24 April 2019

News Flash

‘पथेर पांचाली’च्या पलीकडे..

२००५मध्ये ‘टाइम’ मासिकानं १०० सवरेत्कृष्ट चित्रपटांची यादी प्रसिद्ध केली, त्यातही ‘पथेर पांचाली’हा चित्रपट होता.

|| सिद्धार्थ खांडेकर

२००५मध्ये ‘टाइम’ मासिकानं १०० सवरेत्कृष्ट चित्रपटांची यादी प्रसिद्ध केली, त्यातही ‘पथेर पांचाली’हा चित्रपट होता. धंदेवाईक सिनेमांची पंढरी समजल्या जाणाऱ्या हॉलिवुडमधील ऑस्कर अ‍ॅकॅडमीनंही रायना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवलं, हा योगायोग नाही. ‘पथेर पांचाली’च्या तोडीचा चित्रपट भारतात बनला नाही, असं परदेशी समीक्षकांचं मत आहे. बीबीसीनं त्यावर शिक्कामोर्तब केलंय..

ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन अर्थात बीबीसीच्या सवरेत्कृष्ट १०० बिगरइंग्रजी चित्रपटांच्या यादीत सत्यजित राय दिग्दर्शित ‘पथेर पांचाली’ या एकमेव चित्रपटाला स्थान मिळू शकलं. याचा अर्थ ‘पथेर पांचाली’नंतर सत्यजित राय यांनी किंवा इतर कोणत्याही भारतीय दिग्दर्शकानं त्या तोडीचा किंवा त्याच्यापेक्षा सरस चित्रपट बनवलेलाच नाही असा घ्यायचा का? किंवा मग ‘पथेर पांचाली’च्या पलीकडे भारतीय चित्रपटातील अभिजातता शोधण्यात भारतीय आणि परदेशी समीक्षकांना रस उरला नाही असंही घडलं असावं का? तसं पाहता, गेल्या शतकात जितक्या उत्साहानं आणि ऊर्जेनं विविध देशांमध्ये उत्तमोत्तम संहितांवर आधारित सिनेमे बनवले गेले, तसे आणि तितक्या संख्येनं चित्रपट नवीन सहस्रकात गेल्या १८ वर्षांत बनलेले पाहायला मिळत नाहीत. याची कारणं बरीच. खर्च हा एक मुद्दा. अनेक देशांमध्ये चित्रपट बनवण्यासाठी हल्ली सरकारी अनुदानांचीही सोय राहिलेली नाही. माध्यम प्राधान्यही बदलत आहे. गेल्या दशकातच डिजिटल मूव्ही कॅमेऱ्यातून चित्रपट बनवण्याकडे कल वाढू लागला आहे. शिवाय गेल्या पाच वर्षांत डिजिटल माध्यमांच्या उगम आणि प्रसारामुळे चित्रपट बनवण्यासाठी फार मोठा कॅनव्हास (निधी, कलाकार, लोकेशन्स वगैरे) उपलब्ध असण्याची आवश्यकताही संपुष्टात आली आहे. पण प्रथम बीबीसीच्या १०० चित्रपटांच्या यादीविषयी आणि निवडप्रक्रियेविषयी.

तीन वर्षांपूर्वी बीबीसीनं १०० सवरेत्कृष्ट अमेरिकन चित्रपटांची यादी प्रसृत केली. त्यानंतर २१व्या शतकातील सवरेत्कृष्ट चित्रपट, सवरेत्कृष्ट विनोदनिर्मिती करणारे चित्रपट असे करत यंदा १०० सवरेत्कृष्ट बिगरइंग्रजी (फॉरेन लँग्वेज फिल्म्स) चित्रपटांची यादी परवा प्रसिद्ध केली गेली. ही निवड करण्यासाठी बीबीसीनं बऱ्यापैकी चिकित्सकपणा दाखवलेला दिसतो. १०० सर्वोत्तम चित्रपट ठरवण्यासाठी ४३ देशांतील २०९ सिनेसमीक्षकांचा कौल घेतला गेला. त्यातून ६७ दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केलेले १९ भाषांमधील १०० अभिजात, क्रांतिकारी चित्रपट निवडले गेले. सर्वाधिक सिनेमे फ्रेंच आहेत म्हणजे एकूण २७. १२ मँडेरिन चित्रपट आहे, जे एक आश्चर्यच. इटालियन आणि जपानी प्रत्येकी ११ चित्रपट निवडले गेले. नवीन सहस्रकातील केवळ १२ चित्रपटांचा यात समावेश आहे. जपानी दिग्दर्शक अकिरा कुरोसावा दिग्दर्शित ‘सेव्हन सामुराय’ पहिल्या क्रमांकावर आहे. इटालियन दिग्दर्शक व्हितोरियो डे सिका यांचा ‘बायसिकल थीफ’ दुसऱ्या क्रमांकावर आहे. ‘पथेर पांचाली’ १५व्या क्रमांकावर आहे. तिन्ही चित्रपटांची नावं सिनेदर्दीच्या आणि ‘फेस्टिव्हलवाल्यां’च्या वर्तुळाबाहेरही सुपरिचित आहेत. ‘बायसिकल थीफ’ हा बिमल रॉय दिग्दर्शित ‘दो बिघा जमीन’ चित्रपटाचा प्रेरणास्रोत होता हेही सर्वज्ञात आहे. ‘सेव्हन सामुराय’ ही पिचलेल्या ग्रामस्थांना त्यांच्याच मदतीने त्यांच्याच गावात क्रूर दरोडेखोरांपासून वाचवणाऱ्या सात सामुराय योद्धय़ांची दीर्घ चित्रकथा आहे. या सिनेमाने आपल्याकडील ‘शोले’सह जगभरातील साहसपटांना कल्पनाखाद्य पुरवलं.

