|| राजेंद्र येवलेकर

उत्तर प्रदेशात लखनौ येथे विज्ञान भारती व जैवतंत्रज्ञान विभागाने आयोजित केलेल्या भारतीय विज्ञान महोत्सवास दहा लाख लोकांनी भेट दिली. त्यातून विज्ञानाशिवाय विकास होऊ शकत नाही हा संदेश सर्वदूर गेला यात शंका नाही. या महोत्सवातून आपण विज्ञान प्रगतीत कुठे आहोत हे तर कळतेच, शिवाय वैज्ञानिकांनाही त्यांच्या सामाजिक जबाबदारीचे भान येते.

प्रयोगशाळेतील विज्ञान जनसामान्यांपर्यंत कधीच पोहोचत नाही, हस्तिदंती मनोऱ्यात बसून स्वान्तसुखाय संशोधन करण्याची चैन भारतासारख्या ‘नेहमीच विकसनशील’ या बिरुदाला चिकटून बसलेल्या देशाला परवडणारी नाही. त्यामुळेच लखनौ येथे झालेल्या चौथ्या अखिल भारतीय विज्ञान महोत्सवासारखे कार्यक्रम वेगळे ठरतात. इंडियन सायन्स काँग्रेस आणि हा विज्ञान महोत्सव यातला फरक हा अभिजनांचा मेळा आणि सामान्यांसाठीचा विज्ञान कुंभमेळा असा आहे. विज्ञान भारती व जैवतंत्रज्ञान विभाग यांच्या विद्यमाने सुरू झालेल्या या उपक्रमाचा आता वटवृक्ष झाला आहे. या महोत्सवात आलेली दूरच्या राज्यातील शाळकरी मुले, प्रगत देशात चाललेल्या संशोधनात वाटा उचलणारे भारतीय वैज्ञानिक, शिक्षक, उद्योगधुरीण, तंत्रज्ञ, सरकारी अधिकारी व मंत्री यांच्या मंथनातून समाजाला नेमके काय हवे आहे याचा लेखाजोखा दरवर्षी मांडला जातो.

गुंटूरहून आलेली मुले सांगत होती, ‘आम्ही रेल्वेत कधी बसलो नव्हतो, पण या महोत्सवामुळे आम्हाला ती संधी मिळाली. आता पुढच्या वेळी आमच्या मित्रांनाही संधी मिळावी असे वाटते.’ तेलगु देसमचे खासदार जयदेव गल्ला यांच्या खासदार निधीतील रकमेतून या मुलांचा खर्च करण्यात आला होता. एरवी इंडियन सायन्स काँग्रेससारखे कार्यक्रम अशा मुलांना बघायला मिळणे शक्य नाही, पण विज्ञान महोत्सवाने ते शक्य केले आहे. लखनौतील विज्ञान ग्राममध्ये विज्ञानातील भारताच्या प्रगतीची झलक पाहताना या मुलांना एका वेगळ्या जगात आल्याचा भास झाला असेल तर नवल नाही. आपल्याकडे शहरी मुलांना ज्या संधी असतात त्या छोटय़ा, अगदी शहरांच्या जवळ असलेल्या गावातील मुलांना असतीलच असे नाही. नवे काही अनुभवण्याची संधी गावातील मुलांना मिळते हे या महोत्सवाचे वेगळेपण. विज्ञानाशिवाय विकास होऊ  शकत नाही, किंबहुना विज्ञानातून निर्माण होणाऱ्या तंत्रज्ञानातून फार मोठा फायदा देशाला होतो, त्यातून एकूण राष्ट्रीय उत्पन्नात नकळत हजारो कोटींची भर पडत असते, हे सगळे इथे आल्यानंतर जाणवते.

