04 April 2020

News Flash

ठेवणीतला संगीत-खजिना!

चित्रपट संगीताच्या दुनियेत गेल्या नऊ दशकांत जे अनेकविध प्रयोग होत राहिले, त्या सगळ्यांचे खय्याम हे साक्षीदार होते.

(संग्रहित छायाचित्र)

महंमद झहूर ‘खय्याम’ ज्या पंजाब प्रांतात जन्मले, तो भारतातील सगळ्या प्रांतांमध्ये संगीताच्या दृष्टीने अतिशय समृद्ध असा प्रांत. पंजाबातील संगीत म्हणजे भांगडा, एवढीच तुटपुंजी समजूत असलेल्या भारतातील अन्यांना तेथील संगीताचा आवाका समजलेलाच नाही. खय्याम यांच्या नकळत संगीताचे हे संस्कार त्यांना मिळाले. त्यांनी आयुष्यभरात त्याचे जे सोने केले, त्याने भारतीय चित्रपट संगीत अक्षरश: उजळून निघाले. एवढेच नव्हे, तर उण्यापुऱ्या नव्वद वर्षांच्या चित्रपट संगीताच्या महाकाय राजप्रासादात खय्याम यांचे एक स्वतंत्र दालन उभे राहिले आणि ते सदासर्वदा सुरांनी उजळत राहिले. आयुष्याशी झगडल्याशिवाय यश मिळत नाही, हे खरे ठरवणारी अनेक उदाहरणे असतानाही, खय्याम हे मात्र त्याला अपवाद ठरले. ऐन तारुण्यात अगदी विशीत असतानाच संगीतकार म्हणून त्यांनी आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली. सात दशकांच्या या दीर्घकाळात त्यांनी स्वरांचे मोजकेच महाल उभे केले आणि त्यांच्या प्रतिभाशाली कर्तृत्वाने ते स्वरमानही केले. त्यांच्या नावावर साठहून अधिक चित्रपट नाहीत. पण हेच त्यांच्यातील संगीतकाराचे खरे वैशिष्टय़. आपली प्रतिभा काळाच्या प्रत्येक टप्प्यावर पुन:पुन्हा परजून घेण्याचे सामथ्र्य त्यांच्यापाशी असल्याने ते वयाच्या नव्वदीतही ताजेतवाने राहिले.

चित्रपट संगीताच्या दुनियेत गेल्या नऊ दशकांत जे अनेकविध प्रयोग होत राहिले, त्या सगळ्यांचे खय्याम हे साक्षीदार होते. अभिजात संगीतातील बंदिशींवर आधारित असलेल्या नाटय़संगीतातून चित्रपटात पदार्पण केलेल्या गीतांनी सुरुवातीचा काळ गाजला. पण तोपर्यंत भारतावर राज्य करणाऱ्या ब्रिटिशांनी पाश्चात्त्य संगीतही भारतात आणून ठेवले होते. पियानो, अ‍ॅकॉर्डियन, व्हायोलीन, चेलो यांसारखी युरोपीय वाद्ये भारतात आली. त्यावर इथल्या संगीतकारांनी कमालीचे प्रभुत्वही मिळवले. हळूहळू ते संगीत पहिल्यांदा चित्रपटाच्या दुनियेत येऊन पोहोचले. भारतीय संगीत परंपरा अशा अनेक सांगीतिक आक्रमणांना सरावलेली आहे, याचे प्रत्यंतर चित्रपटातील वेगवेगळ्या धाटणीतील गीतांमुळे सहजपणे लक्षात येते. हजारो वर्षांच्या भारतीय परंपरेत स्वरमाधुर्य, स्वरांतील मंजुळपणा यालाच महत्त्व राहिले. लोकसंगीतातून एकल संगीताकडे प्रवास होताना या स्वरमाधुर्याचा (मेलडी) पगडा सातत्याने राहिला. पाश्चात्त्य संगीतात अनेक स्वरांच्या पुंजातून निर्माण होणारा स्वरमिलाफ (हार्मनी) अधिक महत्त्वाचा असतो. मेलडी आणि हार्मनी यांचा समसमासंयोग भारतीय चित्रपटांनी घडवून आणला. पण खय्याम यांनी ‘मेलडी किंग’ हा आपला किताब कधीही सोडला नाही. ते त्यातच रमले. महामार्गावरून जाताना, शेजारून आपल्यापेक्षा अधिक वेगाने धावणाऱ्या वाहनांकडे शांतपणे पाहात, खय्याम यांनी आपला वेग कधीच बदलला नाही. ते आपल्याच स्वरांच्या गोडव्यात धुंद राहिले.

