19 January 2020

News Flash

ज्ञानभांडार जतनाचा वसा

महापुरामुळे दुर्मीळ ग्रंथसंपदेचे मोठे नुकसान झाले.

|| दिगंबर शिंदे

ससन १८६३ मध्ये ‘धुंडिराज बुक क्लब’ या नावाने स्थापन झालेल्या वाचनालयाला कालौघात सांगली जिल्हा नगर वाचनालयाचे स्वरूप मिळाले. सुमारे दीड शतकाचा वारसा लाभलेल्या या ग्रंथालयाचे सांगलीच्या वैचारिक जडणघडणीत मोठे योगदान आहे. या ग्रंथालयात अफाट ज्ञानभांडार आहे. महापुरामुळे दुर्मीळ ग्रंथसंपदेचे मोठे नुकसान झाले. मात्र, त्याच्या जतनाचा निर्धार संस्थाचालकांनी केला आहे.

सहा गल्ल्यांची सांगली. १८०१ मध्ये सांगली संस्थानची स्थापना झाली. संस्थानचे पहिले अधिपती थोरले चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन यांच्यानंतर गादीवर आलेले अधिपती धुंडिराज तथा तात्यासाहेब यांना इंग्रजी शिकविण्यासाठी नियुक्त करण्यात आलेले रावसाहेब मोने यांनी १८६३ मध्ये एक वाचनालय स्थापन केले. सांगलीने मराठी संस्कृतीच्या जडणघडणीत मोलाची भर घातली आहे. सांस्कृतिक, वैचारिक प्रगतिपथावर अनेक मलाचे दगड सांगलीने निर्माण केले. ते मराठी सारस्वताला जसे दिशादर्शक ठरले तसेच प्रगल्भ वैचारिक बठक निर्मितीला पोषक ठरले. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून पुण्याला प्रथम स्थान दिले जात असले तरी याची नाळ सांगलीच्या कृष्णातीरीही जोडली गेली आहे. या वैचारिक जडणघडणीमध्ये सांगलीच्या इतिहासामध्ये दीड शतकाचा सहवास लाभलेले ‘सांगली जिल्हा नगर वाचनालया’चे योगदान मोलाचे आहे.

सन १८६३ मध्ये ‘धुंडिराज बुक क्लब’ या नावाने हे वाचनालय स्थापन झाले. प्रारंभीच्या काळात ही संस्था पांजरपोळ येथे होती. श्रीमंत चिंतामणराव पटवर्धन यांच्या काळात राज्यकारभार पाहण्यासाठी इंग्रज सरकारने नियुक्त केलेले कॅप्टन बर्क हेही पुस्तकप्रेमी आणि दूरदृष्टी असणारे प्रशासक. कॅप्टन बर्क यांच्यामुळे नगर वाचनालयाला शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आणि नगरपालिका इमारतीशेजारी भूखंड देण्यात आला. राजवाडा चौकामध्ये ३६ फूट लांब व १८ फूट रुंद अशी छोटेखानी इमारत बांधून देण्यात आली. विसाव्या शतकाच्या प्रारंभी वाचनालयासाठी इमारत उभारण्यात आली. १९१० मध्ये इमारत उभारण्यासाठी ४ हजार २०० रुपये खर्च आला होता. हा सर्व खर्च संस्थानाकडून करण्यात आला.

कालौघात लोकाश्रय वाढत गेला आणि संस्था बाळसे धरू लागली. १९५० साली संस्थेचे नाव ‘सांगली जिल्हा नगर वाचनालय’ असे शासनदरबारी नोंद झाले. १९८६ साली संस्थेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार (सर्वोत्तम ‘अ’ वर्ग वाचनालय) मिळाला. नाटय़ाचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांचे ज्येष्ठ बंधू हरी प्रभाकर खाडिलकर हे पहिले कार्यवाह होते. मुक्त प्रवेशाने पुस्तक निवड सुविधा १९८० पासून सुरू झाली. संस्थेतर्फे वर्षभर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यामध्ये व्याख्यानमाला, विविध पुरस्कार, विविध स्पर्धा आयोजित करण्यात येतात. सांगली (जिल्हा) नगर वाचनालय ही गेली १५० वर्षे सातत्याने वाचकांच्या व रसिक श्रोत्यांच्या सेवेत कार्यरत आहे.

