19 January 2020

News Flash

सर्वकार्येषु सर्वदा २०१९ : ‘स्नेहवनी’ फुलला, ‘पाखरांचा मळा’..

स्नेहवन आता फुलते आहे.. दोन एकरांच्या जागेतील या पहिल्या इमारतीत एक समृद्ध वाचनालय उभे राहते आहे

दिनेश गुणे

मराठवाडय़ातील आत्महत्याग्रस्त, पिचलेल्या आणि दुष्काळ-दारिद्रय़ाशी सामना करताना हतबल झालेल्या मुलांचं भविष्य घडवायचं असेल, तर त्यांच्या मानसिक, शारीरिक आणि बौद्धिक विकासासाठी वेगवेगळे उपक्रम राबवावे लागतील, हे ओळखून मराठवाडय़ातीलच अशोक आणि अर्चना देशमाने या तरुण दाम्पत्यानं पुण्याजवळ मोठय़ा हिकमतीनं ‘स्नेहवन’चं स्वप्न बाळगलं. आज ते प्रत्यक्षात उतरलं असलं, तरी ‘स्नेहवन’चा परीघ आणखी रुंदावण्यातच खरी स्वप्नपूर्ती आहे. त्यासाठी हवे आहेत अनेक मदतीचे हात..

त ळेगावला उतरून चाकणच्या एमआयडीसीच्या खाचखळग्यांनी भरलेल्या रस्त्यातील वाहनांच्या कोंडीत पुरते अडकून तब्बल दोन तासांचा प्रवास केला, की कोयाळी फाटा लागतो. काहीसा जंगल-झुडपांनी वेढलेला, एकाकी आणि उदास वाटणारा एक रस्ता आपल्याला पुढे घेऊन जातो. हा त्या गावाचा स्मशानाकडे जाणारा रस्ता.. पण त्याआधीच उजवीकडे अचानक आपली नजर स्थिरावते, आणि एक चकचकीत वास्तू खुणावते. हेच ते स्नेहवन! मराठवाडय़ातील आत्महत्याग्रस्त, पिचलेली आणि दुष्काळ-दारिद्रय़ाशी सामना करताना हतबल झालेली कुटुंबे पाहून मराठवाडय़ाच्याच परभणीतील मंगरूळ या गावातील अशोक देशमाने नावाच्या पंचविशीतल्या अस्वस्थ तरुणाने आपली आयटी क्षेत्रातली चांगली नोकरी सोडली, आणि आत्महत्याग्रस्त, शेतमजूर आणि दरिद्री कुटुंबांतील मुलांचे भविष्य घडविण्याच्या ध्यासाने त्याला पछाडले. याच वास्तूत अशोक, त्याची पत्नी अर्चना, त्यांची दीड वर्षांची मुलगी आनंदी, आणि चार-पाच वर्षांपासून ते सतरा-अठरा वर्षांपर्यंतची पन्नास मुले असे एक मोठ्ठे कुटुंब आनंदाने एकत्र राहते..  जवळपास सहा महिन्यांपूर्वी स्नेहवनच्या प्रकल्पाची खऱ्या अर्थाने याच वास्तूत सुरुवात झाली. त्याआधी, पुण्याजवळ भोसरी येथे एका गल्लीतील अडीच खोल्यांच्या लहानशा घरात अशोक आणि अर्चनाचा पन्नास मुलांसोबतचा संसार सुरू होता. शिवाय गावाजवळ पालं ठोकून राहणाऱ्या व कचरा वेचून पोट भरणाऱ्या कुटुंबांतील ३० मुलींचे शैक्षणिक पालकत्वही अशोकने स्वीकारले आहे. या मुलांचे भविष्य घडवायचे असेल, तर त्यांच्या मानसिक, शारीरिक आणि बौद्धिक विकासासाठी वेगवेगळे उपक्रम राबवावे लागतील, त्यांच्याभोवतीच्या आक्रसलेल्या भिंतींच्या कक्षा काढाव्या लागतील, त्यासाठी मोठी जागा असणे गरजेचे होते.

