‘चतुरंग’चं रौप्यमहोत्सवी ‘रंगसंमेलन’ येत्या १२ डिसेंबर रोजी ‘गेट वे ऑफ इंडिया’ येथे होत आहे. पारधी समाजात काम करणारे गिरीश प्रभुणे यांना या संमेलनात गौरवले जाणार आहे. यानिमित्ताने ‘चतुरंग’च्या कार्याचा आढावा..
मराठी विश्वातलं सर्वात लोकप्रिय व्यासपीठ म्हणजे ‘चतुरंग’चं ‘रंगसंमेलन’. समाजातल्या कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान करणारं हे व्यासपीठ. जीवनगौरव पुरस्कार सोहळ्याचाही यंदा रौप्य महोत्सव साजरा होतोय. सुधीर फडके म्हणजे बाबूजी, पांडुरंगशास्त्री आठवले, श्री. पु. भागवत, पार्वतीकुमार, डॉ. विजय भटकर, शरद जोशी, रत्नाकर मतकरी, सत्यदेव दुबे, लता मंगेशकर अशा विविध क्षेत्रांतल्या मातबर व्यक्तींना पुरस्कार देऊन पंचवीस वर्षांत सन्मानित केलेय, तर गुलजार, आशा भोसले, पु. ल. देशपांडे, नाना पाटेकर, शांता शेळके आणि माधुरी दीक्षित अशा लोकप्रिय, गुणवान व्यक्तिमत्त्वांच्या प्रकट मुलाखती या रंगसंमेलनाच्या व्यासपीठावर रंगलेल्या आहेत.
मन्ना डे, माणिक वर्मा, पं. हृदयनाथ मंगेशकर, अरुण दाते यांच्यासारख्या गायकांच्या मैफलींनी ‘रंगसंमेलन’ गाजलेलं आहे, तर हेमामालिनीने नृत्यदर्शन सादर करून आणि झाकिर हुसेनांनी तबल्यावर थाप टाकत संमेलनात हजेरी लावलेली आहे. या रंगसंमेलनाच्या कार्यक्रमांची विविधता अशी, की करमणूक म्हणजे नटदर्शन, गाणं एवढंच नाही तर शिवाजीराव भोसले, निर्मलकुमार फडकुले, यशवंत पाठक अशा वक्त्यांची ऐकावी, अशी व्याख्यानंही संमेलनात झालेली आहेत. विश्राम बेडेकर, श्याम बेनेगल, अटलबिहारी वाजपेयी, ब. मो. पुरंदरे अशी मोठमोठी माणसं पुरस्कार देण्यासाठी संमेलनात येऊन, त्यांची वक्तव्यं आणि सहवास सर्वसामान्य रसिकांना ‘चतुरंग’ संमेलनात लाभलेला आहे. विशेष म्हणजे शेषन, श्रीधरन, कस्तुरीरंगन, रघुनाथ माशेलकर, नारायण मूर्ती अशा कर्तृत्वसंपन्न व्यक्तींना ‘अभिमान मूर्ती’ सन्मानाने गौरवून, त्यांच्या कर्तृत्वपूर्ण कारकीर्दीला सामान्यांची दाद मिळालेली आहे. मोठय़ा उद्योगपतींच्या देणग्या आणि कुठल्याच पक्षाचं राजकीय पाठबळ न घेता, ‘चतुरंग’ने हा भव्य सोहळा पंचवीस वर्षे यशस्वीपणे आयोजित केलाय, ही सामान्यांच्या मनात रुजलेली, अभिमान वाटावा अशी बाब!
