24 November 2017

News Flash

ऋषितुल्य !

मारुती चितमपल्ली यांच्या सहस्रचंद्रदर्शनानिमित्त खास सोहळा मंगळवारी पुण्यात होतो आहे. त्यानिमित्त हा उजाळा.. पुण्यात औंधचा

जयंत कर्णिक - jayant.karnik@gmail.com | Updated: December 2, 2012 10:29 AM

मारुती चितमपल्ली यांच्या सहस्रचंद्रदर्शनानिमित्त खास सोहळा मंगळवारी पुण्यात होतो आहे. त्यानिमित्त हा उजाळा..
पुण्यात औंधचा पूल ओलांडला की कँटोन्मेंट हद्द सुरू होते तिथे रस्त्याच्या दुतर्फा झाडी होती.. गोष्ट १९८४ सालची.. एकेरी पारंबीला जास्वंदासारखे पण जरा मोठे गडद रक्तवर्णी लटकलेले फूल कायम लक्ष वेधून घेत असे. त्या फुलाच्या जागी पुढे काही दिवसांनी दुधी भोपळ्यासारखे वरवंटय़ाच्या आकाराचे फळ लटकलेले दिसे. त्याचे छायाचित्र मी टिपले तेव्हा, १९९६ साली हेच फूल मारुती चितमपल्लींशी आपला परिचय करून देईल असे वाटलेही नव्हते. झाले असे की, त्यांच्या एका पुस्तकात याच फूल-फळाविषयी प्रसिद्ध लेखक जी. ए. कुळकर्णीनी त्यांच्याकडे विचारणा केल्याचा उल्लेख होता. हाच धागा पकडून मी त्या ‘किजेलिआ पिनाटा’च्या फुलाच्या छायाचित्राचे शुभेच्छापत्र तयार केले आणि चितमपल्लींना पत्र लिहिले. आमचा पत्रव्यवहार सुरू झाला. ते नागपूरलाच स्थायिक झाल्यामुळे प्रत्यक्ष भेटण्याचे योगही आले. त्यांची समक्ष भेट ही एक पर्वणीच असायची.
माझ्यासारख्या जंगलाशी पूर्णपणे अनभिज्ञ असणाऱ्या माणसाला जेव्हा ‘जंगलाचं देणं’ एक लेणं म्हणून लाभलं तेंव्हा मी अक्षरश: हरखून गेलो. मोजक्याच शहरी पक्ष्यांशी परिचित असणाऱ्या मला जेंव्हा ‘पक्षी जाय दिगंतरा’, ‘रातवा’ अशा पुस्तकांतून इतर अनेक पक्ष्यांची ओळख होत गेली तेव्हा मी स्तिमित झालो. अरण्यातील अद्भुत जगाचा पट जेव्हा चितमपल्ली तरल आणि हळुवारपणे उलगडत नेतात तेव्हा आपण विस्मयचकित होतो. भगवान श्रीकृष्णाने विश्वरूपदर्शनाच्या वेळी अर्जुनाला जशी दिव्यदृष्टी दिली होती, तशी सुविधा माझ्यासारख्या पामराला उपलब्ध नसल्यामुळे, समग्र चितमपल्ली वाचताना, तणमोराची शिकार करणाऱ्या पारध्याला कलमुहा घुबडाच्या आवाजाने रानभूल होते, तसाच चकवा मलाही मारतो. पण ‘पक्षिकोश’ आणि ‘चकवाचांदण’ शुक्राच्या चांदणीप्रमाणे वाचनाच्या क्षितिजावर उगवतात अन् चितमपल्लींचा जीवनपट उलगडण्यास मदत होते.
