News Flash

संगीतभास्कर तळपत राहो!

गायनाचार्य भास्करबुवा बखले यांनी १ सप्टेंबर १९११ रोजी भारत गायन समाजाची स्थापना केली. तेव्हाचे संस्थेचे नाव होते 'किलरेस्कर भारत गायन समाज'. १९४० मध्ये पुण्यातील पुणे

| September 15, 2013 02:11 am

गायनाचार्य भास्करबुवा बखले यांनी १ सप्टेंबर १९११ रोजी भारत गायन समाजाची स्थापना केली. तेव्हाचे संस्थेचे नाव होते ‘किलरेस्कर भारत गायन समाज’. १९४० मध्ये पुण्यातील पुणे गायन समाज ही जुनी संस्था आणि भारत गायन समाज यांचे एकत्रीकरण झाले. पुणे भारत गायन समाज असे संस्थेचे नामकरण रूढ झाले. पुणे भारत गायन समाजाच्या ९० व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी आणि ज्येष्ठ संगीतकार नौशाद हे तीन दिग्गज एका व्यासपीठावर आले होते. भास्करबुवांचे नातू सुहास दातार आणि सुधीर दातार हे गेली काही वर्षे या संस्थेची धुरा वाहत आहेत.
अभिजात शास्त्रीय संगीत सर्वसामान्यांना समजावे, संगीताचा प्रचार आणि प्रसार व्हावा या उद्देशातून गायनाचार्य देवगंधर्व भास्करबुवा बखले यांनी स्थापन केलेली आणि शतकाचा उंबरठा पार केलेली पुणे भारत गायन समाज ही संस्था आर्थिक मेटाकुटीला येऊनही त्याच तोलामोलाचे कार्य करीत आहे. संस्थेची ख्याती असल्यामुळे येथे मान्यताप्राप्त कलाकार आपली कला सेवा म्हणूनच रुजू करतात. अत्यल्प शुल्कामध्ये संगीत ज्ञानदानाचे कार्य करणारी ही संस्था शहराचा विस्तार ध्यानात घेता अन्यत्र शाखा सुरू करू इच्छिते. त्याचबरोबरीने विविध उपक्रम राबविण्याचा मानस आहे. मात्र, सध्याच्या व्यापारी आणि व्यावसायिक जगामध्ये या साऱ्या बाबी ‘अर्था’अभावी सध्या तरी कागदावरच आहेत.
इंग्रजी शिक्षण घेऊन नवीन संस्कार झालेल्या काही मंडळींना आपल्या संगीताची आवड होती. पण, संगीताची जुनी शिक्षण पद्धती अर्थात त्यांना पटण्यासारखी नव्हती. कारण, त्या पद्धतीमुळे संगीत भलत्या लोकांच्या हातात राहिले आणि त्यामुळेच भारतीय संगीताची अवनती झाली, असे त्यांचे निदान होते. तसेच, आपल्या संगीताचे स्वरलेखन (नोटेशन) होऊ शकत नाही हीही एक तक्रार युरोपियन लोकांच्या टीकेवरून होत होती. सर्वत्र आधुनिक पद्धतीशी जुळणाऱ्या मार्गानी शिक्षण दिले जावे आणि सुसंस्कृत वर्गात त्याची अभिरुची वाढून वृद्धी व्हावी या उद्देशाने संगीत विद्यालये, समाज, शाळा काढण्याची प्रवृत्ती १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात होऊ लागली. त्यास अनुसरून कोलकात्यास राजा सुरेंद्रमोहन टागोर यांनी ‘बेंगॉल स्कूल ऑफ म्युझिक’ ही संस्था स्थापन केली. या विद्यालयातून शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांना बंगालमध्ये शिक्षक म्हणून पाठवले जात असे. या विद्यालयाचे पुढे ‘बेंगॉल अ‍ॅकॅडमी ऑफ म्युझिक’ असे नामकरण झाले. मुंबईमध्ये ‘गायनोत्तेजक मंडळी’ ही संस्था स्थापन झाली. यामार्फत नवीन विचारांस अनुसरून संगीत शिक्षण देण्याचा प्रयत्न झाला. या संस्थेस पारशी समाजाचे प्रोत्साहन होते. या संस्थेने जे काम मुंबईमध्ये केले तसाच प्रयत्न पश्चिम भारतामध्ये पुणे भारत गायन समाज या संस्थेने केला.
गायनाचार्य भास्करबुवा बखले यांनी १ सप्टेंबर १९११ रोजी भारत गायन समाजाची स्थापना केली. तेव्हाचे संस्थेचे नाव होते ‘किलरेस्कर भारत गायन समाज.’ समाजाची स्थापना पुण्यातील सरदार नातू यांच्या वाडय़ामध्ये झाली. नटवर्य नानासाहेब जोगळेकर यांच्या प्रेरणेने ही संस्था सुरू झाली तेव्हा भास्करबुवा बखले आपली संगीत आराधना करीत होते. संस्था सुरू होऊन वर्ष होते न होते तोच या संस्थेची सारी जबाबदारी खुद्द बखलेबुवांवरच आली. रसिकांचे कान ‘घडणे’ ही फार महत्त्वाची बाब असते, याची जाणीव बखलेबुवांना होती. त्यामुळेच रसिकांना अनेक मान्यवर कलाकारांचे गाणे सहजपणे ऐकता येईल यासाठी या संस्थेचा उपयोग सुरू झाला. आपल्याला कलावंत म्हणून उभे राहण्यासाठी जे कष्ट उपसावे लागले ते पुढच्या पिढीला उपसायला लागू नयेत असा त्यांचा उदात्त हेतू होता. त्यामुळेच ही संस्था केवळ गायनाचे शिक्षण देणारी शैक्षणिक संस्था राहिली नाही तर, अभिजात संगीताचे ते खरेखुरे विद्यापीठ बनले. गाणे ऐकण्याची इच्छा असणाऱ्यांचे कान जसे तृप्त होत होते, तसेच गाणे शिकण्याची इच्छा असणाऱ्या कुणालाही येथे मनापासून शिकण्याची सोय होती. पुणे हे भारतातील एक महत्त्वाचे संगीत केंद्र बनण्यामध्ये जी अनेक कारणे घडली त्यापैकी भारत गायन समाजाची स्थापना हे एक प्रमुख कारण ठरले.
