सकाळपासूनची तगमग आता कमी झालीय, म्हणून लिहावंसं वाटायला लागलंय. सक्काळी फोन आला अमितचा- अप्पाच्या मुलाचा. मोबाइलवर त्याचं नाव पाहिलं तेव्हाच श्वास थोडा थांबला. कारण गेले काही महिने मीच त्याला अधूनमधून फोन करायचो- अप्पा कसा आहे? अमितही उत्साहाने सांगायचा- अप्पांची कालच केमोथेरेपी झाली. फारसा त्रास झाला नाही. कधी सांगायचा- आता अप्पा इतका चांगला आहे, की आम्ही कॉलनीला पायी पायी चक्कर मारून आलो. मी निर्धास्त होतो. अप्पा आजारातनं नक्की उठणार. तोच त्याचा हा फोन : काल रात्री साडेदहाला अप्पा गेला. सुन्नसा बसून  राहिलो. बाहेरच्या खोलीत बसलेल्या आईला ही बातमी सांगायला अंगात जोर नव्हता.
अप्पा ऊर्फ विलास. माझा सख्खा चुलतभाऊ. आधी  शिवसेनेचा नगरसेवक, नंतर आमदार. संघटनेत उपनेता. बाळासाहेबांचा लाडका. ही झाली इतरांसाठीची ओळख. पण माझा तो थोरला भाऊ. खरं तर बरोबरीचा. काही महिन्यांनी मोठा. म्हणजे मित्रच. लहानपणी मुंबईच्या काकांची (दादांची) पाच मुलं सुट्टीला ओतूरला यायची. ती आम्हा खेडूत मुलांना चकित करून टाकायची. त्यांचे बोलायचे हेल वेगळेच. त्या महिन्यात मीही तशाच हेलात बोलू लागायचो. त्यांच्या तोंडात बसलेली ‘नागिन’, ‘नास्तिक’ सिनेमातली गाणी म्हणजे आम्हाला नवलाई. मग मीही त्या चालीत कसलेही शब्द वापरून म्हणायचो. त्यांच्यात अप्पा जरा अबोल.  अप्पाला आमच्या कुटुंबामध्ये जरा जास्तच मान होता. कारण त्याच्या जन्माच्या वेळी आजीला स्वप्न पडले. त्यात आजोबा आले म्हणे. म्हणून तिची आणि सगळ्यांची खात्रीच झाली, की आजोबांनी या पोराच्या रूपाने परत जन्म घेतलाय. त्यांचं नाव- अप्पाजी. म्हणून याला त्याचं नाव ‘विलास’, पण तरी ‘अप्पा’च म्हणू लागले. आजीचा एकाच वेळी नातू आणि नवरा; अशी चमत्कारिक अवस्था.
नंतर वडलांनी आजीला, घरातल्या म्हाताऱ्या मंडळींना  काशीयात्रा घडवून आणली. आजोबांना ती घडली नव्हती, म्हणून अप्पाला इतक्या लहान शाळकरी वयात यात्रेला नेले. तो गंगेत पोहोला, त्याच्या गोष्टी सांगत असे. या सगळ्यामुळे अप्पाचा मला हेवा वाटत असे. किंचित मत्सरही. पण तरी त्याचा प्रभाव इतका, की ते सगळे पुसून  जायचे. एकदा तर अप्पा गेल्याचे कार्ड आले. घरात हलकल्लोळ. नंतर खुलासा झाला- तो आपला अप्पा नाही. मग काय? आजीच्या इच्छेवरून अप्पाला खास मुंबईहून आणवले गेले. त्याच्या हस्ते पूजा.. वगैरे.
कधी आम्ही मुलं मुंबईला जायचो. आम्ही इतकेजण त्या गिरगावातील हेमराजवाडीतल्या दोन खोल्यांत कसे मावायचो, कोण जाणे. या दोन लहान खोल्या तळमजल्यावरच्या. संडास कॉमन. पण तरी तिथे सगळे आवडायचे. कारण तिथे लाइट होते! मजेदार हेलात बोलणारी माणसं होती.
अप्पा तिथला आमचा लीडर. एका अध्र्या उंचीच्या भिंतीवरून उडी मारली की पलीकडे चर्नी रोड. अप्पा कधी खेतवाडीत घेऊन जायचा. तिथले रस्ते म्हणजे भुलभुलय्या. अप्पाच्या वडलांचा धंदा डॉक्टरांना औषधं सप्लाय करण्याचा. कधी अप्पा पिशवी घेऊन ठरलेल्या डॉक्टरांना माल सप्लाय करायचा. ती पिशवी किंवा बॉक्स अप्पा व्यवस्थित पॅक करायचा. माझ्या वडिलांना त्याचं फार कौतुक. मला म्हणायचे, ‘अप्पा किती व्यवस्थित काम करतो बघ.’ तो त्यांची ओतूरला जाताना बॅग, वळकटी करून पॅक करून द्यायचा. वडील म्हणायचे, ‘तो किती स्मार्ट आहे बघ. नाही तर तू! नुसता अजागळ.’ उन्हाळ्यात रिझल्टची  कार्डे आली की दादा त्याला (अप्पाला) म्हणत, ‘तो अन्या बघ, किती हुशार. नाही तर तू!’ अप्पा जोरबैठका काढायचा. दंडात बेटकुळी काढून दाखवायचा. मला हात कितीही वाकवा, दंड जसाच्या तसा. पुढं लहानपण संपलं. आम्हा सगळ्यांच्या मुंजी झाल्या. दादा गेले. अप्पा आणि अशोक एव्हाना बँकेत नोकरी लागले होते. माझी त्यावेळी सेवादलात, प्रजा समाजवादी पक्षात असलेल्या राम तांबे या गृहस्थांशी ओळख झाली होती. अप्पाला घेऊन त्यांचे गिरगावातले घर शोधून काढले आणि अप्पा त्यांच्याकडे जाऊ-येऊ लागला. त्यांचा जसा तो शिष्यच झाला. नंतर तो त्याच भागात राहणाऱ्या प्रमोद नवलकरांकडे जाऊ-येऊ लागला. त्यावेळी कॉर्पोरेशनमध्ये शिवसेना आणि प्रजा समाजवाद्यांची युती होतीच. पुढे तो शिवसेनेचा कार्यकर्ता झाला. त्या भागातल्या लोकांचे नागरी प्रश्न सोडवू लागला. एकदा तर गिरगावातल्या पाणीप्रश्नावर त्याने चर्नी रोडच्या वाहत्या रस्त्यावर रास्ता रोको केले. त्या घटनेमुळे तो एकदम लोकप्रिय कार्यकर्ता झाला.
