१९५७ नंतरच्या आपल्या सार्वजनिक जीवनाची कहाणी अटलजींनी स्वत:च सांगितली होती. त्याचा हा संपादित भाग

स्वातंत्र्यानंतरच्या काळात काँग्रेसच्या पूर्ण वर्चस्वाचा काळ होता. १९५७ मध्ये दुसरी सार्वत्रिक निवडणूक होती. त्याच काळात जनसंघाची वाटचाल सुरू झाली होती. श्यामाप्रसाद मुखर्जीच्या निधनाने पक्षात नेतृत्वाची पोकळी होती. अशा वेळी जनसंघाला उमेदवार मिळणे दुरापास्त होते. पक्षाचा विचार गावोगावी पोहचविण्यासाठी निवडणूक लढविण्याचा निर्णय झाला. त्यावेळी लखनौ, मथुरा व बलरामपूर या तीन ठिकाणांहून मी निवडणूक लढविली. अर्थात जनसंघाची एकंदर ताकद पाहता, विजयाचा प्रश्न नव्हताच. मात्र त्यात इतर दोन ठिकाणांच्या तुलनेत बलरामपूरला पक्षाचे संघटन बरे होते. निवडणुकीला उभे राहण्यापूर्वी बलरामपूरला मी कधीच गेलो नव्हतो.  त्यामुळे पक्षाचा आदेश महत्त्वाचा होता. बलरामपूरला स्वातंत्र्यानंतरही जमीनदारी शिल्लक होती. त्यामुळे त्यांच्या विरोधात लहान-मोठे शेतकरी जनसंघात सामील झाले. त्यावेळी काँग्रेसच्या हैदर हुसेन यांच्यापेक्षा दहा हजार मतांनी मी विजयी झालो. हैदर हे लखनौतील नामांकित वकील होते. माझा इतर दोन ठिकाणी पराभव झाला. येथून माझी संसदीय कारकीर्द सुरू झाली. यात १९५७ मध्ये जनसंघाला माझ्यासह चार जागा मिळाल्या. त्यात महाराष्ट्रातील धुळे येथील उत्तमराव पाटील व रत्नागिरीत प्रेमजीभाई आशर यांचा समावेश होता. या निवडणुकीत जनसंघाला अखिल भारतीय मान्यता मिळाली. परराष्ट्र धोरण हा माझा  आवडता विषय. विशेष म्हणजे संसदेत चर्चेच्या वेळी प्रेक्षकांच्या गॅलरीत गर्दी असे. जनसंघ सदस्यांना बोलायला अपुरा वेळ मिळत असे. २० ऑगस्ट १९५८ रोजी तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांनी भाषणावेळी माझा उल्लेख केला होता हे माझ्यासारख्या नवख्या सदस्यासाठी मोठे प्रशस्तिपत्रच होते.  १९६७ च्या तिसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत मी बलरामपूरमधून पराभूत झालो.

लोकसभेच्या इतिहासात ६ मे १९६१ हा दिवस महत्त्वपूर्ण ठरला. दोन्ही सदनांची संयुक्त बैठक होऊन वित्त विधेयक वगळता दोन्ही सदनाचे अधिकार सारखेच असल्याचे स्पष्ट झाले. मी १९६२ व १९८६ असे दोन वेळा राज्यसभेचा सदस्य होतो. ६२ मध्ये जनसंघाचे राज्यसभेत केवळ दोन सदस्य होते. तरीही सभापती राधाकृष्णन यांनी मला पहिल्या रांगेत स्थान दिले.

इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर १९८४ मध्ये सार्वत्रिक निवडणुकीत विरोधकांचा दारुण पराभव झाला. भारतीय जनता पक्षाला तर केवळ दोन जागा मिळाल्या.  काँग्रेसचे त्यावेळचे युवा नेते माधवराव शिंदे यांच्याविरोधात मी लढलो, पण पराभूत झालो. मुळात राजघराण्याबाबत ग्वाल्हेरच्या जनतेबद्दल आपुलकीची भावना आहे. त्यामुळे माधवरावांचा विजय अपेक्षित होता. येथून माधवराव यांच्या आई राजमाता विजयाराजे शिंदे यांनी निवडणूक लढविली असती तर त्या विजयी झाल्या असत्या. मात्र राजकारणासाठी पुत्र-आईमध्ये सामना व्हावा अशी आमची इच्छा नव्हती. १९९१ मध्ये मध्य प्रदेशातील विदीशा तसेच लखनौ या दोन मतदारसंघांतून मी निवडणूक लढलो. पंडित नेहरू यांच्यापासून ते इंद्रकुमार गुजराल यांच्यापर्यंतच्या पंतप्रधानांना जवळून पाहण्याची संधी मला  मिळाली. त्यात नेहरू यांच्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा माझ्यावर काहीसा उमटला. नेहरू संसदेत नेहमी उपस्थित असत.  प्रश्नोत्तरे किंवा नेत्यांची भाषणे  ते गंभीरपणे ऐकायचे.  नेहरू स्वभावाने थोडे हट्टी होते पण लोकशाही मूल्ये जाणणारे होते. नेहरूंचे विशेष साहाय्यक एम.ओ.मथाई यांनी खासदारांच्या वर्तनाबाबतच्या वक्तव्याने संतापाची भावना होती. विशेष अधिकाराचे हनन झाल्याची सूचना देण्यात आली. माझा प्रस्ताव अध्यक्षांनी संमत केला. त्यावेळी नेहरूंनी मथाई यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र सभागृहाचा रागरंग पाहता, नेहरूंनी ही बाब विशेषाधिकार समितीकडे सोपविण्यास मान्यता दिली. त्यावेळी नेहरूंनी जे भाषण केले भविष्यात नेतृत्व करू पाहणाऱ्यांसाठी दिशादर्शक ठरते.

नेहरू म्हणाले होते की, ‘‘जेव्हा सदनाच्या एखाद्या गटास असे वाटते की, याबाबत काहीतरी करणे आवश्यक आहे, तेव्हा बहुसंख्याकांनी त्यांच्या भावनांचा अव्हेर करणे योग्य नव्हे.’’ या गोष्टीतून नेहरूंचे व्यक्तिमत्त्व दिसते. एखादा जरी विरोधक असेल तरी तो शत्रू नाही, असा अप्रत्यक्ष संदेश पंडितजींनी दिला होता.

हा लेख  आणि वरील भाषण  ‘साप्ताहिक विवेक’ प्रकाशित ‘राष्ट्ररत्न अटलजी’ या पुस्तकातून साभार