सध्या सगळीकडे एक कप्पेबंदपणा दिसत आहे. देश स्वतंत्र झाला तेव्हा भारतीयत्वाची भावना प्रबळ होती. आता प्रादेशिक सीमांमध्ये लोक अडकत आहेत की काय अशी परिस्थिती आहे. काही दिवसांपूर्वी ईशान्य भारतात मोठा हिंसाचार झाला. हजारो लोकांना विस्थापित व्हावे लागले; पण त्याबद्दलची सह-अनुभूती देशाच्या इतर भागांत म्हणावी तशी दिसली नाही. ईशान्य भारत धगधगत आहे. तेथील साहित्यातून ही धग प्रकट होत आहे. सध्या मी वाचत असलेल्या साहित्यांत सर्वात अधिक खदखद ईशान्य भारतातील साहित्यात दिसून येत आहे. तेथील सामाजिक-राजकीय परिस्थितीचा हा परिणाम आहे. देशाच्या इतर भागांत मात्र त्याचे काहीच पडसाद उमटत नाहीत हे कसे? फाळणीच्या बाबतीतही मला हाच प्रश्न पडतो. फाळणीच्या वेळी निर्माण झालेल्या परिस्थितीचे प्रतिबिंब पंजाबी-बंगाली साहित्यांतच प्रामुख्याने दिसते. मला आश्चर्य वाटते, फाळणी या देशाची झाली होती ना? की केवळ पंजाब व बंगाल या प्रांतांची? मग देशातील इतर राज्यांतील लोकांना त्या घटनेबाबत लिहावे असे का वाटले नाही? केवळ साहित्य-कला या क्षेत्रांतच नाही, तर नागरिक म्हणूनसुद्धा आपल्यात भारतीयत्वाची भावना असली पाहिजे. राज्याच्या सीमांमध्ये आपले भारतीयत्व हरवता कामा नये. राज्य-भाषा या सर्व भिंती तोडायला हव्यात. मी मुंबईहून कन्याकुमारी, काश्मीर, गुजरात, अरुणाचल प्रदेशपर्यंत अनेकदा भारत पालथा घातला आहे. खूप सुंदर देश आहे हा. खूप मोठा देश आहे, खूप समृद्ध देश आहे आपला! दक्षिणेकडील नावाडी आणि बंगालमधील नावाडी यांच्यातील गाण्याच्या सुरावटींमध्ये खूपच साधम्र्य आहे. अनेकदा मी एक दिवास्वप्न पाहतो. देशाच्या प्रत्येक राज्यात स्थानिक रहिवासी सोडून इतर राज्यांमधील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची सोय आहे, जागा राखीव आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील तरुण पंजाब, आसाम, तामिळनाडूत जाऊन शिक्षण घेत आहेत. तिकडचे विद्यार्थी असेच दुसऱ्या राज्यात जात आहेत. तारुण्यसुलभ भावनांनी विद्यार्थी-विद्यार्थिनी एकत्र शिकता शिकता एकमेकांत गुंतत आहेत. त्यातून केवळ जात-धर्मच नव्हे, तर भाषा-प्रांत या सगळय़ा सीमा ओलांडून आंतरप्रांतीय विवाह होत आहेत आणि देशातील पुढची पिढी खऱ्या अर्थाने भारतीय म्हणून जन्म घेत आहे. हे सर्व होईल की नाही सांगता येत नाही; पण निदान आपण भाषा-प्रांत यात विखुरले न जाता भारतीयत्व जपले पाहिजे..

vv01

गुलजार, अतिथी संपादक.