याच काळात या दाम्पत्याला मुलाची नुकती चाहूल लागली होती. पन्नास मुलांचा सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण आणि शाळेचे डबे बनवून झाल्यावर गर्भवती अर्चना नियमित तपासण्यांसाठी भोसरीतल्याच डॉक्टर रवींद्र आणि स्मिता कुलकर्णीच्या दवाखान्यात जायची. पहिल्याच बाळंतपणासाठी दवाखान्यात आलेली ही पंचविशीतील मुलगी पन्नास लेकरांचे आईपण हसतमुखाने पेलवतेय, हे समजल्यावर डॉक्टर कुलकर्णी दाम्पत्य भारावून गेलेच होते. अशोक आणि अर्चनाकडून स्नेहवनची माहिती घेतानाच, बाहेरूनही ते संस्थेची माहिती मिळवत होते. अशोकला या संस्थेसाठी मोठय़ा जागेची निकड आहे, पण जेमतेम उत्पन्नातून दररोजचा खर्च भागवतानाच मेटाकुटीला येणाऱ्या या तरुण जोडप्याकडे संस्थेसाठी जागा विकत घेण्याएवढा निधी नाही, हेही त्यांना कळले. एक दिवस गप्पा मारताना अशोकने डॉक्टर कुलकर्णीसमोर आपले स्वप्न मांडले, आणि आळंदी वडगाव रोडवर कोयाळी फाटय़ाजवळील आपल्या आठ एकर जमिनीपैकी दोन एकर जमीन स्नेहवनला देण्याचे डॉ. रवींद्र कुलकर्णीनी ठरविले. पुढच्या काही दिवसांतच दोन एकर जागा ९९ वर्षांच्या कराराने स्नेहवनच्या नावावर हस्तांतरित झाली होती.

स्नेहवनच्या स्वप्नातली एक वास्तू कोयाळी फाटय़ावरच्या दोन एकरांच्या परिसरात उभी राहिली आहे. स्नेहवनच्या या इमारतीत राहणाऱ्या पन्नास मुलांची कहाणी जवळपास सारखीच आहे. कुणाच्या वडिलांनी आत्महत्या केलेली, कुणाचे वडील शेतमजुरी करत जगण्याशी झुंज देताहेत, कुणाचे छत्र हरवलेले.. अशा मुलांना आपल्या मायेची ग्वाही देऊन अशोकने त्यांना स्नेहवनच्या सावलीत आणले. पहिली-दुसरीपासून बारावीपर्यंत शिकणारी पन्नास मुले आज स्नेहवनात सौख्याने वावरताहेत. पहाटे पाच वाजता स्नेहवनचा दिवस सुरू होतो. आन्हिके आवरल्यावर प्रार्थना, योगाभ्यास, गृहपाठ आणि शाळेची तयारी सुरू होते, तेव्हा  मुलांच्या नाश्त्याची आणि जेवणाच्या डब्यांसाठी अर्चनाची  लगबग सुरू असते.

स्नेहवन आता फुलते आहे.. दोन एकरांच्या जागेतील या पहिल्या इमारतीत एक समृद्ध वाचनालय उभे राहते आहे. देणगीरूपाने मिळालेली अडीच हजारांहून अधिक वेचक पुस्तके येथे दिसतात. येथील प्रत्येक पुस्तक प्रत्येकाने वाचले पाहिजे, असा स्नेहवनचा नियम आहे. दररोज संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर स्नेहवनची मुले रिंगण करून अंगणात बसतात. आपण वाचलेल्या पुस्तकाची माहिती देतात, आणि आपल्याला त्यातील काय आवडले, काय कळले, हेही सांगतात. मग ज्यांनी ते पुस्तक वाचले नसते, त्याच्या हाती दुसऱ्या दिवशी ते पुस्तक नक्की दिसते. एका खोलीत होऊ घातलेल्या संगणक प्रशिक्षण केंद्रात मुलांना जगाच्या ज्ञानाची कवाडे खुली करण्यात येणार आहेत. नुकताच एका आंतरराष्ट्रीय संस्थेच्या निमंत्रणावरून अशोक दहा दिवसांचा अमेरिकेचा दौरा करून आला. सेवाभावी संस्थांचे प्रचालन, व्यवस्थापन, नव्या प्रकल्पांची आखणी आणि कार्यवाही, अशा अनेक विषयांच्या संकल्पनांना या दौऱ्यात नवे धुमारे फुटले. भविष्यात या संगणक केंद्रात स्नेहवनातील मुले अमेरिकेतील समवयस्क मुलांशी, तेथील नामवंत शाळांच्या शिक्षकांशी व काही कुटुंबांशीही, इंटरनेटद्वारे संवाद साधतील. मराठवाडय़ातील उपेक्षित कुटुंबांतील ही ‘लोकल’ मुले भविष्यातील ‘ग्लोबल’ नागरिक बनविण्याचे अशोकचे स्वप्न इथे साकारणार आहे.. प्रार्थनागृह, पन्नास मुलांच्या राहण्या-झोपण्याची व्यवस्था, स्वयंपाकघर आणि सभागृहदेखील तयार आहे. अडीच खोल्यांतील आधीचा संसार तर नव्याने थाटून झाला आहे. पण फक्त रोजचा दिवस पुढे ढकलणे हे स्नेहवनचे ध्येय नाही. इथे असलेल्या प्रत्येक मुलास उद्याचा जबाबदार, संवेदनशील, सुसंस्कृत -आणि बहुश्रुतही- नागरिक बनवायचे, हे स्नेहवनचे ध्येय आहे. पण एवढय़ावरच थांबायचे नाहीये..

