19 September 2020

News Flash

सर्वकार्येषु सर्वदा : अक्षम ते सक्षम

मुलांना समाजातील उत्पादक घटक म्हणून स्वावलंबी करण्याचे कार्य पेणची ‘सुहित जीवन ट्रस्ट’ करीत आहे..

(संग्रहित छायाचित्र)

मुलांचा जन्म आई-वडिलांसाठी आनंदसोहळा असतो, पण जन्मानंतर मुलांच्या हालचाली अतिशय मर्यादित असतील तर पालकांच्या हृदयाचा ठोकाच चुकतो. वैद्यकीय तपासण्यांनंतर लक्षात येते, की मुलांच्या मेंदूची वाढ योग्य प्रकारे झालेली नाही. अशा मुलांना समाजातील उत्पादक घटक म्हणून स्वावलंबी करण्याचे कार्य पेणची ‘सुहित जीवन ट्रस्ट’ करीत आहे..

बौद्धिक अक्षम मुले पालकांसाठी चिंतेची बाब असतात. या मुलांकडे पाहण्याचा पालक आणि समाजाचा दृष्टिकोन बराचसा नकारात्मक असतो. अशा मुलांच्या पंखांना बळ देण्याचे काम पेणमधील ‘सुहित जीवन ट्रस्ट’ ही संस्था करते. समाजातील अन्य घटकांप्रमाणेच या मुलांना उत्पादक घटक बनवण्याचे आव्हानात्मक काम संस्था करीत आहे.

शहरांमध्ये बौद्धिक अक्षम मुलांसाठी अनेक शाळा असतात, पण ग्रामीण भागात मात्र त्यांची वानवा असते. ही बाब लक्षात घेऊन पेण येथे २००४ मध्ये डॉ. सुरेखा पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘सुहित जीवन ट्रस्ट’ची स्थापना केली. संस्थेच्या कार्यकर्त्यांनी पेण तालुक्यातील गावागावांत जाऊन मुलांचे सर्वेक्षण केले. त्यातून मानसिकदृष्टय़ा अक्षम असलेली १७० मुले आढळली. त्यावेळी बौद्धिकअक्षम ही संकल्पना फारशी प्रचलित नव्हती. यामुळे अशा विद्यार्थ्यांना मनोरुग्ण ठरवून त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे संस्थेच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आले. त्याच क्षणी या मुलांसाठी विशेष शाळा सुरू करण्याचा निर्णय डॉ. पाटील यांनी घेतला.

शाळा सुरू करण्यासाठी अशा मुलांच्या कुटुंबाचे सखोल सर्वेक्षण आवश्यक होते. त्यातील पहिला अडथळा होता पालकांचा. पालकांनी सर्वेक्षणालाच विरोध केला. ‘‘या मुलांना शिकवून काय करायचे आहे?’’ असा प्रश्न उपस्थित करत अनेक पालकांनी माहिती देण्यासही नकार दिला. या मुलांना वेळेवर खायला-प्यायला दिले की आपली जबाबदारी संपली, अशी अनेक पालकांची धारणा होती. अशा वेळी पालकांची समजूत काढणे हे डॉ. पाटील यांच्यापुढील आव्हान होते. परंतु डगमगून न जाता त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पालकांना समजावण्याचे प्रयत्न सुरू ठेवले.

