मुंबईतून उत्तर-दक्षिण कोणत्याही दिशेला ये-जा करावयाची असेल, तर शिवसेना भवनसमोरूनच जावे लागते. शिवाजी पार्कच्या समोरील चारही रस्त्यांवर जणू या वास्तूची नजर आहे.. २००६ मध्ये या वास्तूला आधुनिक साज चढला. त्याआधीच्या वास्तूतच शिवसेना नावाची एक संघटना जन्माला आली, फोफावली आणि या संघटनेनं महाराष्ट्राच्या मंत्रालयावर भगवाही फडकवला..
त्या पाच मजली इमारतीच्या लिफ्टमध्ये शिरून थेट तिसऱ्या मजल्याचं बटन दाबलं की बाहेर पडल्यावर नाकात धूप, अगरबत्त्यांचे संमिश्र गंध शिरतात आणि एखाद्या मंदिरात आल्याचा भास होतो. पॅसेजमधून पुढे गेलं की दरवाज्याशी चप्पल-बूट काढावेच लागतात. म्हणजे, ‘चप्पल-बूट बाहेर काढा’ असा कुठलाही फर्मानाचा फलक वगरे इथे दिसत नसला, तरी अगरबत्तीच्या वासातूनच तशी पूर्वसूचना मिळालेली असते. आत गेलं की समोर एका भव्य, आरस्पानी देव्हाऱ्यात देवीची सुंदर मूर्ती दिसते आणि सहज हात जोडले जातात..
ही तुळजापूरच्या देवीची, तुळजाभवानीची मूर्ती! समोर एक समई तेवत असते आणि बाजूला अगरबत्त्यांचा मंद सुगंध दरवळत असतो. एखाद्या मंदिरासारखंच वातावरण इथे असतं. फरक इतकाच, इथे पुजारी वगरे समोर दिसत नाही. भाविकांना दर्शन घेऊन झाल्यानंतर ‘देवाचिये द्वारी, उभा क्षणभरी’.. चे पुण्य लाभावे म्हणून बसण्याकरिता भिंतींना टेकून खुच्र्याच्या रांगा असतात..
.. राज्याच्या कानाकोपऱ्यातून मुंबईला येणाऱ्या प्रत्येकालाच, मुंबईतील काही ठरावीक ठिकाणं आवर्जून पाहण्याची इच्छा असते. पूर्वी, ‘राणीचा बाग’ आणि मलबार हिलवरचा ‘म्हातारीचा बूट’ पाहिला, नरिमन पॉइंटवरून संध्याकाळी झगमगणारा ‘क्वीन्स नेकलेस’ अनुभवला की मुंबई दर्शनानं धन्य झाल्यासारखं व्हायचं.. पुढे त्यात आणखी काही स्थळांची भर पडली..
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रात झंझावात उभा केला आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील अनेक गावांमधील तरुणांसाठी मुंबईत एक मंदिर उभं राहिलं. मुंबईत कोणत्याही निमित्तानं येणाऱ्या या तरुणांची पावलं मुंबई दर्शनाच्या या पारंपरिक प्रथेनंतर आपोआपच, आणखी दोन ठिकाणी वळू लागली. एक म्हणजे, ‘मातोश्री’.. बाळासाहेबांचं निवासस्थान. इथे आतपर्यंत पोहोचता आलं नाही, तरी निदान बाहेरून तरी ते न्याहाळायचा या तरुणांचा मोह अजूनही अनावर असतो. आणि दुसरं ठिकाण म्हणजे, ‘शिवसेना भवन.’ मुंबईतून उत्तर-दक्षिण कोणत्याही दिशेला ये-जा करावयाची असेल, तर शिवसेना भवनसमोरूनच जावे लागते. शिवाजी पार्कच्या समोरील चारही रस्त्यांवर जणू या वास्तूची नजर आहे.. २००६ मध्ये या वास्तूला आधुनिक साज चढला. त्याआधीच्या वास्तूतच शिवसेना नावाची एक संघटना जन्माला आली, फोफावली आणि या संघटनेनं महाराष्ट्राच्या मंत्रालयावर भगवाही फडकवला..
