चित्रकला आणि शिल्पकला यांत पडलेली मांडणशिल्प आणि ‘परफॉर्मन्स आर्ट’ सारख्या कलाप्रकारांची भर आता रुळली आहे.. यातून चित्रशिल्पादी कलांचं ‘दृश्यकला’ क्षेत्र सशक्त होतं आहे. अर्थात यात मोठा प्रवाह आहे, तो चित्र/शिल्पांचाच! कलांतल्या यशासाठी नेहमीच बाजारावर अवलंबून राहावं लागल्यामुळे जो ‘विकाऊपणा’ बोकाळत होता, त्याऐवजी आता बिनविकाऊ कलेलाही आश्रयदाते मिळू लागले आहेत. नव्या दमाचे, तरुण आणि जग कवेत घेऊ  पाहणारे चित्रकार- शिल्पकार आता ‘कमिशन्ड वर्क’ पेक्षा (म्हणजे कुणाच्यातरी ऑर्डरी घेऊन त्याबरहुकूम कामं करण्यापेक्षा) जगभरात कुठे ‘ स्पॉन्सर्ड रेसिडेन्सी’ (कलाकृती करण्यासाठी उसंत देणारी निवासवृत्ती) मिळते का, हे शोधत असतात.. पैशापेक्षा संधी पाहतात!  भारतीय कलाक्षेत्राचा प्रभाव वाढतो आहेच, पण २०१३ मध्ये दृश्यकलेच्या भल्यसाठी काही पावलं नक्कीच उचलली जाणार आहेत, ही आशादायी बाब..

‘बिएनाले’चे दिन आले..
‘कोची-मुझिरिस बिएनाले’ हे जगभरच्या सुमारे २००  द्वैवार्षिक दृश्यकला-महाप्रदर्शनांपैकी पहिलं भारतीय महाप्रदर्शन १३ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. त्याचा बोलबाला जगभर होतोच आहे यात नवल नाही, कारण या महाप्रदर्शनाला जागतिक बिएनाले फाउंडेशननं मान्यता दिलेली आहे. दुसरीकडे, आपल्या पुण्यात अगदी छोटय़ा प्रमाणावर, पण शहराचा कलेशी सांधा जोडला जावा आणि कला म्हणजे फक्त सजावट नव्हे, अशा सद्हेतूनं ‘पुणे बायएनिअल’ (बिएनाले) सुरू होतेय.. तारीख आहे ११ जानेवारी! तिथंच १२ तारखेला ‘चिन्ह’चा अंक प्रकाशित होईल.

मुंबईतही निवासवृत्ती..
‘अर्का आर्ट ट्रस्ट’ या संस्थेनं देशी-परदेशी कलावंतांप्रमाणेच महाराष्ट्रातल्या पण मुंबईपासून दूरच्या ठिकाणच्या तरुण आणि गुणी कलावंतांसाठी कमाल तीन महिन्यांची निवासवृत्ती  जाहीर केली आहे. महिन्याभरात त्याचे तपशील जाहीर होतील. याखेरीज, ‘द लास्ट शिप आर्ट रेसिडेन्सी’ ही मुंबईत यंदाही सुरू राहील. या निवासवृत्तीसाठी साधारण जून-जुलैमध्ये अर्ज मागवले जातात. निवासवृत्तीच्या काळात मुंबईत राहण्याजेवण्याचा खर्च ‘लास्ट शिप’ करते.

प्रवासी प्रदर्शन
झरीना हाश्मी या गुणी आणि ज्येष्ठ मुद्राचित्रकर्तीचं सिंहावलोकनी प्रदर्शन अमेरिकेतल्या प्रसिद्ध ‘गुगेनहाइम म्यूझियम’मध्ये जानेवारीअखेर सुरू होईल आणि जूननंतर हेच प्रदर्शन युरोप, आशिया या खंडांतही प्रवास करील. झरीना गेली अनेक वर्षे परदेशात राहतात, परंतु  भारतीय वंशाच्या कुणाही परदेशस्थ कलावंताला आजवर अशा प्रवासी प्रदर्शनाचा मान मिळाला नव्हता!

चित्रांच्या बाजारातली ‘भेसळ’ थांबवण्यासाठी..
सय्यद हैदर रझा आणि मनजीत बावा हे भारतीय कलाबाजारातले फार फार विकले जाणारे चित्रकार. त्यापैकी बावा दिवंगत झाले, तर रझांचा ९१ वा वाढदिवस २२ फेब्रुवारीला दिल्लीच्या वढेरा आर्ट गॅलरीत त्यांच्याच चित्रांच्या प्रदर्शनानं साजरा होईल. रझा काय नि बावा काय, दोघांवरही ‘हे केवळ ब्रँडनेम आहेत.. यांच्या नावाखाली दुसरेच चित्रं काढतात’ अशी टीका झालेली आहेच, पण त्याहून वाईट म्हणजे यांची सहीसुद्धा खोटीच असलेली काही नकली चित्रं विकली जातात! कलेच्या बाजारातल्या या भेसळयुक्त मालाला आळा घालण्यासाठी ‘वढेरा’नंच या दोघांचे ‘कॅटलॉग राय्झोने’ २०१३ मध्ये पूर्ण करण्याचं ठरवलं आहे.

कलाव्यापारमेळे..
नोव्हेंबर २०१३ मध्ये मुंबईत ‘इंडिया आर्ट फेस्टिव्हल’ भरेलच, पण त्याआधी पाचवा ‘इंडिया आर्ट फेअर’ दिल्लीत एक फेब्रुवारीपासून सर्वासाठी खुला होतो आहे.