15 December 2017

News Flash

खेळांच्या आनंदातून ताणतणावावर मात

‘लोकसत्ता’वर विशेष लोभ होता.

लोकसत्ता टीम | Updated: May 14, 2017 3:16 AM

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

ज्येष्ठ क्रीडा मानसतज्ज्ञ भीष्मराज बाम यांचा लोकसत्तावर विशेष लोभ होता. लोकसत्तामधील क्रीडा पानांबरोबरच संपादकीय तसेच विविध पुरवण्या ते आवर्जून वाचत आणि आपली मते कळवीत असत. निधनापूर्वी आठवडाभर आधी त्यांनी हा लेख लोकसत्तासाठी पाठवला होता. हा लेख वाचण्यासाठी ते आज हयात नाहीत याचे मनस्वी दु:ख आहेच. आयुष्यातील ताणतणावांवर मात करण्यासाठी खेळांत मन गुंतवणे चांगले यावर त्यांचा विश्वास होता. खेळ कोणताही असो, स्पर्धेत उतरलेले क्रीडापटू आणि त्यांच्या पालकांनी त्याकडे कसे बघावे, याचे विवेचन करणारा बाम यांनी लिहिलेला हा बहुधा शेवटचा लेख असावा..

आ दिमानव जंगलात गुहांमध्ये राहत होता, तेव्हापासून खेळांचे महत्त्व त्याला पटलेले होते. विरंगुळा-करमणूक म्हणून; कुटुंबाबरोबर, मुलाबाळांबरोबर आणि नंतर टोळीतील इतर लोकांबरोबर वेळ घालवण्याचे साधन म्हणून खेळ उपयोगी पडत. लहान मुलांना शिकार करून अन्न कसे मिळवायचे ते शिकवण्यासाठी आणि स्वसंरक्षणाला सक्षम बनवण्यासाठीही खेळ फार उपयुक्त ठरत असत. मानवी संस्कृतीचा जसा विकास होत गेला तसा खेळांचाही विकास होत गेला. आपण आणि आपला गट सर्वश्रेष्ठ आहोत हे इतरांना पटवून देण्यासाठी सरळ द्वंद्वयुद्धाचा मार्ग पत्करावा लागत असे. मानवी टोळ्यांमध्ये विचार करू शकणाऱ्या लोकांनी यामुळे तरुण पिढी नाहीशीच होण्याचा धोका ओळखला आणि हिंसा न करता स्वत:चे श्रेष्ठत्व पटवून देण्यासाठी खेळांच्या स्पर्धा भरवण्याची पद्धत सुरू झाली.

ऑलिम्पिक स्पर्धाचाही उगम असाच झाला. युवकांची शरीरे आणि मने कणखर बनवण्यासाठी मैदानी खेळांना पर्याय नाही हे विचारवंतांच्या ध्यानात आले. ऑलिम्पिक स्पर्धासाठी तयारी करणाऱ्या युवकांमधून कडवे योद्धे निर्माण झाले आणि पर्शियाच्या गुलामगिरीचे कित्येक शतकांचे जोखड ग्रीकांना झुगारून देता आले. या युवकांचेच सैन्य उभारून सम्राट अलेक्झांडरने पर्शियन साम्राज्य नेस्तनाबूत केले आणि हिंदुस्तानापर्यंत धडक मारली. दीड हजार वर्षे बंद पडलेल्या ऑलिम्पिक स्पर्धाचे पुनरुज्जीवन करताना फ्रेंच उमराव क्युबर्तीन आणि त्याच्या सहकाऱ्यांचा उद्देश युवा पिढीची मरगळ घालवून त्यांना युद्धासाठी आणि जीवनातील संघर्षांसाठी सक्षम बनवणे हाच होता.

ब्रिटिश सरंजामशाहीने स्वत:च्या विरंगुळ्यासाठी निर्माण केलेला क्रिकेटचा खेळ, त्यात भरपूर खेळाडू लागत म्हणून भारतीयांना शिकवण्यात आला. तो त्यांनी इंग्रजांपेक्षाही चांगला खेळण्यास सुरुवात केली. एक विरुद्ध अकरा अशी काहीशा चक्रव्यूहासारख्या रचनेने तो प्रेक्षकांमध्येही भरपूर लोकप्रिय झाला. मला प्रेक्षक म्हणून क्रिकेटचा खेळ खूप भावतो; पण या खेळाच्या नादाला लागून आपण फुटबॉलसारख्या सर्व जगभर खेळल्या जाणाऱ्या सर्वागसुंदर खेळावर फार मोठा अन्याय केला आहे असे वाटते. आपल्याकडे आजारी व्यक्तींसाठी केवढा तरी खर्च केला जातो. शासन आणि समाज आजारी पडायला उत्तेजन देतात आणि ज्या खेळांमुळे आरोग्य चांगले टिकून राहू शकते त्या खेळांवर मात्र खर्च करायला कोणी तयार नाही.