संस्थेने केवळ ग्रंथांची देवघेव करणे आणि वाचकांना वाचनानंद देणे, इतकेच उद्दिष्ट न ठेवता विविध विभागांद्वारे वैचारिक मंथन करण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत. त्यामध्ये लिहित्या हातांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘प्रतिबिंब’ नावाचे भित्तिपत्रक काढले जाते. त्यात कविता, रूपक, चिंतन, विविध घटनांवर भाष्य करण्याची संधी, व्यंगचित्रे प्रकाशित केली जातात. राजकीय विषय वगळून सर्व विषय मांडण्याची संधी दिली जाते. बाल व महिला विभाग स्वतंत्रपणे कार्यरत आहेत. मुलांमध्ये वाचनाची गोडी निर्माण होण्यासाठी जास्तीत जास्त पुस्तके वाचा, अशी स्पर्धाही घेण्यात येते.

स्वातंत्र्योत्तर काळात १९५० मध्ये नगर वाचनालयाला जिल्हा वाचनालयाचा दर्जा मिळाला. त्यानंतर १९७० मध्ये तालुका आणि ग्रामीण वाचनालयांना मदत करणारी एक साखळी योजना १९७० पासून सुरू करण्यात आली. ग्रंथालय सभासदत्व देऊन पुस्तकांची देवघेव सुरू करण्यात आली. सध्या जिल्ह्य़ातील ४७ ग्रंथालये या साखळी योजनेचा लाभ घेत आहेत. विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र टिळक अभ्यासिका आणि बापूसाहेब दप्तरदार संदर्भ विभागही कार्यरत आहे. पुस्तक विक्रेत्यांना प्रदर्शन भरविण्यासाठीही जागा उपलब्ध करून दिली जाते. संस्थेच्या वतीने सावरकर वक्तृत्व स्पर्धा, शिराळकर ज्ञानसत्र, भावगीत गायन स्पर्धा, काव्य वाचन, कथाकथन, पाठांतर आदी उपक्रम राबविण्यात येतात.

वाचकांसाठी नामवंत वक्त्यांची विविध विषयांवर व्याख्याने आयोजित करण्याची परंपरा संस्थेने जपली आहे. ज्ञानसत्रामध्ये आजपर्यंत प्रा. वसंत कानेटकर, गो. नी. दांडेकर, प्राचार्य नरहर कुरुंदकर, विद्याधर गोखले, गोविंद तळवळकर, गंगाधर गाडगीळ, व्यंकटेश माडगूळकर, रामचंद्र देखणे आदी मान्यवरांची व्याख्याने झाली आहेत. श्री. दा. पानवलकर यांच्या स्मृती जतन करण्यासाठी संस्थेच्या वतीने लेखकांना प्रोत्साहित करण्याकरिता पुरस्कार देण्यात येतो.

संस्थेला अनेक मान्यवरांनी भेट देऊन आपल्या हस्ताक्षरात गौरव केला आहे. त्यात माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, गदिमा, लक्ष्मणशास्त्री जोशी, न. र. फाटक, सुधीर फडके, साने गुरुजी, श्री. म. माटे, पृथ्वीराज कपूर, शांता शेळके, सरोजिनी वैद्य, ह. रा. महाजनी, महादेवशास्त्री जोशी, मंगेश पाडगावकर, वसंत बापट, विंदा करंदीकर अशा अनेक मान्यवरांनी संस्थेला भेट देऊन आपली स्वाक्षरी नोंदवीत कार्याचा गौरव केला आहे.

