06 March 2021

News Flash

सर्वकार्येषु सर्वदा : भिक्षेकऱ्यांच्या स्वावलंबनाचा ध्यास

माणदेशातील म्हसवड (जि. सातारा) या मूळ गावातून वैद्यकीय शिक्षणासाठी अभिजित सोनवणे पुण्यात आले.

विद्याधर कुलकर्णी

भिक्षेकऱ्यांच्या हाताला काम देऊन त्यांच्यातील भिक्षेकरी वृत्ती नष्ट करण्याचे आव्हान पुण्याच्या ‘सोहम ट्रस्ट’ने स्वीकारले आहे. भिक्षेकऱ्यांना व्यावसायिक कौशल्ये शिकवून स्वावलंबी करण्याचे- म्हणजे त्यांची वृत्ती बदलण्याचे हे ध्येयवादी काम आहे. संस्थेने आजपर्यंत ८५ भिक्षेकऱ्यांचे ‘भिक्षेकरी ते कष्टकरी’ असे परिवर्तन घडवले आहे. या परिवर्तनचक्राला गतिमान करण्यासाठी हातभाराची गरज आहे..

मंदिराबाहेर पशांसाठी हात पुढे करणारे ज्येष्ठ स्त्री-पुरुष असोत की रस्त्यांवर सिग्नलला भिक्षामागणारी लहान मुले असोत; त्यांना वैद्यकीय मदत करण्याबरोबरच आर्थिकदृष्टय़ा स्वावलंबी करण्याचे ‘सोहम ट्रस्ट’चे ध्येय आहे. भिक्षेकऱ्यांना व्यावसायिक कौशल्ये शिकवण्यासाठी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा संस्थेचा मानस आहे. त्यासाठी संस्थेला पुण्यात किंवा पुण्याजवळ किमान पाच गुंठे जागा घेण्यासाठी निधीची आवश्यकता आहे.

वैद्यकीय व्यवसाय करताना आलेल्या अडचणींच्या काळात एका भिक्षेकऱ्याने केलेल्या मदतीचे ऋण फेडण्यासाठी त्याने गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडली आणि शहरातील मंदिरे, मशिदी, दग्र्याबाहेर बसणाऱ्या भिक्षेकऱ्यांवर मोफत उपचार सुरू केले. त्यांच्यापैकी काहींना लघू व्यवसाय सुरू करण्यासाठी सहकार्य करून त्यांच्या जगण्याला नवी दिशा दिली. डॉ. अभिजित सोनवणे हे त्या अवलियाचे नाव! पत्नी डॉ. मनीषा सोनवणे यांच्यासह डॉ. अभिजित यांनी स्थापन केलेल्या ‘सोहम ट्रस्ट’ची ‘डॉक्टर्स फॉर बेगर’ ही मोहीम भिक्षार्थीसाठी संजीवनी ठरली आहे.

माणदेशातील म्हसवड (जि. सातारा) या मूळ गावातून वैद्यकीय शिक्षणासाठी अभिजित सोनवणे पुण्यात आले. त्यांनी टिळक आयुर्वेद महाविद्यालयातून १९९९ मध्ये बीएएमएस पदवी मिळवली. शिवाजीनगर भागात

डॉ. अभिजित आणि डॉ. मनीषा यांचा छोटा दवाखाना आहे. आपल्या उत्पन्नातील ३० टक्के रक्कम ते भिक्षेकऱ्यांसाठी खर्च करतात.

