मुले शाळेपर्यंत पोहोचू शकत नसतील तर शाळा त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे, या विचारातून तीन दशकांपूर्वी डोअरस्टेप स्कूल या संस्थेची स्थापना झाली. वस्त्यावस्त्यांमधल्या उपेक्षित मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी फिरत्या शाळेसह संस्था विविध उपक्रम राबवते. वंचितांचा हा शिक्षणप्रवास आणखी गतिमान करण्याचा संस्थेचा संकल्प आहे..

घरोघरी शिक्षणाच्या प्रकाशाचे कवडसे पोहोचावेत, यासाठी रजनी परांजपे आणि बिना शेठ लष्करी यांनी १९८९ मध्ये ‘डोअरस्टेप स्कूल’ ही संस्था सुरू केली. बिना या त्या वेळी समाजकार्याचे शिक्षण घेत होत्या. महाविद्यालयीन शिक्षणाचा भाग म्हणून त्यांनी कुलाबा पालिका शाळेतून शिक्षण अर्धवट सोडलेल्या मुलांना पुन्हा शाळेत आणण्याचे आव्हान स्वीकारले. यासाठी आंबेडकरनगर वस्तीत फिरत असताना मुले शाळेत न जाण्यामागची कारणे त्यांना सापडली. मत्स्य व्यवसायात काम करणाऱ्या मुलांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना पालकांनी दिलेल्या उत्तरातून त्यांच्या जगण्यातील हतबलता दिसली. ‘आम्ही मुंबईत कामासाठी आलो आहोत, शिकण्यासाठी नाही,’ हे पालकांचे उत्तर. कधीच शाळेत न गेलेली काही किशोरवयीन मुलेही वस्तीत होती. काही मुलांची शिकण्याची इच्छा आहे, पण कामामुळे त्यांच्याकडे वेळ नाही, असे जाणवले.

मुले शाळेपर्यंत पोहोचू शकत नसतील तर शाळा त्यांच्यापर्यंत पोहोचवू या, या विचाराने १९८९ साली ‘डोअरस्टेप स्कूल’ या संस्थेची स्थापना करण्यात आली. रजनी परांजपे आणि बिना यांनी सुरूवातीला वस्तीतच खेळांच्या माध्यमातून शिक्षण द्यायला सुरुवात केली. हळूहळू आजूबाजूच्या वस्त्यांमधील मुलांची स्थितीही त्यांना कळू लागली. संस्थेने ३ ते ६ वयोगटातील मुलांसाठी वस्त्यांमध्ये बालवाडी सुरू केली. या वयोगटातील मुले काम करत नाहीत आणि त्यांच्याकडे लक्ष द्यायला पालकांना वेळ नसतो. त्यामुळे बालवाडीला चांगला प्रतिसाद मिळाला. १९९१-९२ या शैक्षणिक वर्षांत प्रथमच संस्थेने २० ते २५ मुलांना शाळेत दाखल केले. आता दरवर्षी हजारो मुले शाळेत दाखल होतात.

