जवळपास बारा हजार सार्वजनिक गणेशोत्सव आणि दोन लाखांहून अधिक घरगुती गणेशोत्सव एवढा प्रचंड व्याप गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर पार पाडण्याची एक कसरत मुंबईतील गुरुजींना पार पाडायची असते. अशा वेळी गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यासाठी एक संघटित आखणी करणे आवश्यक असते. मुंबईत पौरोहित्याचा पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या ज्येष्ठ गुरुजींना वर्षांगणिक पंडितांचा तुटवडा भासू लागला आहे. यामुळे आता पौरोहित्याचा व्यवसाय संघटित झाला आहे. गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर मुंबई-ठाण्यातील लाखो घरांमध्ये एकाच वेळी प्राणप्रतिष्ठा मंत्रांचे सूर घुमत असतात. गरज मोठी आणि पुरवठा कमी अशा विचित्र परिस्थितीतही, घराघरातील गणेशमूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठा होते, आणि यजमानालाही समाधान लाभते. भक्तिभावाने घरी आणलेल्या गणेशाची मनासारखी पूजा झाल्याच्या समाधानाने तो तृप्त होतो..
महाराष्ट्रात काही मोजक्या ठिकाणी कोकणातील रत्नागिरी, देवरुख, राजापूरसारख्या गावांत वेदपाठशाळांमध्ये अनेक मुले वयाच्या सातव्या-आठव्या वर्षीपासूनच वेदविद्य्ोचे शिक्षण घेत असतात. धार्मिक विधींसाठी प्रशिक्षित गुरुजी ही दिवसागणिक वाढणारी सामाजिक गरज असल्याने, या वेदपाठशाळांमधून शिक्षण पूर्ण करून बाहेर पडलेली पारंगत मुले रोजगारासाठी मुंबई, पुणे, ठाण्यासारख्या ठिकाणी दाखल होतात आणि पौरोहित्याचा पेशा सुरू होतो. मुंबईत शेकडो मुले दर वर्षी दाखल होत असतात. कामही भरपूर असते. मुंबईच्या आसपास डोंबिवली, ठाणे, वसईसारख्या शहरांत ही मुले भाडय़ाच्या जागा घेतात, कामे वाटून घेतात. पौरोहित्य व्यवसायात, प्रस्थापितांच्या पेढय़ा निर्माण झालेल्या असतात. अशांचे यजमानही ठरलेले असतात. गणेशोत्सवाच्या काळात सहस्रावर्तनांसारख्या विधीसाठी प्रस्थापितांची मदत यजमानाकडून घेतली जाते आणि त्याच्याकडून अशा मुलांना कामे मिळू लागतात.
काही गुरुजी आजही सप्लायर म्हणून काम करतात. त्यामागे अनेक कंगोरे असतात. काहींना पौरोहित्य विधींचे स्वत:चे ज्ञान यथातथाच असते, पण त्यांचा बडेजाव मात्र मोठा असतो. लोकांशी संपर्क चांगला असतो. त्यातून तो स्वत:ची साखळी तयार करतो आणि मागणीनुसार पुरोहितांचा पुरवठा करतो. कित्येकदा हे प्रयोग जमतात असे नसते. जमवाजमव केलेल्यांपकी एखाद्याला अचानक मोठे काम मिळते आणि पुन्हा जमवाजमव करावी लागते. हे अनुभव जमेस धरून काही गुरुजींना स्वत:ची एक टीम तयार केलेली असते. पाल्र्याला श्रीकांत माधव केळकर नावाचे वेदमूर्ती गेल्या सुमारे पंधरा वर्षांपासून पूर्ण वेळ पौरोहित्याचा व्यवसाय करतायत. व्हीजेटीआयमध्ये टेक्स्टाइल इंजिनीअरिंगची पदवी घेतलेले, माटुंग्याच्या वेिलगकर इन्स्टिटय़ूटमधून बिझिनेस मॅनेजमेंटचा डिप्लोमा आणि मुंबई विद्यापीठातून मानसशास्त्राची पदवी संपादन केलेल्या केळकर गुरुजींनी जवळपास पंधरा वर्षांपूर्वी, पूर्ण वेळ व्यवसाय म्हणून पौरोहित्य करण्याचा निर्णय घेतला. त्यांची स्वत:ची वेबसाइटदेखील आहे. परदेशातील भाविकांना ऑनलाइन पूजेचा पर्यायही त्यांच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे. येत्या गणेश चतुर्थीला सिंगापूरमधील काही गणेशमूर्तीची ऑनलाइन प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे, असे केळकर गुरुजी सांगतात. आज केळकर गुरुजींच्या डायरीत पौरोहित्य करणाऱ्या सुमारे साडेचारशे जणांचे दूरध्वनी क्रमांक आणि पत्ते असा डाटा आहे. गरजेनुसार एखाद्या धार्मिक विधीसाठी योग्य गुरुजींची आवश्यकता असेल त्यानुसार या डाटा बँकेतून नाव शोधले जाते, संपर्क साधला जातो आणि यजमानास मनासारखा धार्मिक विधी केल्याचे समाधान मिळवून दिले जाते. गणेशोत्सवाच्या काळात अशा संपर्क यंत्रणेतून भटजींची साखळी कार्यरत होते. एका घरातील प्राणप्रतिष्ठेच्या शास्त्रवत विधीसाठी सुमारे पन्नास मिनिटे लागतात. त्यामुळे पहाटे चार वाजता पहिली पूजा सुरू करणारा भटजी, गणेश चतुर्थीच्या मुहूर्तकाळात सुमारे आठ पूजा पूर्ण करतो. यासाठी नेमकी आखणी केली जाते. म्हणजे, वसईच्या भटजीला ठाण्याला जावे लागणार नाही, तर पश्चिम उपनगरांतील यजमानांचेच व एका पूजेनंतर दुसरीकडे जाणे सोयीचे होईल असे काम करणे आवश्यक असते. आजकाल काही पुरोहितांनी आपले आपले ग्रुपही तयार केले आहेत. बंद समूह.. ते एकमेकांशी फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपसारख्या माध्यमांतून संपर्कात असतात आणि संघटितपणे कामे वाटून घेतात, कमाईदेखील वाटून घेतात. मराठवाडय़ासारख्या भागांत गणेशोत्सवाची आपल्याएवढी धामधूम नसते. त्या काळात तिकडचे काही गुरुजी मुंबईत येतात. मुंबईत पूर्वापारपासून व्यवसाय करणाऱ्या काही गुरुजींना या काळात त्यांची मदत होते.
कोकणात मूळ असलेल्या भाविकांची गणेशपूजेसाठी कोकणातील गुरुजींना पसंती असते, तर मराठवाडय़ातून मुंबईत स्थायिक झालेल्या भाविकांची त्यांच्या त्यांच्या भागातील पुरोहितांना पसंती असते. त्यानुसार पुरोहित वर्गही संघटितपणे आखणी करतो आणि मुंबईकरांचा घरगुती गणेशोत्सव आनंदात साजरा होतो..