दर वर्षी शिलंगणाच्या दिवशी गावाच्या सीमेवर नेऊन निळ्या तास पक्ष्याचं दर्शन घडवणारे वडील, पावलांना रानवाटांची माहेरओढ असणारी आई, टेकराज पचवणारा हणमंतमामा, प्राणी, पक्षी, वनस्पती न बोलता नजरेनं दाखवणारा, अरण्यविद्य्ोतला पहिला गुरू नरसाआत्याचा नवरा िलबामामा, माळकरीण आत्या, प्रत्येक वृक्षाविषयी गूढ ज्ञान आणि कमालीची आस्था असणारे ग्यानबाभावजी.. अशा गोतावळ्यात वाढलेल्या मारुतीने अरण्यरूपी भास्कराकडे झेप घ्यावी हे विधिलिखितच असावे असे वाटते. वानिकी महाविद्यायात शिक्षण घेताना काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंतचे वनवैभव अनुभवले, वनविभागात विविध अरण्यांत राहून एखाद्या तपस्व्याप्रमाणे ते अभ्यासता आले. मूळची संन्यासी वृत्ती, निसर्गाप्रति असणारी निस्सीम श्रद्धा, रसिकतेने ओतप्रोत भरलेले हृदय, आपण करीत असलेल्या कामाविषयीची निष्ठा, अतिशय शांत सोशिक स्वभाव, या सर्वाचा परिपाक ते ऋषितुल्य असल्याची ग्वाहीच देत नाही का!
चितमपल्लींची गुरुपरंपरा बघितली की ह्या ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाच्या चढण-घडणीचे गूढ उकलायला निश्चितच मदत होते. देशपांडे, तिपण्णा, काळे, गुरव, गायकवाड, केळकर, परमार, परशुरामी, पंडित, चतन्य, िशदे, गलांडे असे शाळेतील शिक्षक तर महाविद्यालयात श्रीराम शर्मा, कुळकर्णी, श्रीनिवासन, कृष्णन, गोडबोले, बापट असे प्राध्यापक, वानिकी महाविद्यालय आणि वनविभागात स्ट्रेसी, शेट्टी, रामा राव, जोशी, मरबल्ली, बूटसाहेब.. या सर्वाचे ऋण स्वत: चितमपल्लीच मानतात. संस्कृत साहित्यातील वृक्ष, वन्य पशू-पक्षी, निसर्ग हे विषय अभ्यासताना यज्ञेश्वरशास्त्री कस्तुरे, एकनाथ महाराज खडकेकर, भातखंडेशास्त्री, गजाननशास्त्री जोशी, वैद्य धामणकरशास्त्री यांच्याकडे केलेले संस्कृत भाषेचे अध्ययन.. या प्रवासात ‘ चितमपल्ली, तुम्ही असेच लेखन करीत राहिलात तर पुढे चांगले लेखक व्हाल,’ असे भाकीत पंडितसरांनी ते अकरावीला असताना केले असले तरी तो योग त्यानंतर कित्येक वर्षांनी यायचा होता. व्यंकटेश माडगूळकर, गो. नी. दांडेकर, रामस्वरूप वत्स, डॉ. मुल्कराज आनंद, फादर संतापाऊ, सलील घोष अशा दिग्गजांचे लेखनविषयक सल्ले आणि संस्कार कामी आले. त्यांच्यातल्या ललित लेखकाला पलू पाडून पुढे आणण्याचे काम केले प्राध्यापक नरहर कुरुंदकरांनी; तर प्रोत्साहन, प्रसिद्धीसाठी मोलाची भूमिका बजावली ती गोिवदराव तळवळकर, धर्मवीर भारती, उमाकांत ठोमरे प्रभृतींनी. अन् मग मराठी ललित साहित्याचं असं एक नवं दालन उघडलं गेलं की त्याची दखल पु.ल. देशपांडे, गो. नी. दांडेकर, ग्रेस, शांता शेळके, रवींद्र िपगे, जी. ए., इंदिरा संत, गंगाधर गाडगीळ अशा अनेक मान्यवरांनी घेतली.
