संपादक म्हणून मौज व सत्यकथेतील लेखक हेरणारे, ‘मौज प्रकाशना’तर्फे उत्तमोत्तम पुस्तके वाचकांना देणारे आणि अनेकांना साहित्यमूल्यांची ओळख करून देणारे राम पटवर्धन यांचा आज पहिला स्मृतिदिन. प्राध्यापक आणि सव्यसाची संपादक म्हणून पटवर्धनांबद्दल अनेकांनी लिहिले, परंतु ‘घरातले’ पटवर्धनसुद्धा साहित्यिकांशी संवादामुळे आणि त्यातून सृजनाला फुटलेल्या वाटांमुळे आठवावेत, असे त्यांचे संचित. या संवाद-संचिताची संगती लावताहेत त्यांच्या पत्नी आणि साहित्यप्रवासातील साक्षीदार..

साधारण गणपती गेले की, सत्यकथा आणि मौजच्या दिवाळी अंकांच्या हालचाली सुरू व्हायच्या आणि सामग्री जमा करण्यासाठी पटवर्धनांची कागदपत्र जमा करण्याची व एकत्र बांधून ठेवण्याची तयारी सुरू झाली की, दिवाळी अंकाची चाहूल आम्हाला लागायची. काही लेख, कथा आणि कविता या आधीच कधीतरी आलेल्या असायच्या आणि त्या दिवाळी अंकांसाठी राखून ठेवलेल्या असायच्या. त्या सर्व रबराने बांधून खुणेने ठेवलेल्या असायच्या. ती सर्व पुडकी पटवर्धन काढून बसायचे.
वसंत पळशीकरांनी लेख पाठविलेला असायचा. त्या लेखाच्या समासामध्ये अनेक प्रकारच्या शंका काढणारे व प्रश्न निर्माण करणारे शेरे मारून आणि त्यासोबत एक मोठे पत्र पटवर्धन लिहून त्या लेखासोबत पोस्टाने पळशीकरांना पाठवायचे. अशा पद्धतीने पटवर्धनांकडून तो लेख परत आला की, पळशीकरांच्या लक्षात यायचे की, आता स्वत: जाऊन, पटवर्धनांसमोर ठाण मांडून बसल्याशिवाय लेख पूर्ण होणे शक्य नाही. साधारण पितृपक्षाच्या/ नवरात्रींच्या आसपास पळशीकर मुंबईमध्ये डेरेदाखल व्हायचे. सोबत एक मोठ्ठी शबनम झोळी, अंगावर खादीचा लेंगा-झब्बा असे उंचेपुरे, गोरेपान, मोठा काळ्या काडय़ांचा चष्मा लावलेले पळशीकर चुनाभट्टीला आले की, माझी लगबग व्हायची. कारण लेखामधील विचारांचा आवाकाही मोठा आणि कागदांचा पसाराही मोठा. त्यानंतर आमच्या चुनाभट्टीच्या डबलरूममध्ये तो सर्व लेख उलटासुलटा चर्चित व्हायचा. चर्चा करताना पटवर्धनांचा आवाज वरच्या ‘सा’ला असायचा आणि पळशीकरांचा आवाज जरी खालच्या ‘सा’ला असला तरी ते पटवर्धनांचे सर्व वैचारिक हल्ले परतवायला सज्ज असायचे. दोन-तीन दिवस पळशीकर राहायचे आणि लेख पूर्ण करूनच परतायचे. पळशीकरांबद्दल आधी-आधी खूप दबदबा वाटायचा; परंतु साधी राहणी आणि घरात जी व्यवस्था असेल ती आनंदाने चालवून घेण्याची तयारी या त्यांच्या स्वभावामुळे पळशीकर घरातले कधी झाले हे आम्हालाही कळले नाही.
पळशीकरांसारखेच आणखी एक लक्षात राहणारी व्यक्ती म्हणजे र. कृ. जोशी. रकृ त्यांच्या गाडीने फोर्टमधील त्यांच्या ऑफिसमधून चेंबूरच्या त्यांच्या घरी जाता-जाता सत्यकथेवरील मुखपृष्ठाची प्रत आमच्या चुनाभट्टीच्या घरी ठेवायला यायचे. रकृंची सत्यकथेवरील अनेक मुखपृष्ठे, मुख्यत: आणीबाणीच्या काळातली मुखपृष्ठे त्या वेळी खूप गाजली होती. वसंत पळशीकरांसारखेच त्यांचेही व्यक्तिमत्त्व एकदम वेगळे. ते त्यांच्याच जगात असायचे आणि त्यांच्या वेगवेगळ्या अ‍ॅक्टिव्हिटींबद्दल सतत बोलत असायचे. मराठी भाषा लिपी सुधारणे हा रकृंचा जिव्हाळ्याचा विषय. त्यामुळे ठणठणपाळमध्ये त्यांचा उल्लेख ‘रकरू’ असा असायचा.
