लोकशाहीतून प्रबळ होणारी एकाधिकारशाही नव्या प्रश्नांना जन्म देते. बांगलादेशमधील सार्वत्रिक निवडणुकीत पंतप्रधान शेख हसीना यांनी सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला आणि नवे प्रश्न घेऊनच तेथे नववर्षांची पहाट उगवली. हसीना यांच्या या एकतर्फी विजयाला निवडणुकीतील हिंसाचार, मतदान प्रक्रियेतील गैरप्रकारांच्या तक्रारींची काळी किनार आहे. या मोठय़ा विजयामुळे निवडणुकीच्या विश्वसनीयतेवर प्रश्नचिन्ह उमटलेच; पण त्यातून एकाधिकारशाहीला बळ मिळाल्याच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

बांगलादेशमधील आघाडीच्या ‘द डेली स्टार’ या वृत्तपत्राने ‘हॅट्ट्रिक फॉर हसीना’ या मथळ्याखाली हसीना यांच्या विजयाचे वृत्त, तर ‘अवामी लीग्ज थर्ड कॉन्सिक्यूटिव्ह टर्म’ या शीर्षकाखाली अग्रलेख प्रसिद्ध केला आहे. त्यात हसीना सरकारपुढील आव्हानांचा वेध घेण्यात आला आहे. गेल्या दहा वर्षांत अवामी लीग सरकारने आर्थिक विकास, दारिद्रय़ निर्मूलन, अन्नसुरक्षा, शिक्षण आदी क्षेत्रांत मोठी प्रगती केली; पण याच कालावधीत मानवाधिकाराचे उल्लंघन, सुशासनाचा अभाव, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाल्याचे त्यात म्हटले आहे. पाकिस्तान राजकीय अस्थैर्य, दहशतवादाने पोखरलेला असला तरी तेथील माध्यमे उत्तम दर्जाची आहेत. ‘बांगलादेश रुलिंग कोलिएशन डिक्लेअर्ड विनर ऑफ डिस्प्यूटेड इलेक्शन’ या मथळ्याखाली ‘डॉन’ने दिलेल्या वृत्तात निवडणुकीतील हिंसाचार, गैरप्रकाराच्या तक्रारींवर बोट ठेवले आहे. अवामी लीग आघाडीला बहुमत मिळेल, असे भाकीत वर्तवणाऱ्यांनाही आश्चर्य वाटेल इतका एकतर्फी विजय या पक्षाच्या आघाडीला मिळाल्याचे ‘डॉन’च्या ‘बांगलादेश पोल्स स्वीप’ या शीर्षकाखालील अग्रलेखात म्हटले आहे. माजी पंतप्रधान खलिदा झिया यांच्या बांगलादेश नॅशनलिस्ट पक्षाने  गेल्या सार्वत्रिक निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. निवडणुकीत सहभागी न झाल्यास देशाच्या राजकीय पटलावरून अस्तित्व मिटवू शकणाऱ्या कायद्याच्या भीतीपोटी या पक्षाला रिंगणात उतरणे भाग पडल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे. बांगलादेशने मोठी आर्थिक प्रगती केली, मात्र राजकीय कार्यकर्त्यांना देशद्रोहासारख्या गुन्ह्य़ांत तुरुंगात टाकणे, निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्यावर करण्यात आलेली कारवाई, हिंसाचार आदी बाबी निरंकुश सत्ताधीशांच्या लोकशाहीत घडतात, असेही त्यात म्हटले आहे.

ब्रिटनच्या ‘डेली मेल’ने काही तज्ज्ञांच्या हवाल्याने निवडणुकीच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या निवडणूक निकालाचा लोकशाही व्यवस्थेवर आणि देशातील घटनात्मक संस्थांवरही विपरीत परिणाम होईल, अशी भीती माजी निवडणूक आयुक्त सखावत हुसेन यांनी व्यक्त केली, याकडे त्यातील एका लेखात लक्ष वेधण्यात आले आहे.

शेख हसीना यांना इतक्या मोठय़ा प्रमाणात बहुमत मिळाल्याने एकाधिकारशाहीला बळ मिळेल, असे ‘द वॉशिंग्टन पोस्ट’ने म्हटले आहे. ‘व्हाय बांगलादेश्स लॅन्डस्लाइड व्हिक्टरी इज बॅड फॉर इट्स डेमोक्रॅसी’ या शीर्षकाचा लेख ‘वॉशिंग्टन पोस्ट’मध्ये प्रसिद्ध झाला आहे. ‘बांगलादेशात एकपक्षीय लोकशाही’ असल्याची टिप्पणी त्यात करण्यात आली आहे. हसीना यांनी या विजयाद्वारे सत्तेवरील पकड घट्ट केली असली तरी त्यासाठी निवडणुकीची विश्वसनीयता पणाला लागल्याचे त्यात म्हटले आहे. ‘सन हेराल्ड’नेही हसीना यांच्या एकाधिकारशाही बळावण्याच्या शक्यतेला पुष्टी दिली आहे.

निवडणुकीत गैरप्रकार झाल्याने फेरनिवडणूक घेण्याची विरोधकांची मागणी आणि संयुक्त राष्ट्रांसह युरोपीय संघाने बांगलादेशला केलेल्या चौकशीच्या आवाहनाला आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठी प्रसिद्धी मिळाली आहे. भारत, चीनसह इतर देशांनी निवडणूक निकालाचे स्वागत केल्याने हसीना यांना दिलासा मिळाल्याचा एक मतप्रवाह असला तरी या निकालाने हसीना यांच्या प्रतिमेला काही प्रमाणात धक्का बसू शकेल, असे मत अनेक विश्लेषकांनी नोंदवले आहे.

आर्थिक सुबत्तेतून अभिव्यक्ती, आकांक्षा रुंदावतात, मात्र एकाधिकारशाहीत अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर मर्यादा येतात. बांगलादेशात ऑगस्टमध्ये एका छायाचित्रकाराला अटक करण्यात आली होती. निवडणुकीचे ‘चुकीचे’ वार्ताकन केल्याच्या आरोपाखाली एका पत्रकाराला नुकतीच अटक करण्यात आली. एकाधिकारशाही बळावण्याची ही लक्षणे म्हणता येतील.

संकलन : सुनील कांबळी