‘महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमातूनराज्याची वैभवशाली परंपरा देश-विदेशात पोचवणारे महाराष्ट्रशाहीर’  कृष्णराव साबळे यांचे शुक्रवारी निधन झाले. गीतकार, संगीतकार, नाटककार म्हणूनही नावलौकिक मिळवणाऱ्य़ा साबळे यांचे ‘माझा पवाडा’ हे आत्मचारित्रही खूप गाजले. त्यातील एका प्रकरणाचा हा संपादित भाग.
१९६० चा काळ असावा. शाहीर साबळे आणि पार्टीचा खूप गाजावाजा झालेला. बाहेरगावच्या ऑर्डर्स एकामागून एक यायच्या. नवीन चाली दिलेली माझी जानपद गीते घरोघरी आकाशवाणीवर लागायची. आमच्या प्रहसनातील खटकेबाज संवाद, प्रासंगिक विनोद अन् तालासुरात गायिलेले पोवाडे, लावण्या, vv02गौळणी यामुळे कार्यक्रमात रंगत यायची. समाजातील ढोंगावर अन् व्यंगावर प्रचलित परिस्थितीचे भान ठेवून आम्ही नेमके बोट ठेवायचो अन् त्यामुळे उपरोधिक विनोदाची झालर लावून आम्ही फेकलेले खटकेबाज संवाद प्रेक्षकांमध्ये जाऊन आदळायचे. प्रसन्नतेचा खळाळता प्रवाह आमच्या कलाकृतीमधून अखंडपणे वाहायचा.
अचानक मला ‘यमराज्यात एक रात्र’ची कल्पना सुचली. उघडय़ा मैदानाचे वारे त्या कथेला मानवणारे नव्हते. १९५९-६० चा सुमार ‘यमराज्यात एक रात्र’ हे प्रहसन हाती घेतले. त्याची रंगीत तालीम आम्ही शिरोडकर हायस्कूलमध्ये सुरू केली. रंगीत तालमीला जी. के. गांवकर आणि बॅरिस्टर माने हजर होते. त्यांनी रंगीत तालीम पाहिली आणि आग्रह धरला की, सद्य:परिस्थितीवर प्रकाश टाकणारे अत्यंत उत्कृष्ट असं रसायन तयार झालंय. मात्र याचं सादरीकरण जर बंद थिएटरात केलं तरच ते इफेक्टिव्ह होईल.
याच काळात शाहीर साबळे आणि पार्टीसुद्धा प्रकाशाच्या झोतात होती. त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला. माझे सहकारी हवेवर तरंगू लागले आणि त्यांचीही एकमुखी मागणी आली. उघडय़ा मैदानाच्या मोकळ्या वातावरणात आम्ही किती दिवस उभं राहायचं? काही तरी वेगळं करावं अन् या सर्व परिस्थितीला साजेसं असं मीही धाडसी पाऊल टाकायचं ठरविलं.
माझ्या कलाकाराच्या आयुष्याला एक वेगळं वळण देणारं ते क्रांतिकारी पाऊल होतं. ‘यमराज्यात एक रात्र’ हे बंद थिएटरमध्ये जाणारं माझं पहिलं मुक्तनाटय़ ठरलं. त्याची जाहिरातही आम्ही अगदी वेगळ्या प्रकारानं केली. त्याचा पहिला प्रयोग आम्ही अमर हिंद मंडळाच्या नाटय़गृहात दिनांक १६ जानेवारी १९६० रोजी लावला. योगायोगानं मला एक असा कलाकार भेटला, की जो समर्थ अभिनेता आहे आणि तितकाच तो हजरजबाबीही. त्याचं नाव राजा मयेकर. अगदी सुरुवातीच्या काळात जेव्हा आम्ही प्रहसने करायचो तेव्हा अशा प्रकारच्या भूमिका आम्ही कृष्णकांत दळवी यांना द्यायचो. कृष्णकांत दळवी दिसायला देखणे आणि रुबाबदार, त्यांचं नावही या क्षेत्रात बऱ्यापैकी झालेलं. गाणंही गायचे, मुख्य नट म्हणून आम्ही त्यांना पाच रुपये नाइट द्यायचो; पण त्यांना ती दहा रुपये वाढवून हवी होती. पण त्यांची मागणी आम्हाला परवडण्यासारखी नव्हती. सर्व कार्यक्रमाची बिदागीच मुळी आम्हाला ३० रुपये मिळायची! त्यांच्या जागी मग मी राजा मयेकरांना उभं केलं. गाण्याची बाजू