भारत गायन समाजाचे पहिले प्राचार्य असलेले भास्करबुवा दर गुरुवारी विद्यार्थ्यांसाठी रात्रभर गात असत. रसिकांना सुश्राव्य गायन ऐकण्याची संधी मिळावी या ध्येयाने भास्करबुवांनी विद्यार्थी घडविले. भास्करबुवांसह गोिवदराव टेंबे, उस्ताद रहिमत खाँ असे संगीत क्षेत्रातील दिग्गज सुरुवातीच्या काळात समाजाशी जोडले गेले. आधी किलरेस्कर नाटय़गृहाच्या मागील इमारत, पुढे शुक्रवार पेठ येथील भूतकर वाडा, तुळशीबाग, शनिपार चौकातील बेंद्रे वाडा असे स्थलांतर होत होत संस्था १९३०मध्ये बाजीराव रस्त्यावरील सध्याच्या इमारतीमध्ये आली. शंकरबुवा अष्टेकर आणि दि. गो. दातार यांच्याकडे संस्थेची धुरा सोपवून भास्करबुवा मुंबईला गेले. मात्र, तरीसुद्धा मुद्दाम वेळ काढून ते पुण्याला येत आणि विद्यार्थ्यांना शिकवीत असत. समाजाच्या इमारत फंडासाठी १९२८ ते १९३१ या कालावधीत पाच जाहीर जलसे करण्यात आले. पुण्यातील किलरेस्कर थिएटर येथे पहिला जलसा झाला. या जलशांतून नटसम्राट बालगंधर्व, संगीत कलानिधी मास्टर कृष्णराव, गोिवदराव टेंबे यांचा प्रामुख्याने सहभाग होता. हे सर्व कलाकार आणि त्यामध्येही बालगंधर्व हे त्याकाळी लोकप्रियतेच्या शिखरावर असल्यामुळे खर्च वजा जाता या जलशांतून २ हजार ८७५ रुपये ही मदत मिळाली. साहित्यसम्राट न. चिं. केळकर यांच्या अध्यक्षतेखाली १५ जानेवारी १९२८ रोजी समाजाचे संमेलन झाले. सदाशिवराव पिंपळखरे यांनी केलेल्या भास्कररावांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले. गोिवदराव टेंबे यांचे संवादिनीवादन, थिरकवाँ यांचे तबलावादन आणि विलायत खाँ यांचे गायन असा कार्यक्रम झाला. थिरकवाँ आणि विलायत खाँ यांना मुंबईहून येण्या-जाण्याच्या खर्चाबद्दल २५ रुपये देण्यात आले होते.
एखाद्या क्लबाप्रमाणेच रूप असलेल्या समाजाला घटनात्मक स्वरूप देण्याचे प्रयत्न १९२८ मध्ये झाले. त्यानुसार सरदार आबासाहेब मुजुमदार हे संस्थेचे अध्यक्ष झाले. शनिपाराजवळील सरदार मुतालिक यांचे घर विकत घेण्याबाबतचा पत्रव्यवहार सुरू झाला. संस्थेजवळ स्वत:चा निधी चार हजारांपेक्षा अधिक नसल्याने १५ हजार रुपये किमतीच्या घराचा सौदा करणे धोक्याचे होते. परंतु जनतेची संस्थेविषयीची सहानुभूती, जलसे आणि नाटय़प्रयोग करून, देणग्या मिळवून कर्ज फेडता येईल अशा आत्मविश्वासाने हा व्यवहार ठरविण्यात आला. त्यावेळच्या मंडळींनी िहमत करून मध्यवस्तीतील वास्तू खरेदी केली. म्हणूनच संस्थेस इमारत लाभली. या इमारतीचे मूळ मालक त्याकाळातील प्रसिद्ध वैद्य बाळशास्त्री माटे होते. अमेरिकेमध्ये एकटय़ाने जाऊन वैद्यक परीक्षा उत्तीर्ण झालेल्या पहिल्या स्त्री डॉ. आनंदी गोपाळ जोशी या माटे यांच्या नात्यातीलच. त्यामुळे आनंदीबाई जोशी यांचे या इमारतीमध्ये वास्तव्य होते. क्षयरोग होऊन त्यांचे निधनही याच वास्तूमध्ये झाले.
१९४० मध्ये पुण्यातील पुणे गायन समाज ही जुनी संस्था आणि भारत गायन समाज यांचे एकत्रीकरण झाले. पुणे भारत गायन समाज असे संस्थेचे नामकरण रूढ झाले. मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर हे समाजाचे पहिले विद्यार्थी. त्यांना २० रुपये पोशाखासाठी बक्षीस दिल्याचा उल्लेख संस्थेच्या जमा-खर्चामध्ये आहे. समाजाचा प्रथम गायनाचा सहा वर्षांचा अभ्यासक्रम होता. तो पुढे मास्टर कृष्णरावांनी विचक्षण वृत्तीने विकसित करून दहा वर्षांचा केला. पदव्या तयार केल्या. या अभ्यासक्रमाला महाराष्ट्र सरकारची मान्यताही मिळाली. हा अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेल्यांना शाळांमध्ये संगीत शिक्षक म्हणून काम करण्यास पात्र ठरविले. हे समाजाचे योगदान म्हणावे लागेल. नाटय़ाचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर हे भास्करबुवांकडे रोज गायन शिकण्यासाठी दोन वर्षे येत होते, असा उल्लेखही आहे. भास्करबुवा यांच्या निधनानंतर दत्तोपंत बागलकोटकर, नरहरीबुवा पाटणकर, बापूराव केतकर, शंकरराव अष्टेकर, दिनकरराव दातार या शिष्यवर्गाने समाज टिकविला. भास्करबुवांच्या नावाने भास्कर संगीत विद्यालय ही शाखा समाजाच्या याच इमारतीमध्ये गेली अनेक वर्षे चालविली जात आहे. मास्टर कृष्णराव यांनी २२ वर्षे विद्यालयाचे अध्यक्षपद सांभाळले. संस्थेने २० वर्षे संगीत संशोधन मंडळ चालविले. संगीतविषयक महत्त्वाचे ग्रंथ प्रकाशित करण्यात आले. दुर्मीळ ध्वनिमुद्रिका संस्थेने जतन केल्या आहेत. काही काळ संस्थेने संगीतावरील नियतकालिक प्रसिद्ध केले.