अप्पा माझा सुरुवातीला एकदम रोल मॉडेल होता. नंतरच्या काळात तो सर्वसामान्य मुंबईकर होता. आता तो छान कार्यकर्ता झाला होता. मधल्या काळात मला माझा रस्ता सापडल्याने तो माझा हीरो बनला नाही. पण त्याचं अपरंपार कौतुक वाटायला लागलं. पुढे तो नगरसेवक झाला. नंतर आमदारही. पण तरी तो त्याच दोन खोल्यांत राहिला. त्याने सुटीसाठी तळेगावला फ्लॅट घेतला, इतकेच. पण बरोबरच्या राजकारण्यांनी केवढे पैसे केले. केवढय़ा प्रॉपर्टीज केल्या. पण अप्पा तिथेच राहिला. त्याच्या आमदार निधीचा फायदा त्याने ओतूर परिसराला करून दिला. ओतूरमध्ये सभा वगैरेसाठी हॉल बांधून दिला. (लोकांनी प्रेमाने हॉलला त्याचेच नाव दिले.)  तो आमदार असताना ‘मुक्तांगण’चे एक काम अडले होते. मला त्या मंत्र्यांकडे घेऊन गेला. काम करून दिले. परत कुठे कुणापाशी त्याचा उच्चार नाही. तो शिवसेनेचा टिपिकल कार्यकर्ता नव्हता. त्याने कधी आवाज चढवला नाही. आक्रमक भाषा वापरली नाही. तो काम करीत राहिला. लोकांचे प्रश्न सोडवत राहिला. मुलगा अमित चांगला शिकला. तो नोकरी की व्यवसाय करतो. त्यानं पाल्र्याला घर केलंय. अप्पाला कॅन्सर निघाला तसं अमितने अप्पाला स्वत:च्या घरी आणलं. त्याचे सर्व उपचार केले.
त्याचे लग्न वरच्या मजल्यावर राहणाऱ्या मित्राच्या बहिणीशी- विजूताईशी झालं. तर त्याच्या थोरल्या बहिणीचं लग्न त्याच वरच्या मजल्यावरच्या दुसऱ्या मित्राशी. असं खास मुंबईचं साटंलोटं. मला विजूची कमाल वाटते. राजकारण्यांच्या बायका कशा असतात, ते पाहतो. दागिन्यांनी मढलेल्या. भारी साडय़ा-पैठण्या. विजूताई आहे तश्शी आहे. तिने तो दोन खोल्यांचा संसार छान चालवलाय. ‘चालवलाय’ म्हणतो, ते सवयीने. आता तो कालपासून भूतकाळ झालाय. कशी राहील ती? अप्पाशिवाय जीवन कसे असेल तिचे?
अप्पाही राजकारण्यांसारखा अंगाने सुटला नाही. तो तसाच शिडशिडीत राहिला. चौपाटीच्या स्विमिंग पूलचा तो सदस्य. रोज पोहायला जायचा. तेवढा एक शौक त्याने केला. तो सिनेमा-नाटकावर कधी शब्दही बोलला नाही. बघत होता की नाही, कोण जाणे. तो ठाकरे कुटुंबाच्या इतक्या जवळचा; पण ‘बाळासाहेब मला असं म्हणाले,’ असं चुकूनही कधी त्याच्या तोंडात आलं नाही. मध्यंतरी काही नेते, कार्यकर्ते शिवसेना सोडून गेले. हा होता तिथंच राहिला.
कधी शिवसेनेचे कुणी पुढारी, नेते भेटले की मी ओळख द्यायचो- ‘विलास अवचट माझा सख्खा चुलतभाऊ.’ ते थांबून म्हणायचे, ‘तुमचे ते भाऊ? आमच्यातला तो सच्चा कार्यकर्ता आहे.’
लहानपणी माझा तो रोल मॉडेल होता. कधी मत्सर वाटेल इतका तो रोल मॉडेल.. हीरो होता. मधल्या मोठय़ा गॅपनंतर आता परत एकदा तो माझा हीरो झाला आहे. तेव्हाही मला दंडात बेटकुळी काढता आली नाही, आताही असे दोन खोल्यांत साधे राहणं शक्य होणार नाही.

How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
a father beat child for his betterment by his shoes watch viral video of fathers love
लेकाच्या भल्यासाठी वडिलांनी दिला चोप, बुटाने धू धू धुतले, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “वडिलांचे असे प्रेम…”
scorching heat
उन्हाच्या झळांनी हापूस आंबा काळवंडला; डाळिंब, द्राक्ष, भाजीपाल्यावर परिणाम
youth dies
मस्करी जीवावर बेतली; कम्प्रेसरच्या सहाय्याने मित्राच्या गुदद्वारात हवा भरली, तरूणाचा दुर्दैवी मृत्यू