काळाच्या पुढच्या स्त्रिया
शकुंतला परांजपे हे नाव लेखिका म्हणून सुपरिचित असले तरी त्यांची खरी ओळख संततिनियमनाच्या क्षेत्रात केलेल्या त्यांच्या कार्यामुळे अधिक आहे. रँग्लर डॉ. रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे यांची कन्या असलेल्या शकुंतलाबाई या केंब्रिजमध्ये शिकलेल्या, फ्रेंचसह अनेक भाषांवर प्रभुत्व असलेल्या, अत्यंत बुद्धिमान, विविध कलानिपुण अशा विदुषी होत्या. आपल्या या कर्तबगार आईबद्दल त्यांच्या तितक्याच कर्तृत्ववान लेकीने सांगितलेल्या आठवणी..
मी जन्माला आले तीच वेगळेपणाचा वरदहस्त घेऊन. मला कळू लागल्यापासून एक गोष्ट पक्की उमगली, की आपण इतर मुलींपेक्षा फार वेगळ्या आहोत आणि म्हणून लोकांच्या कुतूहलाचा विषय आहोत. एक तर केंब्रिजला गणिताची उच्च परीक्षा प्रथम श्रेणी प्रथम क्रमांकावर उत्तीर्ण होऊन विक्रम नोंदविणारे भारताचे पहिले सीनिअर रँग्लर, सुप्रसिद्ध गणितज्ञ डॉ. रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे यांची मी नात. अप्पा हे पुणे शहराचे भूषण होते. त्यांच्याविषयी लोकांमध्ये प्रचंड आदर, अमाप प्रेम आणि दबदबा होता. त्यानंतर त्यांची एकुलती एक कन्या शकुंतला हिची मी एकुलती एक मुलगी. माझी आई हे पुणेकरांना न उलगडलेले कोडे होते. ज्याकाळी मुली जेमतेम मॅट्रिक होऊन- किंवा त्याआधीच ‘दिल्या घरी’ दाखल होत, त्या काळात आईने केंब्रिजमध्ये पदवी मिळवून पुढे जीनिव्हाला अल्पकाळ क. छ. ड.मध्ये नोकरी केली. ती फ्रेंच शिकली. आणि तिथे भेटलेल्या एका उमद्या रशियन चित्रकाराबरोबर लग्न करून तिने खळबळ उडवून दिली. दीड वर्ष युरोपमध्ये संसार करून, पुढे घटस्फोट घेऊन आपल्या तान्ह्य़ा मुलीला (मला) घेऊन पुन्हा ती मायदेशी.. पितृगृही परतली. पुन्हा खळबळ! हे सगळेच अघटित होते. पुणेकरांना पचायला अवघड होते. ते तिला विलक्षण बाचकून असत. तिच्या फटकळपणाची ख्याती पसरली असल्यामुळे तिच्याशी बोलायची कुणाची टाप नव्हती. मी मात्र सोपे सावज होते. रशियन लाल, गोरा रंग. गोल गरगरीत अंग. निळे डोळे आणि कापलेले केस.. (त्याकाळी एकजात सर्व मुलींच्या वेण्या असत.) यामुळे मी एक अजूबा वाटत असे. लोक रस्त्यात अडवून मला विचारीत- ‘सई ना गं तू? तुझे वडील कुठे असतात? त्यांचं नाव काय? तुझ्या आईचं लग्न का मोडलं?’ इ. इ. मला बोलतं करायला क्वचित चॉकलेटचं आमिषही दाखवलं जायचं. या हल्ल्याने बेजार होऊन कधी क्वचित मी रडत रडत घरी जाई. मग आईने मला एक कानमंत्र दिला. मुळातच स्वभावाने धीट (आगाऊ) असल्यामुळे मी तो तंतोतंत पाळू शकले. कुणी वाकडा प्रश्न विचारला, की मी मोठाले डोळे करून ‘तुम्हाला हो काय चांभारचौकशा करायच्या आहेत?’ असा उलटा सवाल करी. लहानपणी सोसलेल्या या आक्रमक हल्ल्यामुळेच की काय, अजूनही कुणी अनोळखी व्यक्तीने अवास्तव सलगीचे प्रश्न विचारले की मी मिटून जाते.