मुले शाळेत दाखल झाली म्हणजे संस्थेचे काम संपले असे होत नाही. बऱ्याचदा पालक शिक्षणाबाबत निष्काळजीपणा करतात. विद्यार्थी नियमितपणे शाळेत जात नाहीत. पालक महिनोन्महिने मुलांना गावी घेऊन जात असल्याने शाळा बुडते. त्यामुळे शाळेत दाखल झाल्यानंतर सुरुवातीची काही वर्षे मूल नियमितपणे शाळेत जाते की नाही, यावर लक्ष ठेवले जाते. पालकांशी संवाद साधून त्यांचा मुलांच्या शिक्षणाला पाठिंबा मिळावा यासाठी प्रयत्न के ले जातात. योग्य वयात शाळेत दाखल झाल्यास मूल बालमजुरीकडे वळत नाही. शाळेत दाखल होण्याचे वय निघून गेलेल्या मुलांना संस्थेतर्फे  स्थानिक शिक्षक त्यांच्या वस्तीतच शिक्षण देतात. विद्यार्थ्यांसारखेच राहणीमान असणारे, त्यांचीच भाषा बोलणारे शिक्षक विद्यार्थ्यांना आपलेसे वाटतात. शिवाय शाळेसाठी लांबवरचा प्रवास करून जावे लागत नाही. शाळेबाहेर अनौपचारिकरीत्या शिक्षण घेऊन अपेक्षित कौशल्ये प्राप्त झाल्यानंतर मुले पालिका शाळांमध्ये दाखल होतात. शाळेत विद्यार्थ्यांच्या गर्दीशी, तेथील क्रमिक पुस्तकांशी आणि सतत शिक्षणेतर कामांमध्ये गुंतलेल्या शिक्षकांशी जुळवून घेणे विद्यार्थ्यांना जड जाते. ही परिस्थिती लक्षात घेऊन संस्थेने १९९२-९३ साली पालिका शाळांबरोबर काम करायला सुरुवात के ली.

सध्या मुंबईत पालिकेच्या १० बालवाडय़ा, ४० शाळांबरोबर आणि पुणे परिसरात २०० शाळांबरोबर संस्था काम करत आहे. पालिका शाळेतील शिक्षकांना प्रत्येक विद्यार्थ्यांकडे लक्ष देणे शक्य होत नाही. अशा वेळी विद्यार्थी लेखन, वाचन या प्राथमिक कौशल्यांमध्येही मागे पडतात. हे टाळण्यासाठी संस्थेतर्फे  पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘फर्स्ट स्टेप फॉरवर्ड’ उपक्रम राबवला जातो. संस्थेचे शिक्षक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष देऊन त्यांना लेखन, वाचन शिकवतात. पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनाही शाळेतच अतिरिक्त मार्गदर्शन के ले जाते. याशिवाय वस्ती पातळीवरही अभ्यास केंद्रे चालवली जातात. एखाद्या ‘कोचिंग क्लास’प्रमाणे ही केंद्रे विद्यार्थ्यांसाठी काम करतात. विद्यार्थ्यांना वाचनाची सवय लागून त्यांचा भाषाविकास व्हावा, यासाठी शाळांमध्ये वाचन उपक्रम राबवला जातो. घरातील निराशाजनक वातावरणामुळे विद्यार्थी अबोल बनतात, आपली आकलन क्षमता गमावून बसतात. काही विद्यार्थी चंचल, अस्थिर किंवा रागीट बनतात. अशा विद्यार्थ्यांच्या समुपदेशनासाठी संस्थेने दोन समुपदेशकांची नियुक्ती केली आहे.

सध्या शाळा बंद असल्याने वस्ती शिक्षकांप्रमाणेच शाळा शिक्षकही वस्त्यांमध्ये जाऊन शिकवत आहेत. वऱ्हांडय़ात, गल्लीत, जागा मिळेल तिथे शिक्षण सुरू आहे. नुसते शिक्षण नाही तर करोनाविषयक जागृती, धान्यवाटप हे कामही या सर्व शिक्षकांनी केले. मुंबईत १५० वस्ती शिक्षक आणि शाळा शिक्षक आहेत. पुणे, पिंपरी-चिंचवड येथे १३५ वस्ती शिक्षक आणि ९२ शाळा शिक्षक आहेत. या सर्वाचे जवळपास गेल्या ६ महिन्यांचे वेतन रखडले आहे. कंपन्यांचा सामाजिक उत्तरदायित्व निधी आणि वैयक्तिक देणग्या यांवर संस्था अवलंबून आहे. मात्र, टाळेबंदीमुळे सर्व आर्थिक स्रोत बंद झाले आहेत.

