30 March 2020

News Flash

सर्वकार्येषु सर्वदा २०१९ : मृत जलस्रोतांना संजीवनी

गावातील महिला-मुलींना हंडाभर पाण्यासाठी दररोज काही किलोमीटर पायपीट करावी लागते.

प्रतिनिधी

मुंबईला रोज कोटय़वधी लिटर्सचा पाणीपुरवठा करणाऱ्या ठाणे जिल्ह्य़ातील शहापूर आणि मुरबाड या दोन तालुक्यांतील पाणीटंचाई दूर करण्याचे यशस्वी प्रयत्न ‘वसुंधरा संजीवनी मंडळ’ गेल्या चार वर्षांपासून करीत आहे. तलावांची देखभाल-दुरुस्ती केली, तर या दोन्ही तालुक्यांत आणखी कोटय़वधी लिटर्स अतिरिक्त पाणीसाठा उपलब्ध होऊ शकेल, हे संस्थेने काही गावांमध्ये राबविलेल्या उपक्रमांतून दाखवून दिले आहे..

राज्यातील इतर भागांच्या तुलनेत ठाणे, रायगडसह कोकणात मुबलक पाऊस पडत असला, तरी उन्हाळ्यातील चार महिने अनेक गावपाडय़ांमध्ये भीषण पाणीटंचाई भेडसावते. ठाणे जिल्ह्य़ाचा ग्रामीण भागही त्यास अपवाद नाही. त्यात विरोधाभास असा की, मुंबई-ठाण्याला पाणीपुरवठा करणारी धरणे ज्या भागांत आहेत, त्या मुरबाड आणि शहापूर तालुक्यांतील शेकडो गावपाडय़ांमध्ये उन्हाळ्यात पाण्याचे दुर्भिक्ष असते. गावातील महिला-मुलींना हंडाभर पाण्यासाठी दररोज काही किलोमीटर पायपीट करावी लागते. पावसाळ्यात नैसर्गिक ओढे-नाले दुथडी भरून वाहतात, विहिरी तुडुंब भरतात. मात्र, हे सर्व जलस्रोत जानेवारी महिन्यापासून आटू लागतात. मग त्यानंतर पाऊस पडेपर्यंत शेकडो गावांतील हजारो रहिवाशांची पाण्यासाठी वणवण सुरू होते. विहिरींच्या तळाशी रात्रभर पहारा देऊन वाटीवाटीने पाणी मिळवावे लागते. कोरडय़ा पडलेल्या नदीपात्रातील ओलसर जागी खड्डा खोदून त्यातून पाणी मिळवले जाते. अशा प्रकारे गरजेपुरते पाणी मिळणेही मुश्कील असल्याने पावसाळ्यानंतर दुबार शेतीचा विचारसुद्धा शेतकरी करू शकत नाही. मग दिवाळीनंतर अनेक गावांतील कर्त्यां मंडळींना रोजगारासाठी स्थलांतर करावे लागते. पारंपरिक जलव्यवस्थापन व्यवस्थेची देखभाल करण्याबाबत झालेल्या अक्षम्य दुर्लक्षामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. पावसाळ्यानंतर लगेचच नैसर्गिक ओढय़ा-नाल्यांवर वनराई बंधारे बांधून त्यांचा वाहता काळ वाढवता येतो. काँक्रीटचे बंधारे बांधले तर डिसेंबर, जानेवारीमध्ये आटणारे ओढे, नाले एप्रिल-मेपर्यंत वाहते राहू शकतात. त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना दुबार शेती किंवा भाजीपाला लागवड करता येते. भूजलसाठा वाढल्याने विहिरी आणि कूपनलिकांद्वारे गावांना मुबलक  पाणी मिळते. जनावरांच्या चाऱ्यापाण्याचा प्रश्न सुटतो. आता काही स्वयंसेवी संस्थांनी दोन्ही तालुक्यांतील काही निवडक गावांमध्ये अशा प्रकारचे उपक्रम राबवून तेथील पाणीटंचाईवर मात केली आहे.