पटवर्धनांच्या साधारण इंटरअ‍ॅक्शनवरून माझ्या लक्षात यायला लागले की, पटवर्धनांकडे साधे, सरळ आणि कसदार लिखाण लिहून घेण्याची हातोटी होती. कथेतील व लेखांमधील नको ती वळणे ते अतिशय सहनशक्ती वापरून लेखकांकडून दूर करून घ्यायचे. लेखकांना साधारणपणे त्यांचा हस्तक्षेप आवडत नसे; परंतु होता होईल तो लेखकांचे मन राखून कथा/लेखात योग्य तो बदल पटवर्धन खूप कष्टपूर्वक करून घ्यायचे. काही अपवाद सोडता. आलेले चांगले कसदार साहित्य पटवर्धनांनी हातातून जाऊ दिले नाही. त्यामुळे सत्यकथेचा प्रत्येक महिन्याचा अंक चांगल्या साहित्याने भरलेला असायचा.
सत्यकथा मासिक व मौज वार्षिक हे एखाद्या चांगल्या शाळेसारखे होते. जशी चांगल्या शाळेमध्ये मुळात हुशार मुलेच येतात आणि खूपशा वेळा त्यांच्या स्वत:च्याच हुशारीवर चांगले मार्क मिळवून शाळेचे नाव आणखीन चांगल्या उंचीवर नेऊन ठेवतात तसे काहीसे व्हायचे. जी. के. कुलकर्णी, अनिल अवचट, संभाजी कदम, सरोजिनी वैद्य, विलास सारंग, सानिया, अजिता काळे, विद्युल्लेखा अकलुजकर, आशा बगे, यशवंत पाठक, ऊर्मिला शिरूर, तसेच कवितांच्या प्रांतातली शांता शेळके, शंकर वैद्य ही मला सहज आठवणारी काही नावे या संदर्भात घ्यावीशी वाटतात. अशा लोकांचे आलेले लिखाण फारशा बदलांशिवाय पटवर्धनांनी छापल्याचे मला आठवते. साधारणपणे लेखामध्ये/ कथेमध्ये बदल करण्याचा पटवर्धनांचा कल नसायचा; पण उत्कृष्ट कथाबीज व वैचारिक बीज असलेले; परंतु नीट प्रेझेंटेशन नसलेले लिखाण बदलून घेऊन ते संपृक्त करून घेतल्याशिवाय छापायचे नाही, असे पटवर्धनांचे मत असावे.
बाळ ठाकूर आमच्याच सोसायटीमध्ये राहायचे आणि त्यांची अनेक सुरेख रेखाचित्रे सत्यकथा मौजमध्ये असायची. त्यांच्याबरोबरच्या पटवर्धनांच्या चर्चा घरातले काम करीत करीत ऐकताना मला जाणवायचे की, पटवर्धनांना चौफेर दृष्टी होती आणि चित्रकलेसकट अनेक विषयांमधील नवीन नवीन प्रयोगांबाबत त्यांची माहिती अद्ययावत. याशिवाय पटवर्धनांचे टाइम, न्यूजवीक, इकॉनॉमिस्ट आणि टाइम्स ऑफ इंडिया यावरही बारीक लक्ष असायचे आणि मराठी साहित्याव्यतिरिक्त अनेक प्रकारच्या जागतिक गोष्टींबाबत विशेषत: आर्थिक आणि राजकीय घटनांबाबत माहिती त्यांना असायची. त्यामुळे अनेक वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या, त्याचबरोबर मराठी साहित्याचीही गोडी असलेल्या लोकांशीही ते चर्चा करण्यात रमायचे. विश्वनाथ खैरे हे मौजचे लेखक अशाच प्रकारे झाले. ते मुळात इंजिनीअर, नोकरी पीडब्लूडीमध्ये, आणि व्यासंग वेगवेगळ्या भाषांमधील साधम्र्य शोधण्याचा. पटवर्धनांबरोबर चर्चा करता-करता खैरे मौजचे लेखक झाले आणि पटवर्धनांचे मित्रही.
