संवाद ही मानवजातीची प्रभावी शक्ती मानली जाते. मात्र काही कारणाने अनेक जण या संवादशक्तीपासून दूर राहतात. या शक्तीपासून वंचित असलेल्या  कर्णबधिर मुलांना संवादाचे धडे देण्याचा ध्यास डोंबिवलीतील संवादकर्णबधिर प्रबोधिनी या शाळेने घेतला.

कर्णबधिर मुलांना सर्वसामान्य मुलांसमवेत शाळेत दाखल करून घेतले जात असले तरी या विद्यार्थ्यांच्या गरजा वेगळ्या असतात. त्यांना लागणारी तांत्रिक साधने, शिक्षण पद्धती, ती आत्मसात असलेले शिक्षक या शाळांमध्ये नसतात. संवाद कर्णबधिर प्रबोधिनीच्या संस्थापक अपर्णा आगाशे यांना ही अडचण जाणवली जेव्हा त्यांचा स्वत:चा मुलगा अशा शाळेत जाऊ लागला. परंतु दुसरीनंतरच या शाळेत त्याच्या गरजेनुरूप शिक्षण मिळणे शक्य नसल्याचे लक्षात असल्यानंतर त्यांनी डोंबिवलीतील एका कर्णबधिर मुलांच्या शाळेत प्रवेश घेतला. मात्र याही संस्थेत काही तांत्रिक अडचणींमुळे पुढचे शिक्षण घेणे शक्य झाले नाही. मग आगाशे यांनी चंग बांधला आणि कर्णबधिर मुलांसाठी स्वत: शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला.

Womens health It is need to understand mentality of pregnant women
स्त्री आरोग्य : काय असतं गर्भवतीच्या मनात?
Personality Traits
तुमची जन्मतारीख ३, १२, २१ किंवा ३० आहे का? जाणून घ्या, कसा असतो अशा लोकांचा स्वभाव…
Extraordinary women who make everyday life easier for common people
सर्वसामान्यांचे दैनंदिन जीवन सुकर करणाऱ्या ‘असामान्य स्त्रिया’
Did you know that polyvalent astaxanthin is a natural colorant
Health Special : नैसर्गिक रंग देणारे बहुगुणी ॲस्टाझॅनथीन तुम्हाला माहीत आहे का?

समाजाची साथ

एका वर्षांच्या अवधीत त्यांनी ही संकल्पना प्रत्यक्षात आणली आणि १० जून १९९२ मध्ये त्यांनी शाळेचा पहिला वर्ग आपल्या घरातच भरविला. तोपर्यंत  गृहिणी असलेल्या आगाशे यांना संस्था नोंदणी कशी करायची याची माहितीही नव्हती. मात्र या सर्व गोष्टी माहिती करून घेत त्यांनी शाळेला सरकारकडून मान्यता मिळवली. पहिली चार वष्रे विनाअनुदानित तत्त्वावर चालविलेल्या या शाळेला १९९६मध्ये अनुदान मिळाले आणि या शाळेचा ज्ञानयज्ञ सुरू झाला. डोंबिवलीतील स्थानिक लोकप्रतिनिधी आणि उद्योगपतींनीही या शाळेच्या उभारणीसाठी आर्थिक योगदान दिले. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने या शाळेला भाडेतत्त्वावर जागा उपलब्ध करून दिली.

 

पालकांची मानसिकता बदलण्यापासून सुरुवात

आज या परिसरातील झोपडपट्टीमधील तसेच आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांतील विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत आहेत. सुरुवातीला शाळेतील शिक्षकांनी आणि संस्थेतील सदस्यांनी डोंबिवली आणि आसपासच्या खेडय़ांमध्ये जाऊन गरजू मुलांना शोधून काढले. अनेकांच्या पालकांना ही मुले शिकू शकतात याची जाणीवही नव्हती. त्यांची मानसिकता बदलण्याचे मोठे आव्हान शिक्षकांनी पेलले.

सध्या शाळेत पहिली ते सातवीपर्यंतची मुले शिकत आहेत. शाळेत कर्णबधिर विद्यार्थ्यांच्या विकासासाठी आवश्यक अशा सर्व सुविधा उपलब्ध आहेत. यामुळे कोणता विद्यार्थी किती प्रमाणात कर्णबधिर आहे, त्याला कोणत्या प्रकारचे श्रवणयंत्र आवश्यक आहे इथपासून ते त्याला कशा प्रकारे शैक्षणिक संकल्पना त्याला कशा आत्मसात करून द्यायच्या याचा विद्यार्थीनिहाय विचार होतो. शाळेत पाच विषय व एक कला शिक्षक आहे. याशिवाय काही निवृत्त शिक्षकही स्वेच्छेने काम करतात.

बोलते करण्यासाठी

विद्यार्थ्यांनी बोलावे यासाठी शाळेत सांकेतिक भाषेचा वापर शक्यतो टाळला जातो. श्रवणयंत्र मिळाल्यानंतर त्यांच्याशी सामान्य विद्यार्थ्यांसारखाच संवाद साधला जातो. विद्यार्थ्यांना अक्षर, शब्द आणि वाक्यांची ओळख व्हावी यासाठी सामूहिक श्रवणयंत्रांच्या साह्यने विविध गोष्टी ऐकवल्या जातात. याची सुरुवात होते ती चित्र आणि तक्त्यांच्या अभ्यासातून. यामुळे शाळेत एकही भिंत अशी नसेल की जेथे चित्र वा तक्ता नाही. शाळेची सर्व वर्ग त्या त्या इयत्तेत आवश्यक असलेल्या अभ्यासानुसार शिक्षकांनी तयार केलेल्या तक्त्यांनी भरलेले आहेत.