संस्थेची मध्यवर्ती ठिकाणी असलेली भव्य इमारत, अनेक दुर्मीळ ग्रंथांचा, जुन्या हस्तलिखितांचा समावेश असलेला एक लाख ३५ हजार ग्रंथांचा संग्रह,  काही जुनी वृत्तपत्रे, मोठय़ा वक्त्यांच्या ध्वनिफितींचा संग्रह, त्यांची हस्ताक्षरे व स्वाक्षऱ्या हा सर्व सांगलीकरांसाठी अभिमानाचा विषय होता. अनेक अभ्यासकांसाठी ही हक्काची जागा होती. अचानक कृष्णेला महापूर आला आणि होत्याचे नव्हते झाले. शक्य तेवढी सर्व दक्षता घेऊनही संस्थेचे अपरिमित नुकसान झाले आहे. संस्थेकडील सुमारे साठ हजार पुस्तके पूर्णपणे पाण्यात बुडाली आहेत. पाच संगणक निरुपयोगी झाले आहेत. फर्निचरची मोठय़ा प्रमाणावर मोडतोड झाली आहे. ७० वर्षांपूर्वी पसे मिळतील, तशी टप्प्याटप्प्याने बांधलेली इमारत कमकुवत झाली आहे. सर्व गोष्टींचा विचार करता नुकसानीचा आकडा एक कोटी रुपयांपेक्षाही अधिक आहे.

पुस्तकांचे दर्शनी मूल्य कमी जास्त असले तरी गुणात्मक मूल्य आणि उपलब्धता मूल्य मोजण्यापलीकडचे आहे. संकट मोठे असले तरी त्याचा सामना करून पुन्हा उभे राहण्याचा निर्धार संचालक, कर्मचाऱ्यांनी केला आहे. देणगी स्वरूपात पुस्तके येण्यास सुरुवात झाली आहे. नष्ट झालेल्या पुस्तकांची, संगणकांची, फर्निचरची व इतर साहित्याची खरेदी करून लवकरात लवकर ग्रंथालय सुरू करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. संपूर्ण नवी सुसज्ज इमारत उभी करणे आणि सर्व दुर्मीळ ग्रंथांचे डिजिटलायझेशन करण्याचा संस्थेचा दीर्घकालीन संकल्प आहे. आजवर समाजाच्या पाठबळावर सुरू असलेल्या सांगली (जिल्हा) नगर वाचनालयाचा हा संकल्पही पूर्ण होईल, याची खात्री आहे.

सुसंस्कृत समाज घडविण्यासाठी नितांत आवश्यक असणारे ग्रंथालय पुन्हा उभे करण्यासाठी मदतीची गरज आहे. वाचनालयातील ग्रंथसंपदा पुन्हा उभी करण्याबरोबरच मोडी लिपीतील पोथ्या, हस्तलिखिते, दुर्मीळ पुस्तके यांचे डिजिटायझेशन होण्याची नितांत गरज आहे. यासाठी आर्थिक सहकार्याची गरज आहे. सध्या संस्थेचे अध्यक्ष प्रा. मुकुंद बाळकृष्ण पटवर्धन हे असून डॉ. हणमंत ज्ञानदेव िशगारे हे उपाध्यक्ष, तर कार्यवाह म्हणून अतुल दत्तात्रय गिरजे आणि सहकार्यवाह म्हणून सुहास अनंत करंदीकर हे कार्यरत आहेत.

संस्थेपर्यंत कसे पोहोचाल?

सांगली जिल्हा नगर वाचनालय, ९७२, महात्मा गांधी मार्ग, राजवाडा चौक, सांगली. सांगली बसडेपोपासून दीड किलोमीटरवर ‘सांगली जिल्हा नगर वाचनालय’ (Sangli Jilha Nagar Vachanalay) या नावाने धनादेश काढावा. धनादेशामागे किंवा त्यासोबत देणगीदाराने आपले संपूर्ण नाव, पत्ता, दूरध्वनी तसेच मोबाइल क्रमांक लिहावा. संस्थेकडे धनादेश ऑक्टोबरच्या अखेरीस सुपूर्द केले जातील.

