News Flash

सोशल मीडियाचे प्रचारयुद्ध प्रत्यक्षाहुनि प्रतिमा सुंदर..

२०१४च्या लोकसभा निवडणुकीत सोशल मीडियाचे वर्चस्व राहणार आहे. या युद्धात हायटेक प्रचार तंत्र-मंत्राचा वापर सर्वच पक्षांनी मुक्त हस्ते सुरू केला असून नेत्यांच्या इमेज बिल्डिंगची कसरत

| February 23, 2014 01:17 am

२०१४च्या लोकसभा निवडणुकीत सोशल मीडियाचे वर्चस्व राहणार आहे. या युद्धात हायटेक प्रचार तंत्र-मंत्राचा वापर सर्वच पक्षांनी मुक्त हस्ते सुरू केला असून नेत्यांच्या इमेज बिल्डिंगची कसरत सर्वच पक्ष कसोशीने करत असल्यामुळे ‘प्रत्यक्षाहुनी प्रतिमा सुंदर’ असे सर्वपक्षीय नेत्यांचे चित्र निर्माण झाले आहे.
‘नमस्कार, मी राज ठाकरे बोलतोय. लोकसभेची निवडणूक लढवत आहोत. महाराष्ट्राचा आवाज दिल्लीत गाजायला हवा. आजपर्यंत महाराष्ट्राचा अपमान झाला, आता बस्स. आजपर्यंत सर्वाना संधी दिलीत, आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांना विजयी करा. जय महाराष्ट्र..’
..गेल्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांचा आवाज मोबाइलद्वारे लाखो लोकांपर्यंत पोहोचला.. महाराष्ट्रातील निवडणुकीत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर प्रभावीरीत्या केला तो राज यांनीच. शिवसेनेत असताना त्यांनी अत्यंत कल्पकतेने एफएम रेडिओचा वापर केला होता. ‘एफएम’वरून राज यांचा आवाज जनतेपर्यंत पोहोचत होता. यू-टय़ूब, जिंगल्स, रिंगटोनचा प्रभावी वापर करत मनसेच्या ‘इंजिना’चा आवाज गेल्या सात वर्षांत अवघ्या महाराष्ट्रात प्रभावीपणे पोहोचवला. ‘आया रे राजा, लोगों रे लोगो’ ही रिंगटोन तरुणाईची फेव्हरिट बनली होती.
सोशल मीडियाने गेल्या काही वर्षांत निवडणुकांमध्ये क्रांती केल्याचे दिसून येते. राळेगणसिद्धीचे समाजसेवक अण्णा हजारे यांनी सोशल मीडियाच्या प्रभावी वापराने दिल्लीच्या ‘जंतरमंतर’वर अक्षरश: जादू केली. त्यानंतर साऱ्या देशातील प्रसारमाध्यमांवर केवळ अण्णांचीच छबी दिसत होती. ‘दुसरे गांधी’ ही त्यांची इमेज उभी करण्यात अण्णा समर्थकांना कमालीचे यश आले. एवढेच नव्हे तर काँग्रेसच्या गांधी टोपीवर ‘अण्णा टोपी’ने कधी मात केली हे कळलेच नाही. ‘मैं अण्णा हूँ’ असे लिहिलेल्या लाखो टोप्यांची देशभर विक्री झाली आणि त्यापाठोपाठ सोशल मीडियाचा पराकोटीच्या कौशल्याने वापर करत अण्णांचेच पट्टशिष्य अरविंद केजरीवाल यांनी ‘अण्णा टोपी’ हातोहात पळवत ‘आप’ली बनवली. अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या हायटेक कार्यकर्त्यांनी सोशल मीडियाच्या प्रत्येक अंगाचा वापर करत देशभर एक माहोल उभे केले आणि पाहता पाहता दिल्ली विधानसभेत सर्वच पक्षांना धडकी भरवत आपले सरकार स्थापन केले. मुख्यमंत्री बनल्यानंतर शपथविधीपासून प्रत्येक गोष्टीत नाटय़ निर्माण करून सतत सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रकाशझोतात राहण्याचे काम त्यांनी सरकार पडेपर्यंत केले. केजरीवाल यांच्या प्रचारतंत्राने डोळे