News Flash

सोलापूरची केळी आता परदेशात!

केळीच्या उत्पादनामुळे कंदर आणि परिसरातील शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात चांगली वाढ  झाली आहे.

करमाळा तालुक्यात केळी पिकाखाली सुमारे ३२०० हेक्टर जमीन आहे. यापैकी सुमारे दीड हजार हेक्टर जमीन या दहा गावात लागवडीखाली आहे.

रवींद्र राऊत

शेंगा चटणी, हुरडा, चादर, द्राक्षे आणि डाळिंब यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या सोलापुरातून आता के ळीचेही चांगलेच उत्पादन घेतले जाऊ  लागले आहे. सोलापुरातून केळी निर्यात होऊ  लागली आहे. सोलापूर जिल्ह्यातील या बदलत्या शेतीबाबतीत..

सोलापूरची चादर, सोलापूरची शेंगा चटणी, सोलापूरचे डाळिंब, सोलापूरची कडक भाकरी अशा अनेक उत्पादनात आता सोलापूरची के ळी असेही म्हणावे लागणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यात सध्या केळीचे उत्पादन मोठय़ा प्रमाणावर होत आहे. नुसते उत्पादनच नव्हे तर सोलापुरातून मोठय़ा प्रमाणावर के ळी निर्यातही होऊ  लागली आहे. यात आघाडीवर असलेल्या करमाळा तालुक्यातील कंदर आणि परिसरातील आठ ते दहा गावांत या केळीचे उत्पादन मोठय़ा प्रमाणावर होत असून आता येथील केळींची निर्यातही होऊ लागल्याने सोलापूर आणि केळी असे नवे नाते तयार झाले आहे.

करमाळा तालुक्यात केळी पिकाखाली सुमारे ३२०० हेक्टर जमीन आहे. यापैकी सुमारे दीड हजार हेक्टर जमीन या दहा गावात लागवडीखाली आहे. कंदर, वांगी, बिटरगाव, सांगवी, चिखलठाण, ढोकरी, सोगाव पूर्व, सोगाव पश्चिम, शेटफळ, शेलगाव आदी गावात केळीखालील पिकात गेल्या पाच ते दहा वर्षांत चांगली वाढ  झाली आहे. ऊ स दरातील अनियमितता, घटती उत्पादकता, केळी पिकामधून मिळणारे जास्त आणि शाश्वत उत्पन्न, उसाच्या तुलनेत लवकर पैसे मिळत असल्याने या परिसरातील तरुण शेतकरी केळी पिकाकडे वळला, असे राज्य शासनाच्या कृषी विभागाचे सहायक अनिल कांबळे यांनी सांगितले.

उसाच्या तुलनेत केळीच्या पिकातून जास्त उत्पन्न मिळते. केळीची एकदा लागवड केली की तीन ते चार उत्पादने घेता येतात. काही वेळेस सहा उत्पादने घेता येतात. त्यातच परिसरातील केळीची निर्यात होऊ  लागल्याने हमखास दरवाढ मिळाली. राज्य शासनाच्या माध्यमातून निर्यातीला मदत व्हावी, तांत्रिक ज्ञान देण्यासाठी निर्यात केंद्र स्थापन करण्यात आले आहे. या केंद्रात केळीच्या निर्यातीसाठी आवश्यक असणारम्य़ा सर्व प्रक्रियांचे प्रशिक्षण दिले जाते. केळीचा उत्पादन खर्च कसा कमी करावा, गुणवत्ता कशी राखावी, पॅकिंग कशाप्रकारे करावे, याबाबतचे प्रशिक्षण ‘आत्मा’च्या माध्यमातून दिली जातात. कृषी विभागामार्फ त परिसरातील शेतकऱ्यांना गुजरात, तामिळनाडू या राज्यात सहली आयोजित केल्या जातात, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी सांगितले.

कंदर आणि परिसरातील सर्व गावे उजनी धरणाच्या काठावर आहेत. त्यामुळे या सर्व गावातील शेती पूर्ण सिंचनाखाली आहे. केळी उत्पादनासाठी आवश्यक असणारे हवामान या परिसरात आहे. केळीच्या उत्पादनासाठी आद्र्रता ४५ टक्के लागते. मात्र उजनी धरणाच्या जलाशयामुळे या परिसरातील सर्व गावात ६५ टक्के आद्र्रता असते. या हवामानामुळे केळीचे उत्पादन तर वाढतेच, त्याचबरोबर केळीचा आकार आणि रंगही आकर्षक दिसतो, असे श्री. माने यांनी सांगितले.