दुर्मीळ नाटय़ग्रंथसंपदा डिजिटलायझेशनचा संकल्प

महापुरामुळे पुस्तकांचे मोठे नुकसान झाले आहे. सुमारे साठ हजार पुस्तके पूर्णपणे पाण्यात बुडाली. त्यामुळे संपूर्ण नवी सुसज्ज इमारत उभी करण्याबरोबरच सर्व दुर्मीळ ग्रंथांचे डिजिटलायझेशन करण्याचा संस्थेचा संकल्प आहे.

सांगली ही विष्णुदास भावे यांच्या कार्यामुळे नाटय़पंढरी म्हणून ओळखली जाते. १८४३ मध्ये ‘सीतास्वयंवर’ हे मराठीतील पहिले नाटक सांगलीतच व्यासपीठावर सादर झाले. नाटय़ाचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर, गोविंद बल्लाळ देवल ही नाटय़रत्ने सांगलीतील कृष्णातीरीच मोठी झाली. ही पाश्र्वभूमी लक्षात घेऊन संस्थेत के. वा. जोशी नाटय़ विभाग सुरू करण्यात आला आहे. या विभागात संदर्भग्रंथ, नाटककारांची चरित्रे, समीक्षणात्मक असे विविध प्रकारचे ग्रंथ उपलब्ध आहेत. आजमितीस केवळ नाटकावर लिहिलेली २ हजार ८९४ पुस्तके तिथे आहेत. मात्र, या ग्रंथसंपदेला पुराचा फटका बसला आहे.

धनादेश येथे पाठवा..

एक हजार किंवा त्याहून अधिक रुपयांची देणगी देणाऱ्यांची नावे ‘लोकसत्ता’त प्रसिद्ध केली जातील.

  • मुंबई कार्यालय – लोकसत्ता, संपादकीय विभाग,मफतलाल सेंटर, सातवा मजला, नरिमन पॉइंट, मुंबई – ४०००२१, ०२२-६७४४०२५०
  • महापे कार्यालय – संपादकीय विभाग, प्लॉट नं. ईएल १३८, टीटीसी इंड. एरिया, एमआयडीसी, महापे, नवी मुंबई – ४००७१०. ०२२-२७६३९९००
  • ठाणे कार्यालय – संपादकीय विभाग, कुसुमांजली बिल्डिंग, दुसरा मजला, गोखले रोड, नौपाडा, ठाणे. ०२२-२५३९९६०७
  • पुणे कार्यालय – संपादकीय विभाग, एक्स्प्रेस हाऊस, प्लॉट नं. १२०५/२/६, शिरोळे रस्ता, पुणे – ४११००४. ०२०-६७२४११२५
  • नाशिक कार्यालय – संपादकीय विभाग, स्टेडियम कॉम्प्लेक्स नं. ६, पहिला मजला, महात्मा गांधी मार्ग, नाशिक – ४२२००१. ०२५३-२३१०४४४
  • नागपूर कार्यालय – संपादकीय विभाग, प्लॉट नं. ३८, अ‍ॅडिसन ट्रेड सेंटर, अंबाझरी, नागपूर – ४४००१०, ०७१२ -२२३०४२१
  • औरंगाबाद कार्यालय – संपादकीय विभाग, १०३, गोमटेश मार्केट, गुलमंडी, औरंगाबाद. दूरध्वनी क्रमांक ०२४०-२३४६३०३, २३४८३०३
  • नगर कार्यालय – संपादकीय विभाग, १६४, अंबर प्लाझा, स्टेशन रोड, अहमदनगर. ०२४१-२४५१५४४/२४५१९०७
  • दिल्ली कार्यालय – संपादकीय विभाग, द इंडियन एक्स्प्रेस बिल्डिंग, बी१/ बी, सेक्टर १०, नॉएडा- २०१३०. ०११-२०६६५१५००

First Published on September 2, 2019 2:03 am

Web Title: sarva karyeshu sarvada sangli jilha nagar vachanalay mpg 94 2
Next Stories
1 पीक विमा योजना कोणाच्या फायद्याची? 
2 कृष्णेचा अभूतपूर्व पूर
3 ऊस, दारू.. आणि पाणी!
Just Now!
X