खेळांचा सर्वात मोठा फायदा म्हणजे मनावरचे ताणतणाव जादू वाटावी असे नाहीसे होतात. एक तर ताणतणाव निर्माण होण्याचे मुख्य कारण म्हणजे दुबळे मन हे असते. मन दुबळे झाले की शरीराची शक्तीही आपोआपच क्षीण व्हायला लागते. आत्मविश्वास खचतो आणि माणूस नैराश्याच्या भावनेची शिकार बनतो. जागतिक आरोग्य संघटनेने ७ एप्रिलला आरोग्य दिन साजरा केला . त्याचे सूत्रच नैराश्य नाहीसे करणे हे होते. परस्पर संवाद हा एक नैराश्यावर उतारा मानला जातो. म्हणून त्या संघटनेने ‘निराश वाटते आहे? चला गप्पा मारू या’ अशा अर्थाचे घोषवाक्य जाहीर केले होते; पण खेळही त्याच दर्जाचा अत्यंत प्रभावी असा निराशेवरचा आणि ताणतणावावरचा उतारा आहे. निदान भारतीयांसाठी तरी ‘चला खेळू या’ हे घोषवाक्य जास्त समर्पक ठरेल असे वाटते.

घरात, कार्यालयात, समाजात आपल्या ज्या जबाबदाऱ्या असतात त्यांच्यामुळे भविष्याची काळजी वाटणे साहजिकच असते. झालेल्या चुका आणि अपमान विसरणे शक्य होत नाही. या सर्व गोष्टी डोक्यात घोळत राहतात आणि ताणतणाव निर्माण करून त्यांना खतपाणी घालत राहतात. चेंडूचे किंवा बॅडमिंटनसारखे खेळ या समस्येवर अतिशय उत्तम उपाय आहेत, कारण या खेळात विशिष्ट वस्तूवरच नव्हे तर तिच्या गतीवरही एकाग्र व्हावे लागते तरच ते नीट खेळता येतात. नको असलेल्या गोष्टी डोक्यात घोळणे आपोआप थांबते. जलद हालचाली कराव्या लागत असल्याने श्वसन यंत्रणा मजबूत होते आणि रक्ताभिसरण सुधारल्याने ताजेतवाने वाटायला लागते. अर्थात इतर क्षेत्रांतल्या समस्या नाहीशा होत नसल्या तरी शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारल्याने त्यांना तोंड देण्याची उभारी मनाला येते.

पोलीस खात्यात आणि नंतर इंटेलिजन्स ब्युरोमध्ये काम करत असताना मला मानसिक ताण खूप मोठय़ा प्रमाणावर सहन करावा लागला. मी नेमबाजी आणि बिलियर्ड व स्नूकर हे खेळ खेळत असे. मुंबईत या खेळांच्या स्पर्धा खेळायचीही चांगलीच संधी मिळाली. माझ्या मुलांनासुद्धा हे खेळ खेळण्याची गोडी लागली. त्यांनाही त्यांच्या आयुष्यातले ताणतणाव हाताळण्यासाठी या खेळांचा खूपच उपयोग झाला.  मला शिकवणे आवडते, त्यामुळे मी खेळाडूपेक्षा जास्त चांगला प्रशिक्षक झालो आणि क्रीडा मानसशास्त्राच्या अभ्यासाने हे क्षितिज अधिकच रुंदावले. आता तर चौथी पिढीसुद्धा माझ्याशी संवाद साधायला उत्सुक असते. यापेक्षा मोठा आनंद कोणता असेल?  इंटेलिजन्स ब्युरोमधले अतिशय गाजलेले माझे वरिष्ठ अधिकारी आणि सहकारी जशी सवड मिळेल तसे टेनिस किंवा बॅडमिंटनसारखे खेळ आवर्जून खेळत असत. माझ्यासारखाच त्यांनासुद्धा कामाचा असह्य़ असा ताण असे, पण सतत खेळत राहिल्यामुळे त्यांना तो हाताळण्याची कला साध्य झाली. माझा अनुभव असा होता की, ज्या ज्या अधिकाऱ्यांना खेळाचा छंद होता आणि त्यांनी तो जोपासला होता त्यांची विनोदबुद्धी सतत जागृत असे आणि अशा अधिकाऱ्यांसोबत काम करणे सोपे जात असे. अशा बहुतेक सर्व अधिकाऱ्यांनी वयाची ८० वर्षे ओलांडल्यावरसुद्धा आपली प्रकृती चांगली राखली आहे. यातले काही तर आपल्या कर्तबगारीमुळे माझ्यापुढे आदर्श म्हणून होते.