पाच विशेष टप्पे

बालवर्गात अडीच वर्षांपासून सहा वर्षांच्या मुलांचाही समावेश आहे. विद्यार्थ्यांचे पुढचे शिक्षण सुलभ व्हावे यासाठी पाच विशेष टप्पे आखण्यात आले आहेत. यात सुरुवातीला चित्रांच्या माध्यमातून संवाद साधला जातो. नंतर चित्र आणि शब्दांच्या व पुढे शब्दांच्या माध्यमाचा वापर केला जातो. पुढची पायरी संभाषण आणि गोष्ट अशी असते. यासाठी शाळेतील शिक्षक विशेष परिश्रम घेत असतात. विद्यार्थ्यांनी बोलावे हा मुख्य उद्देश असल्यामुळे वाचा प्रशिक्षण दिले जाते. यामध्ये विद्यार्थ्यांसमोर शिक्षक बसतात आणि ते ओठांच्या हालचाली करतात. त्या हालचाली टिपून विद्यार्थ्यांनी नेमका शब्द ओळखायचा असतो. यामुळे विद्यार्थ्यांची वाचा शक्ती सुधारते आणि ते बोलू लागतात.

प्रकाशरचना

कर्णबधिरतेमुळे ही मुले बरेचदा संशयी आणि रागीट असतात. दोन व्यक्ती बोलत असताना त्या व्यक्ती नेमके काय बोलत आहेत हे पाहण्याची त्यांना प्रचंड उत्सुकता असते. म्हणून त्यांच्या भावविश्वात उजेडाला विशेष स्थान आहे. अंधारात किंवा त्यांच्या नकळत गप्पा मारल्या तर त्यांना या व्यक्ती आपल्याबद्दलच बोलत असल्याचा संशय येतो, असे निरीक्षण आगाशे यांनी नोंदविले. यामुळे शाळेची रचना करताना खूप प्रकाश राहील अशीच करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त वेळ शाळेत घालावा यासाठी शाळा सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळात भरते. तसेच शाळेत विद्यार्थ्यांना अन्नदात्यांच्या सहकार्याने रोज जेवणही दिले जाते. सणांची ओळख व्हावी यासाठी शाळेत सर्व सण साजरे केले जातात.

दहावीचे वर्ग

पुढचे शिक्षण घ्यावे म्हणून सातवीनंतरही दोन वष्रे विद्यार्थ्यांकडून दहावीची तयारी करून घेतली जाते. याची सुरुवात आगाशे यांनी स्वत:च्या मुलापासूनच केली. या शाळेतून त्यांचा मुलगा व अन्य दोन विद्यार्थिनींनी पहिल्यांदा दहावीची परीक्षा दिली. या विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण व्हावे यासाठी आगाशे आणि त्यांच्या शिक्षक़ांनी विशेष सहाकार्य केले. त्या वर्षांपासूनच या शाळेतून दरवर्षी किमान पाच ते सहा विद्यार्थी दहावीची परीक्षा देतात आणि ते सर्वच्या सर्व चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होतात. यातील काही विद्यार्थ्यांना बँकांमध्ये नोकरीही मिळाली आहे. तर काही विद्यार्थी आता बारावीची परीक्षा देण्याच्याही तयारीत आहेत.

कलागुणांना वाव

विद्यार्थ्यांकडून शुभेच्छापत्र, कागदाची फुले अशा विविध गोष्टी शिकवून त्या त्यांच्याकडून बनवून घेतल्या जातात. ही मुले यात इतकी निपुण होतात की ती इतर सामान्य शाळेतील मुलांना हस्तकला शिकवितात. हस्तकलेसोबतच चित्रकला, क्रीडा यामध्येही विद्यार्थी अग्रेसर अनेक आंतरशालेय स्पर्धामध्ये त्यांनी यशही मिळवले आहे.

वसतिगृहाची सुविधा

शाळेतील सुविधांचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा यासाठी शिक्षक विशेष मेहनत घेत असतात. याचाच भाग म्हणून सुट्टीच्या काळात शिक्षक शहराच्या आजूबाजूच्या गांवांमध्ये जाऊन असे विद्यार्थी शोधतात त्यांच्या पालकांना त्यांच्या शिक्षणाचे महत्त्व पटवून देतात. अशा लांब राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी नियमित शाळेत यावे यासाठी वरच्या मजल्यावर वसतिगृह सुरू करण्यात आले. सध्या आठ विद्यार्थी तेथे राहतात. चांगले आर्थिक पाठबळ मिळाल्यास शाळेची स्वतंत्र इमारत उभारण्याचा विचार आहे. आर्थिकदृष्टय़ा दुर्बल कुटुंबातील मुलांना मुख्य प्रवाहात आणण्याकरिता समाजाची साथ मिळाली तर हाही विचार प्रत्यक्षात येईल.

 

नीरज पंडित

संकलन – रेश्मा शिवडेकर

reshma.murkar@expressindia.com