भास्करबुवांचे नातू सुहास दातार आणि सुधीर दातार हे गेली काही वर्षे या संस्थेची धुरा वाहत आहेत. सुहास दातार यांचे वास्तव्य याच वास्तूमध्ये असून ते गेली सहा दशके संस्थेच्या कामामध्येच आहेत. सुधीर दातार आणि त्यांच्या पत्नी शैला दातार यांनी अनेक वर्षे संगीत शिक्षकाचे काम केले आहे. या संस्थेमध्ये गायनासह हार्मोनिअम, तबला, सतार, व्हायोलिन, पखवाज, गिटार या वाद्यवादनाचे त्याचप्रमाणे भरतनाटय़म आणि कथक हे नृत्यप्रकार शिकविले जातात. पुणे भारत गायन समाजाच्या कामकाजामध्ये भास्करबुवांची चौथी पिढी कार्यरत आहे. सुहास दातार यांची कन्या संगीता दुगल ही व्यवस्थापनाचे तर, दुसरी कन्या सावनी ही संगीत शिक्षकाचे काम करीत आहे. सुधीर दातार आणि शैला दातार यांची कन्या शिल्पा पुणतांबेकर ही गायन शिकविण्याचे काम करीत असून चिरंजीव हृषीकेश हा तालवाद्याचे प्रशिक्षण देत आहे. दातार यांची पुढची पिढी समाजाच्या कामामध्ये रस घेत असून त्यांच्या हाती संस्था सुपूर्द करताना काही प्रमाणात तरी आर्थिक सुस्थिती असावी ही भावना आहे. पुणे भारत गायन समाजाच्या ९० व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी आणि ज्येष्ठ संगीतकार नौशाद हे तीन दिग्गज एका व्यासपीठावर आले होते.
बदलत्या काळानुसार संगीत शिक्षकांना योग्य ते मानधन देण्याची इच्छा आहे. संस्थेने जतन केलेले दुर्मीळ ग्रामोफोन ध्वनिमुद्रण सीडी माध्यमाच्या माध्यमातून जतन करणे, विविध घराण्यांच्या मान्यवर कलाकारांना आमंत्रित करून त्यांचे गायन-वादन श्रोत्यांपर्यंत पोहोचविणे असे विविध संकल्प आहेत. मात्र, निधीअभावी या प्रकल्पांची पूर्ती करणे शक्य होत नाही. त्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी अर्थसाहाय्य करावे, ही अपेक्षा आहे.
संस्थेपर्यंत कसे जाल?
शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या शनिपाराजवळच संस्थेचे कार्यालय आहे. पुणे रेल्वेस्थानक, शिवाजीनगर रेल्वेस्थानक, पुणे बसस्थानक, स्वारगेट बसस्थानक या सर्व ठिकाणांहून शनिपाराकडे बस किंवा रिक्षेने जाता येते.
भारत गायन समाज, पुणे
संस्थेने जतन केलेले दुर्मीळ ग्रामोफोन ध्वनिमुद्रण सीडीच्या माध्यमातून जतन करणे, विविध घराण्यांच्या मान्यवर कलाकारांना आमंत्रित करून त्यांचे गायन-वादन श्रोत्यांपर्यंत पोहोचविणे असे विविध संकल्प आहेत.
सुसज्ज ग्रंथालय
संस्थेकडे पाच हजार पुस्तकांचा समावेश असलेले ग्रंथालय आहे. पुस्तकांची संख्या वाढवून येथेच वाचनाची, त्याचप्रमाणे ऑडिओ-व्हिडिओ लायब्ररी करून संगीतश्रवणाची संधी देण्यासाठी सुविधा देण्याची इच्छा आहे. बाजीराव रस्त्यावरील वाहतुकीची वर्दळ लक्षात घेऊन संगीत शिक्षणाच्या वर्गखोल्या वातानुकूलित करावयाच्या आहेत. नाटय़संगीत आणि सुगम संगीत शिकविणारा अभ्यासक्रम नव्याने सुरू करावयाचा आहे. मानधनाची फारशी अपेक्षा न ठेवता तज्ज्ञ शिक्षक संस्थेवरील प्रेमापोटी विद्यादानाचे काम करतात, तर लांबून येणाऱ्या पालकांना अधिक भार नको म्हणून विद्यार्थ्यांकडून मोठय़ा रकमेचे शुल्क आकारता येत नाही. अशा कोंडीमध्ये संस्था सापडली आहे. संस्थेने शताब्दी पार केली हे ध्यानात घेता प्रथितयश कलाकारांची मानधनाची अपेक्षा असते. सध्याच्या काळामध्ये अशी अपेक्षा ठेवणे यामध्ये गैर काही नाही, मात्र आर्थिक अडचणींमुळे या कलाकारांना योग्य मानधन देणे शक्य होत नाही. पुणे भारत गायन समाज, देवल क्लब, दादर-माटुंगा कल्चरल सेंटर अशा संस्थांना प्रथितयश कलाकारांनी मानधनासाठी अडवू नये, असे संस्थेचे म्हणणे आहे.  
धनादेश या नावाने काढावेत
पुणे भारत गायन समाज
८० जी अन्वये आयकर सवलत

