सतीश तारे  यांचं नुकतच निधन झालं. त्यांनी आपल्यातील ‘टॅलेन्ट’ साऱ्या क्षेत्रात दाखवलं. लेखन, अभिनय, दिग्दर्शन, संगीत, निर्मिती, संघटनकौशल्य.. साऱ्याच बाबतीत. लवचिक अभिनय, हजरजबाबीपणा, संवादातील द्रूत लय आणि अप्रतिम टायिमग या बळावर त्यांनी लक्षणीय भूमिका केल्या..

कलावंतच आपलं प्राक्तन घडवतो आणि बिघडवतोही याची अनेक उदाहरणं आपल्यासमोर नित्य असतात. मराठी रंगभूमीवरील कलावंतांना बिघडण्याचा ‘शाप’च आहे. तरीही दिलीप प्रभावळकरांसारखे निव्र्यसनी, अजातशत्रू, सव्यसाची कलावंतही याच रंगभूमीनं दिलेत. कलावतांसमोर आदर्श असतात, पण कुणाच्या मार्गानं यायचं, हे शेवटी त्या कलावंताच्या वृत्तीवर, मानसिकतेवर, परिस्थितीवर अवलंबून असतं. नुकतंच सतीश तारे या कलंदर कलावंताचं निधन झालं. अवघ्या ५४ व्या वर्षी. रंगभूमी, चित्रपट, दूरदर्शन मालिकांधून अभिनेता, लेखक म्हणून लौकिक मिळवत असताना, स्वत:चं स्वतंत्र स्थान, शैली निर्माण करत असतानाच सतीश तारेंच्या आयुष्याचीच अखेर व्हावी, हा रसिकांच्या दृष्टीनं दैवदुर्विलास.
सतीश तारेंच्या घरचं वातावरणच नाटय़मय होतं. वडील जयंत तारे यांची स्वत:ची ‘फुलराणी’ ही बालनाटय़ं सादर करणारी नाटय़संस्था होती. याच नाटय़संस्थेतून मोहन जोशींसारखे कलावंत घडले, तिथेच सतीश तारे, आपला बंधू सुनील तारे याच्या सोबतीनं बालनाटय़ातून भूमिका करू लागला.
अद्भुतरम्य, जादूटोणा, परीकथा, राजा-राणी-प्रधान-विदूषक अशा बालनाटय़ाच्या ठराविक साच्यापेक्षा वेगळी नाटकं ‘फुलराणी’नं रंगमंचावर आणली. आणि इथंच एका सृजनशील, हरहुन्नरी कलावंताचा जन्म झाला. त्या बालनाटय़ातूनच सतीश तारे यांच्या अभिनयाची, टायमिंग आणि सहजतेची कल्पना रसिकांना आली. ‘फुलराणी’च्या ‘नाटकां’साठी जसे रसिक यायचे, तसे सतीश तारे यांचा अभिनय पाहायलाही प्रेक्षक येत. बालनट म्हणून प्रेक्षकांसाठी ‘सतीश तारे’ हे नाव कौतुकाचं झालं होतं.
हा मुलगा पुढं नाव काढेल, हे रसिकांना वेगळं सांगायची गरजच नव्हती. खरं तर हा उलटा प्रवास होता, कलावंतानं व्यावसायिक रंगभूमीच्या नाटकाची प्रतीक्षा करण्याऐवजी नाटय़रसिकच सतीश तारेंच्या व्यावसायिक नाटकातील कामासाठी आसुसलेले होते. सतीश तारेंनी नाटय़रसिकांच्या अपेक्षांना अपेक्षित दाद दिली. त्यांच्या व्यावसायिक नाटकांनीही बालनाटय़ाप्रमाणेच, नाटय़रसिकांचं मनोरंजन केलं. त्यांच्या ‘ऑल लाइन क्लिअर’ या नाटकानं सतीश तारे यांना व्यावसायिक रंगभूमीवर पाय रोवू दिले.
