26 January 2021

News Flash

सर्वकार्येषु सर्वदा : जीवनशाळा : लडाई, पढाई साथ साथ..

शाळा सुरू केली तेव्हा गावात दोन टक्केही साक्षरता नव्हती. पण काही वर्षांतच जीवनशाळेने हे चित्र पालटून टाकले.

संग्रहित छायाचित्र

सामाजिक कार्यकर्त्यां मेधा पाटकर यांच्या नेतृत्वाखाली १९८५ साली ‘नर्मदा बचाव आंदोलन’ सुरू करण्यात आले. जसजशी आंदोलनाची दिशा निश्चित होत गेली तसतशी स्थानिक प्रश्नांची व्यापकता मेधाताईंच्या लक्षात आली. त्यातील महत्त्वाचा प्रश्न म्हणजे नर्मदा खोऱ्यातील शिक्षणाचा अभाव. यातूनच येथील मुलांसाठी ‘जीवनशाळा’ ही संकल्पना रुजली..

नर्मदा ही महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश या तीन राज्यांमधून वाहणारी प्रमुख नदी. नर्मदा नदीवरील सरदार सरोवर धरणामुळे या राज्यांतील आदिवासी मोठय़ा प्रमाणात विस्थापित होऊन त्यांच्या जगण्याचा प्रश्न निर्माण झाला. या आदिवासींना न्याय मिळवून देण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यां मेधा पाटकर यांच्या नेतृत्वाखाली १९८५ साली ‘नर्मदा बचाव आंदोलन’ सुरू करण्यात आले. या धरणामुळे नर्मदा खोऱ्यात होणारे विस्थापन आणि तेथील गावकऱ्यांचे पुनर्वसन अशा अनेक प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम या आंदोलनाने केले. जसजशी आंदोलनाची दिशा निश्चित होत गेली तसतशी स्थानिक प्रश्नांची व्यापकता मेधाताई आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या लक्षात आली. त्यातील महत्त्वाचा प्रश्न म्हणजे नर्मदा खोऱ्यातील शिक्षणाचा अभाव आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या असंख्य समस्या! परिणामी स्थानिकांपर्यंत शिक्षणप्रवाह पोहोचविणे हे एक प्रमुख काम मेधाताईंना वाटले.

नर्मदा खोऱ्यात शाळा नव्हत्या असे नाही. शाळा होत्या, पण फक्त कागदोपत्री. फक्त १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी हे राष्ट्रीय सण साजरे करण्यापुरतेच शिक्षक तेथे येत. एरवी शाळेला सुट्टीच! फक्त कागदोपत्री सरकारला शाळाअस्तित्वाचे पुरावे दाखविण्यापुरती शाळेच्या पटावर खोटी विद्यार्थीसंख्या दाखवून इथले शिक्षक फुकटचा पगार घेत. अनेकदा मृत व्यक्तींची नावेही पटावर असत. नर्मदा खोऱ्यातील लोकांपर्यंत शिक्षण पोहोचावे याबाबत ना सरकार उत्सुक, ना सरकारी अधिकारी, ना शिक्षक. शिक्षक आणि सरकारी यंत्रणांचा हा गैरप्रकार मेधाताईंच्या लक्षात आल्यावर त्यांनी त्याविरोधात गावकऱ्यांसोबत आंदोलन सुरू केले व या फसव्या शिक्षकांविरोधात मोहीम सुरू केली. या आंदोलनामुळे या शिक्षकांवर कारवाई करण्यात आली. परंतु शाळा सुरू करण्यात मात्र सरकारी यंत्रणा उत्सुक नव्हत्या. नर्मदा खोऱ्यातील लोक शिक्षणापासून वंचित राहिल्याने अज्ञान, अंधश्रद्धा आणि त्यातून निर्माण होणाऱ्या अनेक समस्या तेथे भेडसावत होत्या. त्यांना या अज्ञानाच्या गर्तेतून बाहेर काढायचे तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही, या विचारातूनच ‘जीवनशाळा’ या संकल्पनेचा जन्म झाला. ग्रामस्थ, मेधाताई आणि त्यांच्या सहकाऱ्यांशिवाय ‘जीवनशाळा’ आकाराला येणं अशक्य होतं. नर्मदा नवनिर्माण अभियाना अंर्तगत जीवनशाळेला सरुवात झाली.