संस्थेच्या इतिहासातील महत्त्वाचे टप्पे
*जलतरंग, दिलरुबा, सतार हे नवीन वर्ग सुरू झाले, अशी दोन हजार हँडबिले २६ सप्टेंबर १९१२ रोजी वाटली.
*इस्माइल खान यांचे गायन २८ मार्च १९१३ रोजी झाले. त्यांना ५० रुपये बिदागी दिली.
*मुराद खाँ यांचे बीनवादन २१ जून १९१३ रोजी झाले. बाळासाहेब पंडित, नारायणराव राजहंस म्हणजेच बालगंधर्व आणि खाडिलकर अशी तिघांनी प्रत्येकी पाच रुपये वर्गणी काढून त्यांना २५ रुपये बिदागी दिली.
*अल्लादिया खाँसाहेब यांचे २५ सप्टेंबर १९१४ रोजी संस्थेमध्ये गायन झाले.
*जालंदर येथील संगीत सभेत भास्करबुवा यांना डिसेंबर
१९१४ रोजी सुवर्णपदक मिळाले.
*कांताप्रसाद यांचा १६ फेब्रुवारी १९१३ रोजी तबलावादनाचा कार्यक्रम झाला.
*गुरुपौर्णिमेच्या दिवशी १८ जुलै १९१३ रोजी नानासाहेब पाटील बेलबागकर यांनी भास्करबुवांना नवरत्नांची अंगठी दिली.