‘चतुरंग’ संस्थेच्या कुणाही व्यक्तीचा जीवनगौरव निवड समितीत सहभाग नसतो. समाजातील सात मान्यवर ही निवड करतात. या समिती सदस्यांशीही लॉबिइंग नसावं म्हणून ही निवड समिती दर वर्षी बरखास्त केली जाते. ‘चतुरंग’ने स्वत:ला सेलेबल कमोडिटी बनू दिलेलं नाही. त्यामुळे विशेष दखल घेण्याजोगी गोष्ट म्हणजे पंचवीस वर्षांत एकदाही रंगमंचाच्या पाश्र्वपडद्यावर ‘प्रायोजका’चं नाव झळकलेलं नाही.
कर्तृत्ववान व्यक्तींशी नेमका संवाद आणि वागण्या-बोलण्यात पारदर्शीपणा असलेल्या असंख्य कार्यकर्त्यांची फौज, तसंच जनसामान्यांच्या वर्गणीतून उभी केलेली पुरस्काराची रक्कम यामुळे हा रंगसोहळा आणि हे पुरस्कार वितरण रसिकांनी-रसिकांसाठी निरपेक्ष आनंदाच्या भूमिकेतून रंगत गेलेलं ‘रंगसंमेलन’ झालं आहे.
पूर्वी स्टेट बँकेत नोकरी केलेले, तिथून स्वेच्छानिवृत्ती घेऊन पूर्ण वेळ ‘चतुरंग’ उपक्रमांना वाहून घेतलेले विद्याधर निमकर हे ‘सूत्र’ सांभाळत असले, तरी पंचवीस वर्षांत ते एकदाही फोटोत झळकलेले नाहीत. ‘निमकर’ फक्त दोऱ्या लोंबणाऱ्या चष्म्यातून रोखून बघत, ज्ञानदीप वळणाच्या शब्दांची आतषबाजी करणारी पत्रांवर पत्रं मान्यवरांना लिहीत. कार्यकर्त्यांना कार्यक्रम तयारीच्या एकसष्ट सूचना लिखित स्वरूपात वाटत, अखंड ‘फॉलोअप’मध्ये मग्न असतात. बरे, निमकरांना भेटलेले कार्यकर्तेही असे भारी की चुकूनही, कुणाही वलयांकित व्यक्तींच्या बरोबर फोटो काढण्याची कणमात्र धडपड न करणारे, स्वत:ही संमेलनाचं तिकीट काढणारे, लोकप्रिय कलावंताची मुलाखत चालू असताना ह्य़ांना फिल्मरीळ पोहोचवायला दूर पाठवलं तरी न कुरकुरता जाणारे, प्रबोधिनी स्टाइल एकसारख्या पोशाखात वेळेवर हजर होणारे, स्वत:ची नोकरी वा व्यवसाय सांभाळून, एक पैसाही मानधन न घेता, व्यक्तिगत वेळ खर्च करणारे! एखाद्यानं डॉक्टरेट करावी असं हे संस्था-सोहळा संयोजन.
लोकप्रिय अभिनेत्री माधुरी दीक्षित यशोशिखरावर असताना रूपारेल महाविद्यालयाच्या पटांगणावर तिची पहिली खुली मुलाखत घेण्याची संधी १९९८ च्या रंगसंमेलनात ‘चतुरंग’ परिवारानं मला दिली. त्या वेळी मी हजारो रसिकांची भरभरून दाद आणि निरपेक्ष वृत्तीनं काम करणारे कार्यकर्ते यांचा अनुभव घेतलेला आहे. मला आठवतंय, त्या वेळी दिग्दर्शक एन. चंद्रा माधुरीला म्हणाले, की तू चतुरंग संयोजकांना एकदा फक्त भेटीसाठी वेळ दे आणि मग जायचं की नाही ते ठरव.
