एन. के. सिंह 

१५ व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष

‘कुठल्याही व्यक्तीच्या जीवनातील पहिली ४० वर्षे ही आयुष्याच्या पाटीवरील धुळाक्षरे गिरवण्यात जातात, आयुष्याचा आशय त्यात घडत जातो. नंतरची ३० वर्षे या आशयाला भाष्याचे रूप देऊन आपल्या आयुष्याला खरा अर्थ प्राप्त करून देतात,’ असे एकोणिसाव्या शतकातील प्रसिद्ध तत्त्वज्ञ आर्थर शोपेनहॉवर यांनी एके ठिकाणी म्हटले आहे. शोपेनहॉवर यांची अनेक सुवचने ही मानवी जीवनाचा अर्थ अर्करूपात मांडणाऱ्या वाक्यांनी परिपूर्ण आहेत, त्यातील हे एक. एका अर्थाने शोपेनहॉवरने जे म्हटले आहे ते भारतीय तत्त्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून पाहिले तर आपल्या भोवतीचे हे मायाजाल आपणच म्हणजे माणसांनी तयार केलेले आहे. त्याचा अर्थही लावण्याचा आपला प्रयत्न नेहमीच असतो. त्या अर्थाने चाळिशीनंतरच्या काळात माणूस अनुभवाने परिपक्व होत जातो. त्याच्या जगण्याला जो अर्थ प्राप्त होतो तो हा काळ असतो. वयाची सत्तरी म्हणजे अनुभवाची मोठी शिदोरी त्या व्यक्तीजवळ असते. त्यातून आपल्याला जगण्याच्या आशयातील नैतिकता व सौंदर्यस्थळे जास्त स्पष्टपणे दिसू लागतात. मागे वळून पाहताना एक भूतकाळाचे मनोरम पण अर्थगर्भ चित्र मोठय़ा कालपटाच्या रूपात आपल्यासमोर येते. सत्तरीच्या शिखरावरून पाहताना आपल्याला स्वत:च्या आयुष्याच्या अंतरीचा ठाव घेता येतो व तो जास्त अनुभवसंपन्न असतो.

हे जीवनाचे सार निश्चितच प्रत्येक माणसासाठी महत्त्वाचे आहे; पंतप्रधान नरेंद्र मोदीही त्याला अपवाद नाहीत. गुरुवारी (१७ सप्टेंबर) ते वयाची सत्तरी पूर्ण करीत आहेत. देशातच नव्हे तर जगातही वेगाने बदल घडत आहेत. ते बदल अर्थहीन नाहीत. त्यांना जोखीम व संधी अशा दोन बाजू आहेत, त्यामुळे सर्व आघाडय़ांवर जशी आव्हाने आहेत तशा संधीही खुणावत आहेत. अशा काळात पंतप्रधान मोदी वयाची सत्तरी पूर्ण करीत असताना त्यांना कालगतीचे पूर्ण भान आहे, यात शंका नाही. त्यांची शैली साधी सरळ आहे. छोटय़ा-मोठय़ा गोष्टींची आठवण ठेवणारी त्यांची स्मरणशक्ती तल्लख आहे. सभोवती कोलाहल असला तरी त्यातून नीरक्षीर विवेकाने कामांची अंमलबजावणी करण्याची त्यांची तीक्ष्ण हातोटी वेगळीच आहे. त्यांनी सूक्ष्म व्यवस्थापनाने जे काही साधले त्याची अनेक उदाहरणे आहेत. नर्मदा प्रकल्पात गुरुत्वाविरुद्ध पाणी फिरवून कच्छच्या तहानलेल्या जनतेच्या ओंजळी त्यांनी ‘जीवना’ने भरल्या. ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’चा पुतळा ही त्यांची कल्पनाही पुढील पिढय़ांना प्रेरणा देणारी आहे.

