News Flash

पडसाळीतील सिमला मिरचीची समूह शेती!

केवळ शेती करून विकास साधण्यास मर्यादा आहेत. या उत्पादनाला जर समूह शेतीचे रूप दिले तर अनेक प्रश्न सोपे होतात

पडसाळीतील सिमला मिरचीची समूह शेती!
(संग्रहित छायाचित्र)

एजाजहुसेन मुजावर

केवळ शेती करून विकास साधण्यास मर्यादा आहेत. या उत्पादनाला जर समूह शेतीचे रूप दिले तर अनेक प्रश्न सोपे होतात. शेतीमधील आव्हाने, अडचणी सहज दूर करता येतात. चांगल्या उत्पादनाबरोबरच त्यासाठी बाजारपेठ मिळवणे, त्याचे व्यवस्थापन करणे शक्य होते. सोलापूरमधील पडसाळी गावातील सिमला मिरचीच्या समूह शेतीने हेच दाखवून दिले आहे.

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी समजल्या जाणाऱ्या उत्तर सोलापूर तालुक्यात पडसाळीसारख्या भागात यापूर्वी कृषिभूषण ज्योतिराम गायकवाड यांनी शबरी बोरांची यशस्वी लागवड करून स्वत: बरोबरच गावाचे नाव देशाच्या नकाशावर आणले होते. त्यांच्या पश्चात त्यांचे चिरंजीव प्रदीप गायकवाड यांनी पुढाकार घेऊ न समूह शेतीच्या माध्यमातून ढोबळी (सिमला) मिरचीचे उत्पादनाद्वारे आदर्श निर्माण केला आहे. सुमारे दोनशे तरुण शेतकऱ्यांना सोबत घेऊ न पाचशे एकर क्षेत्रात ढोबळी मिरचीचे एकत्रित उत्पादन यशस्वीपणे होत असतानाच देशभरातील दूरदूरच्या बाजारपेठांमध्ये जाऊ न मोठय़ा प्रमाणावर ढोबळी मिरची विकण्याचा प्रयोगही गायकवाड यांनी यशस्वी केला आहे. त्यामुळे शेतीमालामध्ये होणारी लूट, शेतकऱ्यांची फसवणूक थांबल्याचे एक चांगले उदाहरण येथे पाहावयास मिळते. कोलकाता, कानपूर, हैदराबाद, सूरत आदी दूरदूरच्या भागातील व्यापारी दर्जेदार ढोबळी मिरची खरेदीसाठी पडसाळीत थेट शेतकऱ्यांच्या बांधावर येत आहेत. पाचशे एकर क्षेत्रात जवळपास सहा ते सात महिन्यांच्या हंगामामध्ये दरमहा दीड ते दोन कोटी रुपये किमतीची ढोबळी मिरची विक्रीसाठी नेली जात आहे. अतिशय यशस्वी असा हा प्रयोग शेतीशी संबंधित जाणकार मंडळींनी पाहायला हवा असाच आहे.

ढोबळी मिरची किंवा अन्य कोणतेही उत्पादन मोठय़ा प्रमाणावर घेत असताना त्यासाठी बाजारपेठा उपलब्ध होणे आणि त्यात शेतीमालाला किफायतशीर दर मिळणे म्हणजे हा सारा जुगार ठरतो. परंतु पडसाळीच्या शेतकऱ्यांनी दूरदूरच्या बाजारपेठा काबीज करून स्वत:चा दबदबा निर्माण करीत असताना दुसरीकडे शेतीपूरक व्यवसाय कसे सुरू करता येतात आणि सुशिक्षित व अल्पशिक्षित तरुणांची बेकारी कशी हटविता येते, याचे हे उत्तम उदाहरण ठरावे.