घोषवाक्य हेच जीवनध्येय!

‘जीवनशाला की क्या है बात, लडाई, पढाई साथ साथ..’ हे जीवनशाळेचे केवळ घोषवाक्य नाही, तर शिक्षणाशी नाळ तुटलेल्या नर्मदेच्या खोऱ्यातल्या आदिवासी मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणण्याचा तो एक ‘शिक्षणमंत्र’ आहे. जीवनशाळेची सुरुवात झाली ती १९९२ साली नंदुरबारमधील चिमलखेडीपासून! शाळा तिच्या नावापासूनच वेगळी ठरली. ‘आश्रमशाळा’ म्हटले की समाजापासून तुटलेपण जाणवतं म्हणून ‘जीवनशाळा’ हे नाव मेधाताईंनी निश्चित केले. शाळा सुरू केली तेव्हा गावात दोन टक्केही साक्षरता नव्हती. पण काही वर्षांतच जीवनशाळेने हे चित्र पालटून टाकले.

नदीकाठच्या माळावर शाळा सुरू झाली. आंदोलनातील कार्यकर्त्यांनीच शैक्षणिक तक्ते, फळे, खडू, पुस्तके आणली आणि जीवनशाळेला सुरुवात झाली. आपली मुलं शिकत आहेत या आनंदाने आदिवासी समाजाकडून मेधाताईंना चांगला प्रतिसाद मिळाला. हळूहळू महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरात या तीनही राज्यांमध्ये जीवनशाळा उभ्या राहिल्या.

जीवनशाळेसाठी चिमुकल्यांचा लढा

१९९३-९४ सालची गोष्ट. चिमलखेडीची पहिली जीवनशाळा- जी जुगलाडाया यांच्या झोपडीत भरली होती, त्यात पाणी शिरले. पण मुले त्या शाळेच्या झोपडीतून बाहेर यायला तयार नव्हती. ती शाळेतच बसून राहिली. पाणी गळ्यापर्यंत आलं तशी ही मुले शाळेच्या छतावर जाऊन बसली, पण तिथून हटायला तयार नव्हती. शेवटी पोलिसांनी जबरदस्तीने त्यांना तिथून हलवले. ही मुले या जीवनशाळेशी खूप एकरूप झाली होती याचंच हे उदाहरण. ही शाळा बुडाल्यानंतर पुढे शाळेच्या नव्या जागेसाठी दोन महिने तहसीलदार कार्यालयासमोर धरणं धरलं. मग ती शाळा धरणापासूनचं पहिलं गाव मणिबेलीत भरवली गेली. जीवनशाळा चालवायची तर त्याचा नीटसा आराखडा हवा. म्हणजे मुलांच्या शिक्षणालाही एक शिस्त येईल, हे मेधाताई जाणून होत्या. त्यासाठी त्यांनी अनिल सदगोपाल, कृष्ण कुमार (एनसीआरटीचे प्रमुख) या दिल्ली विद्यापीठातल्या प्रोफेसरांना बोलावून शिक्षणाच्या आराखडय़ाबाबात चर्चा केली. यात स्थानिक ग्रामस्थांचाही सहभाग होता, हे विशेष! या चर्चेत स्थानिक गावाचा इतिहास, शिक्षणासाठीचे भाषेचे माध्यम, स्थानिक शेती, जंगल, आपल्या हक्कांसाठी आंदोलनातील सहभाग यावर विचार झाला.  या शाळांसाठी दोन पुस्तकंही तयार करण्यात आली. आदिवासींच्या पौराणिक कहाण्यांवरचं- ‘आमऱ्या काण्या’ (आमच्या कहाण्या) हे पावरी भाषेतलं पुस्तक, ‘अक्षरान् ओळखाण’ म्हणजे अक्षरओळख- ज्यात ‘क’ कमळ असे न शिकवता ‘क’ – कुकडा म्हणजे कोंबडा असं स्थानिक ओळख सांगणारे शिक्षण दिले जाते. जीवनशाळांसाठी शिक्षणतज्ज्ञ लीलाताई पाटील, फलटणच्या मॅक्स्सिन मावशी यांच्याकडून शिक्षकांना प्रशिक्षण दिले गेले. याकामी अक्षरनंदनसारख्या शाळांकडूनही खूप मदत झाली. आज महाराष्ट्रात सात आणि मध्य प्रदेशात दोन अशा एकूण नऊ जीवनशाळा आहेत.