या महोत्सवाचा दुसरा महत्त्वाचा उद्देश म्हणजे, वैज्ञानिकांना आपण समाजाला कुठे तरी जबाबदार आहोत याचे भान मिळते. समाजाच्या समस्यांना तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उत्तरे शोधण्याचे काम त्यांनी करणे अपेक्षित आहे. येथील अनेक दालनांमधून फिरताना असे जाणवते, की अरेच्या. या लोकांनी तर हे उत्तर शोधलेले आहे, मग ते आपल्यापर्यंत कसे आले नाही, तर त्याचेही कारण उलगडत जाते. सीएसआयआरच्या अंतर्गत काम करणाऱ्या ३५ हून अधिक प्रयोगशाळांतील वैज्ञानिक तसेच इतर अनेक संशोधन संस्थांतील वैज्ञानिकांनी या समस्यांवर उत्तरे शोधलीही आहेत, पण केवळ तंत्रज्ञानाला उद्योगाची जोड न मिळाल्याने, त्याला व्यावसायिक रूप न मिळाल्याने हे तंत्रज्ञान वापरात आलेले नाही.

विज्ञान, उद्योग शिक्षण, धोरणकर्ते यांची समोरासमोर गाठ पडल्याने त्यांना समन्वय साधता येतो त्यासाठी हा विज्ञान महोत्सवाचा मंच उपयोगाचा आहे. बिरबल सहानी यांच्यासारख्या अनेक वैज्ञानिकांचा वारसा लाभलेल्या लखनौत झालेला हा विज्ञान महोत्सव साजेसा असाच झाला. इथे काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतचा भारत आपल्यापुढे एखाद्या चित्रमालिकेसारखा डोळ्यापुढून सरकत जातो. काश्मीरमधील पश्मिना शालीच्या निर्मितीसाठी लखनौच्या एका वैज्ञानिकाने क्लोनिंगचे तंत्र वापरून बकऱ्यांच्या त्या जातीचे संवर्धन केले आहे, पश्मिना शाल बनावट मिळण्याचीच शक्यता अधिक, पण या शालीत प्रदीप्त पदार्थ वापरल्याने असली शाल अंधारात नेली असता तिचा एक कोपरा उजळताना दिसतो व ती खरी पश्मिना शाल असल्याचे आपण ठामपणे सांगू शकतो; असे संशोधन करता येऊ शकते यावर कुणाचा विश्वास बसणार नाही.

या विज्ञान महोत्सावात टोपीवाले शेतकरी बाहेरगावहून येतात. ते थेट कृषी सचिव व शास्त्रज्ञांना बांधावरच्या समस्या सांगतात व तज्ज्ञ लोकही कुठलाही मोठेपणाचा आव न आणता बळीराजाला युक्तीच्या चार गोष्टी सांगतात. हा सगळा विचार व संकल्पनांच्या आदानप्रदानातून प्रश्नांवर उत्तरे शोधण्याचा खटाटोप आहे, त्यात बरेचसे यशही येत आहे. एरवी पुण्यातील राष्ट्रीय पेशी विज्ञान केंद्राने केलेले संशोधन, लखनौच्या राष्ट्रीय वनस्पती संशोधन केंद्राने तयार केलेले दुर्मीळ झाडांचे बोन्साय हे लोकांपुढे येण्यास तसा काहीच मार्ग नाही, पण या महोत्सवाच्या निमित्ताने हे आदानप्रदान घडते आहे. गुजरातच्या नवप्रवर्तन केंद्राने जुगाडच्या माध्यमातून लोकांनी केलेले नवीन प्रयोग मांडले, त्यातून निर्माण झालेली साधने व तंत्रज्ञानाची जी झलक दाखवली त्याने तर आपण थक्क होऊन जातो. हे सामान्यांचे विज्ञानही येथे भाव खाऊ न जाते.

आपल्याला आपला देश अशा संमेलनांमध्ये बघायला मिळतो, रोजच्या जीवनातील समस्यांवर कुणीतरी विचार करीत आहे  हेही उमजते. दिल्लीतील शिवमच्या आजोबांना दिल्लीतील प्रदूषणामुळे त्रास झाला होता तेव्हा तो अस्वस्थ झाला. त्यातून त्याने प्रदूषकांपासून संरक्षण करणारा इतका चांगला फिल्टर शोधून काढला की त्यातून अगदी खूप विषारी रसायने हवेत आली तरी लाल दिवे लागून तुम्हाला सावध करतातच. शिवाय नेहमीच्या प्रदूषणाला तर हा फिल्टर अगदी सहज दूर ठेवतो. त्याची किंमत आहे दहा हजार रुपये. अधिक उत्पादनात ती कमी होईल, सॅनिटरी नॅपकीन निर्मितीचे अनेक कल्पक उपाय मुलींनीच शोधून काढले. त्यांनी त्यांची प्रायोगिक उत्पादनेही दाखवली, याचा अर्थ मुलेही विचार करीत आहेत. अटल टिंकरिंग लॅबचा उपक्रम मुलांना वेगळा विचार करायला लावतो आहे हेही दिसले. फक्त ही बहुतांश मुले शहरातील होती, त्यामुळे हा उपक्रम ग्रामीण भागातही पोहोचायला हवा हे जाणवत राहते.