भारतामध्ये पालक खेळाच्या मैदानावर आले की प्रशिक्षकांच्या पोटात गोळा उठतो. कारण ते आपले पाल्य सरावामध्येसुद्धा सतत जिंकत राहावे अशी अपेक्षा करीत असतात. खरे तर, खेळ खेळण्यानेच नव्हे तर चांगला प्रेक्षक बनण्यानेही ताणतणाव नाहीसे होतात; पण बरीच मंडळी आपला अहंकार नंग्या तलवारीसारखा सोबत वागवत असतात. मग ते खेळले किंवा फक्त प्रेक्षक म्हणून आले तरी स्वत:चे ताणतणाव सांभाळून ठेवतात आणि इतरांचे वाढवतात. खेळाबरोबरच खिलाडूवृत्ती शिकायला हवी, नाही तर खेळाचे फायदे होण्याऐवजी आपले आणि इतरांचेही नुकसान होऊ  शकते.

मुळात ताण निर्माण होतात ते आपले विचार आणि भावना यांवर नियंत्रण राहत नाही याच कारणामुळे. खेळ खेळायचे असतात ते हे विचार आणि भावना यांच्यावरून मन काढून दुसऱ्या एखाद्या गोष्टीवर एकाग्र होता यावे यासाठी; पण आपण आपला अहंकार सोबत घेऊन फक्त जिंकण्याच्या ईष्र्येने खेळायला उतरलो तर जिंकणे तर दूरच राहिले, आपले ताणच तिथेही वाढत राहतात. गोल्फ हा ताण घालवण्यासाठी सर्वात उत्तम खेळ आहे आणि तो खेळलाही जातो अतिशय सुंदर वातावरणात. बरे तिथे स्पर्धा तर स्वत:शीच असते. प्रत्यक्षात ताणतणावासाठी इलाज करावा लागतो तो असंख्य गोल्फ खेळाडूंना, कारण त्या खेळात चुका होण्याची शक्यता सर्वात जास्त असते आणि डोळ्यासमोर उभे राहिलेले यश, अचानक फक्त एका चुकीच्या फटक्याने हिरावले जाऊ  शकते. शोक, संताप अशा नकारात्मक भावना पगडा घेतात आणि त्या व्यक्त करण्यासाठी खेळाडू प्रचंड आदळआपट करतात. यात त्यांच्याच अतिशय महागडय़ा सामानाची मोडतोड होते. एका गोल्फ खेळाडूने अतिशय मार्मिक टिप्पणी केली होती. त्याचे म्हणणे, ‘गोल्फ हा खेळ स्वर्गात खेळला जातो, पण खेळाडू स्वत:भोवती नरक निर्माण करून घेतात!’

जेव्हा शक्य असेल तेव्हा स्पर्धेत उतरायचे असते, कारण आपली पातळी ठरवण्याचा तो एकच मार्ग असतो. एक गोष्ट सतत ध्यानात ठेवायला हवी. ती म्हणजे स्पर्धा ही आपल्या शत्रूशी कधीच नसते. ती असते आपल्या भावंडांबरोबर, आपल्या सहकाऱ्यांबरोबर, आपल्या मित्रांबरोबर आणि मुख्य म्हणजे आपल्या स्वत:बरोबर. हे विसरायला होते. स्पर्धकांचा द्वेष आणि मत्सर केला जातो. त्यामुळे नाती आणि मैत्री हे संबंध बिघडतात. यासाठीच सर्व स्पर्धात असा नियम असतो की, स्पर्धा संपल्याबरोबर जिंकणाऱ्या आणि हरणाऱ्या खेळाडूंनी एकमेकांशी हस्तांदोलन करायचे असते. खेळातली चुरस खेळ संपल्याबरोबर संपवता आली तरच खेळांचा खरा फायदा अनुभवायला मिळतो. एक सामना जिंकल्याने आपण काही फार थोर होत नाही आणि हरल्याने क्षुद्रही होत नाही. हे भान सतत जागते हवे.

