शाहीर हा लोककलेतला शेवटचा तारा होता, जो आज निखळला आहे. सगळ्या कलाकारांवर भरभरून प्रेम करणारा हा माणूस होता. क लाकार मग तो नाटकातला असू दे, चित्रपटातला किंवा कुठल्याही क्षेत्रातला असला तरी शाहिरांना त्यांच्याबद्दल कौतुक वाटायचे. शाहिरांबरोबर काम केले नाही असा कलाकार विरळा.. साबळे आणि उमप या दोन घरांमधले संबंध हे अगदी घरोब्याचे होते. मला स्वत:ला महाराष्ट्राची लोकधाराचे लाइव्ह प्रयोग करण्याची संधी मिळाली. शाहीर साबळेंनी रचलेली, त्यांनी गायलेली गाणी आजही लोकांच्या मनात इतकी घर करून आहेत. आम्ही जेव्हा जेव्हा कार्यक्रमांमधून त्यांची गाणी गातो तेव्हा लोकांची उत्स्फूर्त, अस्सल दाद मिळते. लोककला आणि लोकसंस्कृतीच्या माध्यमातून शाहिरांनी काय काय दिले आहे आपल्या समाजाला.. लोकसंस्कृ ती आणि मनोरंजन यांची सांगड घालत खेडोपाडय़ांत विचार घेऊन जाणारे हे अस्सल कलावंत होते. आज आम्ही मोठमोठे कार्यक्रम करतो, त्यासाठी मोजून पैसे घेतो. मात्र या कलावंतांनी रस्त्यावर उतरून आपल्या क लेच्या माध्यमातून जनजागृती केली. त्यांच्यासारखे कलावंत पुन्हा होणार नाहीत. मात्र त्यांनी निर्माण केलेला हा वारसा असाच संपणारा नाही. तो पिढीगणिक पुढे जात राहणार आहे. शाहिरांनी जी गीतं लिहिली, कवनं लिहिली, पोवाडे लिहिले त्यातील विचार हे आजच्या पिढीलाही तंतोतंत लागू पडतात. शाहीर साबळे, शाहीर आत्माराम, शाहीर विठ्ठल उमप अशी नामी शाहीर मंडळी आपल्यातून निघून गेली. मात्र त्यांनी जे मांडून ठेवले आहे ते लोकांना घेता आले पाहिजे. लोककलेच्या माध्यमातून त्यांनी मांडलेला अमूल्य वारसा आत्ताच्या पिढीने जोपासायला हवा.

गाजलेली गाणी :
अरे कृष्णा अरे कान्हा, आई माझी कोणाला पावली, आठशे खिडक्या नऊशे दारे, आधी गणाला रणी आणिला, जेजुरीच्या खंडेराया जागराला या या, मला दादला नको गं बाई, अगगं गं विंचू चावला, बिकट वाट वहिवाट नसावी, महाराज गौरीनंदना, या गो दांडय़ावरन..

शाहीर साबळे यांच्या निधनाने मराठी लोकसंस्कृतीच्या प्रसारासाठी झटणारा निष्ठावंत पाईक हरपला आहे. पद्मश्री पुरस्कारप्राप्त शाहीर साबळे यांनी स्वातंत्र्य चळवळींसोबत संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतही महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. मराठी लोककलांचे पुनरुज्जीवन करणाऱ्या या कलाकाराने नकलाकार, गीतकार, ढोलकी वादक, गायक, दिग्दर्शक, व्यवस्थापक तसेच नाटककार म्हणून आपली ओळख निर्माण के ली होती. त्यांच्या निधनाने शाहिरी परंपरेचा निष्ठेने पुरस्कार करणारा लोकशाहीर आपण गमावला आहे.  
देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
शाहीर साबळे यांच्या पार्थिवावर शनिवारी सकाळी दादर, शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. सकाळी ८.३० वाजता आंबेकर नगर, ग. द. आंबेकर मार्ग, परळ येथील त्यांच्या निवासस्थानाहून अंत्ययात्रेस सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी सकाळी ७.३० ते ८.३० या वेळेत साबळे यांचे पार्थिव निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती साबळे कुटुंबीयांच्यावतीने शाहीर साबळे यांचे नातू शिवदर्शन साबळे यांनी दिली.