अशोकला मोकळ्या जागेवर सुसज्ज शाळा बांधायची आहे. स्नेहवनच्या मुलांना, त्यांच्यातील कलागुणांना आणि भविष्य घडविण्यासाठी आवश्यक असलेल्या कौशल्याला वाव देणारे शिक्षण या शाळेत दिले जाणार आहे. इथे ‘स्वर्गीय नलिनीताई कुलकर्णी ज्ञानग्राम’ उभे राहते आहे! बाजूच्या एका इमारतीत गोशाळा उभी राहते आहे. आणि मुलांचे ग्रामीण जीवनशैलीसोबतचे नाते भविष्यातही अधिक घट्ट व्हावे यासाठी शेती, फळे, भाज्यांची लागवड मशागत करण्यासाठी जमिनीचा एक तुकडा आसुसला आहे.

सुमारे सहा महिन्यांपूर्वी स्नेहवनचा संसार भोसरीहून कोयाळी फाटय़ावरील या जागेत येऊन स्थिरावला. अजूनही रोजचे पिण्याचे पाणी विकत आणावे लागते. त्यामुळे दैनंदिन वापराच्या पाण्याची काहीतरी सोय करणे गरजेचेच होते. त्याचा विचार करत असताना, याच जागेतील एका खड्डय़ात ओलावा असल्याची चाहूल लागली. जमिनीच्या पोटात मुरलेले पाणी उताराच्या दिशेने येऊन येथे थांबत असावे, असा तर्क केला, आणि मुलांचीच फौज मदतीला घेऊन अशोकने तेथे पुरुषभर उंचीचा, दहाबारा फूट व्यासाचा एक खड्डा तयार केला. दुसऱ्या दिवशी सकाळी, त्या खड्डय़ात चारपाच फूट पाणी साचले होते. ही विहीर नाही. पाझरणारे पाणी साठविण्याचा लहान तलाव आहे. पण यातील पाण्यामुळे दैनंदिन वापराच्या पाण्याची सोय झाली. हा पर्याय कायमचा नसला, तरी तात्पुरता प्रश्न मिटला आहे. उद्या प्रकल्पाचा विस्तार करताना पाण्याचा प्रश्न सोडविण्याची काहीतरी उपाययोजना करावी लागणारच आहे.

स्नेहवन हा अशोक आणि अर्चनाच्या ध्यासातून आणि सेवाभावातून फुललेला प्रकल्प असला, तरी आता त्याच्यासोबत काही हितचिंतक जोडले गेले आहेत. नोकरी सोडल्यावर आपल्या आयुष्याचे सोने झाले, असे मानणाऱ्या अशोकच्या प्रामाणिक प्रयत्नांचे फळ त्यांनी पाहिले, अनुभवले आहे. तरीही प्रकल्प पूर्ण होण्याकरिता या हातांना आणखी काही मनांची आणि हातांचीही साथ हवी आहे.  निरपेक्ष सेवाभावाची काही मोजकी मंदिरे हे महाराष्ट्राचे वैभव आहे. भविष्यात अशी मंदिरे उभारली जाणे ही गरज आहे. आपले आयुष्य त्यासाठी वेचण्याच्या ध्यासाने उतरलेल्या अशोक आणि अर्चना देशमाने यांचे स्नेहवन अशा हातांची आणि मनांची वाट पाहात आहे..

.. आणि माळरानाला पाझर फुटला!

सुमारे सहा महिन्यांपूर्वी स्नेहवनचा संसार भोसरीहून कोयाळी फाटय़ावरील या जागेत येऊन स्थिरावला. त्याआधी या परिसरात केवळ माळरान होते. पाण्याचे तर कायमचे दुर्भिक्ष्यच होते. त्यामुळे दैनंदिन वापराच्या पाण्याची काहीतरी सोय करणे गरजेचेच होते. त्याचा विचार करत असताना, याच जागेतील एका खड्डय़ात ओलावा असल्याची चाहूल लागली. जमिनीच्या पोटात मुरलेले पाणी उताराच्या दिशेने येऊन येथे थांबत असावे, असा तर्क केला, आणि मुलांचीच फौज मदतीला घेऊन अशोकने तेथे  पुरुषभर उंचीचा, दहाबारा फूट व्यासाचा एक खड्डा तयार केला. दुसऱ्या दिवशी सकाळी, त्या खड्डय़ात चार-पाच फूट पाणी साचले होते. त्या दिवशीही  स्नेहवनाने आनंदोत्सव साजरा केला!