माझे तर सर्व खेळाडूंच्या पालकांना असे सांगणे आहे की, त्या सर्वानी आपल्या पाल्यांना हार आणि जीत कशी पचवायची तेच शिकवायचे असते आणि स्वत:सुद्धा हे त्यांच्याकडूनच शिकायचे असते. ते शिकलो नाही तर सबंध कुटुंबाचे भविष्य धोक्यात येऊ  शकते. त्यांच्या खेळाच्या दर्जाची जबाबदारी प्रशिक्षकांवर सोपवून मोकळे व्हावे. एखाद्या स्पर्धेसाठी जर आपल्या पाल्यांना नेणार असाल तर अगदी पहिल्या फेरीत ते हरले तरी संपूर्ण स्पर्धा बघून नंतर विजेत्यांचे अभिनंदन करायला बक्षीस समारंभापर्यंत थांबायला हवे. तसे केले नाही तर आपण जिंकल्यावर इतर कोणीच बक्षीस समारंभासाठी थांबणार नाही. आपल्यापेक्षा खेळ महत्त्वाचा आहे. जागतिक अजिंक्यवीरसुद्धा केव्हा ना केव्हा हरतच असतात, हे आपल्या आणि आपल्या पाल्यांच्या मनावर बिंबवायला हवे.

बैठे खेळसुद्धा वेळ घालवायचे अतिशय उत्तम साधन आहे. ते खेळायलाही चांगलीच एकाग्रता साधावी लागत असल्याने मन कणखर करण्यासाठी ते फार उपयुक्त असतात. तणावावर तर ते हमखास इलाज ठरू शकतात, पण त्यात जर आपण जास्त वेळ घालवणार असलो तर शारीरिक आरोग्यासाठी योगासने, सूर्यनमस्कार, धावणे, चालणे असे व्यायाम करीत राहणे अत्यंत आवश्यक आहे. बुद्धिबळ, ब्रिज, रमी हे सर्वच खेळ अतिशय आनंददायी आहेत. त्यांनी डोक्यातले विचार थांबवता येतात आणि इतर खेळाडूंच्या सहवासाचा आनंदसुद्धा मिळतो. यानिमित्ताने आपल्या नित्याच्या व्यवसायाव्यतिरिक्त इतर लोकांशी नेहमी चांगला संबंध येत गेला तर ते शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी फार उत्तम. त्याने दीर्घायुष्यही लाभते; पण त्यांचे व्यसन लागू देता कामा नये आणि खेळ आटोपल्यावर ज्या चर्चा होतात त्याही सांभाळूनच कराव्यात.

तात्पर्य असे की, कोणत्याही वयात जो म्हणून खेळ खेळता येईल तो आणि ज्यांच्याबरोबर खेळता येईल त्यांच्याबरोबर खेळा. त्याने आरोग्य सुधारेल, ताजेतवाने वाटेल आणि जीवनातल्या आव्हानांना सामोरे जायची उभारी येईल. बालकांबरोबर खेळण्याचे सुख तर अनुभवूनच पाहायचे असते. आधी आधी आपण मुद्दाम चुका करून त्यांना जिंकण्याची संधी देतो. तेथपासून ती आपल्याला सहज हरवायला लागतात तेथपर्यंतचा प्रवास फार आल्हाददायक असतो. आपण खेळू शकणार नसलो तर ती संधी पुढल्या पिढय़ांना उपलब्ध करून देऊन त्यांचा खेळ पाहणेही छान असते. तुम्ही जर असे करू शकलात तर तुमचे ताणतणाव तर नाहीसे होतीलच, पण कोणी सांगावे, त्याने मागासलेल्या भारतीय क्रीडा क्षेत्रात सुधारणाही होऊ  शकेल!

First Published on May 14, 2017 3:16 am

Web Title: senior sports psychologist bhishmaraj bam last marathi articles in loksatta