शाळेतील अभ्यासात लक्ष लागत नसल्याने घरातून थेट काकांकडे दिल्लीला पळून जाताना आपण एका नव्या पहाटेच्या स्वागताला चाललो आहोत, याचे भान असण्याएवढे त्यांचे वयही नव्हते. ते शालेय वयात होते, तेव्हा बोलपटांचेही वय साधारण तेवढेच होते. पण त्या माध्यमाने खय्याम यांना जबरदस्त आकृष्ट केले. अभिनेता होण्याचे स्वप्न उराशी बाळगून काकांकडे गेल्यानंतर त्यांनी प्रथम त्यांना शाळेतच घातले. पण फारच थोडय़ांच्या वाटय़ाला असे काका येतात. त्यामुळे खय्याम यांचे चित्रपटाबद्दलचे प्रेम पाहून त्यांना संगीत शिकवायला सुरुवात केली. हुस्नलाल भगतराम आणि पंडित अमरनाथ हे त्यांचे गुरू. पण अभिनयाचे वेड काही जात नव्हते. म्हणून गाठली थेट मुंबई. पण तिथे हिरमुसलेपण आले म्हणून पुन्हा थेट लाहोर. तिथे एका ध्वनिमुद्रणाच्या वेळी चिश्तीबाबांशी गाठ पडली आणि त्यामुळेच नंतरचा सगळा सोनेरी इतिहास घडला. संगीताचे नवनवीन दरवाजे उघडले जात असतानाही खय्याम यांनी आपला मार्ग बदलला नाही. उत्तम काव्य त्यांच्या संगीतासाठी जणू आसुसलेले असावे, परिणामी त्यांचे संगीतही बहरत राहिले. तेच ते संगीत करण्यापेक्षा, त्यात काही ताजेपणा कसा आणता येतो, हे त्यांच्या अनेक गीतांच्या मुखडय़ांवरूनही कळते. ‘बहारों मेरा जीवन भी सवारो’, ‘तेरे चेहरेसे नजर नहीं हटती’, ‘गापुची गापुची गम गम’, ‘कभी कभी मेरे दिल में’, ‘मेरे घर आयी एक नन्हीं परी’, ‘ऐ दिल-ए नादान’, ‘इन आँखोंकी मस्ती में’ अशा त्यांच्या जीवनातील काळाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरील गाणी या टवटवीची साक्ष आहेत.

मिळेल ती संधी वापरायची असा स्वभाव नसल्यामुळे खय्यामसाहेबांनी मोजकेच चित्रपट केले. त्या काळीही संगीतात काम करणाऱ्यांना चांगले पैसे मिळत. पण म्हणून त्याची हाव न ठेवता आपला दर्जा टिकवून ठेवण्याचे फार मोठे आव्हान त्यांनी आयुष्यभर पेलले. सी. रामचंद्र, एस. डी बर्मन, वसंत देसाई, नौशाद यांच्यासारख्या तालेवार संगीतकारांच्या बरोबरीने खय्याम आपली वाट निर्माण करत राहिले. चित्रपट संगीतात आलेल्या हार्मनीने ते विचलित झाले नाहीत आणि स्वरमाधुर्याची कास धरत सातत्याने नवे संगीत निर्माण करत राहिले. गजल, भजन यांसारख्या संगीतप्रकारांमध्ये ते रमले, याचे कारण उत्तम काव्य ही त्यांच्या संगीताची प्राथमिक आवश्यकता होती. त्यामुळे अनेक गाजलेल्या, परंतु सुमार गीतकारांच्या वाटय़ाला खय्यामसाहेबांचे संगीत आलेच नाही. पण काव्याच्या बाबतीत तेही नशीबवान ठरले. त्यामुळे शब्द आणि संगीताचा एक अपूर्व संगम त्यांना साधता आला. हजारो गाणी तयार करणाऱ्या संगीतकारांकडे ठेवणीतले दागिने फार थोडे असतात. खय्यामसाहेबांचा प्रत्येक दागिनाच ठेवणीतला होता. नव्वदीपर्यंत संपन्न जीवन जगणाऱ्या खय्यामसाहेबांचे निधनही त्यामुळे संगीताच्या क्षेत्रासाठी खूपच दु:खदायी घटना ठरली आहे. त्यांना ‘लोकसत्ता’ परिवारातर्फे आदरांजली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 21, 2019 12:03 am

Web Title: special editorial on veteran music director khayyam abn 97
Next Stories
1 अभाग्यांचे दुर्भाग्य
2 कलेचा कणा
3 ‘पुस्तकांचा मृत्यू’.. देखवेना डोळा!
Just Now!
X