ठाण्यातील वसुंधरा संजीवनी मंडळ त्यापैकी एक प्रमुख संस्था. जलव्यवस्थापन, अभियांत्रिकी आणि कॉर्पोरेट क्षेत्रात उच्च पदांवर काम करण्याचा अनुभव असणाऱ्या मंडळींनी एकत्र येत या संस्थेद्वारे ग्रामीण भागातील जलव्यवस्थापनाचे बिघडलेले तंत्र दुरुस्त करण्याचा यशस्वी प्रयत्न गेल्या चार वर्षांपासून सुरू केला आहे. स्थानिकांच्या मोठय़ा प्रमाणातील सहभागामुळे जलसंधारणाचे हे उपक्रम कमालीचे यशस्वी ठरत आहेत. त्याला लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. मुंबई महानगर प्रदेशातील भविष्यकालीन पाणीपुरवठय़ासाठी जलतज्ज्ञ माधवराव चितळे समितीने सुचवलेल्या पोशीर, काळू आणि शाई या तिन्हीपैकी एकही धरण प्रकल्प गेल्या १४ वर्षांत मार्गी लागू शकलेला नाही. अवाढव्य खर्च, पर्यावरणीय निर्बंध आणि स्थानिकांचे पुनर्वसन या मुद्दय़ांमुळे भविष्यातही ते मार्गी लागण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे पारंपरिक जलसाठय़ांचे संवर्धन हाच अतिरिक्त पाणी मिळविण्याचामार्ग उरतो. नेमके तेच काम वसुंधरा संजीवनी मंडळाने हाती घेतले आहे. त्यामुळे पुढील वर्षी उन्हाळ्यात संस्थेच्या सहकार्याने अशा प्रकारचे जलसंधारण प्रकल्प शहापूर आणि मुरबाड या दोन्ही तालुक्यांत मोठय़ा प्रमाणात राबविण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.

‘गाव तिथे पाणवठा’ हा मानवी संस्कृतीचा पाया होता. मात्र, आधुनिक युगात या जलस्रोतांकडे दुर्लक्ष झाले. शहापूर आणि मुरबाड तालुक्यांत शेकडो गावतलाव आहेत. मात्र वर्षांनुवर्षे देखभाल न केल्याने ते गाळाने भरले आहेत. नदी आणि ओढय़ानाल्यांमध्ये शासनाने बांधलेले बहुतेक बंधारे फुटले आहेत. डोंगर-दऱ्यांमधूून वाहून येणाऱ्या पावसाच्या पाण्याबरोबर आलेल्या दगडगोटय़ांमुळे नदीनाल्यांचे पात्र भरून गेले आहे. त्यामुळे नद्या मरणपंथाला लागल्या. मुरबाड तालुक्यातील कनकवीरा ही त्यापैकीच एक नदी. इतर ओढय़ानाल्यांप्रमाणेच तिचे पात्र डिसेंबरमध्ये आटत असे. जिल्हा प्रशासनाने कनकवीरा नदी संवर्धन प्रकल्प हाती घेतला आहे. त्याचा सविस्तर अहवाल तयार करून शासनाकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. वसुंधरा संजीवनी मंडळाने लोकसहभाग आणि सीएसआर निधीच्या सहकार्याने गेल्या तीन वर्षांपासून कनकवीराच्या पात्रातील गाळ काढणे, खोलीकरण करणे, काँक्रीट बंधारा बांधणे अशा प्रकारची कामे सुरू केली आहेत. कनकवीरा नदीची लांबी २२ किलोमीटर आहे. त्यापैकी सध्या जेमतेम पाच किलोमीटर पात्रात ही कामे झाली आहेत. मात्र त्या मोजक्या कामांमुळेही एरवी डिसेंबरमध्ये कोरडय़ा होणाऱ्या कनकवीराच्या पात्रात आता एप्रिलअखेपर्यंत पाणी राहू लागले आहे. पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने त्यासाठी लागणारी यंत्रणा उपलब्ध करून दिली. जिल्हा प्रशासनाने संस्थेला दोन्ही तालुक्यांमधील तलावांची माहिती उपलब्ध करून दिली आहे. त्याआधारे संस्थेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते गाव तलावांचे सर्वेक्षण करीत आहेत. पुढील दोन महिन्यांत या कामाचा आराखडा तयार होईल. त्यानंतर एप्रिल ते जून या तीन महिन्यांत शहापूर आणि मुरबाड तालुक्यांतील जास्तीत जास्त तलावांचा गाळ एकाच वेळी काढण्याची तयारी केली जात आहे. गेली काही वर्षे ज्या पद्धतीने स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात लोकसहभागातून जलसंवर्धनाची कामे सुरू आहेत, तशाच प्रकारचे काम ठाणे जिल्ह्य़ात केले जाणार आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्य़ातील ग्रामीण भागातील पाणीटंचाई दूर होईल. दुबार पिके घेता येणे शक्य असल्याने तेथील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल, जीवनात स्थैर्य येईल. दारिद्रय़ाच्या दुष्टचक्रातून त्यांची सुटका होईल, असा विश्वास वसुंधरा संजीवनी मंडळाचे संचालक आनंद भागवत यांनी व्यक्त केला आहे.