ढोबळी मिरची समूह शेतीचे प्रेरक प्रदीप गायकवाड या संदर्भात सांगतात, की सुरुवातीला मी ढोबळी मिरचीचे उत्पादन घेत होतो. त्या वेळी मला स्वत:ला वाटायचं, की आपल्याकडे सर्व प्रकारचा भाजीपाला येतो. हा भाजीपाला रोजच्या आहारामध्ये येतो. पण ढोबळी मिरचीचा नियमित आहारात क्व चितच होतो. सहसा कोणीही नियमितपणे ढोबळी मिरची खाणार नसेल, तर आपण तर एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर ढोबळी मिरचीची लागवड केलेली. एवढा मोठा माल तयार होणार आणि मग तो विकायचा कसा आणि कोठे, हा प्रश्न होता. त्यावर इतर शेतकरी आणि व्यापाऱ्यांशी चर्चा केली. काही व्यापाऱ्यांनी माल पाठविण्यास सांगितले. तेव्हा मालाची विक्री थोडय़ा प्रमाणावर सुरू झाली. तरीही मालाचे भरघोस उत्पादन आणि तोकडी विक्री व्यवस्था, एवढय़ा प्रचंड प्रमाणावर ढोबळी मिरची खाणार कोण? यामुळे मनात प्रश्नांचे काहूर माजले होते. साधारणपणे आहारात कांदा, लसूण, आले रोज लागते. तशी ढोबळी मिरची गरजेची नसते. या प्रश्नांच्या अस्वस्थतेतून होणाऱ्या चर्चेत असे लक्षात आले, की नवीन तरुण पिढीला मोठय़ा प्रमाणावर ‘फास्ट फूड’ आवडते. ‘फास्ट फूड’मध्ये ढोबळी मिरचीचा होणारा वापर महत्त्वाचा असतो. त्यामुळे या पिकाला मागणी असणे शक्य आहे. परंतु त्याच्या बाजारपेठांची ठिकाणे शोधून काढणे गरजेचे होते.

त्यानुसार गायकवाड यांनी सुरुवातीला हैदराबादला माल पाठवून बघितला. त्यातून थोडीबहुत विक्री सुरू झाली. नंतर पुणे, मुंबईलाही माल पाठविला. पूर्वी वडील कृषिभूषण ज्योतिराम गायकवाड यांच्यामुळे संपर्कात असलेल्या कोलकाता, कानपूर, पटणा, दिल्ली, चेन्नई, भुवनेश्वर, कटक आदी सर्व बाजारपेठांमधील व्यापाऱ्यांशी संपर्क साधून ढोबळी मिरचीसंदर्भात चर्चा केली आणि माल विक्रीसाठी पाठवून देण्याची तयारी दर्शविली. परंतु व्यापाऱ्यांनी हा माल आमच्याकडे चालणार नाही, हा माल एवढय़ा दूर अंतरावर आमच्यापर्यंत पोहोचल्यानंतर टिकतो की नाही, अशी शंका उपस्थित केली. माल हाताळताना त्याची गुणवत्तेवरही (किपिंग क्वोलिटी) प्रश्नचिन्ह उभे केले गेले. तेव्हा गायकवाड यांनी संबंधित व्यापाऱ्यांना, तुमच्याकडे अगोदरच ‘इंदिरा’ नावाचे ढोबळी मिरचीचे वाण चालते. ‘इंदिरा’ वाणाच्या ढोबळी मिरचीची साल जाड असते आणि ती हाताळण्यासही गुणवत्तेच्या दृष्टीने योग्य असते. तशाच गुणवत्तेचा आपला माल आहे. हा माल आपण स्वत: जोखीम घेऊ न पाठवून देण्याची एकदा चाचणी करून बघू या, असा विनवणीवजा आग्रह धरला. व्यापाऱ्यांनीही संमती दिली. पहिल्यांदा हैदराबादपेक्षा सूरतची बाजारपेठ थोडय़ा दूर अंतरावर आहे. आम्ही सूरतला माल पाठविला. तेथे मालाची गुणवत्ता आणि यशस्वी हाताळणी होत गेल्यामुळे तेथील व्यापाऱ्यांनी दुसऱ्याच दिवशी पुन्हा माल पाठविण्याची मागणी नोंदविली. त्यामुळे सूरतला मोठय़ा प्रमाणावर ढोबळी मिरची पाठविण्यात येऊ  लागली. सध्या तर सूरतचे व्यापारी पडसाळीत शेतकऱ्यांच्या बांधावर ढोबळी मिरची खरेदी करण्यासाठी बसून आहेत, याचा प्रदीप गायकवाड हे अभिमानाने उल्लेख करतात.

