आशुतोष शेवाळकर

गेल्या काही दिवसांत एका विचारी माणसानं केलेल्या नोंदींचा हा संपादित अंश..

काळजी किती आणि कशी करायची याची चर्चा उपस्थित करणारा..

मी वैद्यकीय पेशात नाही. पण  जे पाहातो, ऐकतो, वाचतो त्यातून मिळालेल्या माहितीचा विचार मात्र करू शकतो, त्यामुळेच जे वाचलं, ऐकलं त्यातून हे काही प्रश्न निर्माण होतात. कदाचित हे आपणा  साऱ्यांचेच प्रश्न असतील..

इंडियन मेडिकल कौन्सिलने ‘लॉकडाउन’ पूर्वीच्या पत्रकार परिषदेत करोना विषाणूचं संक्रमण झालं तरी ८० टक्केलोकांना काहीच त्रास होणार नाही, तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीनेच तुम्ही त्यावर मात करू शकाल, २० टक्के लोकांना कफ सर्दी, खोकला व ताप येईल आणि यातल्या पाच टक्के लोकांना ‘लाइफ सपोर्ट’ ची गरज पडू शकेल असं जाहीर केलं होतं. ‘लाइफ सपोर्ट’ म्हणजे ‘व्हेंटिलेटर’ व फुफ्फुसांशी निगडित हा विकार असल्यामुळे रोग्याचं फुफ्फुसामधलं ‘इन्फेक्शन’ प्रमाणाबाहेर वाढलं तर कृत्रिम श्वसनाद्वारे फुफ्फुसांना आराम देऊन ते दुरुस्त करण्यासाठी फक्त तो लागत असावा असा मी हे वाचून अंदाज केला होता. ‘व्हेंटिलेटर’ लागले म्हणजे शेवटचा प्रवास अशी जी आपली ‘व्हेंटिलेटर’ विषयी सर्वसाधारण कल्पना आहे, तसा तो प्रकार नसावा असंही मला वाटलं.

शिवाय, संसर्ग होऊनही ‘काहीच त्रास न झालेले’ ८० टक्केलोक हे ‘कॅरियर्स’ असतात का? त्यांच्यापासून इतरांना संसर्ग होऊ शकतो का? असा संसर्ग होऊ शकण्याचा धोका किती दिवस पर्यंत असतो? या प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत.  ८० टक्केलोकांना काहीच त्रास होणार नाही आणि २० टक्के लोकांपैकी पाच टक्क्यांनाच अधिक त्रास होणार असेल तर मग आपण या रोगाला एवढे घाबरतो का आहोत?

करोनाचा मृत्युदर हा याआधी येऊन गेलेल्या सार्स इत्यादि विषाणूच्या मृत्युदरापेक्षाही कमी म्हणजे दोन टक्केच असल्याचंही दहा दिवसांपूर्वीपर्यंत सांगितलं जात होतं. संख्याशास्त्राच्या अशा अंदाजात घराबाहेर पडल्यावर रस्ते-अपघातात मरण्याची शक्यतादेखील दोन टक्केअशीच सांगितली जाते. मृत्यूची शक्यता इतकी कमी असतानाही याचं एवढं मग ‘पॅनिक’ का केलं जात आहे हे कळलं नाही.

पंतप्रधान, मुख्यमंत्री यांची सततची निवेदनं, पोलिसांची दहशत, मीडिया वरच्या बातम्या, सोशल मीडिया वरच्या पोस्ट्स हे या फुरसतीच्या दिवसात सतत बघण्याने हे प्रकरण निश्चितच काहीतरी गंभीर असाव अशी भावना दर वेळीच होते आणी मन पुन्हा गोंधळात पडतं. आपल्याला त्रास होण्याची शक्यता कमी असली तरी या संसर्गाने वृद्ध आणि मुलांना धोका होऊ शकतो,  त्यांच्यासाठी आपल्याला असं उद्योगधंदा सोडून घरी बसणं आवश्यकच आहे असं स्वत:ला समाजावणं मग भाग पडतं.