पेण शहरातील महाडिक चाळीत दोन खोल्या भाडेतत्त्वावर घेऊन सुमंगल विद्यालय सुरू करण्यात आले. मानसिकदृष्टय़ा अपंग आणि बहुविकलांग विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेली रायगड जिल्ह्याच्या निमशहरी भागातील ही पहिलीच शाळा होती. अपेक्षेप्रमाणे सुरुवातीला पालकांचा अत्यल्प प्रतिसाद मिळाला. सर्वेक्षणात आढळलेल्या १७० बौद्धिक अक्षम मुलांपैकी केवळ दहा मुलांनीच शाळेत प्रवेश घेतला. त्यांची शाळेतील उपस्थिती यथातथाच होती. कारण त्यांना शाळेत आणणे आणि परत घरी नेणे ही पालकांपुढील मोठी अडचण होती. पालकांची ही अडचण लक्षात घेऊन शाळेने विद्यार्थ्यांसाठी मोफत बससेवा सुरू केली. गावागावांत जाऊन विद्यार्थ्यांना शाळेत आणणे सुरू झाले. त्यांचे प्रशिक्षणही सुरू करण्यात आले. हळूहळू विद्यार्थ्यांच्या वागण्या-बोलण्यात पालकांना फरक जाणवू लागला. त्यामुळे शाळेबद्दल आणि संस्थाचालकांबद्दल पालकांच्या मनात विश्वास दृढ होत गेला.

समाजाचा या विद्यार्थ्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलू लागला. १५ ऑगस्टला झालेल्या एका सार्वजनिक कार्यक्रमात या शाळेतील विद्यार्थ्यांनी पहिल्यांदा सहभाग घेतला आणि कार्यक्रम सादर केला. मानसिकदृष्टय़ा विकलांग विद्यार्थी म्हणजे मनोरुग्ण नाहीत याची जाणीव त्यांना झाली. हळूहळू शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या वाढू लागली. आज अलिबाग, पेण, उरण, रोहा या तालुक्यांच्या ४४ गावांमधील १५० विद्यार्थी शाळेत नियमित शिक्षण घेत आहेत. संस्थेत दहा विशेष प्रशिक्षित शिक्षक आणि दहा कर्मचारी कार्यरत आहेत. ८० टक्के विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण आणि प्रशिक्षण दिले जाते. एक वेळचे जेवणही शाळेतून मुलांना दिले जाते.

संस्थेची आजवरची वाटचाल सोपी नव्हती. संस्थाचालक आणि संस्थापकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. मात्र प्रयत्नांतील सातत्य, नि:स्वार्थ सेवा, चिकाटी या जोरावर संस्थेची वाटचाल सुरू राहिली. मंगलदास ठाकूर, विशांत नाईकडे, वरुण पाटील, श्रीकृष्ण गोडबोले, एम. आर. सुंदरेश्वर यांनी संस्थेच्या वाटचालीत मोठे योगदान दिले. भाडय़ाच्या दोन खोल्यांमधून सुरू झालेले संस्थेचे काम आज वटवृक्षासारखे विस्तारले आहे. संस्थेच्या कार्याची दखल घेऊन शासनाने संस्थेसाठी पेण शहरातील चिंचपाडा येथे ३३ गुंठे जागा दिली आहे. मदतीसाठी अनेक हात पुढे आले आहेत. ‘एम्फथी फाऊंडेशन’ने शाळेसाठी भव्य इमारत बांधून दिली.

संस्थेची कार्यकक्षाही आता रुंदावली आहे. संस्थेने आता ‘एकलव्य व्होकेशनल केंद्र’ सुरू केले आहे. १८ ते ४५ वयोगटातील विशेष युवक आणि युवतींना व्यवसायाभिमुख प्रशिक्षण दिले जात आहे. २०१० मध्ये सुरू करण्यात आलेल्या या प्रशिक्षण केंद्रात ७५ प्रशिक्षणार्थी आहेत. त्यांना राख्या, दिवाळीत पणत्या, शोभेची फुले, गणपती, कापडी पिशव्या, मेणबत्त्या, पापड, इत्यादी बनविण्याचे प्रशिक्षण दिले जाते. या वस्तूंची विक्री केली जाते. त्यासाठी विद्यार्थ्यांना विद्यावेतनही दिले जाते. येथून प्रशिक्षित झालेले विद्यार्थी स्वत:च्या पायावर उभे राहिले आहेत.

विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी विशेष शिक्षकांची गरज भासू लागल्यामुळे विद्यार्थ्यांसाठी विशेष शिक्षक घडवण्याचे कामही संस्थेने सुरू केले. त्यासाठी संस्थेने ‘लाइट हाऊस स्पेशल टीचर्स ट्रेनिंग सेंटर’ सुरू केले. ‘रिहॅबिलिटेशन काऊन्सिल ऑफ इंडिया, नवी दिल्ली’च्या मान्यतेने तज्ज्ञ शिक्षक तयार करण्याचे काम सुरू आहे. आजवर १५६ विशेष शिक्षकांनी प्रशिक्षण घेतले आहे.

बौद्धिक अक्षम विद्यार्थ्यांवर लहानपणापासूनच निरनिराळ्या उपचार पद्धतींद्वारे उपचार करणे आवश्यक असल्याचे संस्थाचालकांच्या लक्षात आले. त्यामुळे ० ते ६ वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी ‘पालवी शीघ्र हस्तक्षेप केंद्र’ सुरू करण्यात आले. तेथे मानसोपचारतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, स्पीच थेरपिस्ट, ऑक्युपेशनल थेरपिस्ट आणि फिजिओ थेरपिस्ट यांच्यामार्फत बालकांवर नि:शुल्क उपचार सुरू करण्यात आले. दोन वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे. त्याचे चांगले परिणाम मुलांवर दिसून येत आहेत. आता या केंद्राची व्याप्ती वाढवण्याचा संस्थेचा मानस आहे.

संस्थेचे सर्व उपक्रम शासनमान्यतेने राबविले जातात, पण एकाही उपक्रमाला शासनाकडून अनुदान वा मदत मिळत नाही. खासगी कंपन्या, सामाजिक संस्था आणि दानशूर व्यक्तींच्या मदतीवर संस्थेचे कार्य सुरू आहे.

करोनाच्या साथीमुळे देशभरात टाळेबंदी लागू झाली. त्यामुळे शाळा बंद ठेवण्याची वेळ आली. याचा परिणाम या संस्थेच्या कार्यावर झाला. आर्थिक मदतीचा ओघ आटला. मुलांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी संस्थेने प्रयत्न सुरू केले. शिक्षकांच्या मदतीने विद्यार्थ्यांशी ऑनलाइन संपर्क आणि संवाद उपक्रम सुरू करण्यात आला. आता इतर मुलांप्रमाणे ही मुलेही ऑनलाइन पद्धतीने शिक्षण घेत आहेत. टेक्नोसॅव्ही होण्याचा प्रयत्न करत आहेत.

या विशेष मुलांच्या शिक्षणाबाबत शासनस्तरावर अजूनही उदासीनता आहे. आजही सामाजिक संस्थांच्या मदतीने विशेष मुलांच्या शिक्षणासाठी प्रयत्न सुरूआहेत. त्यांना शासनाचे पाठबळ मिळणेही आवश्यक आहे.

निरनिराळ्या क्षेत्रांतील मंडळी एकत्र येऊन संस्थेसाठी निरपेक्ष भावनेने कार्यरत आहेत. तेच संस्थेचे मुख्य संचित आहे. ही मुले काहीशी दुबळी असली तरी ती परिस्थितीपुढे हतबल होत नाहीत. त्यांना सहानुभूतीची नाही तर प्रोत्साहन देऊन लढ म्हणण्याची आवश्यकता आहे.

– हर्षद कशाळकर

संशोधन केंद्राचा संकल्प

बौद्धिक सक्षम मुले जन्माला यावीत यासाठी संशोधन करण्याचा संस्थेचा संकल्प आहे. त्यासाठी संस्थेच्या इमारतीत संशोधन केंद्र सुरू करण्याचे नियोजन आहे. त्याचबरोबर प्रौढ बौद्धिक अक्षम व्यक्तींचे समाजआधारित व्यावसायिक पुनर्वसन करण्याचा संस्थेचा निश्चय असल्याचे संचालिका डॉ. सुरेखा पाटील यांनी सांगितले. शिवाय कार्यशाळेत प्रशिक्षित होऊन बाहेर पडणाऱ्या मुलांच्या कौशल्याला अधिक चांगल्या प्रकारे वाव देण्यासाठी कायमस्वरूपी उत्पादन केंद्र सुरू करण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची आखणीही संस्थेने सुरू केल्याची माहिती डॉ. सुरेखा पाटील यांनी दिली.

