News Flash

सहाव्या संवेदनेचे वाजले की बारा!

आपले जगणे धडधाकट असल्याची पावती दृष्टी, श्रवण, चव, गंध व स्पर्श या पाच संवेदना देत असतात. मात्र याव्यतिरिक्त आपल्याला ‘सिक्स्थ सेन्स’ (सहावी संवेदना) असल्याच्या भ्रम

| February 22, 2014 02:30 am

सहाव्या संवेदनेचे वाजले की बारा!

आपले जगणे धडधाकट असल्याची पावती दृष्टी, श्रवण, चव, गंध व स्पर्श या पाच संवेदना देत असतात. मात्र याव्यतिरिक्त आपल्याला ‘सिक्स्थ सेन्स’ (सहावी संवेदना) असल्याच्या भ्रम कैकांना आयुष्यभर जडलेला असतो. सुघटनेची वा दुर्घटनेची चाहूल आधीच लागल्याचा दावा त्यांच्याकडून होतो. इतकेच नाही तर साध्या साध्या गोष्टींमध्येही ते आपल्या सिक्स्थ सेन्स मालकीचे अवडंबर माजवत असतात. गंमत म्हणजे या अतिरिक्त संवेदनेव्यतिरिक्त माणूस बनला असून सहावी संवेदना ही ‘थोतांड देशाची कविकल्पना’असल्याचे नुकतेच शास्त्रसिद्ध झाले आहे. तेव्हा या सहाव्या संवेदनेच्या समज- अपसमजांचे विसर्जन करण्यासाठीचा हा खटाटोप..
सहावी संवेदना हा अनेकदा वादाचा विषय राहिला आहे. अनेक जण आपल्याला अशी अतिंद्रिय शक्ती असल्याचा दावा करून आपल्याला इतरांपेक्षा जास्त काही तरी कळते, असे भासवण्याचा प्रयत्न करतात. या संवेदनेच्या वापरानेच आपण इतरांपेक्षा जास्त काही जाणू शकतो, अशीही त्यांची समजूत असते पण प्रत्यक्षात सहावी संवेदना किंवा ज्याला सिक्स्थ सेन्स असा काही प्रकार नाही असे पुढे आले आहे. शास्त्रज्ञांच्या मते एखाद्या व्यक्तीत झालेला बदल आपल्याला जाणवतो पण नेमका काय बदल झाला, असे विचारले तर आपली बोबडी वळते. आपल्याला ते नीट सांगता येत नाही. मेलबर्न मानसशास्त्र विज्ञान विभागाचे प्रमुख संशोधक डॉ. पिअर्स होवे यांनी केलेल्या संशोधनाअंती असे दिसून आले की, काही लोक दुसऱ्या व्यक्तीत झालेले बदल जाणून घेऊ शकतात पण त्यांना दृश्य स्वरूपात तो जाणवत नाही. सिक्स्थ सेन्स किंवा सहावी संवेदना याचा अर्थ केवळ मानसिक शक्तीच्या आधारे कुठलाही बदल जाणून घेणे. मग त्यात तुम्ही तुमच्या पारंपरिक शारीरिक संवेदनांवर अवलंबून असत नाही. मानवाला ज्या पाच मूलभूत संवेदना आहेत, त्यात दृष्टी, श्रवण, चव, वास व स्पर्श यांचा समावेश आहे, पण त्या पलीकडे जाऊन केवळ मानसिक पातळीवर एखादी संवेदना असते व त्याच्या आधारे जेव्हा एखाद्या बाबीचे आकलन झाले असे आपण म्हणतो तेव्हा सहावी संवेदना असे म्हणतात.
सहाव्या संवेदेनेचा इतिहास!
अतिंद्रिय संवेदना म्हणजे एक्स्ट्रा सेन्सरी परसेप्शन (ईएसपी) ही संकल्पना तशी नवीन नाही. मानसिक शक्तीच्या आधारे संवेदन करणारी ही संकल्पना डय़ुक विद्यापीठातील मानसशास्त्रज्ञ जे.बी.ऱ्हाइन यांनी प्रथम मांडली. त्या वेळी त्यांनी टेलिपथी, क्लेअरऑडियन्स व क्लेअरव्हॉयन्स असे शब्दप्रयोगही वापरले होते. आपल्याला जे आकलन होत असते ते एक तर भूतकाळाविषयी असते किंवा वर्तमानाविषयी असते, पुढे काय घडेल याचा अंदाज आपण बांधू शकत नाही. १९३० मध्ये नॉर्थ कॅरोलिनाच्या डय़ुक विद्यापीठातील जे.