करोनाचा विषाणू हा थुंकी, शेंबूड यांच्यामधून संसर्गाने पसरू शकतो असंच सगळीकडे सांगितलं जात आहे. हा प्रत्यक्ष संसर्ग टाळायला एक मीटरचं अंतर राखायचं असंही सांगितलं जात आहे. संसर्गित व्यक्तीचे हे ‘ड्रॉपलेट्स’ उडून कुठे पडले असतील व त्याला आपला हात लागला व तोच हात चुकून आपल्या नाकातोंडाला लागला तर हा अप्रत्यक्ष संसर्ग होऊ शकतो. व त्यासाठी सतत हात धुण्यासाठी सुद्धा सांगितलं जातं आहे. पण ‘प्रत्यक्ष संसर्गा’पेक्षा अशा अप्रत्यक्ष संसर्गात लागण होण्याची शक्यता स्वाभाविकच कमी होत असेल ना? कुठल्याही विषाणूचं आयुष्य ७२ तासांपेक्षा जास्त नसतं असं आधुनिक वैद्यकशास्त्र सांगतं. विषाणू अन्य कुठल्या सजीव पेशींखेरीज जिवंत राहात नाहीत, मग अशा वेळी मानवी पेशीपासून संबंध तुटलेला विषाणू निर्जीव पृष्ठभागावर काही तास तग तरी कसा काय धरू शकत असेल? आणि तरीही सगळीकडे इमारतींचं सॅनिटायझेशन, विविध पालिका/ महापालिकांच्या फवाऱ्यांनी रस्ते धुणे कशासाठी सुरू आहे?

आता नुकत्याच आलेल्या अहवालानुसार भारतातल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णामध्ये ९० टक्के लोकांमध्ये काहीच लक्षणं आढळलेली  नाहीत, फक्त १० टक्के लोकांमध्ये सर्दी, खोकला व कफ अशी लक्षणं आढळली आहेत. याचा अर्थ खूप पसरणारा पण जिवाला फारसा धोका नसणारा असा हा साथीचा आजार आहे का? आणि तो तसा असेल तर मग त्याला इतकं आपण का घाबरायचं?

आमच्या लहानपणी डोळे येण्याची साथ जवळपास दरवर्षीच येत असे. हासुद्धा असाच जलद गतीने पसरणारा अति संसर्गजन्य रोग असेल, तर?  गावातल्या प्रत्येकाचेच एकदा तरी डोळे येऊन जात, कुणाकुणाचे तर या काळात दोनदासुद्धा डोळे येत. पण या साथीने कुणाचे डोळे गेल्याचं कधी ऐकलेलं नाही, किंवा कोणाला चष्मा लागण्यासाठी डोळे येणं (कन्जेक्टिव्हायटिस) हे कारण ठरल्याचं सुद्धा ऐकलेलं नाही.

हा ‘करोना’ जे काही असेल ते असो पण आता एकतर हा इतर साथीच्या रोगांसारखा तीन-चार महिन्यांत निघून जाईल.. किंवा कदाचित तो कायमस्वरूपी राहायलाच आलेला असेल, तर आता काही कायमस्वरूपी इलाज त्यावर शोधून काढल्याशिवाय आपल्याला तरणोपाय नाही. हा कायमस्वरूपी उपाय म्हणजे एकतर याच्या प्रतिबंधाची काही लस किंवा याच्या प्रादुर्भावानंतर आपल्या शरीरातल्या या जंतूंना मारू शकणारं काही औषध. कायमस्वरूपी हा आलेला असल्यास, हा रोग धोक्याचा असला वा नसला तरी ‘देवीचा रोगी कळवा, एक हजार रुपये मिळवा’ सारखा याचा पूर्ण नायनाट केल्याविना आता आपल्याला गत्यंतर नाही.

आणि असं करण्यासाठी पहिल्या टप्प्यातली लढाई कदाचित तुलनेने सोपी असली, तरी दुसऱ्या टप्प्यातली लढाई एवढय़ा मोठय़ा व्याप्ती व लोकसंख्येमुळे आपल्यासाठी दीर्घकालीन असणार आहे. आणि अशा दीर्घकालीन लढाईच्या या दुसऱ्या टप्प्याच्या वेळी सध्याची आपली इतकी ‘हाइप’ व ‘ओव्हररिअ‍ॅक्शन’ यांनी आपली ‘लांडगा आला रे आला’ सारखी गत होऊ शकते. दीर्घकालीन लढाईसाठी एवढया मोठय़ा लोकसंख्येचा धीर, पेशन्स  टिकवायचा असेल, तर सुरुवातीचा असा अतिरेक आपल्या अंगलट येऊ शकतो. जे काही असेल ते असो पण सध्याचं आपल्या देशाचं वातावरण हे ‘गणपती दूध पितो..’ च्या दिवसाची आठवण करून देण्यासारखं आहे, हे मात्र खरं.

ashutoshshewalkar@gmail.com