सुरुवातीच्या काळातील अडचणींविषयी डॉ. अभिजित सोनवणे म्हणाले, ‘‘वैद्यकीय पदवी घेतल्यानंतर घरच्यांकडे मदत मागायची नाही असं मी ठरवलं. खेडेगावात वैद्यकीय व्यवसाय सुरू केला. दिवसाकाठी जेमतेम ३५ ते ४० रुपये मिळत. त्यामुळे आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले. एका भिक्षेकरी कुटुंबाला माझी व्यथा समजल्यानंतर त्यांनी त्यांच्या ताटातील अन्न मला दिले. खर्चाला थोडे पैसे दिले. त्याचबरोबर शारीरिक व मानसिक आधार दिला. त्यानंतर मला एका आंतरराष्ट्रीय कंपनीत नोकरी मिळाली आणि आयुष्यच बदलले. या नोकरीने मला पैसे आणि मानमरातब दिला. परंतु त्या भिक्षेकऱ्यांच्या ऋणातून मुक्त होण्याची इच्छा स्वस्थ बसू देईना. त्यामुळे १५ ऑगस्ट २०१५ रोजी नोकरीचा राजीनामा दिला आणि पुण्यातील मंदिरे आणि मशिदींच्या बाहेर बसलेल्या भिक्षेकऱ्यांवर मोफत वैद्यकीय उपचार सुरू केले..

‘‘पुण्यात घेतलेल्या वैद्यकीय शिक्षणाचा उपयोग मी गरीब आणि वंचितांसाठी करतो आहे. पैसे कमावण्याच्या चक्रातून बाहेर काढून मला माणूस म्हणून घडवण्याचे काम पुणे शहराने केले. त्यामुळे हे शहर माझी कायम कर्मभूमी राहील,’’ अशी भावना डॉ. अभिजित यांनी व्यक्त केली.

‘भिक्षेकरी ते कष्टकरी’ परिवर्तन

अनेक भिक्षेकऱ्यांनी डॉ. अभिजित यांच्यावर घरच्यासारखे प्रेम केले. त्यामुळे उपचारानंतर त्यांना पुन्हा त्याच अवस्थेत न सोडता त्यांच्यासाठी काही करता येईल का, असा विचार त्यांनी केला. ‘भिक्षेकरी ते कष्टकरी’ असे परिवर्तन घडवून आणताना अनेकांना छोटे व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन दिले. शनी मंदिरासमोरील भिक्षार्थीना शनीला वाहायला तेलाच्या पुडय़ा करून त्यांची विक्री करण्यास प्रोत्साहन दिले. ज्यांना हात-पाय नाहीत, त्यांना चाकाच्या खुर्च्या घेऊन दिल्या. या खुर्चीवर बसून विक्री करण्यासाठी वस्तूही घेऊन दिल्या. बसून भिक्षामागणाऱ्यांना बसूनच फुलं, भाजी, रुमाल आणि स्कार्फची विक्री करण्यास सांगितले. वृद्ध महिलांना गृहसंकुलांमध्ये मुले सांभाळण्याची कामे मिळवून दिली. काहींना हॉटेलमध्ये पोळ्या करण्याचे आणि भाज्या निवडण्याचे काम मिळवून दिले. कुणाला दाढी करण्याचा व्यवसाय सुरू करून दिला. काहींना एटीएम केंद्रांबाहेर रखवालदाराचे काम मिळवून दिले. आतापर्यंत ८५ भिक्षेकऱ्यांनी भिक्षाटन सोडले आहे. त्यांची कुटुंबे स्वावलंबी झाली आहेत.

आता भिक्षेकऱ्यांसाठी एक व्यावसायिक कौशल्य प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा ‘सोहम ट्रस्ट’चा संकल्प आहे. या केंद्रामध्ये कागदी पिशव्या, मेणबत्त्या, भेटवस्तू तयार करणे, शिवणकाम, इत्यादी कौशल्यांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षण घेणाऱ्या भिक्षेकऱ्यांना विद्यावेतन देण्याचे संस्थेचे नियोजन आहे. प्रशिक्षणानंतर त्यांना स्वतंत्र व्यवसाय सुरू करण्यास सर्व तऱ्हेची मदत करून ‘कष्टकरी’ म्हणून जगण्यास त्यांना हात देणे हे संस्थेचे ध्येय आहे. त्यासाठी किमान पाच गुंठे जागेची गरज आहे आणि ती घेण्यासाठी संस्थेला मदतीची आवश्यकता आहे.

पदपथावरच दवाखाना..

