05 April 2020

News Flash

नाही तर आपण रस्ता चुकू!

वक्तृत्व म्हणजे बोलणे आणि कतृत्व यांचा संगम; म्हणजे आपण जे करतोय तेच बोलावे आणि जे बोलतो तेच करावे, ही वृत्ती

(संग्रहित छायाचित्र)

‘लोकसत्ता वक्ता दशसहस्रेषु’च्या अंतिम फेरीत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां मेधा पाटकर यांनी विद्यार्थी वक्त्यांना मार्गदर्शन केले. या वेळी वक्तृत्वातील विचारांचे अधिष्ठान, वक्त्याची जबाबदारी यांविषयी त्यांनी मनोगत मांडलेच, पण वर्तमानाचे सजग भान का राखायचे, यावर चिंतनशील भाष्यही केले. त्यांच्या भाषणातील हा संपादित अंश..

वक्तृत्व म्हणजे बोलणे आणि कतृत्व यांचा संगम; म्हणजे आपण जे करतोय तेच बोलावे आणि जे बोलतो तेच करावे, ही वृत्ती. ती ‘लोकसत्ता वक्ता दशसहस्रेषु’च्या तरुण वक्त्यांमध्येही असावी असे मी मानते. वक्तृत्व स्पर्धाच्या अनुभवातून मीही गेले आहे. आपण उभे राहावे आणि हक्काने, हिमतीने, अभिव्यक्तिस्वातंत्र्यावरील घाल्यांना न घाबरता बोलावे, हे संस्कार अशा स्पर्धामधून होतात. या स्पर्धा हे युवकांसाठी मोठे देणे असते. आपल्याकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पना येथील गरीब वस्त्या नजरेस पडू नयेत म्हणून मोठय़ा भिंती उभ्या केल्या जातात, अशा वातावरणात त्या ट्रम्पीय वृत्ती-प्रवृत्तींचा विचार करायला लावून तो व्यक्त करण्याची संधी दिली गेली ते कौतुकास्पदच आहे. ‘हम देखेंगे.. ताज उछाले जाएंगे, तख्त गिराए जाएंगे..’ हे म्हणणाऱ्या फैज आणि इक्बाल बानो यांना येथे दाद मिळते, त्यासाठीही सलाम!

लहानपणी- अगदी गणेशोत्सवातील स्पर्धापासून सगळीकडे सहभागी होत असताना अनेक संस्कार झाले, विचार मिळाले. लहानपणी कुणी तरी लिहून द्यायचे आणि ते सादर करायचे असेच होते. मात्र ते दुसऱ्या कुणी लिहून दिले आहे असे वाटू नये, अशा प्रकारे सादर करायचे. पण त्याला काही उपाय नाही, प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्ट स्वयंभूच असते असे नाही. आई-वडील, गुरुजन, इतर मोठे वक्ते यांच्याकडूनच शिकत पुढे जायचे असते. मात्र, ही शिकण्याची प्रक्रिया आहे हे कायम लक्षात ठेवायला हवे. त्यामुळे कुणाच्या मदतीने एखादे भाष्य करणे यात काही गैर नाही. मात्र भाष्याच्या सादरीकरणातून तुमचे भविष्य ठरत नाही; तर ते विचारांतून घडणार आहे, याची जाण हवी. त्यामुळे दुसऱ्याचे भाष्य सादर करण्यातून सुरू झालेला प्रवास हा स्वत:चा विचार मांडण्याकडे जायला हवा. त्यासाठी स्पर्धा ही दिशादर्शकाचे काम करते. स्पर्धा हवीच, स्पर्धेत उतरला नाहीत तर तुम्हाला भविष्य नाही असे वाटायला लावणारे जग एकीकडे आहे. मात्र खरी स्पर्धा ही बाजारू नसावी. ती स्वत:शीच असावी. तरच ती विचारांना चालना देणारी, शिकवणारी ठरते. मी रानडे वक्तृत्व स्पर्धेत सहभागी झाले होते, तेव्हा सिमला करार हा भारताच्या हिताचा होता की नाही, असा विषय माझ्या वाटय़ाला आला. तेव्हा सिमला पाहिले नव्हते आणि करार वाचला नव्हता. मात्र, स्पर्धक म्हणून विषयाशी संबंधित पुस्तके वाचणे, प्राध्यापकांची मदत घेणे हे सर्व करावे लागले. विषयाची तयारी करणे ही महत्त्वाची प्रक्रिया असते. ती फक्त स्पर्धेपुरती मर्यादित राहत नाही, तर ती एक कायमचा विचार देते. आपण जी मांडणी करत आहोत, ती आपल्याला पटलेली असेल तर गडबडण्याची वेळ येत नाही. विचार समजून घेण्यासाठी आपण वाचन केले असेल, तर उत्स्फूर्तपणे आपण मांडणी करू शकतो आणि मग स्पर्धा ही इतर स्पर्धकांशी नाही तर आपली आपल्याशीच होते आणि आपण जिंकतो. स्वत:बरोबरील स्पर्धेत जिंकणे हे ध्येय असायला हवे आणि त्याचा पाठपुरावा करायला हवा.