बी. ऱ्हाइन व त्यांची पत्नी लुईसा यांनी या अतिंद्रिय संवेदनेला पॅरासायकॉलॉजी असे संबोधले, त्याबाबत झेनेर कार्ड्स नावाचा प्रयोगही केला. त्यांनाच ईएसपी कार्ड असेही म्हणतात. या कार्ड्समध्ये वर्तुळ, चौकोन, वेडय़ावाकडय़ा रेषा, फुली, तारा असे पाच पत्ते असतात व त्यांचा एकूण संच पंचवीस पत्त्यांचा असतो. यात टेलिपथीच्या माध्यमातून एक व्यक्ती पत्त्यांची मालिका बघते व दुसरी त्यावरील चिन्हे न पाहता ओळखते, ऱ्हाइन यांनी त्या वेळी असा दावा केला होता की, अगदी सामान्य लोकही शक्याशक्यतेचे गणित बाजूला ठेवले तरी जास्त प्रमाणात ती चिन्हे पत्ता न पाहताही ओळखू शकेल. नंतर त्यांनी इतर पद्धतीनेही हा प्रयोग करून असाच दावा केला होता. १९४० च्या सुमारास ऱ्हाइन, जे. जी. प्रॅट व इतरांनी पत्त्यांबाबतच्या प्रयोगांवर आधारित एक्स्ट्रा सेन्सरी परसेप्शन आफ्टर सिक्स्टी ईयर्स हा आढावावजा शोधनिबंध प्रकाशित केला. त्यात १८८२ पासूनच्या प्रयोगांची माहिती होती. जेफसन यांनी १९२० मध्ये पत्त्यांच्या या प्रयोगाचा प्रथम सांख्यिकी अभ्यास केला. पत्त्यांशिवायही काही प्रयोग केले. त्यात जी. एन. एम. टायरेल, व्हॉटले कार्निगटन, जे. हेटिंगर यांनी वेगवेगळ्या पद्धती वापरून आकलनशक्तीचा अभ्यास केला तर लंडन विद्यापीठातील गणितज्ञ सॅम्युअल सोल यांनी १९५० च्या सुमारास केलेल्या प्रयोगात पूर्वआकलन म्हणजे टेलिपथी नावाची शक्ती असल्याचे सूचित करणारे संशोधन केले. काही वैज्ञानिक व मानसशास्त्रज्ञांची त्यांना मान्यताही होती. त्यांनी ऱ्हाइन यांचे म्हणणे मान्यही केले पण त्यावर काहींनी टीकाही केली. सोल यांचा १९७५ मध्ये मृत्यू झाल्यानंतर मात्र ही संकल्पना काहीशी मागे पडली.
शोधप्रपंच!
संशोधनात काही निरीक्षकांना रंगीत छायाचित्रे दाखवण्यात आली, ती एका महिलेची होती व त्यात तिच्या केशरचनेत जरासा फरक होता.
दोन छायाचित्रे एक सेकंदाच्या विश्रांतीनंतर दीड सेकंद दाखवण्यात आली असता प्रतिसादकांना नंतर दोन्ही छायाचित्रात फरक आहे हे समजले पण तो नेमका काय होता, हे त्यांना सांगता आले नाही.
दुसऱ्या एका प्रयोगात त्यांना छायाचित्रात लाल व हिरवा रंग वेगवेगळ्या प्रमाणात आहे हे कळले पण त्या व्यक्तीच्या टोपीचा रंग बदललेला त्यांना सांगता आला नाही म्हणजे यात त्यांना दृष्टिसंवेदनेने बदल ओळखता आला नाही. याचा अर्थ त्यांना कुठलीही वेगळी अशी संवेदना नव्हती हे स्पष्ट झाले.
जॉन रॉनसन यांची गाजलेली पुस्तके
प्रसिद्ध लेखक जॉन रॉनसन यांनी सहाव्या संवेदनेवर आधारित काही चित्तथरारक कथानकांवर आधारित तीन पुस्तके लिहिली आहेत, त्यात लॉस्ट अ‍ॅट सी, अ‍ॅडव्हेन्चर्स विथ एक्स्ट्रिमिस्ट व द मेन हू स्टेअर अ‍ॅट गोट्स या पुस्तकत्रयीचा समावेश आहे. जॉन रॉनसन यांनी अमेरिकेतील वास्तव जीवनातील नायकांच्या, उडत्या तबकडय़ांच्या कथा मांडल्या आहेत. नेवाडा वाळवंटातील यूएफओ शोधपथकातही ते होते. त्यांनी एका यंत्रमानवाची मुलाखत घेतली होती व त्याला आत्मा आहे का, असे विचारले होते.  अलास्कातील नॉर्थ पोल येथे भेट देऊन त्यांनी ‘हायस्कूल मर्डर प्लॉट’ या गाजलेल्या कटाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. स्वयंपाकघरात अणूचे विच्छेदन करणाऱ्या एका अवली माणसास ते भेटले आहेत. परग्रहवासीयांच्या पृथ्वीवरील स्वागतासाठी उत्सुक असलेल्या महाभागाशी त्यांची गाठ पडली आहे. त्यांना माणसाच्या विचित्र वर्तनाबद्दल कमालीचे कुतूहल आहे. मानवी मनाचा उलगडा करण्याच्या प्रेरणेने ते भारावलेले आहेत.  गूढरम्य घटना व अतिंद्रिय शक्ती असल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तींना भेटण्यात त्यांनी आयुष्य खर्ची घातले आहे. त्यांच्या या कथा साहसवादी व आश्चर्यचकित करणाऱ्या आहेत. ज्यांना चित्तथरारक साहित्य वाचायला आवडते, त्यांच्यासाठी त्यांची पुस्तके म्हणजे मेजवानीच आहेत. आपला विश्वास बसणार नाही, अशा जगात ते आपल्याला घेऊन जातात. वैज्ञानिकांच्या मते मात्र उडत्या तबकडय़ा, परग्रहवासीयांचे कथित अनुभव हे केवळ आभास आहेत, त्याला काही शास्त्रीय आधार असल्याचे दिसून आलेले नाही.