ज्या दिवशी ज्या देवाचा वार, त्या दिवशी भक्तांची होणारी गर्दी लक्षात घेऊन भिक्षेकरी मंदिराबाहेर जमा होतात. त्यामुळे वारानुसार मंदिर बदलते. एखाद्याचा विश्वास संपादन करायचा, तर भेटीगाठींमध्ये सातत्य हवे, याचा विचार करून डॉ. अभिजित मोटारसायकलवर तीन बॅगांमध्ये औषधे भरलेला दवाखाना घेऊन मंदिराबाहेर जातात. रस्त्याच्या कडेला पदपथावरच ठाण मांडून दररोज दुपारी ११ ते ३ या वेळेत ते भिक्षेकऱ्यांवर उपचार करतात. पदपथावरच तपासणी करून औषधे द्यायची, जखमांना मलमपट्टी करायची आणि आजार गंभीर असेल तर रुग्णाला रुग्णालयात दाखल करायचे, अशी त्यांची कार्यपद्धती आहे. डॉ. अभिजित यांनी गेल्या पाच वर्षांत पुण्यातील अकराशेहून अधिक भिक्षेकऱ्यांवर मोफत औषधोपचार केले आहेत.

खराटा पलटण

शहरातील सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करण्यासाठी भिक्षेकऱ्यांची ‘खराटा पलटण’ स्थापन करण्याचा संस्थेचा मानस आहे. संत गाडगेबाबांचे कार्य ही या उपक्रमामागील प्रेरणा आहे. खराटा पलटणीत काम करण्याची तयारी १६ महिला-पुरुषांनी दर्शविली आहे. त्यांना मानधनही देण्यात येणार आहे. टाळेबंदीचे निर्बंध हटल्यानंतर ही ‘खराटा पलटण’ कार्यरत होईल. भिक्षेकऱ्यांतील भिक्षावृत्ती कमी करून त्यांना सन्मानाने जगण्यास उत्तेजन देणे, हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.

भिक्षेकरी नोकरी महोत्सव

भिक्षेकऱ्यांसाठी सोहम ट्रस्टतर्फे लवकरच नोकरी महोत्सव भरवण्यात येणार आहे. भिक्षेकरी कुटुंबातील युवकांना रोजगार मिळावा हे या महोत्सवाचे उद्दिष्ट. अशा स्वरूपाचा कदाचित हा पहिलाच नोकरी महोत्सव असेल. टाळेबंदीतून सवलती मिळाल्यामुळे काही व्यवसाय सुरू झाले असले, तरी कामगारांची टंचाई आहे. कामगार गावाला गेल्यामुळे अनेक व्यवसाय अद्यापही बंद आहेत. गावी गेलेले सर्वच कामगार परत येतील की नाही, हे सांगता येत नाही. दुसरीकडे, रस्त्यावर भिक्षेकऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यांत २५ ते ४० वयोगटातील तरुणांची संख्या लक्षणीय असणे ही चिंताजनक बाब आहे. कामगारांची गरज असणाऱ्या व्यावसायिकांना कामगार कसे मिळवावे हे समजत नाही; तर कामाची गरज असणाऱ्यांना काम कसे मिळवावे, हे कळत नाही. नोकरी महोत्सवात या दोन टोकांना जोडण्याचा प्रयत्न असेल. विविध व्यावसायिक गुण आणि कौशल्ये अंगी असूनही केवळ नोकरी नाही म्हणून भिक्षा मागणारे अनेक युवक आहेत. त्यांना योग्य वेळी काम मिळाले नाही, तर नवे भिक्षेकरी, चोर, अपहरणकत्रे, गुन्हेगार निर्माण होतील. असे होऊ नये म्हणून टाळेबंदीनंतर रस्त्यावरच ‘नोकरी महोत्सव’ भरवण्यात येणार आहे. व्यावसायिक या युवकांतील कौशल्यांची, गुणांची खातरजमा करून त्यांची नोकरीसाठी निवड करतील, अशी संस्थेची अपेक्षा आहे.