गावाकडून मुंबईत फेरफटका मारणाऱ्या शिवसनिकांची पावलं, ‘मातोश्री’ दर्शनानंतर इथे वळतात. संपूर्ण आधुनिक वास्तुरचनेचा एक नमुना असलेल्या या इमारतीच्या आवाराला मात्र ऐतिहासिक गडकिल्ल्यांचा आभासी साज चढलेला आहे. भव्य अशा प्रवेशद्वाराची रचनाच अशी की, आत शिरताना मान झुकवावीच लागते.. डावीकडे बाळासाहेबांचं एक भव्य छायाचित्र. तपासणीचे सोपस्कार आटोपून आत शिरलं की जिन्यातही प्रत्येक मजल्यावर बाळासाहेबांची वेगवेगळी रूपं टिपलेली छायाचित्र. या इमारतीत पावलोपावली त्यांचं अस्तित्व जाणवावं, अशी ही जाणीवपूर्वक केलेली रचना. राज्यातून येणाऱ्या प्रत्येक शिवसनिकाला इथे प्रवेश मिळतो. बाळासाहेबांची ही रूपं न्याहाळत जिने चढताना तो आणखीनच भारावून जातो..
याच इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर, तुळजाभवानीचं ते मंदिर आहे. शिवसेना भवनाच्या दर्शनाला येणारे कार्यकत्रे मजला मजला न्याहाळत या मंदिरात पोहोचतात आणि देवीसमोर नतमस्तक होऊन िभतीजवळच्या खुच्र्यावर विसावतात. आपण एका राजकीय पक्षाच्या कार्यालयात आहोत याचा क्षणकाळासाठी त्यांना जणू विसर पडलेला असतो..
बाहेर चपला-बुटांचा ढीग असतोच..
दरवाजाबाहेरचे चपलांचे ढिगारे हीच आपली संपत्ती, असा संदेश प्रबोधनकारांनी बाळासाहेबांना दिला होता. त्याचा प्रत्यय इथे येतो. केव्हाही, कोणत्याही दिवशी शिवसेना भवनात गेलं, तरी या मंदिराबाहेर चपला-बूट दिसतातच..
शिवसेनेच्या कोणत्याही कामाची, मोहिमेची सुरुवात इथे होते. कोणताही निर्णय घेण्याआधी या तुळजाभवानीला साकडं घातलं जातं.. उमेदवारांची यादी असो, नाहीतर निवडणुकीचे वचननामे असोत, आधी तुळजाभवानीसमोर ठेवले जातात, देवीचा आशीर्वाद घेतला जातो आणि मग जाहीर केले जातात. सेनाभवनाचा फेरफटका मारून बाहेर पडत रस्त्यावर येणारा, बाहेरगावाहून आलेला एखादा शिवसनिक भारावलेलाच असतो.. या वास्तूत देवीचं वास्तव्य आहे, याच्या जाणिवेनं ते भारावलेपण मनात अधिकच रुतून राहतं..
मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी स्थापन झालेली शिवसेना ही संघटना, पुढे राजकारणात स्थिरावली आणि राजकीय पक्ष म्हणून तिचे महत्त्वही अधोरेखित झाले. कामगार क्षेत्रातही संघटनेची पाळेमुळे रुजली, युवक, विद्यार्थी क्षेत्रातही काम रुजले. शिवसेनेच्या या सर्व शाखा-उपशाखांचं हे मुख्यालय. पहिल्या मजल्यावर पक्षाचं प्रशासकीय कार्यालय. बाळासाहेबांच्या वेधक प्रतिमांबरोबरच, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या काही भावमुद्राही इथे दिसतात.
शिवसेना भवनाला भेट देणारा शिवसनिक ज्या भाविकतेने तुळजाभवानीचं दर्शन घेतो, त्याच भाविकतेने पहिल्या मजल्यावरील प्रशस्त दालनात शिरतो. या दालनात दोन मोटारी उभ्या आहेत. बाळासाहेबांनी वापरलेल्या..  त्यातील कॉन्टेसा गाडीशेजारी उभे राहून आपल्या मोबाइल कॅमेऱ्यात स्वत:ची छबी उतरविण्याचा मोह अनेक शिवसनिकांना अनावर झालेला असतो.. मग या गाडीशेजारीच उभे राहून सुरू असलेल्या गप्पांमध्ये, बाळासाहेबांच्या आठवणींचे झरे वाहू लागतात. आपल्या गावातील बाळासाहेबांच्या दौऱ्याच्या आठवणींचे क्षण त्या गाडीच्या साक्षीने पुन्हा उजळतात.. या दालनाबाहेरही चपला-बुटांची गर्दी असतेच.. बाजूच्या प्रशासकीय कार्यालयात बाहेरून आलेल्या शिवसनिकांशी चर्चा सुरू असते.