माझी अगदी पहिली शाळा आमच्या घराच्या- पुरुषोत्तमाश्राच्या अगदी जवळ होती. तीन-चार वर्षांची आम्ही मुलं-मुली तारस्वरात ‘रिंगा रिंगा रोझेस’ गात फेर धरीत असू. ‘ऑल फॉल डाऊन’ला धपकन् खाली पडायचं हे मला फार आवडे. काही दिवसांनी शाळेत एक माँगोलाइड मुलगी दाखल झाली. ती उंच आणि धिप्पाड दिसे. वेगळी पण. ती जवळ आली की आमची पळापळ व्हायची. बालसुलभ दुष्टपणाने आम्ही दुरून तिची टिंगल करीत असू. आईला हे कळलं तेव्हा कुणी वेगळं आहे म्हणून त्याला दूर लोटणं हे किती चुकीचं आहे, हे तिने मला समजावून सांगितलं. उलट, त्यांना आपण समजून, सामावून घेतलं पाहिजे. मला आईचं म्हणणं पटलं आणि हळूहळू माझी भीती चेपली. ती मुलगी आमच्यात हसू-खेळू लागली. आईने दिलेला माणुसकीचा तो पहिला धडा मला जन्मभर पुरला. कोणत्याही प्रकारचे न्यून असलेल्या व्यक्तीबद्दल मला विशेष आपुलकी वाटते. पुढे मी किंडरगार्डनमध्ये जाऊ लागले. माझ्या वर्गात एक नंदू म्हणून मुलगा होता. त्याची माझी छान दोस्ती जमली. त्याची आई मला नेहमी त्यांच्या घरी येण्याचा आग्रह करीत असे. अर्थात माझे ‘वेगळेपणाचे वलय’ हे मुख्य कारण असणार. ‘आईला विचारते..’ असे मी त्यांना सांगितले. खरं तर अनोळखी लोकांच्या घरी जायची मला सक्त मनाई होती. तेव्हा आईने ठाम ‘नाही’ सांगितले. आता हे त्या बाईंना कसे सांगणार? मग मी ‘विचारायला विसरले,’ असं सांगू लागले. लागोपाठ पाच-सहादा विसरल्यावर बाई रागावू लागल्या. मग मी नाना क्लृप्त्या करून त्यांना चुकवू लागले. पण एके दिवशी आमनासामना झालाच.
‘काय ग? विचारलंस की नाही?’ त्यांनी दरडावून विचारलं आणि मी ‘हो’ म्हटलं.
‘मग काय म्हणाली आई?’
‘जा म्हणाली.’ आणि मग मी नंदूच्या बरोबर त्याच्या घरी गेले. सुरुवातीला थोडं धुकधुकत होतं, पण थोडय़ाच वेळात खेळ, खाऊ आणि खादाडी यात मी रमून गेले. मला न्यायला कुणीतरी येईल, असं मी सांगितलं होतं. पहिली थाप मारली की पुढच्या आपसूक उलगडत जातात. बराच वेळ झाला. अंधार पडू लागला. मला न्यायला कुणीच येईना, तेव्हा सोबत गडी देऊन माझी रवानगी करण्यात आली. फग्र्युसन रोड लागताच दुरून झपाझप पावले टाकत येणारी अच्युतमामाची उंच आकृती दिसली. त्याला पाहिल्यावर मला खूप हायसं वाटलं. पण लगेचच आता घरी गेल्यावर खरपूस मार बसणार, याची जाणीवही झाली.

‘सई आणि मार’ हे समीकरण सर्वश्रुत होतं. मला मार बसला नाही असा दिवस विरळा. कारण असो वा नसो- बहुधा नसोच, मला आई बदडून काढीत असे. आज तर काय, मी प्रचंड चूक केली होती. तेव्हा मार अटळ होता. पण अहो आश्चर्यम्! घरी गेले तर काय? मारबीर तर नाहीच; पण मला मांडीवर बसवून आई रडरड रडली. मला फार छान वाटलं. मार खाण्यापेक्षा हे किती उत्तम!
आईचे व्यक्तिमत्त्व अतिशय मनस्वी, अतिरेकी होतं. तिची शिस्त जरी वाजवीपेक्षा कठोर (माझ्या मते!) असली तरी तिच्या ममतेला, लाडालाही सीमा नव्हती. तिचे देणे अगदी ‘छप्पर फाडके’ असे. एकाच उदाहरणावरून माझे म्हणणे पटावे. माझ्या बालपणी लहान मुली मोठय़ा सोसासोसाने आपल्या बाहुलीचे लग्न लावीत. ही लग्ने अंगणात, जिन्याखालच्या सापटीत, किंबहुना मोठी माणसं हुसकून लावणार नाहीत अशा ठिकाणी लागत. भिजवलेले पोहे आणि गूळ यांचा कालवलेला चिकटा प्रसाद म्हणून वाटला जाई. ओळखीच्या सगळ्या मुलींच्या घरी मला लग्नाचे आमंत्रण असे. आईला हा एकूण प्रकारच पसंत नसल्यामुळे माझ्या बाहुलीचे हात पिवळे करण्याचा योग मात्र कधी आला नाही. मैत्रिणींच्या टोमण्यांना कंटाळून शेवटी मी हट्टाला पेटले आणि कधी नव्हे ते आई विरघळली. ‘काय सारखं टुमणं लावलं आहेस? बरं चल. मुहूर्त ठरवू.’ आणि मग लगीनघाई सुरू झाली. तुळशीबागेमधून कापडी बाहुला-बाहुलीची छानशी जोडी विकत आणली. बाहुलीच्या काळ्या केसांचा अंबाडा होता आणि ती जरतारी साडी नेसली होती. बाहुल्याचा धोतर, कुडता, जाकीट, टोपी असा संभावित पोषाख होता. रोज दुपारी आई, मी आणि इतर हौशी तिघी-चौघीजणी मिळून याद्या, रुखवत, दागिने, मंगळसूत्र इ. करण्यात दंग होत असू. लग्नाच्या दिवशी जांभळ्या कागदात गुंडाळलेले सातारी पेढे, ऐटबाज गुलाबी फेटे घातलेल्या युवकांचा खराखुरा स्काऊट बँड आणि वरातीसाठी दारात चक्क एक ठुसकी पांढरी घोडी असा सगळा सरंजाम होता. आमंत्रित आणि आगंतुक मुलांची ही गर्दी लोटली. नवरा-नवरीची वरात आमच्या घरातून निघून आपटे रोडवरून फग्र्युसन रोडला वळसा घालून परत आली. बाहुल्याला मी सोयीस्करपणे घरजावई करून घेतले. गंमत म्हणजे एवढय़ा अमाप उत्साहाने माझ्या बाहुलीचे लग्न लावून देणारी माझी आई पुढे माझ्या लग्नाला काही आली नाही.