औदुंबर येथील ५७व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद, उमरखेड येथील ५१व्या विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद, सोलापूर येथील ७९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद आणि अनेक सन्मान – पुरस्कार ही त्यांच्या साहित्यसेवेला मिळालेली पावतीच आहे. तरीही एक लक्ष नवीन शब्दधनाची मराठीच्या भाषेच्या भांडारात भर घालणाऱ्या या अतुलनीय लेखकाचे उतराई होणे हे मराठी रसिकांना जमेल असे वाटत नाही. ‘पक्षिकोश’ म्हणजे तर त्यांच्या निर्मितीतील मानाचा तुराच आहे. एखादा कोश तयार करायचा म्हणजे किमान काही जणांचे संपादक मंडळ असते. ते एक टीमवर्क असते. पक्षिकोश त्याला अपवाद.. कारण संशोधन, संकलन, पर्यायी शब्दांची योजना, मुद्रितं तपासणी, मांडणी अशा सर्व पातळ्यांवर सातत्याने एकहाती काम करणे हे मला वाटते फक्त चितमपल्लीच करू जाणोत.
हण्रला एकटे राहून मत्स्यविषयक संशोधन करताना वयाची सत्तरी ओलांडलेले चितमपल्ली ज्या तडफेने, चिकाटीने काम करत ते तरुणांनाही लाजवेल असे होते. वयाच्या सत्तरीला ऋषी प्रभाकरांकडे ‘सिद्ध समाधी योगा’चे ज्ञान प्राप्त केले. नंतर त्यात विपश्यनेचीही भर पडली. हे सर्व कशासाठी तर या वयातही ऊर्जा टिकून राहवी, जास्तीत जास्त काम करता यावे म्हणून. सतत चिंतन, मनन, नोंदी करण्यासाठी हातात नोटबुक, पॅड, पेन-पेन्सिल, संदर्भासाठी मोजकी पुस्तके, तक्ते हे सर्व सदैव जवळ बाळगणे. नंतर अभ्यासिकेत विशिष्ट कार्डावर ह्या नोंदी लिहून ट्रेमध्ये क्रमवार लावणे जेणेकरून त्या चटकन सापडाव्यात..
लेखन मग ते कुठल्याही प्रकारचं असो चितमपल्ली ते तेवढय़ाच तन्मयतेने करीत असत. हण्रला असतानाच त्यांना श्रीकांत इंगळहळीकर ह्यांच्या ‘आसमंत’ पुस्तकासाठी प्रस्तावना लिहायची होती. मी लेखनिक. अनेक संदर्भग्रंथ घेऊन ते बसत. विचार करून एकेक वाक्य सांगायचे. मध्येच एखादा संदर्भ धुंडाळताना विचारशृंखला तुटली तर वाक्याची पुनर्रचना करायचे. ‘काटेकोर’ ह्या शब्दाचा अर्थ शब्दकोशापेक्षाही मला त्यांच्या कृतीतून समजला. नंतर त्यांनी मला रेघा असलेले पांढरेशुभ्र जाड ताव दिले. त्यावर जाड निबेच्या काळ्या शाईच्या फाऊंटन पेनने सुवाच्य अक्षरात माझ्याकडून ते लिहून घेतले. पूर्णपणे समाधान झाल्यावरच ते पोस्टाने इंगळहळीकरांकडे रवाना केले.
चितमपल्लींवर आयुष्य ओवाळून टाकणारे त्यांचे काही स्नेही, हितचिंतक आहेत. विवेक देशपांडे, डॉ. सुहास पुजारी, पंचाक्षरी, खडसे, गोहाड.. यादी खूपच मोठी आहे. मुंबईचे एक महाबळ आहेत. चितमपल्लींना त्यांच्यासमवेत संपूर्ण दिवस व्यतीत करताना, गुलजार ह्या जिव्हाळ्याच्या विषयावर चर्चा करताना, कविता-गीतांचा आस्वाद घेताना बघितले आहे. त्याच वेळी अच्युत गोडबोले, विठ्ठल कामतही आवर्जून भेटून गेल्याचे स्मरते. विवेक देशपांडे ह्यांनी एकदा नवेगांवबांधला एक शिबीर आयोजित केले होते, त्या वेळेस चितमपल्लींसमवेत तिथे जाण्याचा योग आला. मुक्काम माधवराव पाटील ह्यांच्याकडे होता. त्यांचं आदरातिथ्य, थंडीचे दिवस असल्यामुळे पेटलेली शेकोटी, त्या उजेडात जुन्या आठवणींनी त्या दोघांचे उजळलेले चेहरे न्याहाळणे, शिकारीच्या रोमांचक गोष्टी ऐकणे.. हे माझ्या पूर्वपुण्याईचे संचित.