फिरती शाळा

वस्त्यांमध्ये राहणाऱ्या मुलांपर्यंत संस्था पोहोचली, पण आझाद मैदानाजवळ किं वा रेल्वे स्थानकांच्या बाहेर अनेक मुले भटकताना दिसत. कधी सिग्नलवर लिंबू-मिरची, फुगे विकणारी मुले दिसत. या सर्वांपर्यंत शिक्षण कसे पोहोचवायचे, हा मोठा प्रश्न होता. सर्व मुलांना एकत्र करून कुठे तरी एका ठिकाणी नेऊन बसवावे, ही कल्पना वेळकाढू आणि गैरसोयीची होती. एखाद्या ठिकाणी मुलांना एकत्र जमवून शिक्षण देण्यास संस्थेने सुरुवात केली; पण सभोवतालच्या आवाजाचा त्यात व्यत्यय येत होता. त्यामुळे संस्थेने ‘चालती-फिरती शाळा’ म्हणजेच बसमधील शाळा ही संकल्पना राबवण्याचा विचार सुरू केला; पण देणगीदार शोधण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागले. त्यानंतर जपानी राजदूतावासाच्या मदतीने पहिली बस सुरू झाली. ती यशस्वीरीत्या चालवण्यासाठी ‘आशा फॉर एज्युके शन’ या संस्थेने आर्थिक साहाय्य केले.

सध्या पुणे परिसरात ६ आणि मुंबईत ७ बसेस आहेत. दर दिवशी प्रत्येक बस चार ठिकाणी जाते. प्रत्येक ठिकाणी दोन-अडीच तास थांबते. मुले बसमध्ये येतात. खेळ आणि कलेच्या माध्यमातून शिक्षण घेतात. येथे प्रामुख्याने भाषा आणि गणित या विषयांवर भर दिला जातो. यातील बऱ्याच मुलांसमोर पैसे कमवणे हेच स्वप्न असते. त्यामुळे त्यांच्या प्राथमिक शिक्षणावर अधिक भर दिला जातो आणि शक्य झाल्यास त्यांना शाळेतही दाखल के ले जाते. विद्यार्थ्यांना बाजार, पोलीस ठाणे, इत्यादी ठिकाणी भेट देण्यासाठी नेले जाते. याबाबतचे अनुभव लिहिण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. विद्यार्थी स्वत:चे पुस्तक तयार करतात. त्यात आपल्या कु टुंबाबद्दल, वस्तीबद्दल लिहितात. चित्रे काढतात. सध्या ही चालती-फिरती शाळा पुढे सुरू ठेवण्याचे आव्हान संस्थेसमोर आहे. प्रत्येक बससाठी वार्षिक १२ लाख रुपये खर्च येतो.

डोअरस्टेप स्कू लने वंचित, उपेक्षित मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणारा पूल उभारला आहे. त्याआधारे शिकलेले विद्यार्थी विविध क्षेत्रांत काम करत आहेत. सर्वांपर्यंत शिक्षण पोहोचविण्याचा संस्थेचा मानस आहे. समाजातील दातृत्वशक्ती पुढे आली तर या वंचित मुलांचा शिक्षणप्रवास सुकर होईल.

– नमिता धुरी

डिजिटल शिक्षणाचे आव्हान

शिक्षणाच्या डिजिटल प्रवाहाशी जुळवून घेण्यासाठी संस्था धडपडत आहे. टाळेबंदी लागू झाल्यानंतर संस्थेने एक सर्वेक्षण केले. त्यानुसार त्यांच्याकडून शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांपैकी ५५ टक्के  विद्यार्थ्यांकडे डिजिटल शिक्षणासाठी आवश्यक उपकरणे नाहीत. संस्थेने इंटरनेट सुविधेसह ५० टॅब उपलब्ध करून दिले. विद्यार्थी टॅब घरी घेऊन जातात, वापरून झाला की परत आणून देतात. मग तोच टॅब दुसरा विद्यार्थी घेऊन जातो, अशी तारेवरची कसरत सुरू आहे.