गेल्या शतकाच्या मध्यावर इटालियन निओ-रिअ‍ॅलिस्ट, फ्रेंच न्यू वेव अशा अनेक चित्रपटांच्या चळवळींच्या लाटेत भारतातही ‘पथेर पांचाली’सारखा अभिजातपट साधारण त्याच काळात बनला. ‘पथेर पांचाली’ हा सत्यजित राय यांच्या दिग्दर्शक कारकीर्दीतला पहिलाच चित्रपट. २६ ऑगस्ट १९५५ रोजी तो प्रदर्शित झाला. अपू त्रिचित्रधारेतील हा पहिला चित्रपट. अपू हा गोंडस मुलगा, त्याची बहीण दुर्गा यांचे गावातले भावविश्व, अपूच्या पालकांची रोजची जगण्याची लढाई, या संघर्षांतील ठसठशीत विरंगुळा किंवा रिलीफ किंवा आशास्थान म्हणून वापरलेली शिट्टी फुंकत दूरवरून येणारी रेल्वेगाडी, तिला पाहण्यासाठी घरातल्या सगळ्यांना टाकून शेतांमधून दौडत जाण्याची खुमारी अशा क्षणांची गुंफण या चित्रपटात सहजपणे साधलेली आहे. सुखाचे मोजके क्षण, त्यांना काळोखून टाकणारं विदारक दुख, गरिबी अशातूनही परस्पर नात्यांचा आधार, मुलांचे आईवडिलांवरचे अवलंबित्व, आईवडिलांना मुलांकडून मिळणारा निरागस भावनिक आधार हे सगळं पाहताना बंगालमधील एका खेडय़ाचा संदर्भच पुसला जात, ही कथा भारतातील प्रत्येकाला परिचयाची वाटू लागते. हा चित्रपट बनला त्यावेळी जगभर वातावरणच असं होतं, की ज्यामुळे ‘पथेर पांचाली’ला फार सहजपणे वैश्विक परिमाण आणि परिचितता लाभून गेली. सत्यजित राय यांनी फार निराळ्या पद्धतीनं तो बनवला होता. एकच अशी गोळीबंद पटकथा नव्हती. राय यांनी रेखाटणे आणि नोट्स काढल्या होत्या. कलाकार नवीन होते. छायालेखक नवीन होता. आर्थिक चणचण होती. तुकडय़ा-तुकडय़ांनी चित्रपट बनवताना पाच र्वष गेली. अखेरी पश्चिम बंगाल सरकारच्या अर्थसाह्य़ामुळे चित्रपट पूर्ण झाला. पश्चिम बंगाल सरकारला हा चित्रपट म्हणजे गरिबी निर्मूलन माहितीपट वाटला होता! गरिबीदर्शनाची टीका राय यांच्यावर सुरुवातीला एतद्देशीयांनीच केली. कारण त्याच दरम्यान हिंदी चित्रपट त्याच्या सध्याच्या व्यावसायिक अवताराकडे सरकू लागला होता. पाश्चिमात्यांना भारतातील गरिबीचे गूढ उदात्तीकरण (एग्झॉटिसायझिंग) करण्याची खोड आहे. त्या सवयीला हा चित्रपट खाद्यच पुरवतो असं टीकाकाराचं म्हणणं होतं. पण खरं तर गरिबीपलीकडेही या चित्रपटात बरंच काही आहे. मुख्य म्हणजे सुखाचे, आनंदाचे क्षणही आहेत. राय यांचा ‘पथेर पांचाली’ गरिबीचे उमाळे टाकण्याच्या फंदात पडत नाही. दृश्यकथन किंवा व्हिज्युअल स्टोरीटेलिंग हा दिग्दर्शकाचा आदिम धर्म राय पाळतात. या चित्रपटाविषयी विशेषत सिनेजाणिवा परिपक्व झाल्यानंतर (१९७०-१९८०नंतर) इतकं काही लिहून आलंय, की त्यामुळे नवीन काही भर टाकण्याची सोय राहिलेली नाही.

२००५मध्ये ‘टाइम’ मासिकानं १०० सवरेत्कृष्ट चित्रपटांची यादी प्रसिद्ध केली, त्यातही हा चित्रपट होता. धंदेवाईक सिनेमांची पंढरी समजल्या जाणाऱ्या हॉलीवूडमधील ऑस्कर अ‍ॅकॅडमीनंही रायना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवलं, हा योगायोग नाही. ‘पथेर पांचाली’च्या तोडीचा चित्रपट भारतात बनला नाही, असं परदेशी समीक्षकांचं मत आहे. आपल्याला ते स्वीकारण्याशिवाय गत्यंतर नाही. बंगाली, मल्याळम, कन्नड आणि काही प्रमाणात मराठी चित्रपटांनी वास्तव अभिजातता दाखवली, त्या काळात हिंदी चित्रपटाचं प्राधान्य वेगळं बनलेलं होतं. आज जगात भारतीय चित्रपट म्हणजे हिंदी चित्रपट हे समीकरण इतकं रूढ झालंय, की त्यामुळेही कदाचित ‘पथेर पांचाली’च्या पलीकडे पाहण्याची गरज बाह्य़ समीक्षकांना वाटली नसावी काय?

First Published on November 4, 2018 12:25 am

Web Title: satyajit rays pather panchali placed at 15 in bbc 100 best foreign language films list