सध्या वक्तृत्वाचे महत्त्व कमी होत चालले आहे. वाक्चातुर्य हे वक्तृत्वाला मारक ठरत आहे. या दोन्हींतील फरक कळायला हवा. एखादा बाबा, बुवा वाक्चातुर्याची झलक दाखवतो तेव्हा त्याला सर्व काही समर्पित करण्यासाठी लोक तयार होतात. फक्त संपत्तीचेच नाही, तर आपल्या मतीचेही भक्ष्य करण्याची क्षमता वाक्चातुर्यात असते. पण त्यात खरेपणा नसतो. आज सत्तेच्या सट्टाबाजारात हे वाक्चातुर्य अनुभवास येते. आश्वासनांनी नशा निर्माण होते ती कधी कधी दारूपेक्षाही अधिक घातक असते. वाक्चातुर्यातील पोकळपणा किंवा त्यातून निर्माण होणारा भ्रम कालांतराने लक्षात येतो. मात्र तोपर्यंत हे वाक्चातुर्य राजकारण घडवत राहते. अशा परिस्थितीत खऱ्याखोटय़ाचे भान राखून, विचारांनी प्रेरित होऊन आणि विचारस्वातंत्र्य मेंदूत भिनवून बोलणे हे खरे वक्तृत्व आहे. ते जपण्याचा प्रयत्न कायम ठेवायला हवा.

वैचारिक विविधता हे आपले वैशिष्टय़ आहे. या विविधतेबाबत सहिष्णुता बाळगणे हा लोकशाहीचा आधार आहे, हेदेखील आता पुन:पुन्हा सांगावे लागते. फेसबुकवर काही लिहिले तर डावे, उजवे यांच्यात काहीच फरक जाणवू नये अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया उमटतात. कोण सत्तेवर आहे आणि कोण सत्तेवर नाही, एवढेच दोन वर्ग अस्तित्वात असलेले दिसतात. ते आपल्या वैचारिक समृद्धीवर हल्ला करतात. म्हणून आता आपल्या अभिव्यक्तीची परीक्षा आहे. अभिव्यक्तीमागे आपल्या स्वातंत्र्याची शक्ती असते. ती शक्ती कमी व्हावी असे ज्यांना वाटते, त्यांना गांधी, आंबेडकर, फुले, शाहू महाराज, पेरियार, लोहिया, जयप्रकाश नारायण यांच्यासारख्यांचे कौतुक कसे असणार? असे झाले की, ज्यांचे गांधी त्यांचे सावरकर असू शकत नाहीत आणि ज्यांचे सावरकर त्यांचे गांधी असू शकत नाहीत. विचारवंतांचे विभाजन सर्रास केले जाते. मग गांधी विरुद्ध भगतसिंग, गांधी विरुद्ध सावरकर होतात. सावरकर विरुद्ध दीनदयाळ उपाध्याय होत नाहीत, हाच काही तो शिल्लक आशावाद. विचारवंतांची, विचारधारांतील साम्यस्थळे लक्षात घ्यायला हवीत. ती पटणारी किंवा न पटणारी असू शकतात. मात्र ती कशीही असली तरी मोकळेपणाने स्वीकारायला हवीत. गांधी विरुद्ध भगतसिंग अशी मांडणी केली जाते, तेव्हा ‘सर्व प्रश्नांवर हिंसा हे उत्तर नाही’ हे भगतसिंग यांनीही मान्य केले होते याचा आपल्याला विसर पडतो. वैचारिक विविधता हे आपले धन आहे. विचारधारांवर किंवा विचारवंतांबाबत व्यक्त होताना वैचारिक विविधतेबाबत सहिष्णुता बाळगली नाही तर विचारांनी समृद्ध वक्तव्य ऐकायला मिळणार नाही, अशी भीती वाटते. अशा वक्तृत्वाचा काहीही उपयोग नाही.