शिवसेनेची एक राज्यव्यापी यंत्रणा आहे. तिचा गाजावाजा नाही. ती कशी राबविली जाते, ते फारसे कुणाला माहीतही नाही. म्हणून तिला गुप्त यंत्रणा म्हणतात.. राज्यातील प्रत्येक घडामोडीचा दैनंदिन अहवाल या यंत्रणेमार्फत शिवसेना भवनात दाखल होतो. त्यात कोणत्याही राजकीय पक्षाच्या स्थानिक हालचाली, सामाजिक घडामोडी, सांस्कृतिक चळवळी सारा तपशील असतो. शिवसेनेच्या धोरणांची आखणी करताना याचा उपयोग होतो, असं पक्षाचे हे प्रशासकीय कार्यकत्रे मानतात. प्रसारमाध्यमांशी संपर्क ठेवणाऱ्या हर्षल प्रधानांचं कार्यालयही याच मजल्यावर आहे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्याशी किंवा अन्य नेत्यांशी थेट भेट घडू न शकणारे गावोगावचे कार्यकत्रे त्यांच्यासमोरच आपल्या समस्या मांडतात. ती समस्या सोडविण्यासाठी योग्य त्या मार्गावर वळविली जाते आणि तो शिवसनिक समाधानाने बाहेर पडतो..
दुसऱ्या मजल्यावरच्या सभागृहात पत्रकार परिषदा, पक्षाच्या आणि संलग्न संघटनांच्या बठका, महिलांचे मेळावे होतात. म्हणजे खऱ्या अर्थाने, शिवसेनेचा हा ‘खलबतखाना!’ विविध स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन वर्गदेखील या दालनात सतत सुरू असतात. रेल्वे, टेलिफोन आणि अन्य खात्यांमधील मराठी माणसाच्या समस्यांवर इथेच खल होतो आणि अन्यायाविरुद्धच्या आंदोलनांची, संघटनेच्या बांधणीची आखणीही इथेच होते. चौथ्या मजल्यावर युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांचे कार्यालय असल्याने या मजल्यावर युवकांचा राबता असतो.. सोशल नेटवìकग साइट, फेसबुक, ट्विटर, कमेंट, पोस्ट, अपडेट असे शब्द या मजल्यावर सतत कानावर पडत असतात.
तिसऱ्या मजल्यावरच्या मंदिराप्रमाणेच शिवसेना भवनात येणाऱ्या प्रत्येकाला ओढ असते पाचव्या मजल्यापर्यंत पोहोचण्याची! या मजल्यावर बाळासाहेबांचं दालन होतं. आता उद्धव ठाकरे इथे बसतात. याच मजल्यावरून बाळासाहेबांनी शिवसेना चालविली, आदेश दिले आणि मार्गदर्शनही केलं. या मजल्यावरच्या दालनात प्रवेश करताच समोर बाळासाहेबांची खुर्ची दिसते आणि शिवसनिक क्षणभरासाठी नम्र होतो.. त्याचं मस्तक खुर्चीसमोर आपोआप झुकतं.
शिवसेना भवनातून बाहेर पडताना समोरच बाळासाहेबांच्या भव्य प्रतिमेशेजारी काही काव्यपंक्ती दिसतात. ‘साहेब, तुम्ही सदैव आहात आमच्या श्वासात, आमच्या मनात’.. अशी शेवटची ओळ वाचताना एखादा शिवसनिक सहमतीची भावना व्यक्त करत स्वत:शीच मान हलवितो आणि तिथून बाहेर पडताना, ‘वाघाचं अस्तित्व आपण अनुभवलं,’ असं तो सहजपणे सांगून जातो. ‘या भवना’त, ‘जहाल भगवे सूर’ घुमत आहेत, असंही त्याला आपोआपच वाटून जातं..