दिपलेल्या अन्य राजकीय पक्षांनीही सोशल मीडियाचे माहात्म्य जाणून या तंत्र-मंत्राचा अभ्यास आणि वापर करण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात जसे यू-टय़ूब व एफएमचा प्रभावी वापर करण्याचे काम राज यांनी सर्वप्रथम केले, त्याचप्रमाणे ३-डीचा प्रथम वापर केला तो भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी. तसे पाहिले तर मोदी यांनी सोशल मीडियाच्या तंत्रात आज सर्वानाच मागे टाकल्याचे दिसत आहे. २०१४च्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप, जनता दलासह देशभरातील सर्व प्रमुख पक्ष प्रचारयुद्धात सोशल मीडियाचा मुक्तहस्ते वापर करू लागले आहेत. वेबसाइट, ई-मेल, टिव्टर, फेसबुक,मोबाइल, एसएमएस, यू-टय़ूबचे शस्त्र घेऊन सर्वच पक्ष निवडणुकीच्या रणांगणात उतरणार असल्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीला वेगळीच रंगत येणार आहे.
स्वातंत्र्यानंतर जवळपास चार दशके देशातील निवडणुकांमध्ये प्रचारासाठी बैलगाडय़ा, ट्रक, रिक्षा आणि मोठमोठे भोंगे घेऊन घोषणा देत कार्यकर्ते प्रचार करत. भिंती रंगविल्या जात. ‘ताई माई अक्का, ..वर मारा शिक्का’ अशा घोषणा देत कार्यकर्ते पत्रके वाटत दारोदार फिरत. आंतरदेशीय कार्ड तसेच पोस्ट कार्डचा प्रचारासाठी तेव्हा मोठय़ा प्रमाणात वापर होई. खेडय़ापाडय़ात जीपगाडय़ा धुरळा उडवीत मोठय़ा दिमाखात फिरायच्या तेव्हा गावागावातील पोरेटोरे या गाडय़ांच्या मागे घोषणा देत धावताना दिसायची. वर्तमानपत्रे हेच एकमेव प्रभावी माध्यम सत्तरच्या दशकात होते. त्या वेळी व आजही एक धोरण मांडून त्याच्या आधारे प्रचाराची रचना केली जाते. इंदिरा हटावचा विरोधकांचा नारा जसा जोर धरू लागला तसा विरोधकांच्या घोषणेचा अत्यंत कल्पकतेने वापर करत इंदिरा गांधी आपल्या सभांतील भाषणांतून विचारीत, ‘वो कहते हैं इंदिरा हटाव, मैं कहती हूँ गरिबी हटाव’, इंदिरा गांधी यांच्या या आक्रमक पवित्र्याने निवडणुकीचे चित्र बदलले. निवडणूक चिन्हांचाही वापर काळानुरूप प्रभावीपणे काँग्रेसने केलेला पाहायला मिळतो. ‘गाय-वासरू’ ते ‘हात’ अशा निवडणूक चिन्हाचा वापर करताना ‘काँग्रेस का हाथ, आम आदमी के साथ’ ही घोषणाही जनमानसात रुजविण्यात यश आले. आम आदमी पार्टीचा दबदबा वाढू लागल्याने आता ही घोषणा बासनात ठेवण्याची वेळ काँग्रेसवर आली आहे..
गेल्या दशकात गुजरात निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी गुजरातमधील प्रचारात मोदींना उद्देशून ‘मौत के सौदागर’ म्हणताच निवडणुकीचे सारे चित्र पलटले. मोदींनी याचा कुशलतेने वापर करत ‘काँग्रेस का खूनी पंजा’ असे प्रत्युत्तर दिले होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे विरोधकांची खिल्ली उडविण्यात प्रसिद्ध होते. शरद पवारांना मैद्याचे पोते, तेल चोपडलेला पहिलवान अशा उपमा देण्यापासून ‘मुंबई तोडण्याचा काँग्रेसचा डाव’ असल्याची आरोळी जवळपास प्रत्येक निवडणुकीत ठोकून निवडणुकीत मराठी मते  मिळवायचे.