आपल्या देशाचे विचारसंचित काय आहे, याचा विचार करण्याची आज वेळ आली आहे. धर्माचा विचार हा आता बाजूला पडला आहे. प्रत्येक धर्माचा मूलभूत पाया हा मानव धर्म आहे. असे असताना आपण ‘धार्मिक’ म्हणत असलेले वर्तन हा खरा अधर्म आहे. धर्माचे वर्णन, त्यांच्या श्रेष्ठत्वाची चढाओढ यांबाबतची वक्तव्ये मूलतत्त्ववाद्यांकडून सातत्याने आपण ऐकतो. हे सर्व अस्वस्थ करत असेल, तर त्याला उत्तर देण्यासाठी आपण जे मांडू पाहतो आहोत त्याचा शोध घ्यायला हवा, अभ्यास करायला हवा. प्रत्येक आंदोलनाने आम्हाला हेच शिकवले. एका शाहीनबागेतून उठून दुसऱ्या शाहीनबागेत जाण्याइतके ते सोपे नसते. त्यामुळे तुम्ही किती परखडपणे बोललात, यापेक्षा त्या परखड विचारांना आचरणात आणून परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी तयार झालात तर तुम्हाला लाख सलाम! नाही तर विचार विचार म्हणजे ‘मन की बात बताना लेकीन किसिको जवाब ना देना..’ असे होते! एकामागोमाग एक बँका बुडत असताना एक बँक टिकून आहे. ती म्हणजे ‘व्होट बँक’! या व्होट बँकेचेच ज्यांना सर्वाधिक आकर्षण असते आणि त्यालाच लक्ष्य मानून ज्यांची वाटचाल सुरू असते, अशा नेत्यांपैकी आपण नाही. आपण सामान्य माणसे आहोत. मात्र तरीही आपली ताकद असामान्य आहे. कारण आपल्याला काही कमवायचे नसते. लोकशाही जशी अपेक्षित आहे, ज्या आदर्श भारताचे चित्र आपण रेखाटत आहोत, ते सारे आपल्या संविधानात आहे. ज्या संविधानाला स्मरून आपण शपथ घेतो, ते संविधान हाती घेऊन आपण करत असलेले विधान हेच आपले संचित आहे. त्यातील मूल्यांची आपण पराकाष्ठेने सेवा करायला हवी, म्हणजेच ती आचरणात आणायला हवीत. नाही तर विचारांची जागा कुविचार घेतात.

दिल्लीतील दंगलग्रस्त भागांत मी जाऊन आले. जे घडते आहे ते अत्यंत दु:खद आहे. या देशातील धर्मापल्याडचा मानवधर्म कुठेही दिसत नाही. जो दिसतो आहे तो फक्त अधर्म. आज करोनाच्या प्रादुर्भावामुळे आपण भयभीत झालो आहोत. परंतु त्यापेक्षा अधिक भयंकर विषाणूने समाज ग्रासला आहे. तो म्हणजे जाती आणि धर्मभेदाचा विषाणू. त्याचा उल्लेख ‘कास्ट व्हायरस’ आणि ‘रिलिजिअस व्हायरस’ असा करणे अधिक उचित ठरेल. कारण आपल्यावरील संकटांची नावे ही नेहमीच परदेशी असतात. या कास्ट व्हायरसने आपला समाज पोखरला आहे. एखाद्याला शिक्षा देतानाही हा जातिवाद डोकावतो. बळाचा वापर करून एखाद्याला नष्ट केले जाते. त्याला बदलण्याची किंवा सुधारण्याची संधीही दिली जात नाही. तेथेही जातिवाद असतो. हैदराबादमध्ये कायद्याचा विचारही न करता शिक्षा देऊन टाकली जाते आणि त्याबद्दल अभिमान व्यक्त केला जातो. मात्र, त्याच वेळी उन्नावमध्ये लहानग्या मुलीवर समजून उमजून भयंकर अत्याचार करणाऱ्या, पीडितेच्या कुटुंबाचे हाल करणाऱ्या आमदाराला जन्मठेपेच्या कैदेची शिक्षा होते. भेदभावातून होणारी हिंसा ही मानवतेच्या विरोधात जाते. कितीही मोठा अपराधी असला, तरी त्याला त्याची बाजू मांडण्याची संधी देणे हे सशक्त न्यायपालिकेचे लक्षण आहे.