गायकवाडांची ही यशोगाथा पाहून पडसाळी गावातील अनेक जण पुढे या ढोबळीच्या शेतीत येऊ लागले. गायकवाड यांनी यासाठी समूह शेतीची प्रेरणा दिली. २०१६ साली प्रदीप गायकवाड यांनी प्रथमत: ढोबळी मिरची लागवड केली होती. त्यानंतर दुसऱ्या-तिसऱ्या वर्षीच गावाच्या शिवारात विस्तार होऊ न पाचशे एकर क्षेत्रात ढोबळी मिरचीचे उत्पादन होत आहे. हा Rोंतिकारक बदल म्हटला पाहिजे. पूर्वी जे कामगार गायकवाड यांच्या ढोबळी मिरचीच्या शेतात काम करीत होते, तेच कामगार आता स्वत:च्या शेतात ढोबळी मिरची लागवडीत पुढे आहेत. आज पाहता पाहता गावातील ३०० हून अधिक शेतकरी ढोबळीचे उत्पादन तसेच या समूह शेतीशी संबंधित आहेत. पुढे मग या उत्पादन, त्याचे पॅकिंग, वाहतूक, विपणन यातही कालपरत्वे बदल करत पडसाळी गावातील शेतक ऱ्यांनी या ढोबळीच्या उत्पादनात उंच भरारी घेतली.

बाजारपेठांमध्ये माल जात असताना मालाच्या वेष्टनात (पॅकिंग) काही आवश्यक सुधारणा केल्या. पूर्वी जाड दुपटीचे साधेच बॉक्स वापरत होतो. त्यात हवा खेळत नव्हती. त्यामध्ये बदल केला. हजार ते दोन हजार किलोमीटर एवढय़ा दूरच्या अंतरावर दिल्ली, कोलकाता, जमशेदपूर, कानपूर, पाटणा, भुवनेश्वर, कटक अशी संपूर्ण देशातील एकही मोठी बाजारपेठ पडसाळीच्या ढोबळी मिरचीसाठी सोडली नाही. अशा प्रकारे बाजारपेठांचा प्रश्न सोडवत जात गेलो. जेवढय़ा दूरच्या बाजारपेठेत जाऊ , तेवढी बाजारपेठ उपलब्ध होतेय. पूर्वी काही स्थानिक व्यापारी ३० रुपये दराने ढोबळी मिरची मागायचे. मग दुसरा पर्याय शोधत दूरच्या परगावचे व्यापारी ३४ रुपये दराने माल खरेदी करायचे. तेव्हा स्थानिक व्यापारीही तेवढय़ाच दराने माल खरेदी करू लागले. अशा बऱ्याच गोष्टी विकसित करता आल्या आणि बाजारपेठांमध्ये पडसाळीच्या ढोबळी मिरचीचा रुबाब वाढत गेला आणि शेतकऱ्यांना चार पैसे जादा मिळू लागले.

एकीकडे ढोबळी मिरची भाव खात असताना दुसरीकडे या माध्यमातून गावात मोठय़ा प्रमाणावर रोजगार निर्माण झाला आहे. पूर्वी हैदराबादला माल पाठवित असताना तेथील व्यापाऱ्यांकडून प्रत्येक बॉक्समधून दोन किलो मालाची घट म्हणून सर्रासपणे कपात केली जायची. एका बॉक्समध्ये २५ किलो माल असतो. त्यातील दोन किलो माल कपात करून उर्वरित २३ किलो मालाचेच पैसे दिले जात होते. त्याबद्दल अनेकदा व्यापाऱ्यांशी वाद झाला. दोन किलो मालाचे पैसे कपात करायचे तसे कोणतेही सबळ कारण नव्हते. पाचसहा तास अंतरावर वाहतूक करून पाठविलेला माल असतो. माल पोहोच करायला दोन किंवा त्यापेक्षा जास्त दिवस लागत असतील, तर तेवढय़ा कालावधीत मालाचे वजन घटू शकते, हे समजू शकतो. परंतु पाचसहा तासांच्या नजीकच्या अंतरावर माल पोहोच करताना तुम्ही दोन किलो मालाचे पैसे कशासाठी कपात करताय, असा वारंवार वाद घातल्यानंतर आता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, की दोन किलो मालाचा आकडा आता शून्यावर आला आहे. प्रदीप गायकवाड आपल्या यशस्वी वाटचालीवर मनमोकळ्यापणाने बोलत होते. दोन किलो मालाच्या कपात बंद झाल्याचा परिणाम इतका मोठा झाला, की दररोज आम्ही ७० टन माल दीड ते दोन हजार बॉक्समधून बाजारपेठांमध्ये पाठवतो. आता त्यामध्ये दररोज एक लाख ६० हजार रुपये वाचतात. ढोबळी मिरचीचा हंगाम सहा-सहा महिने चालतो. आपणास ऐकताना दोन किलो मालाच्या पैशांची कपात सहज आणि किरकोळ वाटते. पण त्याचा परिणाम मोठा आहे. त्याचा महिन्याचा हिशेब विचारात घेतला तर महिन्याला ५० लाखांची बचत होऊ न ही रक्कम व्यापाऱ्यांच्या घशात न जाता शेतकऱ्यांच्या हाती पडते. अशा प्रकारे अनेक गोष्टी लक्षात घेऊ न त्यात बदल केले आहेत.

