|| विश्वास पवार

विशेष मुलांना शिक्षण देऊन त्यांना स्वत:च्या पायावर उभे करण्याचे काम वाईतील ‘रिव्हका साहिल अक्षर इन्स्टिटय़ूट’ गेल्या सुमारे साडेतीन दशकांपासून करत आहे. विशेष मुलांना शिकवणाऱ्या शिक्षकांना प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेच्या अभ्यासक्रमाला सरकारनेही मान्यता दिली आहे. पुढे याच विषयात पदविका अभ्यासक्रम सुरू झाला आणि राज्यभरातील विशेष मुलांची ‘अक्षर’वाट संस्थेने सुकर केली.

विशेष मुलांच्या गरजा, मर्यादा आणि क्षमता ओळखून त्यांना स्वत:च्या पायावर उभे करणे हे मोठे आव्हान असते. वाईतील ‘रिव्हका साहिल अक्षर इन्स्टिटय़ूट’ गेली ३६ वर्षांपासून हे आव्हान पेलते आहे.

वाईसारख्या छोटय़ाशा शहरात १९८२ साली या कार्याची सुरुवात झाली. ‘वाई अक्षर इन्स्टिटय़ूट’ या नावाने त्या वेळी हे कार्य सुरू झाले. या संस्थेच्या स्थापनेमागे अशीच एक वेदना प्रेरणा बनून पुढे आली आणि त्यातून हा आधारवड उभा राहिला. डॉ. पंडित आणि उषा या टापरे दाम्पत्याला १९७५ साली झालेला मुलगा उमेश हा जन्मत:च गतिमंद होता. वैद्यकीय सल्ले-उपचार सुरू झाले. पण, कुठेही आशेचा किरण दिसत नव्हता. एका बालरोगतज्ज्ञाने तर त्यांना अगदी ‘या मुलावर खर्च करू नका, त्याचा उपयोग होणार नाही. त्याची बुद्धी फक्त सहा वर्षांच्या मुलाएवढीच वाढेल,’ असे सांगत नाउमेद केले. हे ऐकल्यानंतर ते पुरते खचून गेले. पण तरीही त्यांनी प्रयत्न सोडले नाहीत. याच काळात अन्य एका बालरोगतज्ज्ञाने मानसिक आधार दिला आणि मार्गदर्शनही केले. यावर उपचार असल्याचा आशावाद त्यांनी व्यक्त केला. हाच आशावाद घेत उमेश वाढू लागला. दैनंदिन गोष्टींसाठी आई-वडील झटत होते. पण, पुढे त्याच्या शिक्षणाचा प्रश्न आला आणि या दाम्पत्याची अस्वस्थता आणखी वाढली. त्याला सामान्य शाळेत घातले. पण, तिथे शाळेचे जग त्याच्या आकलनापलीकडचे होते. अशा विशेष मुलांसाठी त्या काळी स्वतंत्र शिक्षणाची सोयही नव्हती. दरम्यान, टापरे दाम्पत्याचा प्रा. विजयकुमार फरांदे यांच्याशी संपर्क झाला. मग, त्यांच्या प्रेरणेतून अशा मुलांच्या पालकांसाठी वाईत एक मेळावा घेण्याचे ठरले. या विषयातील तज्ज्ञ व्यक्तींना निमंत्रित करीत त्यांच्याकडून मार्गदर्शन घेण्याचे ठरले. त्यासाठी आधी गतिमंद मुलांचा शोध सुरू झाला. त्यात वाई परिसरात अशी ४५ मुले आढळली. या मुलांच्या पालकांसाठी वाईत १९८१ मध्ये एका मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. मेळाव्यात मुलांची तपासणी झाली आणि पुण्याच्या कामायनी संस्थेच्या संस्थापक सिंधूताई जोशी यांचे मार्गदर्शनही लाभले.

विशेष मुलांच्या विकासासाठी काही तरी करण्याच्या धडपडीचे हे पहिले पाऊल होते. यातून या मुलांच्या पालकांची संघटना तयार झाली आणि त्यांच्या शिक्षणासाठीच्या प्रयत्नांना गती आली. याच काळात अविनाश पंडित यांची या विशेष मुलांसाठीच्या धडपडीत सहभागी असलेले प्रा. प्रकाश सावंत यांच्याशी भेट झाली. त्यांनी या मुलांची व्यथा त्यांच्या कानी घातली. या चर्चेतून पंडित यांचे धाकटे बंधू आशुतोष पंडित हे अहमदाबादला गतिमंदांसाठी काम करतात हे समजले. या कार्यकर्त्यांना आशेचा नवा किरण मिळाला. त्यांनी याचा पाठपुरावा सुरू केला आणि पुढे काही दिवसांतच प्रत्यक्ष पंडित हेच वाईत दाखल झाले. त्यांनी या मुलांच्या पालकांच्या भेटी घेतल्या आणि या मुलांसाठी स्वतंत्र शिक्षणाचा विचार रुजवला.

