राजेंद्र येवलेकर

शुक्रावर जीवसृष्टी असण्याची शक्यता वर्तवणारे संशोधन एका आंतरराष्ट्रीय संशोधन पथकाने अलीकडेच जाहीर केले. पुढील शोधाची दारे किलकिली करणाऱ्या या नव्या संशोधनाविषयी..

शुक्र हा आपल्या सूर्यमालेतील लोभसवाणा ग्रह. रोमन लोकांची प्रेमदेवता. पहाटेच्या वेळी शुक्राच्या पांढऱ्याशुभ्र चमकदार ज्योतीचे दर्शन सर्वानाच मोहवून टाकणारे. ‘पिसारा प्रभेचा उभारून दारी, पहाटे उभा शुक्र हा प्रेमळ..’ असे शुक्राचे वर्णन कुसुमाग्रजांनी ‘पृथ्वीचे प्रेमगीत’मध्ये केले आहे. वैज्ञानिकांनाही या प्रेमळ शुक्राने नेहमीच कोडय़ात टाकले आहे. त्यातच अलीकडे शुक्रावर जीवसृष्टी असण्याची शक्यता वर्तवणारे संशोधन एका आंतरराष्ट्रीय संशोधन पथकाने जाहीर केले. या संशोधनातील निष्कर्ष विज्ञानाच्या कसोटीवर अगदी योग्य असले, तरी तो सुतावरून स्वर्ग गाठण्यासारखाच प्रकार आहे. मुळात शुक्र हा आपल्या सौरमालेतील सर्वात तप्त ग्रह आहे, कारण तो सूर्याच्या अगदी जवळ आहे. तरीही या संशोधनाने मंगळाबरोबरच जीवसृष्टीचा शोध आता शुक्रावरही सुरू केला जाईल यात शंका नाही. किंबहुना पुढील वर्षी एप्रिलमध्ये जी अवकाशयाने सोडली जाणार आहेत, त्यातील एक शुक्रावरही सोडण्याचा मनोदय नासाचे प्रमुख जिम ब्राइडेन्स्टाइन यांनी व्यक्त केला आहे.

प्रतिकूल स्थिती

शुक्रावरचे पृष्ठीय तापमान हे ४७१ अंश सेल्सियस असते. तेथे शिशासारखा धातूही वितळून जाईल. शिवाय कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण इतके जास्त आहे, की त्यात जीवसृष्टी तग धरणे अशक्य आहे. तरीही पृथ्वीची भगिनी म्हणूनच शुक्राकडे बघितले जाते. कारण या ग्रहाची रचना पृथ्वीसारखीच खडकाळ आहे. असे असले तरी, शुक्राची इतर अनेक वैशिष्टय़े फार वेगळी आहेत. युरोपीय अवकाश संस्थेच्या ‘व्हीनस एक्स्प्रेस’ यानाने शुक्रावर ओझोनचे अस्तित्व असल्याचे २०११ मध्ये शोधून काढले होते. आताच्या संशोधनानुसार, तेथे ‘फॉस्फिन’ हा वायू आढळून आला आहे. त्यात फॉस्फरसचा एक व हायड्रोजनचे तीन रेणू असतात. जैवरासायनिक प्रक्रियेतून काही सूक्ष्म जीवांनीच हा फॉस्फिन वायू तयार केला, असा नव्या संशोधनातला निष्कर्ष आहे. पण ज्या वातावरणात कार्बन डायऑक्साइड खूपच जास्त आहे, तेथे फॉस्फिन वायू तयार झाला तरी तो लगेच नष्ट होईल. त्यावर सध्याच्या संशोधनातील वैज्ञानिकांचे उत्तर असे की, हा वायू शुक्राच्या वातावरणात २० पीपीबी (म्हणजे पार्ट्स पर बिलियन) आहे. पण तरीही फॉस्फिन वायू तेथे टिकून राहायचा असेल, तर तेथील रासायनिक स्थिती ही अद्भुत असली पाहिजे असा त्याचा अर्थ होतो. तेथील उष्मागतिकी क्रियाही तशा असू शकतील.