ते सत्तर वर्षांचे असले तरी त्यांच्यासाठी हे निवृत्तीचे वय नक्कीच नाही. वर्तमानाचे जे आकलन त्यांना आहे त्याच्या माध्यमातून ते भविष्याचा वेध घेताना भविष्यकाळाच्या शिखराला साद घालू शकतील एवढी ताकद त्यांच्यात आहे. जे लोक भूतकाळाकडे बघत बसतात त्यांचे भविष्याकडे दुर्लक्ष होते, पण मोदींच्या बाबतीत तसे नाही. ते भूत व भविष्य या दोन्हींचा योग्य तो समन्वय असलेले नेते आहेत. आपल्या भोवतीचे जग हे गुंतागुंतीचे आहे. त्या वाटचालीत अनेक अडथळे असतात. अनेक बदलांना सामोरे जावे लागते. ते ठरावीक नसतात, त्यात ते एकमेकांशी निगडित व एकमेकांत गुंफलेले असतात, त्यामुळे हे बदल पेलणे हे आव्हानात्मक असते. किंबहुना ते जीवनाचे अपरिहार्य सत्य आहे. पहिल्यांदा एका टोकावर असताना दुसरे शिखर खुणावते, नंतर तिसरे, मग एखादे सर्वोच्च शिखर.. अशी ही वाटचाल. पण ही शिखरे गाठताना मोदी यांनी प्रत्येक टप्प्यावर एक अनुभवाचे संचित गाठीशी बांधले आहे. त्यामुळेच ते कमालीच्या क्षमतेने दूरगामी दृष्टी ठेवून देशासाठी काम करू शकले.

भविष्यावर नजर ठेवून त्यांची काम करण्याची हातोटी अनोखीच. मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीत याचा प्रत्यय अनेकदा आला आहे. स्वच्छ भारत अभियान, प्रधान मंत्री उज्ज्वला योजना ही त्यांनी सुरू केलेल्या दोन योजनांची उदाहरणे. दोन्हीही सर्जनशील, दूरदृष्टीच्या योजना. या योजनांत त्यांनी अनेक गोष्टी साध्य केल्या; एक तर देशाचे आरोग्य व उत्पादनशीलता सुधारण्यासाठी यातून प्रयत्न झाला. चुलींमुळे होणारा धूर, त्यामुळे आरोग्याची हानी व पर्यावरणाची हानी होत होती. हे दोन्ही धोके उज्ज्वला योजनेत टाळले गेले. महिलांचे आरोग्य सुधारण्यात हे मोठे पाऊल होते. उघडय़ावर शौचास जाण्याची एक सवय व सॅनिटरी नॅपकिन या दोन गोष्टी सामाजिक पातळीवर दबक्या आवाजात बोलण्याचा विषय होता, पण त्या दोन्ही गोष्टी आरोग्याशी संबंधित असल्याने त्याची उघड चर्चा करून मोदी यांनी सार्वजनिक आरोग्य सुधारणेत मोठी क्रांती केली असेच म्हणावे लागेल. घरात शौचालय बांधणे व महिलांना मासिक पाळीसाठी उत्तम दर्जाचे सॅनिटरी पॅड्स कमी दरात उपलब्ध करून देणे या दोन्ही गोष्टींना त्यांच्यासारख्या उच्च पदावरील नेत्याने महत्त्व दिल्याने समाजात योग्य तो संदेश गेला. त्यामुळेच आज अनेक गावे हागणदारीमुक्त झाली आहेत. ग्रामीण घरांमध्येही शौचालये आहेत. अशिक्षित महिला-मुलींनाही सॅनिटरी पॅड्समुळे मासिक पाळीतील आरोग्याचे महत्त्व पटले आहे. आर्थिक सुधारणांतही त्यांनी दमदार पाऊल टाकले ते ‘प्रधानमंत्री जनधन योजने’तून. बँकिंगच्या पातळीवर दिवाळखोरी व नादारी संहिता आणून एकीकडे बँकिंग सेवा  शेवटच्या माणसापर्यंत नेली, शिवाय बँकांचा आर्थिक पाया मजबूत केला. जे जग त्यांना अपेक्षित होते त्यातील मूलभूत अडथळे दूर करण्याची असोशी या प्रत्येक योजनेतून दिसून येते.

भविष्याचा वेध घेताना त्यांनी तीन नव्या गुंतागुंतीच्या गोष्टींच्या वास्तवाचे भान ठेवले. वेगाने होणारे पर्यावरण बदल, विविध घटक, व्यक्ती तसेच प्रदेश यांच्यातील बदलत चाललेला समतोल, चौथ्या औद्योगिक क्रांतीतून अवतरलेली डिजिटल क्रांती, त्यानंतर कृत्रिम बुद्धिमत्तेपर्यंत विस्तारलेला आयाम. आपली पृथ्वी आता वेगाने मानवी कृतींमुळे होणाऱ्या परिणामांच्या प्रभावाखाली येत आहे. तापमान, पाऊसमान, अन्न व पाणी सुरक्षा, जैवविविधता या अनेक गोष्टींत त्याचे प्रत्यंतर येत आहे. समाज, पर्यावरण, अर्थव्यवस्था, पायाभूत व्यवस्था, व्यक्तिगत आयुष्य यांचे आपण अगदी धागे निघेपर्यंत विश्लेषण करू शकतो, त्याचे अनेक पैलू उकलू शकतो, त्यातून कुठल्याही परिस्थितीतून उभे राहण्याची क्षमता उलगडते. मोदी यांनी डिजिटल क्रांतीचा उपयोग समाजासाठी सर्वंकषपणे करून घेतला. त्यातून सामुदायिक सुरक्षितता आणली. सायबर सुरक्षेची अनेक आव्हाने असताना आपण त्याच्याशी कसे जुळवून घेणार आहोत, हा प्रश्न आपल्या रचनात्मक व्यवस्थांमधील बदलांवर प्रभाव टाकणारा आहे. मोदी यांचा ‘प्रगती’ म्हणजे ‘प्रोअ‍ॅक्टिव्ह गव्हर्नन्स अँड टाइमली इम्प्लिमेंटेशन’वर विश्वास आहे. देशाच्या प्रगतीसाठी ते करीत असलेल्या प्रयत्नांचा तो गाभा आहे.

मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्याव्यात, की त्यांना विनंती करावी असा प्रश्न पडला तर त्यात मी त्यांना विनंती करणेच पसंत करेन. सत्तरीपर्यंतचे जे संचित त्यांच्याकडे आहे ते वयाच्या ८० व्या वर्षांकडे पदार्पण करतानाच्या दहा वर्षांत त्यांनी अधिक चांगल्या प्रकारे वापरावे अशी माझी इच्छा आहे.

आगामी काळातील नेतृत्वाकडे तीन गुण असणे आवश्यक आहे हे तेही मान्य करतील. एक म्हणजे भूतकाळ लक्षात ठेवताना वर्तमानकाळाचा स्वच्छ विचार. आपण सध्या भूराजकीय परिस्थितीच्या अगदी नाजूक स्थित्यंतरातून वाटचाल करीत आहोत. आपल्या पूर्वीच्या आघाडय़ा व एकमेकांशी संबंध हे आंतरराष्ट्रीय पातळीवर महत्त्वाचे आहेत. आधीचे मित्र हे मित्रच, पण नवीन काळात वाटचाल करताना नवीन भागीदाऱ्या उभ्या कराव्या लागतील. नवी जागतिक आव्हाने पेलताना भारताला पुढाकार घेऊन काही गोष्टी कराव्या लागतील, त्यात नवीन उपक्रम असतील. त्यासाठी अतिशय स्पष्ट अशी दृष्टी हवी. मी ही जी गोष्ट सांगतो आहे ती अंतर्गत व बाह्य़ अशा दोन्ही पातळींवर लागू आहे. आपल्याला नवीन सहकाऱ्याच्या भागीदाऱ्या जशा आंतरराष्ट्रीय पातळीवर उभारायच्या आहेत तशाच केंद्र व राज्य तसेच स्थानिक प्रशासनातही भागीदारीचे समन्वयाचे सेतू उभारावे लागतील.

मोदी यांच्यासारख्या नेत्याला वास्तवाच्या मर्यादांचे भान ठेवून मार्ग कसा काढावा याचे कौशल्य चांगलेच आत्मसात आहे. त्याच वेळी अनेक अवघड पर्यायांतून उत्कृष्ट पर्याय निवडण्यासाठी इतरांना प्रेरित करण्याचा गुणही आहे.

कोविड १९ महामारीमुळे आपण जगाने कधी न पाहिलेल्या सर्वात मोठय़ा आर्थिक उलथापालथीच्या उंबरठय़ावर आहोत. कोविड १९ साथ रोखताना आपण केलेले प्रयत्न हे अस्वस्थतेचा प्रवाह थांबवू शकले नाहीत. त्यातून अनेक आव्हाने सामोरी आली आहेत. पंतप्रधान मोदी हे वास्तव नजरेआड करणार नाहीत व देशवासीयांना आशेचा किरण दाखवतील ही अपेक्षा आहे. शेवटी, आज आपल्याला एका ऊर्जेने उत्फुल्ल असलेला नव्या दृष्टिकोनाचा नेता हवा आहे. त्यामुळे आपला देश संधी व जोखीम या दोन्हींनी परिपूर्ण असलेल्या भविष्यकाळात यशस्वी वाटचाल करू शकेल. गेली अनेक शतके आपल्या देशाचा पाया आनंद, सौंदर्य, वैश्विक मानवता यावर आधारित आहे, हे आपले पंतप्रधान जाणतात; म्हणूनच दूरच्या क्षितिजाक डील त्यांची वाटचाल सोपी होईल. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!