फिरते वाचनालय

विद्यार्थ्यांनी अवांतर वाचन करावे, यासाठी संस्थेने ग्रंथालये सुरू केली आहेत. वस्ती पातळीवरील ग्रंथालयांमध्ये विद्यार्थी त्यांच्या सोयीनुसार कधीही येतात आणि पुस्तके वाचतात. शिवाय दारोदारी फिरूनही विद्यार्थ्यांपर्यंत पुस्तके  पोहोचवली जातात. फिरते वाचनालय या उपक्रमांतर्गत एक गाडी मुंबईत फिरत असते. याचा लाभ हजारो विद्यार्थ्यांना होतो आणि यानिमित्ताने वाचनसंस्कृतीचाही प्रसार होतो.

संस्थेपर्यंत कसे जाल?

डोअरस्टेप स्कूल, खोली क्रमांक – २५४, दुसरा मजला, जगन्नाथ शंकर शेठ पालिका शाळेची इमारत, लामार्ट विनार दुकानाच्या बाजूला,  ग्रँट रोड पुलाच्या खाली, नाना चौक, ग्रँट रोड पश्चिम, मुंबई-४००००७.

‘द सोसायटी फॉर डोअरस्टेप स्कूल’

THE SOCIETY FOR DOORSTEP SCHOOL

या नावाने धनादेश काढावा. धनादेशामागे किंवा त्याबरोबर देणगीदाराने आपले संपूर्ण नाव, पत्ता, दूरध्वनी तसेच भ्रमणध्वनी क्रमांक लिहावा.

संस्था ‘८०-जी’ करसवलतपात्र आहे.

संस्थेची कामगिरी : संस्थेने आतापर्यंत

१ लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना शाळेत दाखल केले आहे. त्यातील सुमारे २५ टक्के विद्यार्थ्यांनी पदवी शिक्षण पूर्ण केले. काहींनी स्वत:च्या स्वयंसेवी संस्था सुरू केल्या आहेत. काही बँकेत, वैद्यकीय क्षेत्रात, तर काही सरकारी नोकरीत आहेत.

धनादेश येथे पाठवा..: एक हजार किंवा त्याहून अधिक रुपयांची देणगी देणाऱ्यांची नावे ‘लोकसत्ता’त प्रसिद्ध केली जातील.

मुंबई कार्यालय

लोकसत्ता, संपादकीय विभाग,मफतलाल सेंटर, सातवा मजला, नरिमन पॉइंट, मुंबई – ४०००२१,  ०२२-६७४४०२५०

महापे कार्यालय

संपादकीय विभाग, प्लॉट नं. ईएल १३८, टीटीसी इंड. एरिया, एमआयडीसी, महापे, नवी मुंबई – ४००७१०.  ०२२-२७६३९९००

ठाणे कार्यालय

संपादकीय विभाग, कुसुमांजली बिल्डिंग, दुसरा मजला, गोखले रोड, नौपाडा, ठाणे.  ०२२-२५३९९६०७

पुणे कार्यालय

संपादकीय विभाग, एक्स्प्रेस हाऊस, प्लॉट नं. १२०५/२/६, शिरोळे रस्ता, पुणे- ४११००४.  ०२०-६७२४११२५

नाशिक कार्यालय

संपादकीय विभाग, स्टेडियम कॉम्प्लेक्स नं. ६, पहिला मजला, महात्मा गांधी मार्ग, नाशिक – ४२२००१.  ०२५३-२३१०४४४

नागपूर कार्यालय

संपादकीय विभाग, प्लॉट नं. ३८, अ‍ॅडिसन ट्रेड सेंटर, अंबाझरी, नागपूर – ४४००१०, ०७१२- २२३०४२१

दिल्ली कार्यालय

संपादकीय विभाग, द इंडियन एक्स्प्रेस बिल्डिंग, बी१/ बी, सेक्टर १०, नॉएडा- २०१३०१. ०१२०- २०६६५१५००