उपक्रम

’रात्रीच्या वेळी वाहनांची धडक बसून भिक्षेकरी वृद्धांचे अपघात होतात. यामागे अधू झालेली दृष्टी हे कारण असू शकते, हे लक्षात घेऊन ५५० भिक्षेकऱ्यांवर मोफत मोतििबदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या.

’लहान मुलांना भिक्षा मिळते म्हणून त्यांना भिक्षा मागण्यास भाग पाडले जाते. अशा ५४ मुलांना भिक्षेकरी वृत्तीपासून परावृत्त करून संस्थेने त्यांचे पालकत्व घेऊन त्यांचे शिक्षण सुरू केले.

’बेवारस म्हणून रस्त्यावर अनेक वर्षे भिक्षा मागणाऱ्या १६ आजी-आजोबांना संस्थेने महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या वृद्धाश्रमांमध्ये निवारा मिळवून दिला आहे. डॉ. अभिजित सोनवणे यांनी वृद्धाश्रमात निधन झालेल्या चार ज्येष्ठांवर मुलाच्या नात्याने अंत्यसंस्कार केले.

संस्थेपर्यंत कसे जाल?

सोशल हेल्थ अँड मेडिसिन ट्रस्ट (सोहम),

फ्लॅट नं. २, शालिनी हाईट्स, शिरोळे गल्ली,

शिवाजीनगर, पुणे – ४११००५.

 ‘सोशल हेल्थ अँड मेडिसिन

(सोहम) ट्रस्ट’ किंवा ‘सोहम ट्रस्ट’

SOCIAL HEALTH AND (SOHAM) MEDICINE TRUST

या नावाने धनादेश काढावा. धनादेशामागे किंवा त्याबरोबर देणगीदाराने आपले संपूर्ण नाव, पत्ता, दूरध्वनी तसेच भ्रमणध्वनी क्रमांक लिहावा.

संस्था ‘८०-जी’ करसवलतपात्र आहे.

धनादेश येथे पाठवा..: एक हजार किंवा त्याहून अधिक रुपयांची देणगी देणाऱ्यांची नावे ‘लोकसत्ता’त प्रसिद्ध केली जातील.

मुंबई कार्यालय

लोकसत्ता, संपादकीय विभाग,मफतलाल सेंटर, सातवा मजला, नरिमन पॉइंट, मुंबई – ४०००२१,  ०२२-६७४४०२५०

महापे कार्यालय  

संपादकीय विभाग, प्लॉट नं. ईएल १३८, टीटीसी इंड. एरिया, एमआयडीसी, महापे, नवी मुंबई – ४००७१०.  ०२२-२७६३९९००

ठाणे कार्यालय    

संपादकीय विभाग, कुसुमांजली बिल्डिंग, दुसरा मजला, गोखले रोड, नौपाडा, ठाणे.  ०२२-२५३९९६०७

पुणे कार्यालय      

संपादकीय विभाग, एक्स्प्रेस हाऊस, प्लॉट नं. १२०५/२/६, शिरोळे रस्ता, पुणे- ४११००४.  ०२०-६७२४११२५

नाशिक कार्यालय       

संपादकीय विभाग, स्टेडियम कॉम्प्लेक्स नं. ६, पहिला मजला, महात्मा गांधी मार्ग, नाशिक – ४२२००१.  ०२५३-२३१०४४४

नागपूर कार्यालय       

संपादकीय विभाग, प्लॉट नं. ३८, अ‍ॅडिसन ट्रेड सेंटर, अंबाझरी, नागपूर – ४४००१०, ०७१२ झ्र् २२३०४२१

दिल्ली कार्यालय       

संपादकीय विभाग, द इंडियन एक्स्प्रेस बिल्डिंग, बी१/ बी, सेक्टर १०, नॉएडा- २०१३०१.

०१२०- २०६६५१५००

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 24, 2020 12:49 am

Web Title: sarva karyeshu sarvada 2020 social health and medicine trust zws 70
Next Stories
1 श्रुतीचा बाप्पा
2 महापौरांचा लाडका बाप्पा
3 लोकसहभागाला पर्याय नाही!
Just Now!
X