आता चित्र बदलले आहे. एका ‘क्लिक’वर प्रचार फिरू लागला आहे. देशाच्या कोणत्याही कोपऱ्यातून देशातील कोणताही नेता अथवा पक्ष आपले म्हणणे मांडू लागला आहे. ‘आप’चा धसका घेऊन सर्वच पक्षांनी हायटेक प्रचारासाठी आपापल्या टीम सज्ज केल्या आहेत. विविध पक्षांच्या प्रचाराच्या प्रत्येक तंत्रासाठी बडय़ा कंपन्या उभ्या राहू लागल्या. घोषणा, पक्षाचे धोरण, आकर्षक जाहीरनामा तयार करण्यापासून एसएमएस, मोबाइल, अ‍ॅप्स, गुगल, फेसबुक, इंटरनेटच्या प्रत्येक अंगाचा प्रभावी वापर नेत्याची प्रतिमा विकसित करण्यापासून पक्षाला लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम करू लागले. आयटी क्षेत्रातील तज्ज्ञांचे ताफेच्या ताफे विविध पक्ष आता बाळगू लागले असून हे पेड कार्यकर्ते पक्षासाठी अहोरात्र काम करून पक्ष व नेत्याला जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम करू लागले. चणे-फुटाणे, वडापाव आणि कटिंग चहाच्या जागी हायटेक प्रचार करणाऱ्यांसाठी बर्गर-पिझ्झा आणि कोकच्या बाटल्यांचा साठा विविध पक्ष कार्यालयांत पाहावयास मिळत आहे. नेत्याचा ड्रेस, त्याचे दिसणे हे सारेच प्रचारासाठी नियुक्त केलेल्या कंपन्यांचे लोक पाहू लागल्यामुळे ‘प्रत्यक्षाहून प्रतिमा सुंदर’ अशी साऱ्याच नेत्यांची सध्याची स्थिती आहे. पंतप्रधानपदाचे उमेदवार बनण्यापूर्वी नरेंद्र मोदी यांची गुजरातचे सर्वेसर्वा तसेच विकास पुरुष म्हणून प्रतिमा निर्माण करण्यात आली.

नरेंद्र मोदींच्या वांद्रे येथील सभेसाठी जाहिरात फलक लावताना ‘मोदींची महागर्जना’ ही थीम मांडण्यात आली होती. सभेनिमित्त जवळपास एक कोटी एसएमएस लोकांना पाठविण्यात आले होते. राहुल गांधी यांची मुंबईभर लागलेली पोस्टर्स आणि त्यातील थीम ‘आप’ आणि भाजपला टक्कर देण्यासाठी पद्धतशीरपणे बनविण्यात आली आहे.पंतप्रधानपदाचे उमेदवार बनल्यानंतर देशभर प्रचारसभा घेताना प्रसिद्धीचे सारे तंत्रमंत्र पूर्ण ताकदीने वापरण्यास त्यांनी सुरुवात केली. यासाठी वेबसाइट, ब्लॉग, इंटरनेटच्या माध्यमातून भाषणे पोहोचविणे, ३-डी प्रसारमाध्यमांचा त्यांनी प्रभावी वापर केला. तसे पाहिले तर भारताच्या राजकीय इतिहासात राजकीय वेबसाइट सुरू करण्याचा पहिला मान हा भाजपचा असून १९९८ मध्ये त्यांनी तयार केलेली वेबसाइट हा चर्चेचा विषय बनला होता. दिवंगत भाजप नेते प्रमोद महाजन हे तेव्हा भाजपच्या हायटेक प्रचाराची धुरा सांभाळत होते. ‘इंडिया शायनिंग’चा प्रयोग फसला असला तरी हायटेक प्रचाराचे ‘कमळ’ तेव्हापासून फुलत होते.
