्रकारच्या शासकीय अनुदानावर चालवली जात नाही. संस्थेच्या इमारतीत असलेल्या बँका आणि अन्य व्यावसायिकांकडून मिळणारे भाडे व संस्थेला मिळणाऱ्या देणग्या यावर संस्थेचा कारभार समर्थपणे चालवला जात आहे. ग्रंथ आणि पुस्तकांच्या खरेदीबरोबरच संस्थेकडे असलेल्या दुर्मीळ साहित्यसंपदेचं जतन व्हावं, या हेतूने संस्थेने डिजिटायझेशनचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला असून, या प्रकल्पात गेल्या वर्षी विविध ग्रंथांच्या पन्नास हजार पानांचे डिजिटायझेशन पूर्ण झाले आहे. अशाच पद्धतीने दर वर्षी लाखभर पृष्ठांचं डिजिटायझेन करण्याचं नियोजन करण्यात आलं आहे.

दुर्मीळ ग्रंथांचे भांडार

या ग्रंथालयातील दुर्मीळ ग्रंथसंपदा जिज्ञासूंच्या अभ्यासासाठी, जुने संदर्भ शोधण्यासाठी, तत्कालीन परिस्थिती समजून घेण्यासाठी अत्यंत उपयुक्त अशी आहे. दुर्मीळ आणि ऐतिहासिक संदर्भ असलेल्या ग्रंथांची संख्या सुमारे दोन हजार इतकी आहे. शब्दश: शेकडो उदाहरणं देता येतील, की ज्या ग्रंथांना आणि पुस्तकांना काही ना काही इतिहास आहे, अशी ग्रंथसंपदा इथे पाहायला मिळते. पं. नेहरूंच्या मंत्रिमंडळातील बॅरिस्टर न. वि. गाडगीळ यांचा संस्थेवर विशेष लोभ होता. त्यांनी त्यांना भेट म्हणून आलेली भारतीय राज्यघटनेची प्रत या संस्थेला दिली आहे. हे आणि असे शेकडो ग्रंथ हे या संस्थेचं खरंखुरं वैभव आहे.

आचार्य अत्रे हे तर संस्थेचे सदैव हितैषी राहिले. संस्थेबद्दल त्यांनी ८ जानेवारी १९६७ रोजी ‘‘ह्य़ाच संस्थेने माझ्या साहित्यिक जीवनाचा पाया घातला. संस्थेचे उपकार मानण्यास मजजवळ शब्द नाहींत. पुण्यातील वाङ्मयप्रेमी तरुणांना स्फूर्ति नि प्रेरणा देण्याचे महान कार्य ह्य़ा संस्थेकडून होवो ही इच्छा!’’ असा अभिप्राय लिहिला आहे. ‘‘या संस्थेचा २७-२८ वर्षांपूर्वी मी सदस्य होतो व येथील पुस्तके अधाशीपणें वाचत होतो,’’ अशी मधू लिमये यांनी लिहिलेली आठवणही संस्थेच्या अभिप्राय पुस्तकात वाचायला मिळते. एस. एम. जोशी हेही संस्थेचे सदस्य होते. ‘ज्ञानदीप लावू जगी’ हे संत नामदेववचन संस्थेचं ध्येय वाक्य आहे. त्यानुसार संस्थेची वाटचाल सुरू आहे.

संस्थेपर्यंत कसे जाल?

पुणे नगर वाचन मंदिर : पुणे नगर वाचन मंदिर लक्ष्मी रस्त्यावर आहे. बेलबाग चौक वा सिटी पोस्ट ही संस्थेजवळची खूण. १८१ बुधवार पेठ, पुणे-४११००२

धनादेश -‘पुणे नगर वाचन मंदिर’ (pune nagar vachan mandir) या नावाने काढावा.  धनादेशामागे अथवा सोबत देणगीदाराने त्याचे संपूर्ण नाव, पत्ता, दूरध्वनी तसेच मोबाइल क्रमांक लिहावा. संस्थेकडे धनादेश सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस सुपुर्द केले जातील.

देणगी ‘८०-जी’ अंतर्गत करसवलतीस पात्र.

ग्रंथसंपदा

  • ६० हजार मराठी ग्रंथ व पुस्तके
  • १२ हजार इंग्रजी ग्रंथ व पुस्तके
  • २ हजार दुर्मीळ ग्रंथ
  • १२५ नियतकालिके, २२ वृत्तपत्रे

 

विनायक करमरकर

First Published on September 3, 2017 3:56 am

Web Title: sarva karyeshu sarvada 2017 pune nagar vachan mandir