आई, तुझ्या चैतन्यरूपाला आम्ही अंतरलो. हे होणं अटळ असतं, तरीही वेडं मन ते मानायला तयार नसतं. ८७ वर्षांचं प्रदीर्घ आयुष्य तू किती सुंदरपणे जगलीस! पूर्वजन्माच्या पुण्याईनं कलासक्त वडिलांच्या पोटी जन्म घेतलास. संगीताचं बोट धरून जीवनप्रवास सुरू केलास. शिकायचं आणि शिकवायचं हे व्रत तर दहाव्या वर्षांपासून सुरू केलंस. मधुमक्षिकेप्रमाणं अनेक गुरूंकडून संगीताचे धडे घेतलेस. निकोप आवाज, सतत नवं शिकण्याची आस, प्रचंड मेहनत घेण्याची वृत्ती यामुळे तुझा व्यासंग प्रगल्भ होत गेला. संगीत नाटकांच्या दुनियेत तर जन्मापासूनच तुझं नातं जडलेलं होतं. दिग्गज कलाकारांकडून तुला मार्गदर्शन मिळत गेलं. तुझं सौंदर्यासक्त मन नेहमीच सुंदरेचा वेध घेत राहिलं. त्यातूनच तुझा अभिनय आणि संगीत बहरत गेलं. नटसम्राट बालगंधर्व म्हणजे तुझं परम दैवत. शारदा नाटकात त्यांनी इंदिराकाकूच्या भूमिकेत तुझ्या आईची भूमिका केली. त्यांच्या वत्सलतेचा आशीर्वाद हस्त तेव्हा तुझ्या मस्तकावरून ममतेनं फिरला आणि तुला भव्य प्रेरणा देऊन गेला. त्यांच्या गंधर्व मंडळीत त्यांच्याच भूमिका करण्याची संधी मिळाली. ऐनवेळेस घसा बसल्यानं ‘स्वयंवर’ नाटकातील त्यांचं रुक्मिणीचं काम त्यांच्याच आज्ञेनं तुला करावं लागलं. त्याबद्दल त्यांनी दिलेली शाबासकी म्हणजे आयुष्यातला सर्वात मोठा पुरस्कार होता.
साहित्य संघाच्या नाटय़ोत्सवात शाकुंतल नाटकानं नानांची आणि तुझी जोडी जमली. त्यानंतर संगीत नाटक म्हणजे आपली जीवनसाधना असं समजून एकमेकांच्या साथीनं तुम्हा दोघांच्या आयुष्याचा खडतर प्रवास तुम्ही किती धीरोदात्तपणं, निष्ठेनं आणि विश्वासानं करीत राहिलात. ‘मराठी रंगभूमी’ ही नाटय़संस्था स्थापन केलीत. जुन्या संगीत नाटकांचं जतन, संवर्धन आणि नवीन संगीत नाटकांची निर्मिती हे ध्येय अखेपर्यंत निभावलंत. तुमच्या संसारवेलीवर फुललेल्या लता, कीर्तीची पावलं बाळपणापासूनच रंगभूमीकडं वळली. त्यांना वळण लावणं, त्यांच्याकडून मेहनत करून घेणं, त्यांना सर्वतोपरी घडवणं हे तू किती सहजपणे करत राहिलीस!
नानासाहेब फाटकांबरोबर ‘एकच प्याला’तील सिंधू साकारण्याचं आव्हान तू सहजपणे पेललंस. छोटा गंधर्व, रामभाऊ मराठे, सुरेश हळदणकर, भार्गवराममामा आचरेकर, भालचंद्र पेंढारकर, रामदास कामत, प्रसाद सावकार या सगळ्यांबरोबर तू नायिका म्हणून वावरलीस. घरच्या संस्थेतली तुझी आणि नानांची जोडी तर लक्ष्मीनारायणसारखीच झळकत होती. तुम्ही संगीत नाटकांचे ‘नटीसूत्रधार’ शोभून दिसायचात!
‘आपला खेळ कसा होईल,’ असं ‘सूत्रधार’ नाना जेव्हा विचारायचे तेव्हा आश्वासकपणं, हसतमुखानं नटीच्या रूपातील उत्तर द्यायचीस ‘आपला खेळ चांगलाच होणार’.. खरोखरच तुम्ही संगीत नाटकाचा खेळ अतिशय सुंदरपणं खेळलात आणि नंतर तुमच्या कार्यात सहभागी झालेल्या सर्वाना तसंच खेळण्याचा आणि रंगतदारपणं त्याचा आनंद लुटण्याचा वसा देत राहिलात. नाना खूप लवकर देवाघरी गेले. हा आपल्यासाठी दुर्दैवाचा आघात होता. पण त्यांच्यानंतरही संगीत नाटकांचा मांडलेला डाव तू मोडू दिला नाहीस. मुलींच्या पाठीशी खंबीरपणं उभं राहून पुन्हा नव्या ताकदीनं आपल्या जीवनध्येयाची ज्योत जागती ठेवलीस. अनेक शिष्यांना विद्यादान करून तू त्यांना सतत प्रेरणा देत राहिलीस. आसयुक्त गाणं कसं गावं, गाताना नेहमी प्रसन्नवदन कसं असावं, खणखणीत षड्ज कसा लावावा, तालाशी घट्ट असलेली बंदिश कशी म्हणावी हे तू मन:पूर्वक शिकवत राहिलीस. उत्तम कलावती, उत्तम गायिका, उत्तम गुरू, उत्तम गृहिणी, उत्तम आई, अष्टपैलू व्यक्तिमत्त्व.. आणि या सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुझं निर्मळ हसणं. सगळ्या दु:ख-संकटांवर मात करत, प्रतिकूल परिस्थितीशी सामना करत मराठी रंगभूमीची धुरा सांभाळलीस, उत्तम प्रपंच केलास, तोसुद्धा प्रसन्न चित्तानं आणि हसतमुखानं. ही केवढी विलक्षण गोष्ट.