सतीश तारेंच्या एकूण वृत्ती-प्रवृत्तींना साजेशी त्यांची अभिनयशैली होती. त्यांचा स्वभाव मिष्किल. वृत्ती आनंदी. शब्दांवर त्यांचं विलक्षण प्रेम. शब्दांच्या कोटय़ा करणं हा तर त्यांचा हातखंडा. विशेष शब्दांत ‘अर्थघन’ चमत्कृती शोधण्याकडे त्यांचा कल होता. हे त्यांच्या लेखनातून विशेषत्वानं जाणवायचं. पण अभिनय करतानाही ते आयत्या वेळी संवादांशी खेळत, प्रेक्षकांचा अंदाज घेऊन वर्तमान घटना-प्रसंग व्यक्तींवर प्रतिक्रिया देत. ‘विच्छा माझी पुरी करा’ या वगनाटय़ाच्या वेळी तर विजय कदम आणि सतीश तारे यांची जुगलबंदीच चाले.
सतीश तारे यांचं वाचनही मोजकं, पण निवडक असे. प्रयोगापूर्वी वर्तमानपत्र वाचून, दौऱ्यावरील गावातील महत्त्वाची खबर काढून त्यावर टिप्पणी करण्याची त्यांची शैली प्रेक्षकांना भावायची. ‘विच्छा..’ ‘गाढवाचं लग्न’ यांसारख्या लोकनाटय़ाबरोबरच ‘टूरटूर’, ‘शांतेचं कार्ट चालू आहे!’, ‘श्यामची मम्मी’, ‘वटवट सावित्री’, ‘जादू तेरी नजर’, ‘वन टू का फोर’, ‘बायको देखणी, मोलकरीण चिकणी’ अशासारख्या नाटकांमधूनही ‘अ‍ॅडिशन’ घेऊन हशे वसूल करण्याचं कसब त्यांच्यापाशी होतं. पण अशी नाटय़संहितेबाहेरची ‘अ‍ॅडिशन’ घेताना सहकलावंतांची गोची करणं, त्यांचा अभिनय पाडणं किंवा त्यांना अडचणीत आपणं असले खलनायकी उद्योग त्यांनी कधीच केले नाहीत.
उलट, त्यांचा स्वभाव (सतीश तारेंवर कितीही अन्याय झाला तरीही) हा दुसऱ्यांना मदत करण्याचाच होता. जनार्दन लवंगारे यांच्या ‘चंद्रकला’ नाटय़संस्थेची दोन नाटकं, ‘चल लव कर’ आणि ‘मराठी माणसं’ अशी व्यावसायिक यश लाभलेली नाटकं करूनही ‘जय हो’ या तिसऱ्या नाटकासाठी सतीश तारेंचा विचार झाला नाही. ‘चंद्रकला’साठी हॅट्ट्रिक करायची त्यांची इच्छा होती. पण लवंगारेंनी – मधल्या काळात सतीश तारेंनी स्वीकारलेल्या सवयीमुळे – त्यांना वगळलं होतं. पण ‘जय हो’ च्या शुभारंभाच्या तीनच दिवस आधी लवंगारे इस्पितळात. अगदी आयसीयूमध्ये. प्रयोग होणार कसा?
मग या नाटकाचे सूत्रधार महेश मांजरेकर यांनी सतीश तारेंना विचारलं,
‘लवंगारे हॉस्पिटलमध्ये आहेत त्यांची भूमिका तुम्ही करणार का?’ खरं तर, तारेंना आधीच डावललं गेलं होतं, त्यांनी ‘नाही’ म्हटलं असतं तरीही चाललं असतं. तारेंनी नाटकाची जाहिरातही पाहिली होती. ६ जूनला प्रयोग आणि विचारणा होतेय ३ जूनला. सतीश तारेंनी विचारलं, ‘स्क्रिप्ट किती पानी आहे?’