पडदारूपी सिक्स्थ सेन्स!
एम. नाइट श्यामलन यांनी दिग्दर्शित केलेला द सिक्स्थ सेन्स हा चित्रपट १९९९ मध्ये प्रदर्शित झाला होता त्यात कोल सियर नावाचा एक मुलगा मृतात्म्यांशी संवाद साधत असतो व एक बालमानसशास्त्रज्ञ त्याच्यावर उपचार करीत असतात असे कथानक आहे. त्या वेळी या चित्रपटास ऑस्कर नामांकनही मिळाले होते. चित्रपटाने श्यामलन यांची कारकीर्द विस्तारली. आणि सहाव्या संवेदनेच्या वाहकांचे ‘भ्रम’रही बरेच तयार झाले. आपल्यालाही सिक्स्थ सेन्स असल्याचा साक्षात्कार अनेकांना झाला, तर अनेक लोक काही नसताना उगाच संवेदनांचे नाटक करू लागले.
सिक्स्थ सेन्स तंत्रज्ञान
अमेरिकेतील एमआयटी या संस्थेचे पीएच.डी.चे विद्यार्थी प्रणव मिस्त्री यांनी तयार केलेले सिक्स्थ सेन्स डिव्हाइस हे वास्तव जगाचा संबंध माहितीच्या जगाशी जोडून देते. अंकीय माहितीचे अनुभव वास्तव जगाशी जोडण्याची किमया त्यांनी या यंत्राच्या मदतीने केली आहे. त्रिमिती चित्रे काढणारा पेन, रोबोटिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता यात मिस्त्री यांनी बरेच संशोधन केले आहे. त्यांचे सिक्स्थ सेन्स टेक्नॉलॉजी हे टेड व्याख्यानमालिकेतील सादरीकरण आवर्जून पाहावे असे आहे. प्रणव मिस्त्री- द थ्रिलिंग पोटेन्शियल ऑफ सिक्स्थ सेन्स टेक्नॉलॉजी असा गुगल सर्च देऊन ते पाहता येईल. मुलांनी तर ते जरूर पाहावे असेच आहे. एमआयटीने त्यांची जी मीडिया लॅब तयार केली आहे त्यात याबाबत अनेक प्रयोग केले जातात.
अध्यात्माच्या अभ्यासकांच्या मते शक्ती, भाव, चैतन्य, आनंद व शांती या पाच अवस्थांतून आपण आकलन करीत असतो. त्यात शांती ही साध्य करण्यास सर्वात अवघड, अशी अवस्था असते. वास म्हणजे पृथ्वी तत्त्व असते. चव ही जल तत्त्व दर्शवते. दृष्टी ही अग्नी तत्त्वावर आधारित असते, स्पर्श हे वायू तर ध्वनी हे इथर तत्त्व आहे. आध्यात्मिक साधनेतून आपण सहावी संवेदना प्राप्त करू शकतो, त्याच्या आधारेच आपण अज्ञाताचे विश्व जाणून घेऊ शकतो. काहींना त्या पातळीवर पूर्वजन्म, पुढचा काळ वगैरे दिसतो असे दावे केले जातात. अशा कथांना मागणी चिकार आहे आणि त्यावर मासिके, साप्ताहिके यांना विशेषांक काढण्यास आनंदही मोठा असतो. आपण आध्यात्मिक की सैद्धांतिक यावर सहाव्या संवेदनाच्या असण्या-नसण्यावर
 विश्वास ठेवतो.
स्त्रियांची अतिसंवेदना?
स्त्रियांना पुरुषांपेक्षा सहावी संवेदना जास्त असते, असे मानले जाते. कारण त्यांची आंतरप्रेरणा पुरुषांपेक्षा जास्त असते. पुरुष हे जास्त व्यवहारी पातळीवर जाऊन विचार करणारे असतात त्यामुळे त्यांना ही संवेदना कमी असते, असे म्हटले जाते. मात्र संवेदनाआख्यान जाणून घेतले, तर या कल्पनेलाही तिलांजली देणेच उचित.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 22, 2014 2:30 am

Web Title: sixth sense an illusion
Next Stories
1 शेतकऱ्यांना (विजेची) भीक नको..
2 चलनवाढ रोखण्याचा ‘धर्म’
3 सुरक्षा आली, सार्वभौमत्वाचे काय?
Just Now!
X