गणेशोत्सवात दाही दिवस गाण्याच्या मैफली करून तू कधी थकली नाहीस.. गैरसोयींशी, अडचणींशी सामना करत केलेले नाटकांचे दौरे.. घरात सासर-माहेरात वडिलकीच्या जबाबदाऱ्या सतत सांभाळताना कैक वेळा नड भागवायला तुझ्या तोडे, पाटल्या बँकेत गहाण पडायच्या. त्या पुन: पुन्हा सोडवून आणताना नाना आटापिटा करायचे. तुला पद्मश्री जाहीर झाल्यावर आम्ही मुलींनी ठरवलं तुला शिंदेशाही तोडे करायचे.. ते घडवून तुझ्या हातात चढवल्यावर एखाद्या लहान मुलीसारखा व्यक्त केलेला तुझा आनंद पाहून आम्हा दोघींना गहिवरून आलं. हा आनंद तिला आपण आधीच का दिला नाही याबद्दल स्वत:ला फटकारत राहिलो.
गेल्या वर्षांत एकापेक्षा एक महत्त्वाचे सन्मान तुला मिळत गेले. संगीत नाटक अकादमीचा टागोर सन्मान, महाराष्ट्र शासनाचा अण्णासाहेब किलरेस्कर जीवनगौरव पुरस्कार आणि भारत सरकारची ‘पद्मश्री’.. परमेश्वराचा वरदहस्त सतत तुझ्या शिरावर होता. तुला प्रवासाला नेताना खूप काळजी वाटे. पण तुझा आपल्या मुलींवरचा गाढ विश्वास नेहमीच बळ देणारा असे. सगळे प्रवास निर्विघ्न पार पडले.
नेहमी प्रकृती बिघडली की स्वत: उठून चालत येऊन गाडीत बसायचीस. डॉक्टर्सना संपूर्ण सहकार्य करायचीस. आजारावर मात करून स्वत:च्या पायांनी चालत गाडीत बसून घरी यायचीस. या वेळेला मात्र अ‍ॅम्ब्युलन्स बोलवावी लागली. परत आलीस ती अचेतन होऊन. अ‍ॅम्ब्युलन्सच.. डॉक्टरांनी हा शेवटचा काळ असल्याचं सांगितल्यावर मी आणि लता कोसळून गेलो. अश्रू पुसायचे आणि खोटय़ा अवसानानं तुझ्याशी गप्पा मारायला तुझ्याजवळ यायचं. तुला वेदना होताहेत असं वाटलं की अक्कलकोट स्वामींचा नामजप सुरू करायचा. तो नामजप म्हणजे तुझ्या वेदनांवरचं रामबाण औषध असायचं. मधुमेहानं उचल खाल्ली, किडनीचं काम थांबलं. त्यानंतर झपाटय़ानं तब्येत खालावत गेली. बुधवारची रात्र संपून गुरुवार सुरू झाला. हृदयाचे ठोके मंद होत गेले. अतिशय शांतपणे. कोणत्याही वेदनांशिवाय तू शेवटचा श्वास घेतलास. मृत्यू इतका सुंदर असू शकतो! तीन दिवस अनावर दु:ख होत असलेल्या आम्हा मुलींच्या डोळ्यांत पाणीही आलं नव्हतं. हा चमत्कार तुझ्या अचेतन असतानाही प्रसन्न असणाऱ्या दिव्य व्यक्तिमत्त्वाचा होता.
तू तुझं आयुष्य पूर्णपणं जगलीस. आपल्या संगीतापासून, संगीत नाटकापासून, ध्येयापासून कधीही विचलित झाली नाहीस. मनोभावे आपलं काम करत राहिलीस. महान कलाकार असून कधी टेंभा मिरवला नाहीस. प्रचंड ज्ञानभांडार सर्वाना वाटण्यात कधी हातचं राखलं नाहीस. नवं शिकण्याची जिद्द शेवटपर्यंत अबाधित ठेवलीस. तू खरंच देवाची लाडकी होतीस.
आयुष्याच्या रंगमंचावर उत्साहानं पाऊल टाकलंस, दिमाखात वावरलीस आणि निरामय शांतीनं या जगातून गेलीस.. उरल्यात तुझ्या निर्मळ आठवणी.. तुझी आत्मतृप्त गाणी.. अगदी तुझ्या प्रसन्न हास्यासारखी!