मी, तर संवादाची बाजू ते सांभाळायचे. राजाभाऊ अत्यंत हुन्नरी माणूस. त्यांच्याइतका समर्थ नट माझ्या पाहण्यात नाही. आचरटपणा, अंगविक्षेप टाळूनही विनोद करता येतो हे राजाभाऊंनी दाखवून दिले. ‘यमराज्यात एक रात्र’ या मुक्तनाटय़ात यमाच्या भूमिकेत राजा मयेकर, किसनच्या भूमिकेत मी स्वत:, तर शेटजीच्या भूमिकेत सुहास भालेकर, झोटिंग व शास्त्रज्ञ कमलाकर राणे, तसेच दत्ता राणे आणि हुतात्मा अनंत राणे या सर्वानीच धमाल उडविली. मी स्वत: दिग्दर्शन व संगीत या दोन्ही बाजू सांभाळल्या होत्या.  विशेष म्हणजे ‘यमराज्यात एक रात्र’ या मुक्तनाटय़ाला महाराष्ट्र शासनाच्या राज्यपातळीवरील स्पर्धेत लिखाणाचे पहिले पारितोषिक मिळालेले होते. यातील यमाचा द्विभाषिक रेडा त्या वेळच्या म्हणजे सन १९६० च्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमुळे फारच गाजला होता. इतका की त्या नाटकाचे ते प्रमुख आकर्षण ठरायचे. ‘मन माझे तडफडले’, ‘तो धनिया तो बनिया’, ‘अरेरे आम्ही ओळखिला व्यापार’, ‘विज्ञानी गढला मानव’, ‘सांगता धर्माची थोरी’, ‘फुगडी यांनी मांडली’ इत्यादी गाण्यांच्या तालासुरांवर प्रेक्षक डोलू लागायचे.
‘आंधळं दळतंय’ हे मुक्तनाटय़ आम्ही १३ ऑगस्ट १९६६ रोजी मुंबईच्या रवींद्र नाटय़मंदिरात रंगभूमीवर आणलं. या नाटय़ाचा मुहूर्तही बाळासाहेब ठाकरे यांच्या शुभहस्ते मोठय़ा धूमधडाक्यात पार पडला. या प्रसंगी ‘आंधळं दळतंय’ या मुक्तनाटय़ाची प्रशंसा करताना बाळासाहेब म्हणाले-
‘‘समाजाला गंज चढून जेव्हा मरगळ यायला लागते तेव्हा शाहिराचा डफ प्रभावी ठरतो. साबळे यांनी लोकजागृतीचा फार मोठा वाटा उचललेला आहे. ‘आंधळं दळतंय’ म्हणजे आंधळं  कुठं अन् पीठ कुठं जातंय याचा या आंधळ्यालाच पत्ता लागत नाही. ते पीठ कोठेही जाऊ नये म्हणून शाहिरांनी ‘आंधळं दळतंय’ या रूपकात जनतेसमोर काय घडते अन् काय घडायला पाहिजे हे समर्थपणे मांडले आहे.’’
वास्तववादी कथानकामुळे मुक्तनाटय़ प्रेक्षकांना खूपच आवडलं. नेहमीप्रमाणे गाण्याची बाजू मी सांभाळीत असे.
मुंबई ग नगरी बडी बाका!
कुणीबी हितं तंबू ठोका,
छातीवर मेखा!!
रोवल्या ठायी ठायी,
तिडीक कोणाला अजून न्हाई,
गेली अक्कल
या गीतानं कार्यक्रमाची सुरुवात होते. सुरुवात म्हणजे मराठी माणसाला सणसणीत चपराकच होय!
मुंबईसह महाराष्ट्र राज्य व्हावयासाठी ज्या एकशे पाच हुतात्म्यांनी बलिदान केलं त्यांच्या स्मारकाचा हुतात्मा चौक लोकांस ठाऊक नसावा यापरतं दुर्दैव नाही. पाटलाला महाराष्ट्राच्या राजधानीत मराठी माणसाचं दर्शन घडलं ते हमालाच्या रूपात! ‘‘पाटील वाघ असूनही शेळीवाणी ऱ्हावं लागतंय इथं, या मुंबईच्या परक्या मुलखात!’’
तडा तडा ते फुटले आमच्या विजयाचे चौघडे
मराठी पाऊल मागे पडे
घरात आमुच्या अमुची परवड
मानेवर परक्यांचे जोखड
हमाल का नवसाचे बोकड आम्ही इतरांपुढे।।
‘आंधळं दळतंय’ या मुक्तनाटय़ातील संवाद खटकेबाज आहेत. चुरचुरीत विनोद आणि विनोदाच्या पाठीमागे उपहास उभा केला आहे. मराठी माणसाचे हे दोष दाखविण्यासाठी मी विविध प्रसंगांची सुंदर, पण कल्पकतापूर्ण सांगड घातली आहे.