उपभोगासाठी स्त्रीवर होणारी आक्रमणे ही अधिकच धोकादायक आहेत. स्त्रियांची स्वप्ने संपवणे, त्यांना घरात कोंडून ठेवणे यांपासून ऑनर किलिंगपर्यंतचा अविचार शिक्षित म्हणवल्या जाणाऱ्या कुटुंबांत होताना दिसतो. हा समान नागरिकत्वावरील हल्ला आहे. स्त्रीचा पुरस्कार करताना स्त्रीवादाचा पुरस्कार केला तर अनेक मुद्दय़ांकडे पाहण्याची दृष्टी बदलू शकते. स्त्रीवादाचा विचार हा मातृत्वाचा, करुणेचा आहे, विखारी विषाणूंचा नाही. ही करुणा टिकवण्यासाठी स्त्रीलाच पुढे करणे आवश्यक आहे. कायदा बदलून वा आपल्या अस्मितेवर फुंकर घालून मूळ प्रश्न विसरायला लावणे, अशा अनेक विषाणूंनी या देशात प्रवेश केला आहे. एका कायद्यासाठी भांडत असताना इतर अनेक कायद्यांतील बदलांकडे आपले दुर्लक्ष होत आहे. असे अनेक प्रश्न आहेत. नैसर्गिक संसाधनांचा बाजारू साधनांसारखा वापर करणे. त्याचबरोबर माणसाची करुणेची नैसर्गिक भूक नाकारणे हे अनेक प्रश्नांचे कारण आहे. ही भूक भागवण्याची क्षमता स्त्रीवादात आहे.

गांधीजींची दीडशेवी जयंती साजरी करताना कोणत्याही प्रकारची हिंसा खपवून घेणार नाही, असा निश्चय आपण केला पाहिजे. त्या वेळी विकासाच्या नावाखाली चालणाऱ्या हिंसेचाही विचार हवा. ही हिंसा फक्त झाडांची कत्तल करण्यापुरती मर्यादित नाही. ही हिंसा अनेक समुदायांची, शेकडो वर्षे जुन्या गावांची, संस्कृतींची, नद्यांचीही असते. शाश्वत विकास म्हणजे काय? शाश्वत विकासात काहीच किंमत मोजावी लागत नाही, असे ठामपणे म्हणता येईल का? विकास म्हणजे बदल असेल तर कोणती तरी गोष्ट बाजूला ठेवणे ही एक प्रकारे किंमतच असते. बदल सहन करण्यासाठी मोजाव्या लागणाऱ्या किमतीचा विचार करताना आदिवासींना त्यांच्या पाडय़ातून हुसकावून लावणे, तळागाळातील माणसांची जमीन एखाद्या बांधकाम व्यावसायिकाला दिल्यामुळे झालेला आक्रोश, या मुद्दय़ांना शाश्वत विकासात स्थान नसेल तर शाश्वत विकासाची परिभाषा नव्याने आणि अधिक खोलात जाऊन मांडण्याची गरज आहे. अगदी आपल्यालाही उपभोगांचा त्याग करावा लागेल. नदीच्या नैसर्गिक प्रवाहाला अडथळा निर्माण केला जातो, त्यामुळे निसर्ग मोजत असलेली किंमत ग्राह्य़ धरली जात नाही. आज वातावरण बदलावर जागतिक पातळीवर चर्चाचर्वण होते, त्यातही विकासाच्या किमतीचा विचार होताना दिसत नाही. उपभोगवादी विकासाला कसे रोखायचे, हा प्रश्न आहे. विकास कुणाचा आणि कशाला म्हणायचे, हे ठरवण्याबरोबरच विकासाची प्रक्रिया ठरवणे हे आव्हान आहे आणि ते पेलावे लागेल. विकासाचे मोठे ओझे आपण वागवत आहोत. जगण्याच्या अधिकारासाठी लढताना जगणेच अशक्य झाले तर जगण्याचा अधिकार संविधानही देऊ शकणार नाही. आपल्या विकासाच्या संकल्पनांनी आपल्याला अशा वळणावर आणून उभे केले आहे, की आताच आपल्याला संकल्पनेच्या तळाशी जाऊन ती स्पष्ट करावी लागेल, नाही तर आपण रस्ता चुकू!

प्रायोजक  : ‘वीणा वर्ल्ड’ प्रस्तुत ‘लोकसत्ता वक्ता दशसहस्रेषु’ ही स्पर्धा मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, औरंगाबाद, रत्नागिरी, नागपूर, कोल्हापूर अशा आठ केंद्रांवर  झाली. ही स्पर्धा पॉवर्ड बाय ‘इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड’ असून बँकिंग पार्टनर ‘डोंबिवली नागरी सहकारी बँक’, नॉलेज पार्टनर ‘चेतनाज इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड रिसर्च’ हे आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 22, 2020 12:19 am

Web Title: senior social worker medha patkar guides student loksatta dusseh sreshru abn 97
Next Stories
1 तान्हाजीला छपाक
2 चाँदनी चौकातून : करोनाप्रहर
3 coronavirus : ‘करोना’चं सत्य
Just Now!
X