आईचे कर्तृत्व आणि बहुआयामी व्यक्तिमत्त्व लक्षात घेता तिला तिच्या योग्यतेच्या कोणत्याही क्षेत्रात उच्चपद मिळविता आले असते. विद्वत्ता, प्रखर बुद्धिमत्ता, मराठी, इंग्रजी, फ्रेंच भाषांवर प्रभुत्व, केंब्रिजची एम. ए.ची पदवी, आय.एल.ओ.मध्ये केलेली नोकरी, लेखिका म्हणून झालेले नाव आणि अर्थातच महापुरुष रँग्लर परांजपे यांची कन्या म्हणून मिळालेले वारसाप्राप्त वलय एवढे विपुल भांडवल असूनही तिने स्वत:च्या भलाईसाठी य:कश्चितही हालचाल केली नाही. तिचे सर्व प्रयास, तिची अवघी ऊर्जा एकाच बिंदूवर केंद्रित झाली होती- आपल्या एकुलत्या एक मुलीचा सर्वागीण विकास!
मला ‘सर्वगुणसंपन्न’ करण्याच्या आईच्या ध्यासापोटी मला अनेक दिव्यांमधून जावे लागले. आमच्या घरी वाचनाचे अतिशय वेड होते. पुरुषोत्तमाश्रात तर एक अख्खी खोली फक्त पुस्तकांची होती. प्रत्येक भिंतीला खालपासून पार वपर्यंत शेल्फ आणि त्यात ठासून भरलेली पुस्तके. वर चढायला एक शिडीही कोपऱ्यात सज्ज असे. मी दहा-बारा वर्षांची होईपर्यंत हरी नारायण आपटे, लक्ष्मीबाई टिळक, अरेबियन नाइट्स, सानेगुरुजी, वीरधवल, गोटय़ा, चिंगी इ. मराठी, तर इंग्रजीमध्ये चार्लस् डिकन्स, सर वॉल्टर स्कॉट, ब्राँटे भगिनी, टॉमस हार्डी, जेन ऑस्टीन, मार्क ट्वेन यांची पुस्तके वाचून फस्त केली होती. रोज मी अप्पांजवळ मोठय़ाने वाचीत असे. उच्चार शुद्ध हवेत असा दोघांचा कटाक्ष असे. त्यासाठीच आईने संस्कृतचा आश्रय घेतला. ‘सुभाषितरत्नभांडार’ या अनमोल ग्रंथामधले कितीतरी निवडक श्लोक मी शिकले. अर्थ समजून घेऊन मगच तो श्लोक पाठ करावा लागे. आणि नुसतेच पाठांतर नाही, तर तो सुवाच्य अक्षरात (त्यातल्या त्यात) लिहून काढावा लागे. मला एकटीला कंटाळा येऊ नये म्हणून आईसुद्धा रेघा आखून पान-पान श्लोक लिहीत असे. या भावगर्भ सुभाषितांच्या चरणाचरणांमधून अगाध ज्ञानाचा ठेवा आहे, हे सर्वश्रुत आहे. पण संस्कृत भाषेत केवढा मिश्कील विनोद भरला आहे याची फार थोडय़ा लोकांना कल्पना असावी. आमच्या घरी देव्हारा नव्हता. पण गणपती ते मारुती सर्व देवदेवतांची स्तोत्रे मला मुखोद्गत होती. रोज रामरक्षा म्हणावी लागे. रावणस्तोत्र म्हणताना प्रत्येक शब्दाचा घणाघाती उच्चार करीत मंत्रघोष करायला मजा येई. पुढच्या आयुष्यात हिंदी, फ्रेंच अशा भाषा शिकायला आणि आकाशवाणी आणि रंगभूमी या माझ्या कार्यक्षेत्रात काम करायला संस्कृतच्या शिदोरीचा फार उपयोग झाला. रोज रात्री झोपताना आई मला गोष्टी सांगे. एकदा ती म्हणाली, ‘आज मला कंटाळा आला आहे. तू सांग.’ मग मी तिला एक गोष्ट सांगितली. ‘बरी आहे की!,’ आई म्हणाली, ‘कुणी सांगितली तुला?’ ‘मीच रचली..’ मी फुशारकीने सांगितले. आधी तिचा विश्वास बसला नाही. पण दोन-तीन आणखीन अशा गोष्टी ऐकल्यावर तिची खात्री पटली. आणि मग माझ्यावर आपत्तीच कोसळली. कारण त्या सगळ्या गोष्टी मला लिहून काढाव्या लागल्या आणि मग रोज तीन पाने ‘लिखाण’ करायचा दंडक सुरू झाला. पुरेसा ऐवज जमल्यावर आईने मोठय़ा अभिमानाने माझ्या गोष्टींचे पुस्तक छापले- ‘मुलांचा मेवा’! तेव्हा मी आठ वर्षांची होते. माझ्या सुदैवाने माझ्या पाठीशी समर्थ आई असल्यामुळे हे शक्य झालं याची मला नम्र जाणीव आहे. त्याकाळी गाजत असलेल्या सिनेमांमधल्या गाण्यांवर आईने माझे नाच बसविले होते. माझे लहान वय, बऱ्यापैकी अभिनयगुण आणि गोरेगोबरे रूप यामुळे लोकांना हे नाच आवडत. ठिकठिकाणांहून मला बोलावणी येत. मला पोत्यावारी चांदीचे बिल्ले मिळत. तेव्हा ऊठसूट हे बिल्ले द्यायची फार पद्धत होती. मला ते अजिबात आवडत नसत. बिल्ले घेऊन करायचे काय? आई मोठय़ा प्रेमाने ते सांभाळून ठेवीत असे. ‘दूर हटो.. हिंदुस्तॉं हमारा है’ हा माझा एक हातखंडा आयटम होता. या नाचात एक छोटी लाकडी तलवार मी आवेशात फिरवत असे. तलवारीचे हात रीतसर शिकायला माझ्या आग्रही आईने मला टिळक रोडवरच्या महाराष्ट्र मंडळात दाखल केले होते. रोज एक तास असा महिनाभर हा वर्ग चाले.

सगळ्यात कहर म्हणजे मुलीला सर्वकलानिपुण करण्याच्या अट्टहासापोटी आईने मला शास्त्रोक्त गाण्याची शिकवणी लावली. शिक्षकही असे तसे नाहीत, तर पुण्याचे सुप्रसिद्ध गायनाचार्य मिराशीबुवा! बुवांचा व्यासंग दांडगा. त्यांच्या बोलतानांची फार ख्याती होती. पुढे त्यांना संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार मिळाला. रोज सकाळी मोठय़ा पलंगावर बैठक मारून आमची शिकवणी चाले. ‘आसावरी’ राग मला चांगला आठवतो. कारण त्या एका रागापुढे आमची मजल गेली नाही. ‘नेवरिया’ ही चीज आम्ही आळवत असू. किंबहुना बुवा डोळे मिटून तंबोरा छेडीत गात आणि मी डोकावून त्यांची पडजीभ बघत असे. ही शिकवणी फार दिवस चालली नाही. एके दिवशी सगळं धैर्य एकवटून बुवा आईला म्हणाले, ‘‘शकुंतलाबाई, सईला संगीताचे तीळमात्र अंग नाही. आपण भलता आग्रह धरू नये.’’ तेव्हा कुठे माझी शिकवणी थांबली.
टिळक तलावात पोहण्याचा वर्ग, रोज फग्र्युसन टेकडीवर पार मारुतीच्या देवळापर्यंत रपेट, प्रसिद्ध चित्रकार गोंधळेकर यांच्या स्टुडिओत चित्रकलेची दीक्षा, ऑस्ट्रेलियात घोडेस्वारीचे शिक्षण असे इतर बरेच उपक्रम या ‘विकास योजने’त सामील होते. त्या कोवळ्या वयात हे सर्व सोपस्कार मला जाचक वाटले, तरी आज मागे वळून पाहताना त्या पाठय़क्रमाबद्दल वेगळाच साक्षात्कार घडतो. नाना मुशींमधून आईने मला तावूनसुलाखून काढले, मला घडवले. साहित्य, नाटक, बालनाटय़, आकाशवाणी, दूरदर्शन व चित्रपट या माध्यमांमधून मी पुढे जी काही थोडी कामगिरी करू शकले ते केवळ आईच्या या तपश्चर्येमुळेच! माझ्या प्रत्येक कलाविष्कारात आईच्या पाऊलखुणा आढळतात.