पालक एकत्र आले, त्यांनी हे काम सुरू करण्याचेही ठरवले. पण पहिलाच प्रश्न उभा राहिला, या मुलांना शिकवणार कोण आणि शिकवायचे झाले तरी ते कसे? यावरही पंडित यांनीच मार्ग काढला. या पालकांना, त्यातही या मुलांच्या मातांना एकत्र करीत ते म्हणाले, की तुम्ही आतापर्यंत तुमच्या मुलांना चालायला, खायला, बोलायला जसे शिकविले तसेच अन्य गोष्टींचे शिक्षणही द्यायचे. मी तुम्हाला मार्गदर्शन करेनच, पण यात तुमची मदत, कष्ट करण्याची तयारीदेखील लागेल. या पालकांचे शिक्षण-प्रशिक्षण सुरू झाले आणि यातून तयार झालेल्या पालकांच्या आधारे ४ मार्च १९८२ रोजी या अशा विशेष मुलांसाठीच्या शाळेचा पहिला वर्ग वाईत एका मंदिरात भरू लागला. मंदिर, एका लॉजची खोली आणि पुढे वाईतील एक कापड व्यापारी सुगनमल तथा चाचा अलवाणी यांनी देणगी म्हणून दिलेल्या तीन खोल्यांमध्ये ही शाळा भरू लागली.

दर दोन महिन्यांनी पंडित हे अहमदाबादहून वाईला यायचे. या शाळेत शिकवण्याचे काम करणाऱ्या पालकांना शिकवण्याचे प्रशिक्षण द्यायचे. पंडित यांच्याबरोबर त्यांचे मित्रही येऊन मार्गदर्शन करू लागले. सुरुवातीच्या काळात या पालकांचीच मुले शाळेत येत होती, पण जसजशी त्याची माहिती पसरू लागली तशी विद्यार्थीसंख्या ३० पर्यंत गेली. पुढे १९८५ साली आशुतोष पंडित शाळेमध्ये पूर्णवेळ रुजू झाले.

‘विशेष शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रम’ 

जून १९८६ पासून त्यांनी संस्थेत ‘विशेष शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रम’ सुरू केला. त्यास महाराष्ट्र सरकारची मान्यताही मिळाली. यात सर्वप्रथम शाळेचा सगळा कर्मचारीवर्ग प्रशिक्षित झाला. या अभ्यासक्रमाचा फायदा बाहेरील शिक्षकही घेऊ लागले. १९९२ पासून संस्थेत या विषयावर ‘पदविका अभ्यासक्रम’ सुरू झाला आणि या विषयात एक मोठा टप्पा पार झाला.

आज शाळेत शंभर गतिमंद विद्यार्थी आहेत. त्यांना स्वावलंबन, भाषा विकास, बौद्धिक विकास, वाचन, लेखन, संख्याज्ञान, हिशेब, सामान्यज्ञान, गृहकौशल्य  इत्यादी विषयांचे शिक्षण दिले जाते. या मुलांमध्ये अतिशय तीव्र गतिमंदत्व असलेली, अतिचंचल (हायपर अ‍ॅक्टिव्ह), स्वमग्न अशी मुले आहेत. या सर्वाबरोबर शिक्षकांना सहनशीलतेने वागावे लागते. १८ वष्रे पूर्ण झाली की, ही मुले शाळेच्या बाहेर पडतात. त्यांना पुन्हा समाजात वेडे, गतिमंद म्हणून हिणवले जाऊ नये म्हणून १९८९ पासून संस्थेने प्रौढ गतिमंदांसाठी कार्यशाळा सुरू केली. तिथे सध्या ५६ प्रौढ गतिमंद आहेत. त्यांना स्वावलंबनाचे धडे दिले जातात. यातून पायपुसणी, कपडय़ाची फुले, औषधांसाठीची पाकिटे, लोकरी रुमाल, कागदी पिशव्या, खडू, मेणबत्या बनवल्या जातात. सौम्य गतिमंद असलेल्या काही प्रौढ व्यक्ती शेतीकाम, दुकानात मदतनीस म्हणून काम करतात. संस्थेतर्फे गतिमंद मुलांच्या गरजा व क्षमता यावर आधारित ‘अक्षर समायोजित वर्तन परिमाण’ ही बौद्धिक चाचणी तयार केली आहे. गतिमंदांच्या विषयावरील अनेक पुस्तके संस्थेतर्फे प्रकाशित केलेली आहेत. गतिमंद मुलाच्या आईचे कष्ट लक्षात घेऊन संस्थेने आदर्श माता पुरस्कार सुरू केला आहे.

