07 March 2021

News Flash

संगीतमय आइस्क्रीम

वाढदिवसाला आइस्क्रीमची गंमत काही औरच असते. आता तर उन्हाळा तोंडावर आहे त्यामुळे आइस्क्रीमचेच दिवस आहेत.

| March 15, 2014 01:01 am

वाढदिवसाला आइस्क्रीमची गंमत काही औरच असते. आता तर उन्हाळा तोंडावर आहे त्यामुळे आइस्क्रीमचेच दिवस आहेत. पण या आइस्क्रीमचा आनंदही द्विगुणित करण्याची युक्ती वैज्ञानिकांनी शोधून काढली असून त्यात काही संवेदक बसवून तुम्ही ते आईस्क्रीम चाटाल तेव्हा त्या गोठवलेल्या आइस्क्रीममधूनही संगीताचे स्वर उमटतील.. हॅपी बर्थडे टू यू. न्यूयॉर्कच्या दोन कलाकारांनी हा आइस्क्रीमचा अभिनव कोन विकसित केला असून एमिली बाल्टझ व कार्ला डायना अशी त्यांची नावे आहेत. त्यानी लिकेस्ट्रा नावाचे संगीतमय आइस्क्रीम तयार केले आहे. म्हणजे एकीकडे आइस्क्रीमचा स्वाद तर दुसरीकडे संगीत. लिकेस्ट्रामध्ये कोन वापरलेले असून त्यात कॅपॅसिटिव्ह संवेदक आहेत. हे कोनमधील आइस्क्रीम चाखताच कोनमधील संवेदक इलेक्ट्रॉनिक संदेश अ‍ॅरडय़ुनो बोर्डकडे पाठवतात. तेथून तो संदेश संगणकाकडे जातो व त्यातील लायब्ररीतून संगीताची धून निवडली जाते व ती वाजते. बाल्टझ यांनी सांगितले की, अ‍ॅरोन डायर यांच्या चार भागांच्या संगीत रचनेवर आम्ही बरेच काम केले. प्रत्येकासाठी वेगळे संगीत यात निवडले जाते, तुम्ही आइस्क्रीम कसे चाखता यावर त्यातून कुठली धून उमटणार हे अवलंबून आहे असे त्यांचे मत आहे. न्यूयॉर्कच्या व्हिज्युअल आर्ट्स शाळेत त्यांनी या आइस्क्रीमच्या मदतीने संगीताचे कार्यक्रमही केले आहेत.

जुनं ते सोनं
काही गोष्टी जुन्याच चांगल्या असतात. वाइन जितकी जुनी मुरलेली तितकी चांगली. लिंबाचं लोणचं जितकं जुनं मुरलेलं तितकी औषधी अन् शरीरास चांगलं. ‘चीज’चंही तसंच आहे. चीज जितकं जुनं तितकं चांगलं. चीनमधील टकलामकान वाळवंटातील ३८०० वर्षे जुन्या ममीमध्ये जगातील सर्वात जुने चीज सापडले आहे. ममीज पुरताना चीजचा वापर त्यावेळी मरणोत्तर जीवनात त्यांना ते मिळावे या समजुतीतून केला जात होता. चीज करायला सोपे, पोषक व पचायला चांगले असते असे जर्नल ऑफ आर्किऑलॉजिकल सायन्सने म्हटले आहे. शियोहे येथील ओरडेक नेक्रोपोलिस येथे दफनभूमीत उत्खनन करण्यात आले तेव्हा २००२ ते २००४ दरम्यान हे चीज सापडले. नेक्रोपोलिसचा शोध १९३४ मध्ये नदीपात्र कोरडे झाले तेव्हा लागला त्यात अनेक ममीज सापडल्या, त्या शवपेटिकात ठेवलेल्या होत्या, त्यांचा आकार बोटीसारखा होता व त्या सील केलेल्या होत्या. प्रत्येक थडग्यावर १ ते २ से.मी चे पिवळसर गोळे होते. ते गळा व छातीजवळ ठेवले होते, त्यात युरेशियन गुणधर्म होते. रासायनिक विश्लेषणात तो दुग्धजन्य पदार्थ असल्याचे लक्षात आले व त्यात कुठलेही वितंचक नव्हते त्यावेळी त्याला रेनेट असे म्हटले जात असे. लॅक्टोबॅसिलस व सॅखरोमायसेटीस यीस्ट यांच्या मदतीने किण्वन करून हे चीज बनवले जाते. केफिर या आंबवलेल्या पेयात त्यांचा वापर केला जातो. याच प्रक्रियेचा वापर करून संशोधकांनी त्या ममीमधील चीजसारखे चीज तयार करून पाहिले. कांस्ययुगातही केफिर डेअरी पदार्थाचे अस्तित्व होते. त्यामुळे पूर्व युरेशियात लॅक्टोजबाबत स्थानिक लोकात अ‍ॅलर्जी असूनही दुधाचा धंदा कसा वाढला यावरही या संशोधनात प्रकाश पडला.