वृक्षदान मोहीम

शासनाच्या वृक्षलागवड मोहिमेला पूरक ठरेल, असा एक उपक्रम संस्था गेल्या तीन वर्षांपासून मुरबाड आणि शहापूर तालुक्यांत राबवीत आहे. या योजनेत ग्रामस्थांना उत्तम प्रतीची कलमी फळझाडे संस्था विनामूल्य उपलब्ध करून देते. त्या व्यक्तीने ते झाड आपल्या घराजवळ लावून त्याची देखभाल करावी इतकीच अपेक्षा आहे. आतापर्यंत या योजनेत चार हजार वृक्ष देण्यात आले आहेत. संस्थेने मुरबाड तालुक्यातील खेवारे गावात सुधा भागवत स्मृती रोपवाटिका निर्माण केली असून त्या माध्यमातून भविष्यात या उपक्रमासाठी लागणारी फळझाडांची कलमे उपलब्ध करून दिली जातील.

कृषी विकासाला हातभार 

जल व्यवस्थापनाला जोडूनच स्थानिक शेतकऱ्यांना दुबार पिके घेण्यास प्रोत्साहन देणे, सेंद्रिय शेती लागवडीचा प्रसार करणे, शेतकऱ्यांना याबाबत योग्य ते मार्गदर्शन उपलब्ध करून देणे असे उपक्रमही राबविण्याचा संस्थेचा विचार आहे. त्यासाठी मुरबाड आणि शहापूरमधील काही निवडक गावांमध्ये कृषीविषयक माहिती केंद्र स्थापन केले जाणार आहे. या केंद्रात शेतकऱ्यांना नियमितपणे तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळेल. त्याचप्रमाणे प्रत्येकी शंभर कृषीविषयक पुस्तकांचा समावेश असणारी ग्रंथपेटी काही गावांना भेट म्हणून दिली जाणार आहे.

संस्थेपर्यंत कसे पोहोचाल?

* कल्याणहून मुरबाडला जाण्यासाठी नियमितपणे एसटी उपलब्ध आहेत. नगरकडे जाणाऱ्या कोणत्याही गाडीने तालुक्यातील टोकावडे इथे उतरावे. तिथून तळवली, वाघाची वाडी, पेंढरी इथे जाण्यासाठी रिक्षा उपलब्ध आहेत.

* संस्थेचे कार्यालय : ७४, सातवा मजला, संस्कृती प्रसाद, शिवप्रसाद हॉटेलसमोर, राम मारुती रोड, ठाणे (प.)

कनकवीरा नदीपात्रात गाळउपसा

गेली तीन वर्षे सातत्याने कनकवीरा नदीच्या पात्रात खोलीकरण, गाळ काढणे, काँक्रीटचा बंधारा बांधणे अशा प्रकारची कामे सुरू आहेत. गेल्या वर्षी संस्थेने जिल्हा प्रशासनाच्या मदतीने कनकवीरा नदीच्या पात्रातील एक लाख घनफूट गाळ काढला. परिणामी आता ही नदी एप्रिल महिन्यापर्यंत वाहती राहू लागली आहे.