काँग्रेसने आपली हायटेक टीमतयार केली असून निवडणूक प्रचारतंत्राचा सर्वार्थाने वापर त्यांनीही सुरू केला आहे. देशातील सर्व प्रमुख शहरांमध्ये सध्या राहुल गांधी यांचे चित्र आणि ‘मैं नहीं, हम’ म्हणत ‘आप’ला टक्कर देण्यासाठी सज्ज आहेत. ‘हर हाथ शक्ति, हर हाथ तरक्की’ ही राहुल यांचे छायाचित्र असलेली जाहिरात सर्वाचे लक्ष वेधून घेणारी असून आगामी काळात काँग्रेसकडून सोशल मीडियाचा प्रभावी वापर झालेला दिसेल. ‘मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा’ अशी घोषणा करत मनसेचे इंजिन महाराष्ट्रात पोहोचविणारे राज ठाकरे हे स्वत: व्यंगचित्रकार व कलावंत आहेत. त्यामुळे जाहिरात कंपन्यांवर काम सोपवून स्वस्थ बसण्याऐवजी ते स्वत: प्रत्येक जाहिरात अथवा प्रचारतंत्र तयार करण्यात जातीने लक्ष घालतात असे मनसेच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख केदार होंबाळकर यांनी सांगितले. एखादी थीम, त्यातून तयार होणाऱ्या घोषणा व त्याभोवती फिरणाऱ्या जाहिरातींवर राज यांचे बारीक लक्ष असते. जाहिरातीची संकल्पनाही तेच तयार करतात आणि प्रत्यक्षात कशी उतरवायची हेही तेच सांगतात. त्यामुळेच मनसेच्याजिंगल, रिंगटोन तसेच जाहिरातींना एक वेगळेच महत्त्व प्राप्त होते. ‘बदल हा घडणारच आणि हो, तुम्हीच तो घडविणार’ ही राज यांची थीम तरुणांनाच नव्हे, तर मोठय़ांनाही आकर्षित करून गेल्याचे गेल्या विधानसभा व लोकसभेच्या निकालावरून दिसून येईल, असेही होंबाळकर यांनी सांगितले.
‘आप’ च्या अरविंद केजरीवाल यांनी डोक्याभोवती जो मफलर मध्यंतरी गुंडाळला होता, त्यामागे ते ‘कॉमन मॅन’चे प्रतिनिधी दिसावे ही संकल्पना होती. केजरीवाल यांच्या तज्ज्ञांनी त्यांना दिलेल्या सल्ल्यामधून जसा मफलर आला तसेच अण्णांची टोपी पळवून ‘मैं आम आदमी हूं’ ची छाप निर्माण करण्यात आली. पक्षाची लाइन, धोरण तसेच त्यानुसार नेत्यांची भाषणे, होर्डिग्ज आदी तयार करण्यासाठी आयटीच्या टीम तसेच जाहिरात क्षेत्रातील कंपन्या व तज्ज्ञांची मदत घेण्यात येते. राष्ट्रीय नेते ज्या भागात जातात तेथील इतिहासापासून प्रमुख मुद्दय़ांच्या अनेक टिप्पण्या व भाषणांचे मुद्दे तयार केले जातात. कधी नेत्यांकडून जाहिरात कंपन्यांना थीम तसेच धोरण सांगितले जाते तर कधी कंपन्यांचे तज्ज्ञ  प्रचाराची आखणी तयार करून पक्षाला सादरीकरण करतात. राष्ट्रीय पातळीवर नेते व पक्षाची कामे मिळविण्याप्रमाणेच उमेदवार अथवा राज्य पातळीवरही काम मिळविण्यासाठी वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये जोरदार स्पर्धा सुरू असते.
