प्रदीप नणंदकर

सर्व प्रकारची खाद्यतेले ही यंदा बाजारात सर्वाधिक चर्चेत असलेली गोष्ट आहे. यामागे तेलबियांचे सध्याचे वाढलेले भाव हे मुख्य कारण आहे. यामुळे यंदाच्या हंगामात या तेलबियांच्या पिकांनाही मोठे महत्त्व आले आहे. यंदा या पिकांचा पेरा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

गुढीपाडवा झाला. गेल्या वर्षीच्या हंगामाची कामे आटोपली की थोडी उसंत मिळते, त्यात नव्या वर्षाच्या नियोजनाचा विचार शेतकरी करत असतो. मागील वर्षीचे आडाखे किती बरोबर? किती चूक? याचा ताळमेळ घालत पुन्हा नव्या जोमाने, नव्या कल्पना लढवत नवीन काही करण्याची त्यांची धडपड सुरू असते. शेतकऱ्यांचे प्रश्न दरवर्षी नवे असतात. एक सुटला न सुटला तोवर दुसऱ्याचा गुंता वाढलेला असतो. ‘नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न’ याचा अनुभव दरवर्षी तो घेत असतो.

या वर्षी जरा वेगळा अनुभव आला. ज्वारी, मका, बाजरी या पिकांचा अपवाद वगळता जवळपास सर्वच शेतमालाला हमीभावापेक्षा बाजारपेठेत अधिकचा भाव मिळाला. सोयाबीनला हमीभावापेक्षा दुप्पट भाव मिळाला. गेली २५ वर्षे भावाची उपेक्षा झेलाव्या लागणाऱ्या सूर्यफुलालाही उतरंडीचा पांग फिटावा त्याप्रमाणे हमीभावापेक्षा दीडपट भाव मिळाला. ‘करडीला कीड नाही, वकट्याला मरण नाही’ अशी म्हण ग्रामीण भागात असली तरी गेले अनेक वर्षे करडईला हमीभाव मिळत नसल्यामुळे या पिकाचा पेरा नगण्य झाला होता. या वर्षी करडईलाही हमीभाव मिळाला. मोहरी, जवस यांचेही भाव कधी नव्हे ते वधारले. शेतकऱ्यांच्या आयुष्यात खरं सांगायचं तर असं वर्ष पहिल्यांदाच आलं आहे. याही स्थितीत, ‘देव आला द्यायला अन् पदर नाही घ्यायला’ अशी अवस्था काही शेतकऱ्यांची झाली. कारण अडचणीमुळे शेतमाल ताबडतोब विकावा लागला आणि त्या शेतमालाला नंतर चढा भाव आला पण सर्वसाधारणपणे हे वर्ष शेतमालाच्या भावासाठी चांगले राहिले.

ज्यांचा शेतीचा काडीचाही संबंध नाही, अशी मंडळी वर्षानुवर्षे शेतकऱ्यांनी पीक पद्धतीत बदल केला पाहिजे असा उपदेश करत असत. आपले म्हणणे शेतकरी का ऐकत नाहीत याची खंत त्यांना वाटत असे. या वर्षी त्यांची ही खंत दूर होणार आहे. आगामी वर्षात बाजारपेठेतील सध्याचे तेलबियांचे भाव लक्षात घेऊन शेतकरी पीक पद्धतीत बदल करेल हे निश्चिात. खरीप हंगामातील सोयाबीनच्या पेऱ्यात या वर्षी पुन्हा एकदा वाढ होणार आहे. पुढील वर्षी सोयाबीनचा भाव किती राहील हे आताच सांगणे कठीण असले, तरी शेतकरी सोयाबीनकडे अधिक वळणार हे नक्की.

या वर्षी उन्हाळी हंगामात सोयाबीन घेणाऱ्या शेतकऱ्याला मोठा र्आिथक लाभ झाला, त्यामुळे पुढील वर्षीही उन्हाळी हंगामात सोयाबीन व सूर्यफूल घेण्याकडे लोकांचा कल राहील. खरीप हंगामातील ज्वारी, मूग, उडीद याच्या क्षेत्रात आणखी घट होईल. रब्बी हंगामात करडई, सूर्यफूल, मोहरी याच्या पेऱ्यात वाढ होईल. सरकारने धोरणे चांगली आखली, तेलबिया उत्पादन वाढीसाठी विशेष सवलती दिल्या, आयात-निर्यात धोरणावर लक्ष दिले व बाजारपेठेत तेलबियाला भाव चांगले मिळाले तर डाळीप्रमाणेच खाद्यतेलातही देश स्वयंपूर्ण होण्यास वेळ लागणार नाही. २०२१ चा शेतीचा हंगाम ही त्याची मुहूर्तमेढ असेल, हे नक्की.

मराठवाडा, विदर्भाकडे लक्ष

सोयाबीन, सूर्यफूल, मोहरी व भुईमूग पेरा वाढवण्याचे नियोजन पुढील वर्षासाठीचे केले जात असून त्यासाठीची पूर्वतयारी करण्यात येत आहे. मराठवाडा व विदर्भ या भागावर विशेष लक्ष दिले जाईल.

– एकनाथ डवले, सचिव, कृषी विभाग महाराष्ट्र

कृषी विद्यापीठ सतर्क

बदलत्या परिस्थितीनुसार पिके घेण्याचे नियोजन करावे लागणार असून तेलबियाला मिळणाऱ्या भावामुळे शेतकऱ्यांचा ओढा आता तेलबिया घेण्याकडे असेल हे गृहीत धरून कृषी विभागाच्या मदतीने कृषी विद्यापीठ जय्यत तयारी करत आहे.

– डॉ. अशोक धवण, कुलगुरू, वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी</p>

गणित संशोधन केंद्र सज्ज

गेल्या वर्षभरापासून गणित संशोधन केंद्रामार्फत जनजागृतीसाठीचे विविध उपक्रम राबवले जात आहेत. तेलबियांच्या लागवडीसाठी नवीन संशोधित वाणांचे पीक प्रात्यक्षिक घेतले जात आहे. खाद्यतेल स्वयंपूर्णतेसाठी दमदार पाऊल टाकण्याची संधी आम्ही दवडणार नाही.

– डॉ. एम. के. घोडके, शास्त्रज्ञ, गणित संशोधन केंद्र, लातूर</p>

pradeepnanandkar@gmail.com