आईने जरी कोणत्याही नियमबद्ध चाकोरीमध्ये स्वत:ला अडकवून घेतले नाही, तरी ती नित्यनवीन आव्हानांचा वेध घेत असे. युरोपहून परत आल्या आल्याच तिने व्ही. शांतारामांच्या ‘कुंकू’मध्ये चित्राची भूमिका केली. तिचे सिनेमामधले वडील केशवराव दाते. हे तिच्याच वयाच्या तरुणीबरोबर लग्न करतात. चित्राचा त्याला विरोध असतो. आईच्या मते- तिने भूमिका वाईट केली. ‘निर्जीव अभिनय आणि एकसुरी संवाद’ असा तिचा प्रांजळ अभिप्राय होता. पण चित्रपट खूप गाजला. लोकांना चवीचवीने बोलायला आणखी एक विषय झाला. त्याकाळी घरंदाज कुटुंबातल्या स्त्रिया सहसा पडद्यावर दिसत नसत. मला मात्र आईने सिनेमात काम केले याची फुशारकी वाटे.
आई मग नाटकाकडे वळली. फ्रेंच नाटकांवरून बेतलेली तिची ‘सोयरीक’ आणि ‘चढाओढ’ ही नाटके आधीच छापली गेली होती. आता तिने नवीन सामाजिक नाटक लिहिले- ‘पांघरलेली कातडी’! दोन समांतर प्रेमकथा असलेल्या या नाटकात एक कोळणीचे पात्र आहे. ठसठशीत रूप, फटकळ बोली; पण प्रेमळ स्वभावाची तुळसा कोळीण हे एक बहारदार पात्र आहे. नाटक स्वत: बसवण्याचा आणि तुळसाची भूमिका करण्याचा आईने निर्णय घेतला. आमच्या घरी तालमी सुरू झाल्या. राजा परांजपे मेघदूतची भूमिका करीत होते. आईला नाटय़-दिग्दर्शनाचा अनुभव नव्हता; पण उदंड कल्पनाशक्ती, दांडगी हिंमत आणि अफाट आत्मविश्वास होता. शिवाय अप्पांचा उत्तेजक पाठिंबा होताच. रंगभूमीचा जिवंत पाठ मला या अभियानातून मिळाला. तुळसाच्या प्रतिमेचा शोध घेण्यासाठी आईने सरळ कोळीवाडा गाठला. आठवडय़ातून एक दिवस आम्ही (गाडय़ाबरोबर माझी नाळ्याची यात्रा!) डेक्कन क्वीनने मुंबईला जाऊन थेट माहीमच्या कोळीवाडय़ात दाखल होत असू. सोनाबाई नावाच्या एका कोळिणीशी आईने गट्टी जमवली. दिवसभर आमचा मुक्काम तिच्या घरी असे. गेल्या गेल्या आई कोळी पद्धतीचे लुगडे नेसत असे. मग बसणे, उठणे, बोलणे, हावभाव, लकबी यांचा ती बारकाईने अभ्यास करी. दुपारी आमचे माशाचे जेवण असे. मासा म्हणजे फक्त पापलेट नाही, हे मला तिथे उमजले. मुंबईला पहिला प्रयोग झाला तेव्हा अवघी बाल्कनी कोळी लोकांनी भरली होती. नाटकाची सुरुवात आगगाडीच्या डब्यापासून होते. हा डबा चक्क सरकत स्टेजवर येत असे. प्रयोग छानच झाला. आईच्या तुळसाचीही वाहवा झाली. पण बेसुमार खटाटोप आणि श्रम करावे लागल्यामुळे आई पुन्हा नाटक बसवण्याच्या फंदात पडली नाही.
नाटकांच्या व्यतिरिक्त आईने इतरही बरेच लिखाण केले. ती सातत्याने लिहीत असे. विशेषत: ‘विविधवृत्त’ आणि र. धों. कर्वे यांच्या ‘समाजस्वास्थ’मधून तिचे लेख प्रसिद्ध होत. रसाळ, ओघवती शैली, मिश्कील विनोद आणि निर्भीड विचार या वैशिष्टय़ांची साक्ष तिच्या ‘भिल्लिणीची बोरे’ आणि ‘माझी प्रेतयात्रा’ या पुस्तकांमधून होते. तिच्या मनात आलेला विचार कसलीही चाळणी न लावता लेखणीद्वारा सरळ कागदावर उतरत असे. तिने निवडलेले विषय तिच्या स्वतंत्र वृत्तीला धरून अगदी मुलखावेगळे असत. तिचा गाजलेला ‘माझी प्रेतयात्रा’ हा लेख पाहा. मथळाच किती बोलका आहे. ‘आपुले मरण पाहिले म्या डोळा’ हा या लेखाचा आशय आहे. या लेखात तिने अनेक प्रतिष्ठित लोकांची आणि मुख्य म्हणजे स्वत:ची यथेच्छ टिंगल केली आहे. शोकसभेच्या भाषणांमधून तिने न. चिं. केळकर, मामा वरेरकर, कृष्णराव मराठे (तेव्हाचे पुण्याचे खंदे ‘संस्कृतिरक्षक’!), आचार्य अत्रे आदी मंडळींच्या लकबी आणि स्वभावविशेष बेमालूम रंगवले आहेत. एकच उदाहरण-
‘टाळ्यांच्या व शिटय़ांच्या गजरात अत्रे उभे राहिले. ऑस्ट्रेलियाला जायची जय्यत तयारी करून शकुंतलाबाई भलतीकडेच गेल्या, हे त्यांच्या खिलाडूवृत्तीला शोभत नाही. त्यांनी संततिनियमनाचे काम केले असे ऐकतो. त्या कार्याची मला प्रत्यक्ष माहिती नाही, पण आज त्यांना शेकडो न जन्मलेले जीव दुवा देत असतील अशी माझी खात्री आहे.. ‘समाजस्वास्थ्या’तील त्यांचे लेख मी वाचले नाहीत. ते वाचण्यासाठी अनेक वेळा मासिक हाती घेतले; परंतु प्रत्येक वेळा मुखपृष्ठावरील (नग्न) चित्र दिसताच मी तेच बघत बसे.. ‘भिल्लिणीची बोरे’ मात्र मी चाखली आहेत व त्यांच्या आंबट-गोडपणाबद्दल भरपूर आस्वाद घेतला आहे. त्या लोकांना हसवू शकत.. तर आपल्या स्वत:लाच त्याहून अधिक हसू शकत, हे त्यांच्या स्वभावाचे आणि लिखाणाचे मर्म होते.’
