अब्दुल कादर मुकादम  arumukadam@gmail.com 

हिंदुत्व हे साध्य मानायचे की साधन? हिंदूंमध्ये समता हवी की समरसतेची अपेक्षा ओबीसी अथवा वंचितांकडून करावी? हे प्रश्न या संदर्भात महत्त्वाचे ठरतात..

What Jayant Patil Said?
भाजपासह सत्तेत जायचं हा निर्णय शरद पवारांचा की अजित पवारांचा ? जयंत पाटील म्हणाले, “राष्ट्रवादीत…”
sunetra pawar and supriya sule
ठरलं! बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार लढत होणार; सुनिल तटकरे म्हणाले, “मी अधिकृतपणे सांगतो की…”
mahavikas aghadi prakash ambedkar marathi news, prakash ambedkar latest marathi news, prakash ambedkar mahavikas aghadi marathi news
वंचितबरोबर जागावाटपाबाबत महाविकास आघाडीचे नेते साशंक
Prakash Ambedkar news
महाविकास आघाडीच्या बैठकीत वंचित हजेरी लावणार; ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, “महत्त्वपूर्ण महासभा असूनही…”

महाराष्ट्रात गेला महिनाभर चाललेल्या राजकीय नाटय़ाचा आता शेवट झाला असतानासुद्धा त्याबाबत शंकाकुशंका उपस्थित करण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. एकीकडे हिंदुत्व आणि दुसरीकडे सेक्युलर विचारप्रणाली अशा परस्परविरोधी विचारधारांमुळे महाविकास आघाडीतील अंतर्विरोध दिवसेंदिवस तीव्र होणार असे गृहीत धरून ही आघाडी अल्पजीवी ठरणार अशी भाकिते वर्तवली जात आहेत.

सेक्युलर विचारप्रणाली आणि हिंदुत्ववाद या दोन्ही राजकीय विचारप्रणालींत अंतर्गत विरोध आहे, हे कुणालाही नाकारता येणार नाही. पण भाजपचे हिंदुत्व आणि शिवसेनेचे हिंदुत्व यांच्यात एक सूक्ष्म पण गुणात्मक फरक आहे. हे समजून घेतल्यास काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या विकास आघाडीच्या तीन घटक पक्षांत परस्पर वैचारिक फरक असले तरी त्यांच्यात परस्पर सहकार्य होऊ शकणार नाही आणि झाले तरी ते अल्पजीवी ठरेल असेही समजण्याचे कारण नाही.

गुणात्मक फरक कसा?

भाजपचे हिंदुत्व हे त्यांचे एकमेव आणि अंतिम साध्य आहे. इतर सर्व बाबी हे साध्य साधण्याची साधने आहेत. भाजपला हिंदुत्वाचा वारसा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून मिळाला आहे हे सर्वज्ञात आहे. इतकेच नव्हे तर त्यांच्या हिंदू राष्ट्राची आणि त्याच्या राष्ट्रवादाची संकल्पनाही हिंदुत्वाच्या पायावरच उभी आहे. यामुळे हजारो वर्षे अंगभूत विषमता, शोषण आणि अन्यायाने ग्रासलेल्या हिंदू समाजात विकासासाठी परिवर्तन घडवून आणण्यासाठी समता आणि न्याय या मूल्यांची नितांत गरज असतानासुद्धा हिंदुत्वाच्या विचारप्रणालीत या मूल्यांना स्थान असल्याचे आढळत नाही. त्याऐवजी ‘समरसता’ हा शब्द आढळतो. पण समता आणि समरसता या समानार्थी संज्ञा नाहीत हेही इथे लक्षात ठेवले पाहिजे.