संयोजकांनी माधुरीभेटीत तिला दिलेले सारे शब्द पाळले. नेमलेल्या दोन-तीन कार्यकर्त्यांखेरीज अन्य कुणी तिच्या आसपास फिरकलं नाही. कुणीही फोटो काढण्याचा आग्रह केला नाही. तिला तिच्या कुटुंबीयांसमवेतच फक्त तिला आवडणारी पुरणपोळी आणि मोदक खिलवत, निवांत जेवणाचा आनंद घेऊ दिला. तीदेखील खुलली. ब. मो. पुरंदरे, सुधीर फडके, सुलोचनादीदी या व्यासपीठासमोर बसलेल्या दिग्गजांना खाली उतरून, वाकून नमस्कार करत, मग वर आली आणि खळाळत हसत, गाण्याची ओळदेखील गात, तिनं माझ्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरं देत रसिकांची मनं जिंकली.
जुन्या ज्येष्ठ अभिनेत्री ललिता पवारांशी रंगभवनच्या व्यासपीठावर गप्पा करण्याची संधीही मला ‘चतुरंग’ने दिली आणि उत्तम संयोजन, ज्येष्ठत्वाचा राखलेला आदर आणि रसिकांचा ओसंडता उत्साह पाहून, ललिताबाईही भारावल्या आणि त्यांच्या डोळ्यांत चक्क अश्रू उभे राहिले होते.
मध्यमवर्गीय रसिकांना आनंद देणाऱ्या या रंगसंमेलनाची आणि जीवनगौरव पुरस्कार सोहळ्याची संकल्पना ‘चतुरंग’ला मुळात सुचली कशी आणि साकारली कशी गेली, याचा धावता आढावा, विद्याधर निमकरशी गप्पा मारताना मी घेतला होता.
समाजात निरलसपणे काम करत, आपल्या ‘आयुष्याला’ समाजाच्या उपयोगाची गोष्ट करून देणाऱ्या व्यक्तींबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एखादा पुरस्कार असावा, अशी कल्पना १९९० मध्ये कार्यकर्त्यांच्या खुल्या चर्चेत प्रथम पुढे आली आणि १९९१, मध्ये पंचवीस वर्षांपूर्वी हा पुरस्कार सुरू झाला. तोवर विविध शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबविणाऱ्या ‘चतुरंग’ची सतरा र्वष झाली होती. (१९७४ – अक्षय्यतृतीया स्थापना). कार्यकर्त्यांच्या गप्पांत आग्रही भूमिका, अशी मांडली गेली, की हा पुरस्कार समाजाने दिलेला असावा. देशपातळीवरच्या ज्येष्ठ उद्योगपतींच्या देणगीवर बेतलेला नसावा. पुरस्कार रकमेत सामान्य माणसाच्या वर्गणीचा सहभाग असावा. प्रत्येकी एक हजार रुपये, एकदाच एका सामान्य रसिकाने द्यावे.
म्हणजे हा खरंच समाजाने केलेला जनपुरस्कार होईल. एक लाख रुपये व्यक्तिगत स्वरूपात देणगी म्हणून द्यायलाही काही रसिक तयार होते, पण ते पैसे तसे न घेता, हजार रुपयाच्या वर्गणीतूनच रक्कम उभी करावी म्हणजे हा पुरस्कार लोकांनी उभ्या केलेल्या पैशातून होईल आणि प्रत्येक रसिकाला हा पुरस्कार माझा आहे, ही भावना घराघरांत नि मंडपात रुजेल. या वर्षीपर्यंत एकूण ५२०० जणांनी पुरस्काराचं ‘जनक’त्व स्वीकारलं आहे.
पु. ल. देशपांडेंनी सुचवलं, की हा त्या व्यक्तीच्या आयुष्यभराच्या कर्तृत्वाचा पुरस्कार करताय, तेव्हा याला ‘जीवन गौरव पुरस्कार’ हे नाव द्यावं. हल्ली गल्लीबोळात कुणीही हे नाव देतं. पण हे नाव ‘चतुरंग’कडे रजिस्टर आहे. अन्य बरेच जण वापरतात, पण ‘चतुरंग’ त्यांच्याशी कायदेशीर भांडणाच्या उद्योगात पडत नाही. इतरांनीच या नावाचा दुरुपयोग न करण्याची सभ्यता पाळावी.