मुलींसाठी विज्ञानात कुणीच आदर्श नाही असे सहज कुणीही म्हणेल, पण तिथे तुम्हाला वेगळेच चित्र दिसते. वैज्ञानिक महिलांचे अनेक आदर्श तिथे उपस्थित होते. त्यात वनस्पती शास्त्रज्ञ वीणा टंडन यांच्यापासून कितीतरी नावे घेण्यासारखी. या प्रत्येक वैज्ञानिक महिलेने पुरुषांचे वर्चस्व असलेल्या जगातून मार्गक्रमण करीत आताची पायरी गाठेपर्यंत सांगितलेले अनुभव डोळ्यात पाणी आणणारे. पण त्यातही साधारण पन्नाशी ओलांडलेल्या महिलांनी जे अनुभव सांगितले ते बघता पुरुषी वर्चस्व असले तरी तो काळ ‘मी टू’चा नव्हता, पुरुषांनी एक ठरावीक पायरी न ओलांडण्याचा म्हणजे शिस्तीचा होता. कर्करोग झालेली एक मुलगी त्यावरील उपचारांचे हानीकारक परिणाम कमी करायचे असा निश्चय करते, तोच ध्यास घेऊ न नंतर औषध कंपनी काढते, हे सगळे अनुभव थक्क करणारे. पुण्यातील एनसीएलच्या डॉ. अश्विनी राजवाडे व आघारकर संशोधन संस्थेच्या डॉ. अनुपमा इंजिनीअर यांनी आत्मविश्वासाने कथन केलेला  संशोधनाचा प्रवास सर्वच महिला संशोधकांना प्रेरणा देणारा असाच होता.

विज्ञानात मुलांना रस निर्माण होणे हे ते शिकवण्याच्या पद्धतीवरही अवलंबून असते. आपल्या देशात अशा शिक्षकांची कमी नाही. नागपूरच्या रसायनशास्त्राच्या शिक्षिका पुष्पलता रवींद्र यांनी बाटली, इंजेक्शन, गॅस व पाणी यांच्या मदतीने अनेक रासायनिक क्रिया उलगडल्या, स्माइलीच्या माध्यमातून अणुरचना वेगळ्या पद्धतीने समजावून सांगितली. मुंबईच्या बॅप्टिस्ट ज्युनियर कॉलेजच्या डॉ. अरुणा सामंत यांनी घरातील वस्तू वापरून जिवंत पेशीतील डीएनए काढून दाखवला. सूक्ष्मदर्शकाशिवाय डीएनए दिसू शकतो हे पहिल्यांदाच कळले. त्यात त्यांनी कांद्याचा लगदा करून मीठ घातले, नंतर भांडे धुण्याचे एक द्रावण टाकले, नंतर ते गाळून अल्कोहोलमध्ये टाकले असता धाग्यांच्या स्वरूपात डीएनए तरंगताना दिसला. मुंबईच्या मिठीबाई कॉलेजचे प्रा. विष्णू वझे यांनी अब्जांश तंत्रज्ञान म्हणजे नॅनो टेक्नॉलॉजी सोप्या भाषेत समजून दिली. महाराष्ट्राच्या एका सरकारी शाळेतून आलेल्या शिक्षिका ज्योती मेडमिलवार यांनी ‘लॅब इन कॅरीबॅग’ ही संकल्पना सादर केली. नेहमीच्या वस्तूंमधून ही प्रयोगशाळा तुम्ही जवळ बाळगू शकता. गोमतीनगरच्या रेल्वे स्टेशन मैदानावर विविध वैज्ञानिक व औद्योगिक संस्थांच्या कामगिरीचे प्रदर्शन होते. त्यात इस्रोपासून अगदी माहिती नसलेल्या संस्थांपर्यंत अनेकांचे काम सामोरे आले. अशा महोत्सवातून विज्ञानाचे लोकशाहीकरण होत आहे यात शंका नाही.