या लेखाची अखेर अशी होती..
..होता होता मिरवणूक ओंकारेश्वरापाशी आली. दोन्ही हात पसरून कृष्णराव मराठय़ांनी सर्वाना अडवले. आपल्या खणखणीत आवाजात ते म्हणाले, ‘‘इथे फक्त ब्राह्मणांचाच अंत्यविधी होऊ शकतो. तेव्हा परधर्मीयाशी लग्न करून बाटलेल्या बाईला आम्ही येथे येऊ देणार नाही.’’ .. झाले. आता लकडी पुलावरच आमची बोळवण करावी म्हणून आमची मिरवणूक त्या दिशेला वळवली, तर काही ब्राह्मणेतर आडवे आले. ‘‘बामणाच्या बाईला आम्ही येथे येऊ देणार नाही.’’ आमचे ओझे घेऊन मंडळी परत फिरली. कुरकुर सुरू झाली.
‘‘या बाईला खांद्यावर मिरवायचं तरी किती वेळ?’’
‘‘काय जगावेगळी बाई आहे! मेल्यावरसुद्धा करणी मुलखावेगळीच.’’
‘‘आता खांदे दुखले बुवा. देऊ हिला टाकून..’’ आणि चौघांनीही मला धाडकन् खाली फेकून दिली. त्या आवाजाने मी जागी झाले..
..आईने ‘घराचा मालक’ ही भावपूर्ण कादंबरी आणि लहान मुलांसाठी ‘सवाई सहा’ टोळीच्या साहसकथा लिहिल्या. त्यातल्या ‘सवाई सहांची कोकणातली करामत’ या कथेवर आधारीत बालचित्रपटाला बॉस्टनच्या महोत्सवात प्रथम पारितोषिक मिळाले.
आईने इंग्रजीतूनही बरेच लिखाण केले आहे. ‘Three Years in Australia’ आणि  ‘Sense and Nonsenses’ या ग्रंथांमधून तिच्या ‘क्वीन्स इंग्लिश’चा प्रत्यय येतो. भाषा वेगळी असली तरी तिची लोभस, मिश्कील शैली तीच आहे.
शकुंतला परांजपे हे नाव ती लेखिका असल्यामुळे परिचित असले तरी माझ्या मते तिची खरी ओळख तिने संततिनियमनाच्या क्षेत्रात केलेल्या कामगिरीमुळे नोंदवली जावी. रघुनाथ धोंडो कर्वे हे आईचे दूरचे चुलतभाऊ. (अप्पा आणि भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे हे सख्खे आते-मामेभाऊ!) पण नाते जरी दोन चुलींपलीकडचे होते, तरी कर्वे-परांजपे जवळीक दाट होती. कर्वे तेव्हा समाजात संततिप्रतिबंधाचा प्रचार करण्याच्या प्रयत्नांत होते. पण ते बरेचसे अरण्यरुदन होते. कारण तो विषयच तेव्हा अप्रिय होता. तेव्हा कुणी त्यांचा उपदेश आचरण्याचे तर सोडाच; पण ऐकण्याच्याही मन:स्थितीत नव्हते. एकदा ते आईला म्हणाले, ‘‘या कामाचा खरं तर स्त्रियांच्यात प्रचार व्हायला हवा. पण त्यासाठी एखादी खंबीर बाई उभी राहिली पाहिजे. तू करशील का हे काम?’’