नॅनोतंत्रज्ञानाच्या मदतीने केमोथेरपीचे दुष्परिणाम टाळणे शक्य
कर्करोगाच्या रुग्णांना केमोथेरपी दिली जाते त्यामुळे अनेक दुष्परिणामांना सामोरे जावे लागते. पण आता नॅनो तंत्रज्ञान व लेसरच्या मदतीने केवळ कर्करोगग्रस्त पेशींवरच केमोथेरपीचा वापर करता येणार आहे यात औषधे थेट कर्करोगग्रस्तपेशीपर्यंत सोडली जाणार असल्याने निरोगी पेशींना अपाय होणार नाही. या तंत्रात खास तयार केलेले नॅनोकण केमोथेरपीची औषधे घेऊन कर्करोग पेशींपर्यंत पोहोचतात. त्यांना पोहोचवण्याचे काम अवरक्त तरंगलांबी असलेले दोन फोटॉन लेसर करीत असतात. लॉसएंजल्सच्या कॅलिफोर्निया विद्यापीठात हे तंत्र विकसित करण्यात आले असून त्यात डॉक्टरांच्या हातात नियंत्रण जास्त राहते व हवी तितकी औषधे शरीराच्या योग्य त्याच भागात सोडता येतात. यात औषधांचा कर्करोगास मारण्याचा परिणाम वाढून इतर पेशींवर परिणाम होत नाहीत. जेफ्री झिंक व फुयु तमानोई व सहकाऱ्यांनी नॅनोपार्टिकलवर आधारित हे तंत्र विकसित केले आहे. या नॅनो कणांमध्ये बारीक टय़ूब असतात व त्यात केमोथेरपीची औषधे असतात. या वाहिन्यांना नॅनोव्हाल्व्ह म्हणजे झडपा असतात. बुचाच्या बाटलीतील औषधासारखे ते असते. दोन फोटॉन लेसरच्या ऊर्जेला नॅनोव्हाल्व्ह प्रतिसाद देतात कारण त्यात विशिष्ट रेणू असतात. त्यामुळे हवे तेव्हा व्हाल्व्ह उघडून औषध सोडले जाते. मानवी स्तनाच्या कर्करोगावर या तंत्राच्या चाचण्या घेण्यात आल्या असून त्यात तांबडय़ा तरंगलांबीच्या अवरक्त फोटॉन लेसरचा वापर करण्यात आला. चार सेंटीमीटरवरून त्यांचा मारा करून अचूक लक्ष्य साध्य करता येते. अंडाशय, आतडे, स्तन यांच्या कर्करोगात त्याचा वापर करता येतो. नवीन नॅनोकण हे प्रदीप्त असतात त्यामुळे रेणवीय प्रतिमा चित्रणात ते कसे काम करतात हे प्रत्यक्ष बघायलाही मिळते. त्यामुळे नॅनोपार्टिकल नेमका कसा प्रवास करीत कर्करोगपेशींवर हल्ला करतात हे कळते. स्मॉल नावाच्या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

श्वान स्फोटके ओळखतात कसे..
बॉम्बस्फोट झाले की, स्निफर डॉग्ज म्हणजे खास प्रशिक्षण दिलेले श्वान स्फोटके तपासण्यासाठी आणले जातात हे दृश्य आपण अनेकदा पाहतो पण हे श्वान अगदी सारख्याच असलेल्या पदार्थातून नेमकी स्फोटके कशी ओळखतात याबाबतचे कोडे सुटले आहे. या श्वानाविषयी लिहित असताना मुंबई बॉम्बस्फोटात महत्त्वाची कामगिरी बजावलेल्या जंजीर या श्वानाची आठवण सर्वाना झाल्याशिवाय राहणार नाही. जंजीर कालांतराने मरण पावला. आताच्या अभ्यासानुसार हे श्वान स्फोटकासारखा वास असलेल्या कुठल्याही इतर पदार्थांच्या वासांना प्रतिसाद देत नाहीत, खऱ्या स्फोटकांच्याच वासाला प्रतिसाद देऊन ते ओळखतात. या श्वानांना स्फोटके ओळखण्याचे प्रशिक्षणही दिलेले असते असे इंडियाना विद्यापीठातील संशोधक जॉन गुडपेस्टर यांनी म्हटले आहे. अगोदरच्या अभ्यासानुसार सी-४ नावाच्या विस्फोटक नसलेल्या बाहेर टाकल्या जाणाऱ्या रसायनामुळे श्वान स्फोटके ओळखतात असे म्हटले जात होते व त्यांच्या प्रशिक्षणासाठीही त्यासारख्या पदार्थाचा वापर केला जात असे. संशोधकांच्या मते सी-४ ची नक्कल केल्याने काहीही होत नाही. हा पदार्थ प्लास्टिकच्या पीव्हीसी पाइपमध्ये सुद्धा असतो, इलेक्ट्रीक टेप, चित्रपटाची तिकिटे, प्लास्टिक बॅग, प्लास्टिकची पोती यातही तो असतो. ३३ प्रशिक्षित श्वानांवर प्रयोग केले असता त्यांना या सी-४ मधील वासद्रव्यांना प्रतिसाद देता आला नाही. याचा अर्थ स्निफर म्हणजे स्फोटके ओळखणाऱ्या श्वानांना पूर्ण वासाचे प्रशिक्षण दिल्याशिवाय ते खरी स्फोटके ओळखू शकत नाहीत. श्वानांना सहज मूर्खात बनवता येत नाही. स्फोटकाच्या कुठल्याही घटकाचा वास देऊन त्याला फसवता येत नाही, त्यांना त्या स्फोटकाचा र्सवकष वासच माहीत असतो. त्यांची संवेदनशीलता जास्त असते त्यामुळेच ती स्फोटके ओळखू शकतात असे गुडपेस्टर यांचे मत आहे. जर्नल फोरेन्सिक सायन्स इंटरनॅशनलमध्ये हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 15, 2014 1:01 am

Web Title: special information
टॅग : Technology
Next Stories
1 निवडणूक खर्चाचा घोळच!
2 फुकुशिमाचे उपधक्के
3 धगधगत्या आठवणींचा आधार..
Just Now!
X