हा पुरस्कार देण्यासाठी निमित्त हवे म्हणून रंगसंमेलनाची निर्मिती पंचवीस वर्षांपूर्वी झाली. नाटय़संमेलनात बऱ्याचदा अनेक नाटकवाले नसतात. साहित्य संमेलनाकडे तर अनेक साहित्यिक पाठ फिरवतात. पण ‘चतुरंग’च्या रंगसंमेलनाला पंचवीस वर्षे सातत्याने साहित्यिक-कलावंतांची भरभरून उपस्थिती आहे.
पहिलं रंगसंमेलन रूपारेलला चार दिवस चाललं. विश्राम बेडेकरांच्या हस्ते भालजी पेंढारकरांना गौरवण्यात आलं. दोन हजार सालापर्यंत दोन ते तीन दिवस रात्रीपर्यंत संमेलन चालत. पुलंच्या वेळी तर पहाटेचे पावणेसहा वाजले. पुलंवरचा ‘या सम हा’ अनुबोधपट पाहत रसिक पांगले. पण ‘दहा’चं बंधन आलं आणि सायंकाळी पाच ते रात्री दहा अशी वेळ होऊन बंदिस्त सभागृहात संमेलन होऊ लागली. १९९७ मध्ये तर रंगभवन हे खुले नाटय़गृह संमेलनासाठी प्रथमच बंदिस्त करण्यात आलं. रंगसंमेलनाच्या जोरावरच वर्षभराच्या विनामूल्य उपक्रमांचा आर्थिक डोलारा सांभाळला जातो.
यंदा प्रथमच महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक विभागाच्या साथीने रौप्यमहोत्सवी संमेलन ‘गेट वे ऑफ इंडिया’ला होतंय. पारधी समाजात काम करणारे, चिंचवडच्या गुरुकुलचे गिरीश प्रभुणे यांना यंदा न्या. नरेंद्र चपळगावकरांच्या हस्ते गौरवलं जाणार आहे.
कोकणातल्या कोपऱ्यातल्या खेडय़ात शैक्षणिक उपक्रम करणारं ‘चतुरंग’चं चिपळूण केंद्र २८ र्वष कार्यरत आहे. तर डोंबिवलीत २७ र्वष काम चालू आहे. त्यामुळे या वेळी एकदिवसीय संमेलन न ठेवता, १२ डिसेंबरला गेट वे ऑफ इंडिया, २० डिसेंबर चिपळूण, २६ डिसेंबर डोंबिवली आणि पुढे ३ जानेवारीला गोव्यातही संमेलन होईल.
पर्यावरण, प्राणिजीवन, अंध मुलं अशा विविध क्षेत्रात फंडाविना, शासन अनुदानाविना ‘एकांडे’ काम करणाऱ्याही व्यक्ती आहेत. अशा २५ व्यक्तींचा सन्मानही तीन ठिकाणी होतोय. यांना ‘एकल जनसेवक’ म्हटलं गेलंय. या पंचवीस जणांवर पुस्तकही तयार होतंय. गेट वेच्या सोहळ्यात हे पुस्तक त्या सर्वासमक्ष, त्यांच्याच मंचीय उपस्थितीत प्रकाशित करून चतुरंग स्मरणिका घेणाऱ्यांना ते विनामूल्य दिलं जाईल. हा रौप्यमहोत्सवी सोहळा होत असताना ‘मळलेल्या वाटेनं न जाता स्वत:ची नवीन पायवाट करा, कार्यक्रमाचा तोंडवळा वेगळा असू द्या,’ असं सांगणाऱ्या गणेश सोळंकी मास्तरांची, दारव्हेकर मास्तरांची, प्रफुल्ला डहाणूकरांची आठवण मात्र ‘चतुरंग’ कार्यकर्त्यांच्या मनात नक्कीच दाटून येईल.
sudhirggadgil@gmail.com