अलीकडच्या बहुतांश मोहिमा या आंतरराष्ट्रीयच असतात. त्यात शुक्रावर फॉस्फिनचे अस्तित्व शोधणाऱ्या या मोहिमेचे नेतृत्व कार्डिफ विद्यापीठाचे प्रा. जेन ग्रीव्हज् यांनी केले होते. ‘नेचर अ‍ॅस्ट्रॉनॉमी’ या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. २०१७ मध्ये प्रा. ग्रीव्हज् यांनीच शुक्रावरील वातावरणात फॉस्फिन असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. हवाईतील जेम्स मॅक्सवेल दुर्बीण, चिलीतील दुर्बीण यांनी २०१९ मध्ये त्यावर शिक्कामोर्तब केले होते. पण प्रत्येक वेळी संशोधकांनी या संशोधनाची माहिती देताना सावधगिरीच बाळगली आहे. आता फक्त त्यातील एक पाऊल पुढे पडले आहे. शुक्रावरचे तापमान खूपच जास्त आहे, तेथील वातावरण दाट आहे. वातावरणात सल्फ्युरिक आम्लही आहे. तेथील वातावरणातून कुठलीच वस्तू पृष्ठभागावर उतरेपर्यंत जशीच्या तशी राहील असे नाही. तिचे क्षरण झालेले असेल. फार तर तेथे ड्रोन किंवा बलूनच्या मदतीने पहिल्या मोहिमा करता येतील. नासा व इस्रोने तशा मोहिमांचा विचार केला आहे. इस्रो २०२३ मध्ये अशी मोहीम आखणार आहे. शुक्राचे दाट वातावरण भेदून तेथे अवतरणे आव्हानात्मक आहे, पण अशक्य नाही.

आताचे संशोधन..

शुक्रावर फॉस्फिन वायू सापडला, त्याअर्थी तेथे सूक्ष्मजीव असले पाहिजेत, असा अंदाज बांधण्यात आला आहे. कारण पृथ्वीवर फॉस्फिनचे अस्तित्व हे काही सूक्ष्मजीवांमुळे आहे. हे जीव ऑक्सिजनमुक्त वातावरणात टिकू शकतात. परंतु शुक्रावरील फॉस्फिनचा स्रोत हे सूक्ष्मजीवच असतील, हे मात्र अद्याप सिद्ध झालेले नाही. त्यामुळे त्याचे समाधानकारक स्पष्टीकरण देता आले असे म्हणता येत नाही. काही ग्रहांवर मिथेन ज्या पद्धतीने शोधला गेला, त्याच पद्धतीने शुक्रावर फॉस्फिनही शोधला गेला आहे. शुक्राची रेण्वीय रचना ही मातृ ताऱ्यानुसार आहे. गुरू व शनी या ग्रहांवरही फॉस्फिनचे अस्तित्व आहे म्हणून तिथे जीवसृष्टी आहे असे म्हणता येत नाही. कारण तेथील दाब व तापमान जास्त आहे. या ग्रहांवर फॉस्फिनचे प्रमाण ४.८ पीपीएम आहे. त्यामुळे तो लगेच फॉस्फरस व हायड्रोजनमध्ये विघटित होतो. फॉस्फरसमुळेच गुरूच्या ढगांचा रंग लालसर दिसतो. शुक्राबाबत परिस्थिती थोडी वेगळी आहे; येथे फॉस्फिनचे प्रमाण खूप जास्त- म्हणजे २० पीपीबी आहे. तेथे विजा पडणे, ढग, ज्वालामुखी, उल्कावर्षांव यामुळेही फॉस्फिन तयार होत असावा. पण हा वायू तेथील जास्त ऑक्सिडिकारक वातावरणात लगेच नष्ट होऊ शकतो. मग तेथे फॉस्फिनचे प्रमाण जास्त का आहे, हा प्रश्न उरतोच. पृथ्वीवरही सूक्ष्मजीवांबरोबरच काही औद्योगिक प्रक्रियांत फॉस्फिन वायूची निर्मिती होते.