‘‘अप्पांना विचारून सांगते,’’ असे तिने उत्तर दिले. अप्पांनी तात्काळ संमती दिली. म्हणाले, ‘‘हे कार्य अतिशय निकडीचे आहे. प्रजा अशीच बेसुमार वाढत राहिली तर देशात फार कठीण परिस्थिती ओढवणार आहे.’’ मग आईने या खडतर कार्याचा श्रीगणेशा केला. अर्थात् मार्गदर्शक आणि गुरू र. धों. कर्वे होते. (हा एक मजेदार योगायोग होता; कारण महर्षी कर्वे हे अप्पांचे गुरू होते.) १९३८ साली याची व्यवस्थित दीक्षा घेतल्यावर आईने पुरुषोत्तमाश्रमामध्ये आपले क्लिनिक उघडले. पण तिथं कुणीही येईना. एक मैत्रीण तिला म्हणाली, ‘‘अगं शकू, तुझ्या क्लिनिकमध्ये दिवसाढवळ्या कोण येणार? कुणी पाहील याची धास्ती असतेच ना!’’ क्लिनिकच्या वेळा दिवसाच्या होत्या आणि त्या काळात ‘संततिनियमन’ हा शब्ददेखील कुणी ‘सभ्य’ समाजात उच्चारीत नसे. नातेवाईकसुद्धा शकूला ‘दुसरं समाजकार्य सुचलं नाही का?,’ असं म्हणून नाकं मुरडीत. आईने क्लिनिकची वेळ बदलून रात्रीची ठरवली. हळूहळू लोक येऊ लागले. तीन-चार वर्षांनी तर उघड वर्दळ सुरू झाली. सल्ला मोफत होताच; पण प्रसंगी साधनेही विनामूल्य दिली जात. पुणेकर क्लिनिकचा फायदा घेऊ लागले.
मग आईने आपला मोर्चा खेडय़ांकडे वळवला. शहरी मध्यमवर्गापेक्षा अशिक्षित, श्रमजीवी ग्रामीण जनतेला ‘जाणतं’ करणं अगत्याचं होतं. ती ‘डेक्कन अॅग्रिकल्चरल असोसिएशन’ या शेतकी सुधार संस्थेची सभासद झाली आणि त्यांच्या मदतीने खेडोपाडी दौरे काढू लागली. तिच्या सभांना प्रथम फक्त पुरुष येत. ‘बायका कुठे आहेत?’ विचारलं तर या ‘अशा विषया’वर भाषण ऐकायला त्यांना संकोच वाटतो, असं सांगण्यात येई. मग आई म्हणे- ‘या विषयावर जर एक बाई बोलू शकते, तर त्यांना नुसतं ऐकायला काहीच हरकत नाही. ठीक आहे! बायका जमल्याशिवाय सभा सुरू होणार नाही.’ ही मात्रा मात्र छान लागू पडत असे आणि पाहता पाहता पटांगण बायकांनी फुलून जाई. अनेकदा तर बायकांची बहुसंख्या नोंदवली गेली आहे.
खेडय़ांतून वावरताना आपल्या शहरी वलयामुळे ग्रामीण जनतेशी म्हणावी तशी जवळीक साधता येत नाही, एक परकेपणा कायम राहतो, याची जाणीव होऊन आईने आपल्या साहसी वृत्तीला अनुसरून प्रचाराची एक अभिनव पद्धती सुरू केली. मातीशी नाते सांगणाऱ्या सहा-सात स्त्री-पुरुषांचा एक ताफा तिने उभा केला. या सर्वाच्या संततिप्रतिबंधक शस्त्रक्रिया झालेल्या होत्या. तेव्हा त्यांचे अनुभवाचे बोल मोलाचे होते. ही मंडळी खेडुतांच्या भाषेत बोलत. एवढेच नाही तर दणकेबाज भाषणे करीत. या ‘टीम शकुंतला’मध्ये एक बस कंडक्टर, एक भाजीवाला, एक हॉस्पिटल आया, म्युनिसिपल झाडूवाली, एक भंगारवाला अशी तीसेक मंडळी होती. सभेत बसलेल्या गावकऱ्यांच्या न विचारलेल्या प्रश्नांची ते बिनचूक उत्तरे देत..
कृष्णाबाई : द्येव लेकरं द्येतो. आपुन कोन न्हाई म्हननार? अवो, पण गावात साथ आली की सुई टोचून घेता की न्हाई? द्येवान धाडली बला, म्हून का गप बसून ऱ्हात न्हाई? मग का पळापळी करता?
गुंजाळ : ऑपरेशनची भीती वाटत होती. आपण पुरुष राहणार की नाही, याची पण. ऑपरेशनला आता तीन र्वष झाली, माझ्यात काहीही बदल नाही. माझी बायकोबरोबर बातचीत आधीसारखीच चालू आहे.
धनवडे : ऑपरेशन शब्द मोठा! पण इंजेक्शनपेक्षा काही जास्त दुखलं नाही. दुसऱ्या दिवसापासून कामाला जाऊ लागलो.
शेवंता धुगड : लेकरं रगड, एकाचं नाही धड! दोन बरी, त्यांना टायमावर भाकरी!
.. पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनने १९५० मध्ये आईला कुटुंबनियोजन सोशलवर्कर नेमले. के. इ. एम., गाडीखाना, शनिवारपेठ, येरवडा इथे ती नियमित काम करू लागली. सरकारी अॅम्ब्युलन्स, एक डॉक्टर, एक नर्स आणि तिच्या टीममधले एकेक स्त्री-पुरुष घेऊन ती खेडोपाडी जाऊन शस्त्रक्रिया कॅम्प चालवीत असे. या कॅम्प्सना प्रचंड प्रतिसाद मिळे. तिच्या कामाबद्दल खूप बोलबाला होऊ लागला. सुरुवातीचा प्रतिकार आता नाहीसा झाला होता. १९५८ साली तिला मुंबई विधानसभेवर नेमण्यात आलं आणि पुढे १९६४ साली पं. नेहरूंनी तिची राज्यसभेवर नेमणूक केली.
राज्यसभेच्या अधिवेशनासाठी आई दिल्लीला आली की ती जनपथवरच्या ‘वेस्टर्न कोर्ट’ या शानदार सरकारी निवासामध्ये एका प्रशस्त खोलीत राहत असे. अरुण (जोगळेकर) आणि मी तेव्हा दिल्लीलाच राहत होतो. तेव्हाची एक आठवण.. कडाक्याच्या थंडीचे दिवस होते. आईला मी एक विजेची शेकायची पिशवी दिली होती. एकदा तिला भेटायला सकाळी तिच्या खोलीवर गेले, तर खोलीभर धूर! ती म्हणाली, ‘‘पहाटे केव्हातरी पिशवीमध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागली. माझी झोप मोडली ती पायाला चटका बसूनच.’’ चादर, ब्लँकेट पार जळून गेले होते. गादीलाही मोठे थोरले भोक पडले होते. आईने वेस्टर्न कोर्टच्या मेट्रनना बोलावले. मिसेस मल्होत्रा आल्या आणि त्यांनी आगीची करामत पाहून आई सलामत राहिल्याचे समाधान व्यक्त केले. ‘‘या सर्व नुकसानीबद्दल मला काय रक्कम भरावी लागेल, ते अवश्य सांगा,’’ आईनं त्यांना सांगितलं. ‘‘चौकशी करून पाच दिवसांत सांगते,’’ असं म्हणून मल्होत्राबाई परतल्या. पण त्यांच्याकडून काहीच खबर न आल्याने आईच एक-दोनदा त्यांना आठवण करून द्यायला गेली. पण व्यर्थ! अखेर संसदेचं अधिवेशन संपून पुण्याला परतण्याची वेळ आली तरी मल्होत्राबाईंकडून काहीच हालचाल होईना. निकरीचं म्हणून आई परत जेव्हा त्यांच्याकडे गेली तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘शकुंतलाजी, गेली वीस र्वष मी इथे मेट्रन आहे. किती एम. पीं.नी टॉवेल, पडदे, थर्मास, लँपशेड्स पळवली आहेत, त्याची गणती नाही. स्वत: नुकसानभरपाई करून देण्याची भाषा मी आजपर्यंत कधीही कुठल्याही एम. पी.कडून ऐकली नाही. हा माझा पहिला सुखद अनुभव. त्या धक्क्यातून मी अद्याप सावरलेले नाही. वेस्टर्न कोर्टचे तुम्ही काही देणे लागत नाही.’’
माझ्या लोकविलक्षण आईबद्दल किती आठवावे? किती लिहावे? तिचे नाना व्यासंग- टेनिस, ब्रिज, बुद्धिबळ, विणकाम.. यांचे वर्णन राहूनच गेले. अप्पा ऑस्ट्रेलियात तीन वर्षे भारताचे राजदूत असताना त्यांची अनधिकृत ‘जनसंपर्क’ आणि ‘गृह’ सचिव म्हणून तिने केलेली अजोड कामगिरी.. तिचाही तपशील नाही सांगितला.
शेवटी एकच किस्सा : माझी मुलगी आणि मी सुट्टीत सिंगापूरला गेलो होतो. अचानक पुण्याहून मीराचा- माझ्या मैत्रिणीचा फोन आला- ‘‘शकूताईंना त्यांच्या कार्याबद्दल पद्मभूषण देऊ केलं आहे. सरकारी अधिकारी त्यांची अनुमती घ्यायला आले होते. त्यांचा निर्णय घ्यायला दोन दिवसांनी परत येतील.’’ हे वर्तमान ऐकताच विनीने आणि मी हर्षभरीत होऊन हॉटेलच्या खोलीतल्या पलंगावर उडय़ा मारल्या. पण मग एकदम सावरून मी मीराला उलटा फोन केला- ‘‘हे बघ, आईला सांग की, या बहुमानाचा नक्की स्वीकार कर. उगीच नाहीबिही म्हणू नकोस.’’ तिचा काय नेम?
आईला १९९१ साली पद्मभूषण मिळाले.’