१९६७ साली शिवसेनेची स्थापना झाली त्या वेळची परिस्थिती वेगळी होती. नोकरी-व्यवसायाच्या क्षेत्रांत विशेषत: सरकारी नोकऱ्यांत दाक्षिणात्यांचे पूर्ण वर्चस्व होते. मराठी तरुणांना नोकरी-व्यवसायांत अतिशय अल्प संधी मिळत होती. त्यामुळे त्यांच्यात अगतिकतेची आणि नैराश्याची भावना निर्माण झाली होती. यावरील उपाय म्हणून महाराष्ट्रातील, विशेषत: भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील नोकरी-व्यवसायाच्या क्षेत्रांत मराठी माणसाला प्राधान्याने स्थान मिळाले पाहिजे, हे शिवसेनेच्या स्थापनेमागील एकमेव उद्दिष्ट होते. बाळासाहेबांनी मराठी तरुणांच्या वर्मावर नेमके बोट ठेवल्यामुळे मराठी तरुणांनी त्यांच्या हाकेला मोठय़ा प्रमाणात प्रतिसाद दिला आणि अल्पकाळातच दखल घेण्यासारखी एक संघटना म्हणून शिवसेना ओळखली जाऊ लागली. या काळात शिवसेनेच्या आचारविचारात हिंदुत्वाला स्थान नव्हते. निवडणुकीचे राजकारणही तिच्या अजेंडय़ावर नव्हते. ते नंतरच्या काळात आले आणि तेव्हाच शिवसेनेने हिंदुत्वाचा स्वीकार केला. तोवर शिवसेनेचा दाक्षिणात्य विरोध मावळला होता आणि त्याची जागा मुस्लीम विरोधाने घेतली होती. पण तरीही ‘मराठी तरुणांचा आर्थिक आणि भौतिक विकास’ हाच शिवसेनेच्या वैचारिक भूमिकेचा आणि प्रत्यक्ष कार्याचा प्राधान्याचा विषय राहिला आहे. त्याला हिंदुत्वाचा आधार घेण्याची गरजच नाही. किंबहुना हिंदुत्वाचा असा आधार घेतल्यास विकासाच्या प्रक्रियेत त्याचा अडसरच निर्माण होतो. कारण विषमता, तीवर आधारित शोषण आणि अन्याय पारंपरिक हिंदू समाजात अंगभूत असल्यामुळे, अशा समाजात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणल्याशिवाय शोषित, वंचितांचा विकास होऊच शकत नाही आणि कुठलाही पारंपरिक समाज हा स्थितिप्रिय असतो. त्यामुळे परिवर्तन आणि हिंदुत्व एकत्र नांदू शकत नाही, अशी ही शृंगापत्ती आहे. म्हणूनच शिवसेनेसाठी हिंदुत्व हे साध्य नसून साधन आहे, तेसुद्धा तात्कालिक. भविष्यात व्यापक उद्दिष्टासाठी त्याचा त्याग करण्याची किंवा ते तात्पुरते स्थगित करण्याची गरज भासली तर त्यामुळे शिवसेनेच्या मूलभूत उद्दिष्टावर त्याचा काहीही विपरीत परिणाम होणार नाही.

सावरकर व गोळवलकरांचे ‘हिंदुत्व’

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आणि पर्यायाने भाजपचे हिंदुत्व यापेक्षा अधिक व्यापक पण सामाजिक आणि राजकीयदृष्टय़ा संकुचित आहे. स्वा. सावरकरांनी १९२३ साली प्रसिद्ध केलेल्या त्यांच्या ‘हिंदुत्व’ या ग्रंथात त्यांनी हिंदुत्ववादी विचारप्रणाली आणि हिंदू राष्ट्राची संकल्पना या दोहोंचे सविस्तर विवेचन केले आहे. या विवेचनात स्वा. सावरकरांनी हिंदू राष्ट्राची व्याख्या करताना या राष्ट्राचे नागरिकत्व कुणाला आणि कसे प्राप्त होते आणि कोण त्यासाठी अपात्र ठरतो हेही सांगितले आहे.

स्वा. सावरकरांनी या व्याख्येत असे म्हटले आहे की, सिंधू नदीपासून दक्षिणेस सिंधुसागरापर्यंत पसरलेली ही भूमी ज्यांची पितृभू आणि पुण्यभू आहे असेच लोक हिंदू राष्ट्राचे नागरिक होऊ शकतात. या व्याख्येतील ‘पुण्यभू’ हा शब्द सर्वात महत्त्वाचा आहे. या शब्दाचा अर्थ स्वा. सावरकर यांनी असा सांगितला आहे, की ज्यांचे धर्म, धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा, सणवार, संत, महात्मे या भूमीत जन्मलेले असले पाहिजेत. हिंदू राष्ट्राच्या नागरिकत्वाचा हा निकष इतका अभेद्य आहे की मुस्लीम, ख्रिश्चन, पारसी, ज्यू यांची ही पितृभू असली तरी ती पुण्यभू होऊ शकत नाही. पर्यायाने ते हिंदू राष्ट्राचे नागरिक होऊ शकत नाहीत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी यावर भाष्य करताना असे म्हटले आहे की, ‘सावरकरांच्या हिंदू राष्ट्रात बिगरहिंदू केवळ दुय्यम नागरिक होऊ शकतात.’ (डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे लेखन आणि भाषणे (इंग्रजी) खंड आठवा, पृ. १४२)

हीच विचारप्रणाली स्वीकारून डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी १९२५च्या दसऱ्याच्या मुहूर्तावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. डॉ. हेडगेवार यांच्यानंतर सरसंघचालक माधवराव गोळवलकर गुरुजींनी या विचारप्रणालीचा विस्तार आणि विकास केला. हा सगळा भाग गुरुजींच्या ‘बंच ऑफ थॉट्स’ किंवा ‘विचारधन’ या ग्रंथात आला आहे. या ग्रंथात गुरुजींनी मुस्लीम, ख्रिश्चन आणि कम्युनिस्ट यांना हिंदूंचे ‘क्रमांक एकचे शत्रू’ मानले आहे. यासंबंधीचे तपशीलवार विवेचन तीन स्वतंत्र प्रकरणांत केले आहे.