शुक्रावर फॉस्फिनमुळे सूक्ष्मजीव असतीलच, असा अर्थ काढण्याआधी शुक्रावरील सर्व रासायनिक क्रियांचा अभ्यास करावा लागेल. त्यातून फॉस्फिननिर्मितीच्या कारक घटकांबद्दल सूक्ष्मजीवांच्या अस्तित्वाशिवाय इतर पर्याय पुढे येऊ शकतात. पण तूर्त तरी या संशोधनावरून शुक्रावर पृथ्वीप्रमाणे उच्च तापमान, उच्च आम्लता व उच्च कार्बन डायऑक्साइड असलेल्या स्थितीत फॉस्फिननिर्मिती करणारे सूक्ष्मजीव असावेत व ते सुखेनैव नांदत असावेत, असा सोपा अर्थ लावण्यात आला आहे. पृथ्वीवर काही सूक्ष्मजीव फॉस्फिन निर्माण करतात तेव्हा त्यात ऑक्सिजनच्या अस्तित्वाची गरज नसते. पण या सूक्ष्मजीवांचा पुरेसा अभ्यास झालेला नाही. पृथ्वीवरील सूक्ष्मजीव येथे फॉस्फिन तयार करत असतील, तरी शुक्रावरील प्रतिकूल परिस्थितीत ते त्याची निर्मिती करू शकतात का, याचा शोध जीवरसायनशास्त्रज्ञांना घ्यावा लागेल. जर फॉस्फिननिर्मितीची प्रक्रिया ही जैविक असेल तरच तेथे जीवसृष्टी असण्याची शक्यता उरते.

शुक्राचे तापमान पाचशे अंशापर्यंत जाते, त्यामुळे जीवसृष्टीसाठी तो बाद ग्रह मानला जातो. कारण तेथे वातावरणीय दाबही पृथ्वीच्या शंभरपट आहे. तेथील वातावरणात सल्फ्युरिक आम्लही आहे. तेथे फॉस्फिन असल्याचा शोध वर्णपंक्तीशास्त्राच्या मदतीने लावण्यात आला आहे. यात प्रकाश रासायनिक रेणूंशी कशी क्रिया करतो यावरून रेणूंची ओळख पटवली जाते. तीच पद्धत येथे वापरण्यात आली. काही रेणू विशिष्ट रंगाचा प्रकाश शोषतात, तेव्हा त्या रासायनिक घटकाचे अस्तित्व पटते. शुक्रावरील वातावरणाचा अशा प्रकारे वर्णपंक्तीमापकाच्या मदतीने इंद्रधुनष्यी पट तयार करता येतो. बारकोडसारखी ही रचना असते असे आपण समजू. त्यावरून तेथील रासायनिक घटकांचा अंदाज येतो. हा बारकोड साध्या प्रकाशात समजत नाही, तर विद्युत-चुंबकीय लहरींतून काही प्रमाणात कळतो. मानवी डोळ्यांना तो दिसत नाही. अतिनील किरण, सूक्ष्म लहरी, रेडिओ लहरी यांतून त्याचा अर्थ लावता येतो. कार्बन डायऑक्साइड हा अवरक्त किरणांमुळे दिसतो. या बारकोडसारख्या वर्णपंक्तीच्या मदतीनेच शुक्रावर फॉस्फिन शोधण्यात आला. परंतु शुक्रावर जरी असा फॉस्फिन असेल, तरी सूक्ष्मजीव शोधण्यासाठी तेथे शोधक याने पाठवावी लागतील.