आज गावातील तीनशेहून अधिक शेतकरी या ढोबळीच्या समूह शेतीत सक्रिय आहेत. या उपक्रमातून शेतीबरोबरच या समूह शेतीशी संलग्न अन्य रोजगाराच्या संधीही गावातील अनेक तरुणांना प्राप्त झाल्या आणि यातून अनेकांना स्वयंपूर्ण होण्याची संधी लाभली आहे. यात केवळ ढोबळी मिरची लागवड आणि बाजारपेठांमध्ये माल पाठविण्यापुरतेच काम उपलब्ध नाही तर इतर काही पूरक रोजगारही उपलब्ध झाले आहेत. मालवाहतुकीसाठी गावातील काही तरुणांनी चारचाकी मालवाहतुकीची वाहने घेतली आहेत. त्यामुळे परगावच्या मालवाहतूकदारांवर विसंबून राहावे लागत नाही. माल पाठवणीसाठी आवश्यक असलेले बॉक्सही स्थानिक तरुणच तयार करतात. तर माल पाठवणीसाठी सुतळीही लागते म्हणून सुतळी तयार करण्याचा उद्य्ोगही गावातील तरुण करतात. स्थानिक तरुणांसह आसपासच्या गावांतील सुमारे पाचशे तरुणांना पडसाळीने रोजगार दिला आहे. पाचशे एकर समूह शेतीतील ढोबळी मिरची लागवडीमुळे गावात बियाणे, खत, रासायनिक औषधांची तीनचार दुकानेही सुरू आहेत. सोबत कांदा लागवडही असल्यामुळे बियाणे, खत, रासायनिक औषधांच्या विक्रीतून वर्षांत कोटय़वधीची उलाढाल एकटय़ा पडसाळीत होते. या संपूर्ण Rोंतिकारक बदलामुळे यापूर्वी गावातून स्थलांतरित झालेली एका राष्ट्रीयीकृत बँकेची शाखा पुन्हा याच गावात नव्या जोमाने व्यवसाय करीत आहे. एके काळी दुष्काळी असलेल्या या गावात शेततळी व अन्य माध्यमातून शेती विकास होऊ न आर्थिक संपन्नता वाढत आहे. पडसाळी शिवारात समृद्धी नांदत असल्याचे हे द्योतक आहे.

कंपनी गठीत करण्याचा मानस

पडसाळी येथे सुमारे दोनशे तरूण शेतकऱ्यांना सोबत घेऊन पाचशे एकर क्षेत्रात ढोबळी मिरचीचे एकत्रित उत्पादन यशस्वी होत असताना या समूह शेतीशी संबंधित सर्व शेतकऱ्यांची कंपनी गठीत करण्याचा मानस प्रदीप गायकवाड यांनी व्यक्त केला आहे. या गावात सुरूवातीला कांदा, हरभरा, ज्वारी आदी पारंपरिक पिके घेतली जात असत. त्यावेळी एकरी ४० ते ५० हजार रुपये उत्पन्न घेणारा शेतकरी आता ढोबळी मिरचीतून एकरी तीन ते चार लाख उत्पादन घेत आहे. मालाच्या बाजारपेठांची माहिती शेतकऱ्यांना चांगलीच अवगत झाली आहे. तर दुसरीकडे एखाद्या वेळी ढोबळी मिरचीच्या शेतीमध्ये जंतू, किटाणूंचा शिरकाव होऊन मालाच्या आरोग्याला धोका निर्माण झाल्यास त्यावरही तत्काळ औषधांची फवारणी करण्यासाठी शेतकरी पुढे येतात. एखादा रोग अधिक जोखमीचा असल्यास स्वत: आपण संबंधित प्रभावी औषधांचा वापर करून शास्त्रोक्त पध्दतीने ढोबळी मिरची शेतीचे आरोग्य सांभाळतो. त्यासाठी कोणा तज्ज्ञ मंडळींची मदत घेण्याची गरज भासत नाही, असे या समूह शेती प्रयोगातील शेतकरी सांगतात.

aejajhusain.mujawar@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 29, 2020 12:12 am

Web Title: simla chilli group farming in padsali abn 97
Next Stories
1 बिनपैशाचा ‘तमाशा’
2 भयपर्वातील ‘त्या’ अपघातापश्चात..
3 करोनाने लोटले देहबाजारात!
Just Now!
X