‘आंधळं दळतंय’मध्ये वस्तुस्थितीचं चित्रण अतिशय समर्थपणे प्रेक्षकांसमोर उभं केलं आहे. उडुपी इथं आले अन् त्यांनी हॉटेलचा धंदा काबीज केला. मद्राशांनी मोठमोठय़ा नोकऱ्या पटकाविल्या आणि आपल्या समाजाला वर ओढले. तीच गोष्ट सिंधी, शीख, म्हैसुरी अन् गुजराती लोकांची. वस्तुनिष्ठ आणि व्यापक दृष्टिकोन स्वीकारल्याशिवाय मराठी माणूस पुढे येणार नाही आणि मग आपण असेच राहावे का? ‘ठेविले अनंते तैसेचि रहावे’ या गुंगीतल्या धुंदीतून मराठी माणसाला मी जागविला अन् थोडा हलविला!
मुंबईमध्ये काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतच्या माणसांचे लोंढे येतात व ते मुंबईतच स्थिर होऊन राहतात. मूळच्या मराठी माणसांची मात्र केविलवाणी स्थिती झालेली आहे. याचे मराठी माणसाने कठोरपणे परीक्षण करावे म्हणून मराठी माणसाचे दोष दाखवून त्यांची अस्मिता जागृत करण्याचे काम अतिशय प्रभावीपणे या मुक्तनाटय़ाने त्या काळी केले. या मुक्तनाटय़ाचा प्रयोग पाहून बाहेर पडणारा प्रेक्षक असा विचार करीत बाहेर पडायचा-
‘‘ज्यांनी मुंबईसह महाराष्ट्र मिळविण्यासाठी एवढे मोठे बलिदान केले, त्यांच्या वारसांवर देशोधडीस लागण्याची पाळी यावी ना? औषधालासुद्धा मराठी भाषा मुंबईत राहू नये? मराठी माणसाची वाताहत मराठी माणसाच्या नावाने राज्य करणाऱ्यांनी मुकाटय़ाने पाहावी ना? मराठी शासन आणि त्याची यंत्रणा मराठी माणसाच्या बाबतीत अशी सर्वच दृष्टीने अगतिक बनावी ना? ’’
आणि अशा प्रकारे ‘आंधळं दळतंय’च्या निमित्तानं मुंबईकर मराठी माणसाला जागविण्याच्या कार्यात मलाही खारीचा वाटा उचलता आला.
ओघात आलं म्हणून या मुक्तनाटय़ाच्या संदर्भात जनजागृती कशी झाली होती त्याचा एक किस्सा आठवला तो सांगतो.
त्या काळात टॅक्सीवाल्यांची अरेरावी मुंबई शहरात फारच चालायची. जवळजवळ सगळेच परप्रांतीय! लोकांना जिथं जायचं असेल तिथं जायला ते राजी नसत. पण ‘आंधळं दळतंय’ या मुक्तनाटय़ाचा प्रयोग पाहून प्रभावित झालेल्या प्रेक्षकांनी त्या दिवशी त्यांना चांगलाच धडा शिकविला. प्रयोगानंतर काही प्रेक्षक टॅक्सीने जाणारेही असत. अशाच एका प्रयोगानंतर काही जण टॅक्सी पकडायला गेले; पण टॅक्सीवाले नेहमीसारखे अडेलतट्टूपणा करायला लागले. प्रेक्षकांच्या मनावर प्रयोगाचा परिणाम होताच. नकारामुळे ते संतप्त झाले. बाचाबाची सुरू झाली. इतर लोकही जमले. टॅक्सीवाल्यांच्या दादागिरीला उत्तर म्हणून लोकांनी त्यांच्या गचांडय़ा पकडल्या, तेव्हा कुठे ते शुद्धीवर आले!
‘आंधळं दळतंय’चा पहिला प्रयोग १३-८-१९६६ ला ‘मार्मिक’च्या वर्धापन दिनानिमित्त रवींद्र नाटय़मंदिरात, सुवर्णमहोत्सवी प्रयोग शिवाजी मंदिरात, तर शतक महोत्सवी प्रयोग पुन्हा रवींद्र नाटय़मंदिरात झाला. दृष्ट लागण्यासारखं यश या मुक्तनाटय़ाला लाभलं. सगळ्या थरांतल्या प्रेक्षकांनी उदंड आश्रय दिला!
 ‘माझा पवाडा’ (पहिली आवृत्ती २००७, मॅजेस्टिक प्रकाशन ) मधून साभार)