‘बावन्न.’
‘मला कधी मिळेल?’
‘उद्या सकाळी.’
‘म्हणजे ४ तारखेला. आणि प्रयोग सहाला. पण सतीश तारेंचा आत्मविश्वास इतका जबर की आपल्या संवादांसहित आपण सारी नाटय़संहिता दीड दिवसात मुखोद्गत करू! आणि दुसऱ्या दिवशी सकाळी साडेदहा ते रात्री अकरापर्यंत तालीम करता करताच त्यांनी नाटक तोंडपाठ केलं. पहिले दहा प्रयोग त्यांनी ‘जय हो’मधील मध्यवर्ती हवालदारची भूमिका केली आणि लवंगारे बरे होऊन रंगमंचावर आल्यावर हवालदाराची भूमिका त्यांनी लवंगारेंकडे सुपूर्द केली आणि स्वत: प्रधानजींची सहाय्यक भूमिका निभावली. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा! एकच नाटक पहिल्या दहा प्रयोगांत नायक आणि पुढच्या प्रयोगात सहाय्यकाची भूमिका करणारा, सतीश तारे हा एकमेव कलावंत.
त्यांचा स्वत:च्या क्षमतेवर प्रचंड विश्वास होता. मध्यंतरी त्यांच्या बेधुंद वागण्यानं नाटय़निर्माता संघानं या कलंदर, मनस्वी कलावंतावर बंदी घातली. त्याला वाळीतच टाकलं. एखादा लेचापेचा कलावंत पार खचून गेला असता. पण सतीश तारे यांनी आपल्या लेखणी, संघटनकौशल्यावर, दिग्दर्शनातून ‘टीम’ तयार केली. आणि नाटकं व्यावसायिक रंगभूमीवर आणली. नाटककार, दिग्दर्शक, निर्माताही ते झाले. ज्या रंगभूमीवर त्यांना बदनाम करण्यात आलं, त्याच रंगभूमीवर त्यांनी नव्यानं आपलं नाव रेखलं.
त्यांना सूर-ताल-लयीचंही उत्तम ज्ञान होतं. ते तबला सुरेख वाजवत. गिटार, हार्मोनियमही सहजतेनं हाताळत. गातही सुरेल. पण गायनाकडे त्यांनी दुर्लक्षच केलं. गळा गाता राखायला हवा. पण त्याची राख केली.. अपेय पानानं.आंगिक अभिनयावर त्यांनी भर दिला. त्यासाठी आपली शरीरयष्टी कायम लवचिक राखली. जाणीवपूर्वक. ‘जादू तेरी नजर’मध्ये तर कोपराच्या सहाय्यानं शरीर ओढत विंगेत जाणं, हे तर खासच. लवचिक अभिनय, हजरजबाबीपणा, संवादातील द्रूत लय आणि अप्रतिम टायिमग या बळावर त्यांनी लक्षणीय भूमिका केल्या.
कलावंत आपलं प्राक्तन घडवतो. सतीश तारे यांनी आपल्यातील ‘टॅलेन्ट’ साऱ्या क्षेत्रात दाखवलं. लेखन, अभिनय, दिग्दर्शन, संगीत, निर्मिती, संघटनकौशल्य.. साऱ्याच बाबतीत. त्यांना माणसांची ओढ होती. मित्रांमध्ये रमायला त्यांना आवडायचं. ‘फेसबुक’वर नवनवीन छायाचित्रं टाकणं, चॅटिंग करणं त्यांना मनापासून आवडायचं.
पण त्यांची- इतरांना न आवडणारी ‘आवड’ त्यांचं प्राक्तन बिघडवणारी ठरली. कलावंत जसा घडतो, तसा बिघडतोही. त्यांच्या या अवस्थेत त्यांना मानसिक आधार देणारा सच्चा मित्र लाभला असता तर, त्यांचंही प्राक्तन वेगळं झालं असतं.