सरकारी मान्यता, पण विनाअनुदानित शाळा

या शाळांना सरकारी मान्यता मिळविण्यासाठी खूप प्रयत्न केले गेले. अथक लढय़ानंतर २०१३ साली या शाळांना सरकारी मान्यता मिळाली खरी; पण विनाअनुदान या तत्त्वावर. ‘स्वयं अर्थसाहाय्य’ या नावाखाली ना मानधन, विद्यार्थ्यांसाठी ना माध्यान्ह भोजन, ना पाठय़पुस्तके, ना शैक्षणिक साहित्य! असे असूनही जीवनशाळेचा आलेख चढाच राहिला आहे. मात्र योगिनी खानोलकर, गीतांजली चव्हाण, विजय वळवी, जीवनशाळेची संयोजिका लतिका राजपूत, चेतन साळवे, सियाराम, खेमसिंग, ओरसिंग पटले, शिक्षक, आदिवासी युवा यांच्या अथक मेहनतीशिवाय जीवनशाळेचा प्रवास शक्य नाही. हे सारे अपुऱ्या मानधनावर  काम करतात. ही माणसे मेहनतीने सामाजिक बांधिलकी पार पाडतात. कविता भागवत, शिल्पा बल्लाळ जीवनशाळेसाठी तळमळीने मदत करतात. विश्वस्त विजया चौहान, परवीन जहांगीर यांचा इथे आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. या साऱ्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांना साथ लाभते ती दात्यांची. आर्थिक साहाय्याशिवाय जीवनशाळेचा प्रवास सुकर होणार नाही. तरीही जीवनशाळा ग्रामस्थांच्या जिद्दीने उभ्या आहेत. सध्या शाळेत एकूण ९६५ मुले शिकत आहेत. ६६ शिक्षकेतर कर्मचारी आहेत.

करोनानिर्मित टाळेबंदीमुळे सर्वत्र शाळा बंद आहेत. मात्र हा भाग करोनाबाधित नसल्याने अलीकडेच जीवनशाळांमधील शिक्षण सुरू झाले आहे. त्यामुळे इथल्या मुलांचं शिक्षण सुरू आहे. जीवनशाळेमुळे स्थानिकांना आपल्या हक्कांची, अधिकारांची जाणीव झाली, हे मोठे यश असल्याचे मेधाताईंना वाटते. जीवनशाळेमुळे नर्मदा बचाव आंदोलनाला एक वेगळी दिशा दिली हेही मेधाताई मान्य करतात. गेल्या अठ्ठावीस वर्षांत जीवनशाळेतून आतापर्यंत पाच हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले आहे. वर्षांगणिक जीवनशाळेचा वटवृक्ष विस्तारत आहे. समाजातील तळागाळातील, उपेक्षित घटकांपर्यंत शिक्षण पोहोचविण्यासाठी ‘जीवनशाळा’सारखे प्रयोग महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. अशा प्रयोगांना आर्थिक बळ मिळणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

– लता दाभोलकर

जीवनशाळेची मुले हुशार!

जीवनशाळेतून शिकून गेलेली मुले विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत. क्रीडा क्षेत्रात जीवनशाळेचे विद्यार्थी चमकत आहेत. शिक्षक म्हणूनही जीवनशाळेत काही जण काम करतात. यातील अनेक मुले दहावी, बारावी, तर काही पदवीधर, तर काही एमएसडब्ल्यू, एम.कॉम. झाली आहेत. जीवनशाळांमधून अनेक क्रीडापटू तयार झाले. पैकी गुलाबसिंग वसावे आणि भीमसिंग वसावे या धावपटूंचा प्रामुख्याने उल्लेख करता येईल. गुलाबसिंगला बावन्न सुवर्णपदके मिळाली आहेत. तो राज्य व राष्ट्रस्तरीय स्पर्धामध्ये खेळला आहे. त्याचा भाऊ भीमसिंगलाही अनेक पदके मिळाली आहेत. भारतीय हॉकीचा गोलकीपर खुमानसिंग पटले हाही जीवनशाळेचाच विद्यार्थी. आजही जीवनशाळेची अठरा-वीस मुलं क्रीडा प्रबोधिनीत प्रशिक्षण घेत आहेत.