यशवंत पाठक खैऱ्यांपेक्षा वेगळ्या पठडीतले. पटवर्धनांना सहज भेटायला आलेले असताना वारकरी संप्रदाय, कीर्तनकारांचे वेगवेगळे संप्रदाय, नाशिक तीर्थक्षेत्रामधील शास्त्री लोकांची परंपरा या सगळ्या गोष्टीवर चर्चा करता-करता, गप्पागप्पांमध्ये ते मौजचे लेखक झाले आणि एक वेगळेच जग मराठी वाचकांसमोर आले.
अशोक रानडे हे आणखी एक उदाहरण. पटवर्धनांना शास्त्रीय संगीताबाबतही कळते आणि गप्पांमध्ये रस आहे हे कळल्यावर त्यांच्या मौजमधल्या फेऱ्या वाढल्या आणि त्यांचे हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताबद्दलचे अनेक माहितीपूर्ण लेख सत्यकथा/ मौजमध्ये आल्याचे मला स्मरते. श्री.दा. पानवलकर कस्टम्स आणि डॉक्समध्ये कस्टम्स् ऑफिसर आणि साहित्यवेडे. पटवर्धनांकडे त्यांच्या फेऱ्या नेहमीच असायच्या. त्यांच्या मुंबई डॉक्समधील अनुभवांवर आधारित कितीतरी कथा सत्यकथेमध्ये आल्या आणि गाजल्या.
आणखी एक वेगळेच उदाहरण म्हणजे प्रभाकर जोशी. अर्थशास्त्रातील त्यांची पदवी आणि एका मोठय़ा वित्तविषयक कंपनीमध्ये मोठय़ा हुद्दय़ावर. प्रोफेसर सुधा जोशींमुळे ते पटवर्धनांच्या ओळखीचे झाले आणि पटवर्धनांच्या बरोबर गप्पा मारायला ते आमच्या चुनाभट्टीच्या घरी घाटकोपरहून यायचे. गप्पा चालायच्या भारताचे अर्थकारण, भारताच्या पुढचे आर्थिक प्रश्न आणि वित्तपुरवठय़ाबाबत निर्णय घेताना त्यांना येणारे अनुभव. गप्पा मारता-मारता त्या ओघामध्ये स्वत:चे बालपण, पोरकेपणा आणि पुण्याच्या अनाथ विद्यार्थीगृहामधील त्यांच्या अनुभवांबाबत ते पटवर्धनांशी बोलले आणि अनाथ विद्यार्थीगृहामधल्या त्यांच्या अनुभवांबाबतचा एक लेख आणि सरकारची आर्थिक धोरणे आणि सामाजिक जाणिवा यांची सांगड कशी घालता येईल याबाबतचे त्यांचे दोन लेख पटवर्धनांनी सत्यकथा/ मौजमध्ये छापले.
मारुती चित्तमपल्ली फॉरेस्ट ऑफिसर. रानावनातल्या त्यांच्या आठवणी मौजच्या कार्यालयात गप्पा मारताना सांगायचे आणि तो धागा पकडून पटवर्धनांनी त्यांच्याकडून अनेक लेख लिहून घेऊन जंगलामधील जग मराठी वाचकांसमोर आणले.
अनुवादांच्या क्षेत्रातील पटवर्धनांचे काम आणि कौशल्य पाडसमुळे आणि चेकॉव्ह वगैरे रशियन लेखकांच्या कथांमुळे तुमच्या माहितीत आलेच आहे. पटवर्धनांचा असा कटाक्ष असायचा की, अनुवादाला त्या मातीचा वास असला पाहिजे आणि ‘पाडस’ वाचताना तो मीही अनुभवला आहे.
पटवर्धनांना अनेक प्रकारच्या, अनेक क्षेत्रांमधल्या लोकांशी एकाच वेळी संवाद साधता यायचा आणि त्या संवादामधून अनेक वेळा विविध प्रकारची साहित्यनिर्मिती झाली.

गुरुवारच्या अंकात, प्रा. डॉ. मृदुला बेळे यांचे ‘कथा अकलेच्या कायद्याची’ हे सदर