कंदर आणि परिसरातून पाच ते सहा निर्यात केंद्रे आहेत. त्यामध्ये निर्यातदार किरण डोके आघाडीवर आहेत. बारावी उत्तीर्ण असलेल्या डोके यांनी ‘स्टार बनाना’ ब्रँड विकसित करून केळी निर्यात करण्यास सुरुवात केली. श्री. डोके यांनी १०० टन क्षमतेचे वातानुकू लित साठवण सुविधा केंद्र विकसित केले आहे. ‘सनस्टार ए—वन अ‍ॅग्री प्रोडय़ुसर’ कंपनीची स्थापना केली आहे. या कंपनीच्या माध्यमातून त्यांनी शेतकरी गट स्थापन केले. यामुळे गावात केळीखालील क्षेत्र वाढले. श्री. डोके यांनी केडी अ‍ॅग्रो प्रॉडक्ट कंपनीच्या माध्यमातून देशांतील केळी पाठवण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर अरब आणि युरोपीय देशांत निर्यात सुरू केली आहे. केळी निर्यात सुरू झाल्याने शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळू लागले आहेत, त्यामुळे केळी पिकाकडे येथील शेतकऱ्यांचा कल वाढत आहे, असे श्री. डोके यांनी सांगितले.

केळीच्या उत्पादनामुळे कंदर आणि परिसरातील शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात चांगली वाढ  झाली आहे. त्याचा परिणाम परिसरातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यात झाला आहे. उत्पन्नात वाढ झाल्याने शेतीमध्ये अत्याधुनिकता आली आहे, असे उपविभागीय कृषी अधिकारी रवींद्र कांबळे यांनी सांगितले.

कंदर आणि परिसरातील गावांत  सुमारे २००० हेक्टर जमिनीवर केळीची लागवड आहे. येथील केळी निर्यातक्षम असल्याने गुणवत्ता वाढीच्या दृष्टीने शासन आणि प्रशासनाने लक्ष दिले आहे. निर्यातक्षम केळीची वर्षभर मागणी असते. विशेषत: फेब्रुवारी ते जून महिन्यात मोठय़ा प्रमाणावर मागणी असते. यंदाच्या वर्षांत २१४० टन म्हणजेच सुमारे १०० कंटेनर केळीची निर्यात झाली आहे. केळी सौदे अरेबिया, अफगाणिस्तान, इराण, ओमान, कतार आणि रशिया आदी देशात निर्यात होतात. यामुळे येथील शेतकऱ्यांच्या जीवनमानात सुधारणा झाली आहे. या परिसरातील आर्थिक उलाढाल वाढली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी नुकतीच कंदर आणि परिसरातील गावांना भेट देऊ न केळी उत्पादकांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांनी कंदरच्या केळी व्यवसायाला प्रोत्साहन मिळावे यासाठी सर्व संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना एकत्रित घेऊ न विकासाचा आराखडा तयार केला जाईल, असे सांगितले.

पायाभूत सुविधा निर्माण व्हाव्यात

करमाळा तालुक्यातील विविध गावांतील जमीन आणि वातावरण केळी उत्पादनासाठी अतिशय चांगले आहे. येथून आणखी निर्यात वाढू शकते. मात्र या परिसरातील पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा होण्याची आवश्यकता आहे. रस्ते, पाणी, वीज वितरण आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटी यामध्ये सुधारणा होण्याची आवश्यकता आहे.

– प्रशांत चांदणे, केळी निर्यातदार

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 8, 2021 12:55 am

Web Title: solapur bananas in european market banana in solapur solapur banana export in abroad zws 70
Next Stories
1 शेतीपूरक मत्स्यउद्योगातील नवे तंत्रज्ञान
2 इच्छा प्रामाणिक असेल तर युतीप्रमाणेच आघाडीही टिकेल
3 राज्यावलोकन : भाजपपुढे दुहेरी आव्हान…
Just Now!
X