अशोक स्वभावत कवी आहे. त्याच्या डोळ्यांत कविता आणि भविष्याची स्वप्ने एकाच वेळी तरळत असतात, आणि त्याच्याशी बोलताना ती आपल्यासमोर जिवंत होतात. स्नेहवनच्या पायरीवर बसून गप्पा मारताना अशोकची नजर समोरच्या मोकळ्या जागेवर एकाएका ठिकाणी स्थिरावते, आणि त्याच्या वर्णनातून तेथे भविष्यात साकारणारी स्वप्ने जिवंत होतात. समोर एक सुसज्ज शाळा बांधायची आहे. स्नेहवनच्या मुलांना, त्यांच्यातील कलागुणांना आणि भविष्य घडविण्यासाठी आवश्यक असलेल्या कौशल्याला वाव देणारे शिक्षण या शाळेत दिले जाणार आहे..

संस्थेपर्यंत कसे पोहोचाल?

पुणे जिल्ह्य़ातील आळंदी- वडगाव घेणंद रस्त्यावरील कोयाळी फाटय़ावरून पुढे गेले, की वडगाव नर्सरीच्या जवळ.

स्नेहवन’ (Snehawan)

या नावाने धनादेश काढावा. धनादेशामागे किंवा त्यासोबत देणगीदाराने आपले संपूर्ण नाव, पत्ता, दूरध्वनी तसेच मोबाइल क्रमांक लिहावा. संस्थेकडे धनादेश ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस सुपूर्द केले जातील. संस्था ‘८०-जी’ करसवलतप्राप्त आहे.

धनादेश येथे पाठवा.. : एक हजार किंवा त्याहून अधिक रुपयांची देणगी देणाऱ्यांची नावे ‘लोकसत्ता’त प्रसिद्ध केली जातील.

मुंबई कार्यालय

लोकसत्ता, संपादकीय विभाग,मफतलाल सेंटर, सातवा मजला, नरिमन पॉइंट, मुंबई – ४०००२१,  ०२२-६७४४०२५०

महापे कार्यालय  

संपादकीय विभाग, प्लॉट नं. ईएल १३८, टीटीसी इंड. एरिया, एमआयडीसी, महापे, नवी मुंबई – ४००७१०.  ०२२-२७६३९९००

ठाणे कार्यालय    

संपादकीय विभाग, कुसुमांजली बिल्डिंग, दुसरा मजला, गोखले रोड, नौपाडा, ठाणे.  ०२२-२५३९९६०७

पुणे कार्यालय      

संपादकीय विभाग, एक्स्प्रेस हाऊस, प्लॉट नं. १२०५/२/६, शिरोळे रस्ता, पुणे – ४११००४.  ०२०-६७२४११२५

नाशिक कार्यालय       

संपादकीय विभाग, स्टेडियम कॉम्प्लेक्स नं. ६, पहिला मजला, महात्मा गांधी मार्ग, नाशिक – ४२२००१.  ०२५३-२३१०४४४

नागपूर कार्यालय       

संपादकीय विभाग, प्लॉट नं. ३८, अ‍ॅडिसन ट्रेड सेंटर, अंबाझरी, नागपूर – ४४००१०, ०७१२ झ्र् २२३०४२१

औरंगाबाद कार्यालय        

संपादकीय विभाग, १०३, गोमटेश मार्केट, गुलमंडी,  औरंगाबाद. दूरध्वनी क्रमांक ०२४०-२३४६३०३, २३४८३०३

नगर कार्यालय       

संपादकीय विभाग, १६६, अंबर प्लाझा, स्टेशन रोड, अहमदनगर. ०२४१-२४५१५४४/२४५१९०७

दिल्ली कार्यालय       

संपादकीय विभाग, द इंडियन एक्स्प्रेस बिल्डिंग, बी१/ बी, सेक्टर १०, नॉएडा- २०१३०१.

०११-२०६६५१५००

First Published on September 7, 2019 4:26 am

Web Title: sarva karyeshu sarvada 2018 snehawan organization in maharashtra
Next Stories
1 आमचा सन्मान.. आमचं संविधान!
2 सर्वकार्येषु सर्वदा २०१९ : माणूस घडविणारी शाळा
3 सर्वकार्येषु सर्वदा २०१९ : रुग्णसेवेचे व्रत
Just Now!
X