फॉस्फिन वायू रंगहीन आहे, पण त्याला वास असतो. काही सूक्ष्मजीव ऑक्सिजनरहित वातावरणात हा वायू तयार करतात. त्यामुळे त्याचे अस्तित्व सूक्ष्मजीवांच्या दिशेने निर्देश करते हे खरे असले, तरी फॉस्फिन वायू हा ज्वालामुखी, उल्कावर्षांव किंवा भूगर्भीय क्रियांतून तसेच काही औद्योगिक प्रक्रियांतून तयार होऊ शकतो. त्यामुळे शुक्रावरील फॉस्फिन वायूचा स्रोत सूक्ष्मजीवच आहेत का, याचा शोध घेण्याची गरज आहे. १९६०-७० च्या सुमारास काही अवकाशयाने शुक्राचा वेध घेण्यासाठी गेली, पण त्यातून काही निष्पन्न झाले नाही. त्यामुळे जीवसृष्टी शोधण्यासाठी वैज्ञानिकांनी नंतर मंगळाकडे मोर्चा वळवला. काही ग्रहांवर पाण्याचे पुरावे मिळाल्याचे जे संशोधन झाले आहे, त्यापेक्षा हे संशोधन महत्त्वाचे मानले जात असले तरी प्रत्यक्षात फॉस्फिनचा स्रोत सापडेपर्यंत तसे म्हणणे चुकीचे ठरेल. प्रख्यात वैज्ञानिक व विज्ञानप्रसारक कार्ल सेगन यांनी अगदी सुरुवातीला शुक्रावरील ढगात सूक्ष्मजीव असण्याची कल्पना मांडली होती. मात्र, शुक्राच्या वातावरणात सल्फ्युरिक आम्ल असल्याने तेथे कुठल्याही सजीव घटकांचे अमिनो आम्ले, डीएनए यांचे तुकडे होऊन जातील. त्यामुळे तिथेही वातावरणात सूक्ष्मजीव टिकण्याची शक्यता फार कमी आहे.

‘‘आम्ही शुक्रावर सजीवसृष्टीच्या खुणा सापडल्याचा दावा केलेला नाही, केवळ फॉस्फिन सापडल्याचे म्हटले आहे. शुक्रावरचे वातावरण सजीवसृष्टीस खूपच प्रतिकूल आहे. त्यामुळे जर तिथे असे सूक्ष्मजीव असतील तर ती खूपच गुंतागुंतीची शक्यता असेल. पण कुठलीही शक्यता पडताळून पाहणे हे वैज्ञानिकांचे कर्तव्य ठरते.’’

 सारा सीगर, ग्रहवैज्ञानिक (एमआयटी, अमेरिका)

‘‘शुक्रावर जीवसृष्टीचे संकेत मिळाल्याच्या संशोधनाबाबत ज्या बातम्या आल्या आहेत, ती एक सुरुवात आहे. परंतु निष्कर्षांप्रत जाण्यासाठी फॉस्फिन वायू शुक्रावर नेमका कशामुळे तयार होतो व टिकून कसा राहतो, हे शोधावे लागेल. त्यासाठी अधिक पुरावे गोळा करणारे संशोधन आवश्यक आहे.’’

 अरविंद परांजपे, संचालक, नेहरू तारांगण (मुंबई)

‘‘शुक्रावरच्या अस्थिर वातावरणात फॉस्फिन वायू टिकून कसा राहतो, हे शोधावे लागेल. कारण फॉस्फिन वायू लगेच नष्ट होणारा असतो. एक तर तो सूक्ष्मजीवांमुळे तयार होत असावा किंवा इतर एखादी रासायनिक क्रिया त्यास कारणीभूत असावी. या कोडय़ाचे उत्तर रसायनशास्त्रातील वेगळ्याच शाखेचा शोध लावणारे ठरू शकते. शुक्राभोवती जर शोधकयान सोडले तर १००-२०० किमी अंतरावरून फिरताना ते याबाबत अधिक स्पष्टीकरणात्मक माहिती देऊ शकेल.’’

– डॉ. सिद्धार्थ पांडे, खगोलजीवशास्त्र विभाग प्रमुख, सेंटर फॉर एक्सलन्स (अ‍ॅमिटी विद्यापीठ, मुंबई)

rajendra.yeolekar@expressindia.com