विषमतेचे काय? 

या संदर्भातील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सावरकरांना अभिप्रेत असलेल्या हिंदू राष्ट्राचे स्वरूप विशद करताना सावरकरांनी प्राचीन हिंदू संस्कृतीचे गोडवे गायिले आहेत. पण ज्या समाजात चातुर्वण्र्याधारित अंगभूत विषमता, अन्याय, गुलामी आहे त्या समाजाच्या अशा अन्याय्य परंपरेत गुंतून पडलेल्या हिंदू समाजातील शोषित, वंचितांना कसे मुक्त करता येईल वा त्यांचा विकास कसा करता येईल याचा विचार स्वा. सावरकर आणि गोळवलकर गुरुजींनी केलेला आढळत नाही. कै. नरहर कुरुंदकरांनी त्यांच्या ‘शिवरात्र’ या ग्रंथातील ‘श्री. गोळवलकर गुरुजी आणि महात्मा गांधी’ या शीर्षकाच्या पहिल्याच प्रकरणात या प्राचीन हिंदू संस्कृतीची तपशीलवार चिकित्सा केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, ‘‘हिंदुत्ववादाला हिंदू धर्माचे प्रेम आहे, हा धर्म ज्या जनतेने सहस्रावधी वर्षे प्रेमाने आणि निष्ठेने जतन केला त्या जनतेचे प्रेम नाही. कारण सर्वच धर्म राजेशाहीच्या, सरंजामशाहीच्या वातावरणात विकसित होत असतात, तसे हिंदू धर्माचेही स्वरूप आहे आणि सरंजामशाही विषमता आणि माणसाची गुलामगिरी यावरच आधारलेली असू शकते. या देशात इतिहासाचा पुरावा सापडतो तेव्हापासून एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत जनावरांचे आठवडे बाजार भरावेत तसे माणसांचे बाजार भरत असत आणि या बाजारातून राजरोस स्त्री-पुरुषांची खरेदी-विक्री होत असे. राजेरजवाडे आणि जमीनदार यांना देव-देवळे आणि धर्म यांची गरज असे. या सर्व सरंजामदारांनी दासीबटकी, नर्तिका आणि वेश्या, देवदासी यांचा एक प्रचंड ताफा राजवाडय़ातील राजे आणि देवळातील देव यांच्या मनोरंजनार्थ निर्माण केला होता. ज्यांना जिज्ञासा असेल त्यांनी प्राचीन विक्रमशीला विद्यापीठाचा अभ्यासक्रम चाळून पहावा.’’ (शिवरात्र, पृ. २९-३०, नरहर कुरुंदकर, साधना प्रकाशन)

वर विस्ताराने दाखवून देण्यात आलेला हिंदू समाजातील वंचित, शोषित वर्ग तसेच ज्याला आजच्या परिभाषेत ओबीसी म्हणून ओळखले जाते तो प्रवर्ग हा आज शिवसेनेचा सर्वात मोठा असा अनुयायीवर्ग आहे. वाटचाल नुकतीच सुरू झालेल्या ‘महाविकास आघाडी’तील घटक पक्षांनी या वर्गाच्या विकासासाठी काही प्रकल्प हाती घेतले तर शिवसेना त्याला विरोध करील, असे समजणे हा भाबडेपणाच मानावा लागेल.

मग प्रश्न असाही उभा राहतो की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बदलणार नाही का?

तसे समजण्याचे कारण नाही. कारण बदलणे हा सृष्टीचा धर्म आहे. पण माणसातील बदलासाठी इच्छाशक्ती हवी. गेले जवळपास शतकभर संघ ज्या विचारांच्या आणि मूल्यांच्या आधारे मार्गक्रमणा करीत आहे त्यातील सनातनी आणि पारंपरिक, सरंजामी विचारांची वस्त्रे-वैकल्ये उतरवून त्याऐवजी समता, समताधारित न्याय यांसारखी आधुनिकतावादी मूल्ये व त्यांना पूरक अशा विचारप्रणालीचा स्वीकार करावा लागेल. अशा नव्या मूल्यांचा, विचारप्रणालीचा स्वीकार केला की आपली वाटचाल समग्र परिवर्तनाच्या दिशेने सुरू होते. ही वाटचाल सर्वसमावेशक असते. म्हणून इतर धर्मीयांचा विद्वेष करण्याची गरज राहात नाही. कारण तो सर्वाच्या विकासाचा मार्ग असतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शब्दांत सांगायचे तर, ‘सब का विकास, सब का साथ’ आणि ‘सब का विश्वास’ संपादन करण्याचा तो मार्ग असतो. रा. स्व. संघाची याला तयारी आहे का, हा या संदर्भातील महत्त्वाचा प्रश्न आहे.