मनू प्रकाश ठरले आकर्षणबिंदू

भारतीय वंशाचे अमेरिकी वैज्ञानिक डॉ. मनू प्रकाश या महोत्सवास उपस्थित होते. त्यांनी ८० रुपयांत घडीचा सूक्ष्मदर्शक तयार केला आहे. त्याच्या मदतीने त्यांनी मुलांना एका सूक्ष्मजीवांच्या वेगळ्या जगाचे दर्शन घडवले. कार्डबोर्ड पेपरच्या मदतीने त्यांनी तयार केलेला सूक्ष्मदर्शक एखादी वस्तू १७५ पट मोठी करून दाखवतो. हा सूक्ष्मदर्शक मोबाइलला कपलरने जोडून निरीक्षण करायच्या पदार्थाची सगळी माहिती संग्रहित करता येते. मनू प्रकाश यांनी मुलांचा तासच घेतला आणि त्यांनाही त्यात खूप मजा आली. त्यांच्या या सूक्ष्मदर्शकामुळे मुलांना आता शाळेतील सूक्ष्मदर्शकावर अवलंबून राहावे लागणार नाही. त्यांनी या फोल्डस्कोपमधून मुलांना क्लोरोफिल, त्वचापेशी, जिवाणू असे सगळे काही दाखवले. मनू प्रकाश हे उत्तर प्रदेशच्या मेरठचे रहिवासी. बारावीनंतर त्यांनी कानपूर आयआयटीत शिक्षण घेतले व नंतर अमेरिकेतील स्टॅनफर्डला गेले. तेथे त्यांनी प्रकाशीय प्रयोगशाळा उभारली आहे.

कृत्रिम बुद्धिमत्ता

कृत्रिम बुद्धिमत्ता हा आगामी काळातील मोठा विषय आहे. त्यातून अनेक गोष्टी साध्य होतील, अगदी निवडणुकांचा प्रचारसुद्धा वेगळ्या वळणावर जाईल. अणुकेंद्रातील सफाईचे धोकादायक काम यापुढे यंत्रमानव करतील. आयआयटी खरगपूरचे पी. के. विश्वास व कोलकात्याचे आशीष घोष यांनी सांगितले, की आपल्या देशात नवीन पिढीचे यंत्रमानव तयार होणार आहेत. त्यांचे संचालन कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे होईल. थोडक्यात त्याला विचारशक्ती दिली जाईल. खरगपूर आयआयटीत त्यासाठी ‘सेंटर फॉर आर्टिफिशियल इंटेलिजन्स रिसर्च’ ही संस्था काम करीत आहे. संपूर्ण वाहतुकीचे नियंत्रण परिस्थितीनुसार यंत्रमानवच करेल.

तमिळनाडूचे यांत्रिकी अभियंता मुरगन यांनी केळ्याच्या धाग्यांपासून कपडा, तर गरापासून जैवखत तयार केले असून त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढू शकते. मुरगन यांचा राष्ट्रपती व पंतप्रधान यांनी याआधीच गौरव केला आहे.

जवानांसाठी पाणी

सीमेवर पाण्याची समस्या तीव्र असते, तेथे जवानांना पुरेसे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी डीआरडीओने एयरोटॉर डिस्पेन्सर तयार केला आहे. त्यात पाण्याची ९५ टक्के बचत होते.

फ्लोराइड पाण्यावर उत्तर

फ्लोराइड व आर्सेनिकयुक्त पाण्याने लोक आजारी पडतात, त्यावर सीएसआयआरने घरगुती वापराचा फिल्टर तयार केला असून त्यात नॅनो तंत्रज्ञानाचा वापर केला आहे.

rajendra.yeolekar@expressindia.com