हा प्रकल्प सुरू झाला त्या वेळी ‘वेडय़ांची शाळा’ म्हणून हिणवले जायचे. गतिमंद वगरे संकल्पना आजही समजून घेण्यात समाज कमी पडतो. या शाळेत येणारी मुले ही वाई परिसरातील ४५ गावांमधून येतात. या मुलांना शाळेत येताना अन्य मुलांकडून त्रास व्हायचा. अनेकांच्या घरची आर्थिक स्थिती बेताची असल्याने आई-वडील दोघांनाही रोजगारासाठी बाहेर पडावे लागे. मग या मुलांना शाळेपर्यंत ये-जा करणेही अवघड होई. अखेर काही दानशूरांच्या मदतीने या मुलांसाठी बस घेण्यात आल्या. या बसमधून आता ही मुले आणि प्रौढ सुरक्षितपणे शाळेत ये-जा करू लागले.

दरम्यान, १९८२ साली ज्या इमारतीतून संस्थेचे कार्य सुरू झाले, ती जुनी झाली होती. छत गळू लागले होते, भिंतींना भेगा पडल्या होत्या, पावसाळय़ात इमारतीत पाणी साचायचे. मग मुलांना घरी पाठवावे लागायचे. २००६ मध्ये तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे पुतणे आणि जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ डॉ. अशोकराव जोशी यांनी संस्थेला भेट दिली. शाळेची ही दुरवस्था पाहिल्यानंतर त्यांनी संस्थेला नवीन इमारत बांधून देण्याचा संकल्प सोडला आणि तो पूर्णही केला. संस्थेने कृतज्ञता म्हणून त्यांची नात आणि नातवाच्या नावाची संस्थेच्या नावात भर घालून ‘रिव्हका साहिल अक्षर इस्टिटय़ूट’ असे संस्थेचे नामकरण केले. ही संस्था आजही अनेक अडचणी, आव्हानांचा सामना करीत निरंतर कार्य करते आहे. संस्थेत २८ कर्मचारी आहेत. यातील अनेक जण तुटपुंज्या पगारावर काम करतात. दैनंदिन खर्च, मुलांसाठी बसचा खर्च आदी भागवण्यासाठी संस्थेला मदतीची गरज आहे. या मुलांच्या रोजगारासाठी नवनव्या योजना उभ्या करणे गरजेचे आहे. पण निधीअभावी या साऱ्या योजना केवळ कागदावरच आहेत. समाजाकडून मदतीचा हात मिळाला तर या मुलांचे आयुष्यही प्रकाशमान होऊ शकेल.

संस्थेपर्यंत कसे पोहोचाल?

रिव्हका साहिल अक्षर इन्स्टिटय़ूट

पुण्यापासून ८५ किलोमीटरवर वाई आहे. वाई शहरातील कन्या शाळेजवळ ही संस्था आहे. शहरात पोहोचल्यावर खासगी वाहन किंवा रिक्षाने संस्थेपर्यंत पोहोचता येते.

धनादेश -‘ रिव्हका साहिल अक्षर इस्टिटय़ूट, वाई ’

(Rivka Sahil Akshar Institute, Wai)

या नावाने काढावा.  धनादेशामागे अथवा सोबत देणगीदाराने त्याचे संपूर्ण नाव, पत्ता, दूरध्वनी तसेच मोबाइल क्रमांक लिहावा. त्यावरून संस्थेला पावती पाठविता येईल. संस्थेकडे धनादेश ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस सुपूर्द केले जातील.

पुढील योजना

संस्थेसाठी स्वतंत्र जागा घेऊन तिथे रोजगारनिर्मितीसाठी एक औद्योगिक केंद्र, शेतीशी निगडित प्रकल्प राबवण्याचा संस्थेचा संकल्प आहे. विशेष मुलांसाठी कायमस्वरूपी समुपदेशन केंद्र सुरू करायचे आहे. गतिमंदांच्या क्षेत्रातील वाङ्मय मराठीत तयार करण्याची संस्थेची योजना आहे. सध्या संस्थेत २८ कर्मचारी आहेत. यातील अनेक जण तुटपुंज्या वेतनावर काम करतात. त्यांच्या वेतनवाढीबरोबरच आगामी प्रकल्पपूर्तीसाठी संस्थेला निधीची गरज आहे.