धनादेश येथे पाठवा..
एक हजार किंवा त्याहून अधिक रुपयांची देणगी देणाऱ्यांची नावे ‘लोकसत्ता’त प्रसिद्ध केली जातील.

मुंबई कार्यालय
लोकसत्ता, संपादकीय विभाग, एक्स्प्रेस टॉवर्स, पहिला मजला, नरिमन पॉइंट, मुंबई – ४०००२१,  ०२२-६७४४०२१४
महापे कार्यालय   
संपादकीय विभाग, प्लॉट नं. ईएल १३८, टीटीसी इंड. एरिया, मआयडीसी, महापे, नवी मुंबई – ४००७१०.  ०२२-२७६३९९००
ठाणे कार्यालय     
संपादकीय विभाग, कुसुमांजली बिल्डिंग, दुसरा मजला, गोखले रोड, नौपाडा, ठाणे.  ०२२-२५३९९६०७
पुणे कार्यालय       
संपादकीय विभाग, एक्स्प्रेस हाऊस,
प्लॉट नं. १२०५/२/६, शिरोळे रस्ता, पुणे – ४११००४.  ०२०-६७२४१०००
नाशिक कार्यालय        
संपादकीय विभाग, स्टेडियम कॉम्प्लेक्स नं. ६, पहिला मजला, महात्मा गांधी मार्ग, नाशिक – ४२२००१.  ०२५३-२३१०४४४

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 15, 2013 2:11 am

Web Title: singer musician bhaskarbuwa bakhale started pune bharat gayan samaj a music legend must live long
Next Stories
1 सोबत आणि शुश्रूषेची दिलासादायक मात्रा
2 सर्वकार्येषु सर्वदा : विशेष मुलांची ‘झेप’ उंचाविण्यासाठी..!
3 सर्वकार्येषु सर्वदा : .. म्हणून आम्ही हात पसरतो!
Just Now!
X