केवळ दहा वर्षांच्या चिमण्या जिवाला तिच्या या हसण्या-बागडण्याच्या वयात संपूर्ण आभाळ पेलताना पाहून विलक्षण थक्क व्हायला होते. या वयातील तिची संकटांना तोंड देण्याची हिंमत व धाडस आश्चर्यचकीत करणारे. या निरासग भाबडय़ा आदिवासी कन्येचे नांव आहे, गंगा. तिची ही अंतर्मुख व्हायला भाग पाडणारी अनोखी कथा.
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात धडगाव रस्त्यावर कुसुमवाडा हे छोटेसे टुमदार गांव. फत्तेपूरपासून साधारणत: दोन किलोमीटर अंतरावर वसलेले. लोकसंख्या अवघी २२९४. गावात ९० टक्के भिल्ल लोकांची वस्ती असून शेती व शेतमजुरी हाच प्रमुख व्यवसाय. दोन-चार पक्की घरी सोडली तर बाकी सारी झोपडय़ांचीच वस्ती. याच गावातील गंगा ही दहा वर्षांची चिमुरडी. मात्र, तिने पेललेली जबाबदारी भल्याभल्यांना थक्क करणारी. ठसक्या बांध्याची, अत्यंत निरागस, परंतु, करारी चेहेरा. आभाळाएवढं दु:ख पेलूनही चेहेऱ्यावर दु:खाचा लवलेशही नाही.
तिचे बोलणे अत्यंत परिपक्व-पोक्त महिलेसारखे. ‘ही सर्व जबाबदारी तु इवल्याशा वयात कशी सांभाळते’ या प्रश्नावरील तिचे उत्तर निरूत्तर करणारे. ‘आमचे कोणीच नाही, मग मी नाही करणार तर, दुसरे कोण करणार ?’.
प्रतिकूल परिस्थितीशी झगडण्याचा तिचा निर्धार लक्षात येत होता. शिक्षित असूनही जे काम कोणी करू शकत नाही, ते काम ही चिमुरडी मुलगी करत असल्याची गावातील महाविद्यालयीन तरूणांची भावना. गंगा तिच्याहून लहान असलेल्या चार भावंडांची ‘आई’ झाली आहे. ती स्वावलंबनातून भावंडांचे पालन-पोषण करीत आहे. तिच्या फाटक्या झोपडीत तुटपुंजे साहित्य, हेच तिचे ऐश्वर्य. कपाशीच्या काडय़ांचे कुड असलेली झोपडी. तिच्यावर कौलारू छप्पर. त्यानेही पोक काढलेले. झोपडीत गरजेपुरतीच भांडी. मातीची चुल, तवा, तेलासाठी प्लास्टीकची बरणी आणि एक कंदील हा तिचा फाटका संसार. घरात तिची सत्तर वर्षांची आजी. परंतु, ती सुद्धा दुर्धर आजाराने बेजार. आजी असूनही नसल्यासारखी. गंगा निराधार असूनही ती इतरांचा आधार बनली आहे. भावंडांसह वृद्ध आजीचे म्हणजे आनंदीबाईचं तिच संगोपन करीत आहे. गंगाच्या पाठीवर जमना, भाऊ बजरंग (रोहित), यमुना आणि दोन वर्षांची आरती असा तिचा स्वत:चा परिवार आहे. घरचा स्वयंपाक, धुणी- भांडी करून भावंडांची शाळेत जाण्याची तयारी ती करून देते. ती स्वत: आणि जमना तिसऱ्या इयत्तेत, रोहित दुसऱ्या तर यमुना पहिल्या वर्गात शिक्षण घेत आहे.
लहान आरती केवळ आठ महिन्यांची असताना तिची आई सरस्वती दुसरा घरोबा करून गुजरात राज्यात निघून गेली. तेव्हापासून गंगाच सर्व काही समर्थपणे सांभाळत आहे. तिचे वडिल भामटय़ा (भामसिंग) माळी वर्षभरापूर्वी हे जग सोडून गेले. ते देखील अपंग होते. त्यांच्याकडून काही काम होत नव्हते. त्यांचा सांभाळही गंगाच करत होती.
शाळा व घरचे काम सांभाळून गंगा शेत मजुरीसाठी जाते. शेतातही ती वाघिणीसारखे काम करते. ‘ही लहान मुलगी काय काम करणार’ असा प्रश्नार्थक चेहेरा करणाऱ्या शेतकऱ्यांना ती पूर्ण केलेल्या कामातूनच उत्तर देते. मोठय़ा माणसांच्या क्षमतेने ती झटपट शेती काम करते. या कामातून तिला जी ७० ते १०० रूपये मजूरी मिळते, त्या रकमेतून ती स्वस्त धान्य दुकानातून गहू- तांदूळ विकत घेऊन सर्वाचा उदरनिर्वाह करते. गावकरी गंगा व तिच्या कुटुंबियांना शक्य ती मदत करतात.
गावातील कुसुमताई जायस्वाल अधुनमधून तिच्या कुटुंबियांना जेवायला बोलावून घेतात. सामाजिक कार्यकर्ते मनलेश जायस्वाल यांनी उपसरपंच गुलाबसिंग शेमळे, पंचायत समिती सदस्य लहू वळवी आणि गावकऱ्यांच्या उपस्थितीत गंगा व तिच्या भावंडांसाठी ५० किलो गहू व ५० किलो तांदुळ भेट दिला. असे अनेक उदार हात गंगेसाठी पुढे आले आहेत. आधार केंद्रात जावून गंगाने स्वत:सह सर्व भावंडांचे आधारकार्डही तयार करून घेतले आहे.
वडील दिवंगत झाले तेव्हा, आदिवासी रिती-रिवाजाप्रमाणे वडिलांचे उत्तरकार्यही तिने केले. तिच्या शाळेचे मुख्याध्यापक काऊसिंग भंडारी आणि शिक्षक उत्तमराव सक ऱ्या पावरा हे गंगा व तिच्या भावंडांकडे विशेष लक्ष देत आहेत.
‘आपणही शिकणार आणि भावंडांनाही शिकविणार’ अशी तिची भावना आत्मविश्वास प्रगट करते. कुसुमवाडा येथे तिला चवथीपर्यंत शिक्षण घेता येईल. पण, पुढे काय, या अनुत्तरीत प्रश्नाची उकल करण्यासाठी काही सामाजिक संस्थांनी पुढे येऊन तिला आधार देण्याची गरज आहे.