काँक्रीटचे बंधारे

मुरबाड तालुक्यातील तळवली, पेंढरी, वाघाची वाडी, खापरी तसेच शहापूर तालुक्यातील मानेखिंड, अष्टे आणि आडिवली गावांमध्ये संस्थेने काँक्रीटचे बंधारे बांधले. हे काँक्रीटचे बंधारे बांधण्यापूर्वी हे जलस्रोत ऑक्टोबर ते जानेवारीदरम्यान कोरडे होत होते. मात्र, आता एप्रिल महिन्यापर्यंत पाणीसाठा उपलब्ध असतो. तब्बल १५० शेतकऱ्यांनी या बंधाऱ्यातील पाण्याचा वापर करून दुबार पीक घेणे सुरू केले आहे. त्यामुळे त्यांच्या उत्पन्नात भर पडली आहे. तसेच गावातील मजुरांना काम मिळाले.

यासाठी मदत हवी..

गेल्या वर्षी संस्थेने दहा काँक्रीटचे बंधारे बांधण्याचा निर्णय घेतला होता. मात्र सीएसआर निधी कमी पडल्यामुळे पाचच काँक्रीटचे बंधारे बांधता आले. २०२३ पर्यंत लोकसहभागातून टप्प्याटप्प्याने ५० काँक्रीटचे बंधारे बांधण्याची संस्थेची योजना आहे. एक बंधारा बांधण्यासाठी साधारण सात ते दहा लाख रुपये खर्च येतो.

वसुंधरा संजीवनी मंडळ

(Vasundhara Sanjivani Mandal)

या नावाने धनादेश काढावा. धनादेशामागे किंवा त्यासोबत देणगीदाराने आपले संपूर्ण नाव, पत्ता, दूरध्वनी तसेच मोबाइल क्रमांक लिहावा. संस्थेकडे धनादेश ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस सुपूर्द केले जातील.

धनादेश येथे पाठवा.. : एक हजार किंवा त्याहून अधिक रुपयांची देणगी देणाऱ्यांची नावे ‘लोकसत्ता’त प्रसिद्ध केली जातील.

मुंबई कार्यालय

लोकसत्ता, संपादकीय विभाग,मफतलाल सेंटर, सातवा मजला, नरिमन पॉइंट, मुंबई – ४०००२१,  ०२२-६७४४०२५०

हापे कार्यालय  

संपादकीय विभाग, प्लॉट नं. ईएल १३८, टीटीसी इंड. एरिया, एमआयडीसी, महापे, नवी मुंबई – ४००७१०.  ०२२-२७६३९९००

ठाणे कार्यालय    

संपादकीय विभाग, कुसुमांजली बिल्डिंग, दुसरा मजला, गोखले रोड, नौपाडा, ठाणे.  ०२२-२५३९९६०७

पुणे कार्यालय      

संपादकीय विभाग, एक्स्प्रेस हाऊस, प्लॉट नं. १२०५/२/६, शिरोळे रस्ता, पुणे – ४११००४.  ०२०-६७२४११२५

नाशिक कार्यालय       

संपादकीय विभाग, स्टेडियम कॉम्प्लेक्स नं. ६, पहिला मजला, महात्मा गांधी मार्ग, नाशिक – ४२२००१.  ०२५३-२३१०४४४

नागपूर कार्यालय       

संपादकीय विभाग, प्लॉट नं. ३८, अ‍ॅडिसन ट्रेड सेंटर, अंबाझरी, नागपूर – ४४००१०, ०७१२ झ्र् २२३०४२१

औरंगाबाद कार्यालय       

संपादकीय विभाग, १०३, गोमटेश मार्केट, गुलमंडी,  औरंगाबाद. दूरध्वनी क्रमांक ०२४०-२३४६३०३, २३४८३०३

नगर कार्यालय       

संपादकीय विभाग, १६६, अंबर प्लाझा, स्टेशन रोड, अहमदनगर. ०२४१-२४५१५४४/२४५१९०७

दिल्ली कार्यालय       

संपादकीय विभाग, द इंडियन एक्स्प्रेस बिल्डिंग, बी१/ बी, सेक्टर १०, नॉएडा- २०१३०१. ०११-२०६६५१५००

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 12, 2019 2:06 am

Web Title: sarva karyeshu sarvada 2019 vasundhara sanjivani mandal zws 70
Next Stories
1 सर्वकार्येषु सर्वदा २०१९ : इथे सापडतात नव्या वाटा..
2 सर्वकार्येषु सर्वदा २०१९ : प्राण्यांसाठी मायेचा ‘पाणवठा’
3 भिंत खचली, निर्धार भक्कम!
Just Now!
X