लोकसभेची २०१४ ची निवडणूक सोशल मीडिया गाजविणार हे आता स्पष्ट आहे. भारताची लोकसंख्या व इंटरनेटचा वापर करणाऱ्यांची संख्या यांचे प्रमाण व्यस्त असले तरी सोशल मीडियाचा दबदबा राहणार आहे. भारतात इंटरनेटचा वापर हा १२.६ टक्के लोक करतात. अर्थात अमेरिका व चीनच्या खालोखाल भारतात वापर होत असला तरी आजघडीला १५ कोटींहून अधिक लोक इंटरनेट वापरतात. फेसबुक वापरणाऱ्यांची संख्या जगभरात १२१ कोटी एवढी असून भारतात १८ कोटी लोक फेसबुकवर आहेत, तर ट्विटर वापरणाऱ्यांची संख्या दोन कोटी आहे. यू-टय़ूबचा वापर सुमारे सहा कोटी लोक करताना दिसतात. निवडणूक आयोगाच्या अंदाजानुसार भारतात ८१ कोटी ५० लाख लोक मतदानासाठी पात्र असून यातील २० टक्के नवमतदार हे फेसबुक, यू-टय़ूब आणि ट्विटरचा वापर करणारे आहेत. भारतात इंटरनेट-मोबाइलला चालना देण्यासाठी स्थापन केलेल्या (इंटरनेट अ‍ॅण्ड मोबाइल असोसिएशन ऑफ इंडिया)च्या अहवालानुसार २०१४ मध्ये लोकसभेच्या ५४३ मतदारसंघांपैकी १६० मतदारसंघ सोशल मीडिया प्रभावित असतील. ३१६ मतदारसंघांत अंशत: प्रभाव असेल. गेल्या तीन वर्षांत मोदींना ट्विटरवर ६० लाख लोकांनी ट्विट केले. राहुल गांधींपेक्षा ही संख्या तिपटीहून अधिक आहे. गुगल चॅटद्वारे जनतेशी संपर्क साधणारे मोदी पहिले भारतीय राजकारणी असून इंटरनेटचा सतत वापर करणारा तरुणवर्ग खरोखरच मतदानाला उतरला तर देशातील राजकारणाचे चित्र बदललेले दिसेल. राहुल यांचा वेश तसेच त्यांचे तरुण असणे याचा प्रभावी वापर काँग्रेसकडून सध्या सुरू असून अमेरिकेच्या निवडणुकीत बराक ओबामा यांनीही इमेज बिल्डिंगकडे विशेष लक्ष दिले होते. यासाठी तज्ज्ञ तसेच या क्षेत्रातील व्यावसायिक कंपन्यांची नियुक्ती करण्यात आली होती. ‘येस,वुई कॅन’ म्हणत त्याचा फायदा ओबामा यांना निश्चित झाला. आजच्या राजकारणात तुमची प्रतिमा केवळ तुमच्या वागण्यावर अवलंबून नाही तर ती जनतेच्या मनात बिंबवणे हे फार महत्त्वाचे बनले आहे. गांधी अथवा नेहरू यांना त्याची कधीच गरज भासली नाही. कारण त्यांनी आपले स्थान थेट लोकांच्या हृदयात निर्माण केले होते, ते आपल्या संघर्षमय जीवनातून आणि कामातून. आता जमाना बदलला आहे. पोस्टरबाज नेतेच अधिक झाले आहेत. सत्यनारायणाच्या पूजा घालून  मिरवणारेच मोठे झाले असून आता प्रत्यक्षाहून प्रतिमा सुंदर बनवीत निवडणुकीच्या आखाडय़ात कुस्ती जिंकण्यासाठी सोशल मीडिया हेच एकमेव साधन बनले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 23, 2014 1:17 am

Web Title: social media election campaigning shows facts larger than actual
टॅग : Social Media
Next Stories
1 दयेचा अधिकार राष्ट्रपतींना नकोच!
2 हिंदू मानसिकता आणि फॅसिझम
3 इथे राजकारण ‘शिजते’!..
Just Now!
X