चितमपल्ली आणि माधवराव पाटील ह्यांचे ऋणानुबंध बघितले की त्यांच्या रक्तापलीकडच्या नात्याची प्रचीती येते. ही दोन्ही व्यक्तिमत्त्वं एकमेकांना पूरक होती. माधवरावांनी गोंड, ढिवर अशा आदिवासींवर जीव लावला. त्यांच्यासाठी तळमळीने केलेले काम, वैद्यकीय सेवा, स्वत:च्या पशातून केलेली लोककल्याणाची कामे; शाळा, रस्ते, विहिरी.. एक ना अनेक. वनाधिकारी आणि स्थानिक यांच्यातली दरी कमी होण्यास, त्यांच्याशी जवळीक निर्माण होण्यात, मुख्य म्हणजे संशोधन कार्यात चितमपल्लींना ह्याची बहुमोल मदत झाली. वन्यप्राण्यांचं संरक्षण, अवैध शिकारींना आळा घालणे ह्या कामात साहेबांना मदत करण्यासाठी पाटील कुटुंबीय सदैव तत्पर असत. अरण्यांची जपणूक, खस आणि कमलकंद काढताना ठेकेदारांचा हलगर्जीपणा, त्यामुळे नष्ट होणारी पक्ष्यांची तळ्याकाठची निवासस्थानं, हे पाहून माधवरावांची होत असलेली तगमग साहेबांना बघवत नसे. मग हिवाळी अधिवेशनापर्यंत आवाज उठवून त्यावर बंदी आणली जाई. एकेकाळी पट्टीचे शिकारी असणाऱ्या माधवरावांनी नवेगांवचं जंगल आणि त्यातील प्राण्यांचं संरक्षण व्हावं म्हणून मुख्यमंत्री वसंतराव नाईकांना साकडं घालून, नवेगांव राष्ट्रीय उद्यानाचे जनक होण्याचा मान मिळवला. थेट पंतप्रधान इंदिरा गांधींशी संपर्क साधून, तलावासाठी संपूर्ण बोदराईचं जंगलच नष्ट होण्याची आपत्ती टाळली. अर्थात ही प्रेरणा त्यांना चितमपल्लींसारखे वनाधिकारी त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभे होते म्हणूनही मिळाली असं म्हटलं तर वावगं ठरू नये.
१९७० सालच्या डिसेंबर महिन्यात कर्नाळ्याला असताना चितमपल्ली ज्याची आतुरतेने वाट बघत होते तो योग जुळून आला. त्यांचे पक्षिनिरीक्षणातले गुरू डॉ. सलीम अली आणि डॉ. सलीम अली ज्यांना गुरुस्थानी मानत ते जर्मनीचे प्रा. एरविन स्ट्रेसमन, ह्यांचा गाईड होण्याचे भाग्य लाभले. हे ऋणानुबंध, हे गुरू-शिष्याचे नाते आजन्म टिकले. ‘चितमपल्ली, तुमचं जीवन मला द्या अन् माझं जीवन तुम्ही घ्या!’, असं अलींनी म्हणणं आणि ‘मला संधी मिळाली तर एक चांगला वनाधिकारी आणि पक्षिशास्त्रज्ञ होऊन दाखवीन,’ असं वचन आपल्या गुरूला देणं, ते पाळणं, स्वत:ला सिद्ध करणं, यातच ह्या गुरू-शिष्याच्या नात्याची पूर्तता अधोरेखित होते.

First Published on December 2, 2012 10:29 am

Web Title: special occasion to remember maruti chitampalli