जीवनशाळेचे सांस्कृतिक रंग

जीवनशाळेचा दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवडय़ात मोठा बालमेळावा भरतो. वेगवेगळ्या ठिकाणी हा बालमेळावा भरवला जातो. या मेळाव्यात पहिलीची मुले सोडून साधारण आठशे मुले चार दिवस एकत्र राहतात. या चार दिवसांत खो-खो, कबड्डी, बोटिंग, तिरंदाजी, चित्रकला यांसारख्या वैयक्तिक स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते. जीवनशाळेतून शिकून गेलेले विद्यार्थी या मेळाव्यात अनोखे रंग भरतात. या मुलांना स्पर्धेसाठी विविध विषय दिले जातात. त्यावर ते सादरीकरण करतात.

संस्थेपर्यंत कसे जाल?

नर्मदा नवनिर्माण अभियान, मैत्री निवास, टेंभेवाडी, काकावाडीच्या मागे, तालुका-धडगाव, जिल्हा-नंदुरबार- ४२५४१४

Narmada Navnirman Abhiyan

या नावाने धनादेश काढावा. धनादेशामागे किंवा त्याबरोबर देणगीदाराने आपले संपूर्ण नाव, पत्ता, दूरध्वनी तसेच भ्रमणध्वनी क्रमांक लिहावा.

संस्था ‘८०-जी’ करसवलतपात्र आहे.

धनादेश येथे पाठवा..: एक हजार किंवा त्याहून अधिक रुपयांची देणगी देणाऱ्यांची नावे ‘लोकसत्ता’त प्रसिद्ध केली जातील.

मुंबई कार्यालय

लोकसत्ता, संपादकीय विभाग,मफतलाल सेंटर, सातवा मजला, नरिमन पॉइंट, मुंबई – ४०००२१,  ०२२-६७४४०२५०

महापे कार्यालय

संपादकीय विभाग, प्लॉट नं. ईएल १३८, टीटीसी इंड. एरिया, एमआयडीसी, महापे, नवी मुंबई – ४००७१०.  ०२२-२७६३९९००

ठाणे कार्यालय

संपादकीय विभाग, कुसुमांजली बिल्डिंग, दुसरा मजला, गोखले रोड, नौपाडा, ठाणे.  ०२२-२५३९९६०७

पुणे कार्यालय

संपादकीय विभाग, एक्स्प्रेस हाऊस, प्लॉट नं. १२०५/२/६, शिरोळे रस्ता, पुणे- ४११००४.  ०२०-६७२४११२५

नाशिक कार्यालय

संपादकीय विभाग, स्टेडियम कॉम्प्लेक्स नं. ६, पहिला मजला, महात्मा गांधी मार्ग, नाशिक – ४२२००१.  ०२५३-२३१०४४४

नागपूर कार्यालय

संपादकीय विभाग, प्लॉट नं. ३८, अ‍ॅडिसन ट्रेड सेंटर, अंबाझरी, नागपूर – ४४००१०, ०७१२- २२३०४२१

दिल्ली कार्यालय

संपादकीय विभाग, द इंडियन एक्स्प्रेस बिल्डिंग, बी१/ बी, सेक्टर १०, नॉएडा- २०१३०१. ०१२०- २०६६५१५००

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2020 12:07 am

Web Title: sarva karyeshu sarvada 2020 article on narmada navnirman abhiyan abn 97
Next Stories
1 सर्वकार्येषु सर्वदा : भिक्षेकऱ्यांच्या स्वावलंबनाचा ध्यास
2 श्रुतीचा बाप्पा
3 महापौरांचा लाडका बाप्पा
Just Now!
X