संस्थेपर्यंत कसे जाल?

दामोदरनगर, चिंचपाडा, आगरी समाज हॉलजवळ, तालुका पेण, जिल्हा रायगड- ४०२१०७.

सुहित जीवन ट्रस्ट

या नावाने धनादेश काढावा. धनादेशामागे किंवा त्याबरोबर देणगीदाराने आपले संपूर्ण नाव, पत्ता, दूरध्वनी तसेच भ्रमणध्वनी क्रमांक लिहावा.

संस्था ‘८०-जी’ करसवलतपात्र आहे.

विद्यार्थी व्यावसायिक.. या शाळेतील निमिषा पाटील ही विद्यार्थिनी लग्न समारंभात मेहंदी काढून चरितार्थ चालवते. भरत पाटील या विद्यार्थ्यांने वाहन दुरुस्ती प्रशिक्षण व्यवसाय सुरू केला आहे. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तू परदेशात पाठविल्या जातात. दरवर्षी २० ते २५ हजार पणत्या आणि पाच हजार राख्यांची निर्मिती विद्यार्थी करतात. त्यांची विक्री मुंबई, पुणे आणि रायगड जिल्ह्यातील विविध भागांमध्ये केली जाते.

धनादेश येथे पाठवा..: एक हजार किंवा त्याहून अधिक रुपयांची देणगी देणाऱ्यांची नावे ‘लोकसत्ता’त प्रसिद्ध केली जातील.

मुंबई कार्यालय

लोकसत्ता, संपादकीय विभाग,मफतलाल सेंटर, सातवा मजला, नरिमन पॉइंट, मुंबई – ४०००२१,  ०२२-६७४४०२५०

महापे कार्यालय

संपादकीय विभाग, प्लॉट नं. ईएल १३८, टीटीसी इंड. एरिया, एमआयडीसी, महापे, नवी मुंबई – ४००७१०.  ०२२-२७६३९९००

ठाणे कार्यालय

संपादकीय विभाग, कुसुमांजली बिल्डिंग, दुसरा मजला, गोखले रोड, नौपाडा, ठाणे.  ०२२-२५३९९६०७

पुणे कार्यालय

संपादकीय विभाग, एक्स्प्रेस हाऊस, प्लॉट नं. १२०५/२/६, शिरोळे रस्ता, पुणे- ४११००४.  ०२०-६७२४११२५

नाशिक कार्यालय

संपादकीय विभाग, स्टेडियम कॉम्प्लेक्स नं. ६, पहिला मजला, महात्मा गांधी मार्ग, नाशिक – ४२२००१.  ०२५३-२३१०४४४

नागपूर कार्यालय

संपादकीय विभाग, प्लॉट नं. ३८, अ‍ॅडिसन ट्रेड सेंटर, अंबाझरी, नागपूर – ४४००१०, ०७१२- २२३०४२१

दिल्ली कार्यालय

संपादकीय विभाग, द इंडियन एक्स्प्रेस बिल्डिंग, बी१/ बी, सेक्टर १०, नॉएडा- २०१३०१. ०१२०- २०६६५१५००

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 30, 2020 12:10 am

Web Title: sarva karyeshu sarvada 2020 article on suhit jeevan trust abn 97
Next Stories
1 काँग्रेसने आता डावे वळण घ्यावे!
2 मार्गदर्शक निकालपत्र..
3 ‘परीक्षां’च्या निकालाचे फलित काय?
Just Now!
X