20 September 2020

News Flash

बारा की बात..

बुधवारचा दिवस हा नेहमीसारखा उगवणार असला तरी नेहमीसारखा असणार मात्र नाही. कारण तो आहे १२/१२/१२! यापुढचा असा मुहूर्त १/१/१ हा तब्बल ८८ वर्षांनी एक जानेवारी

| December 12, 2012 01:16 am

बुधवारचा दिवस हा नेहमीसारखा उगवणार असला तरी नेहमीसारखा असणार मात्र नाही. कारण तो आहे १२/१२/१२! यापुढचा असा मुहूर्त १/१/१ हा तब्बल ८८ वर्षांनी एक जानेवारी २१०१ ला येणार असल्याने अशाप्रकारचा आकडय़ाचा खेळ करणारा हा बहुतेकांच्या आयुष्यातला अपूर्वाईचा योग आहे. त्यामुळे या दिवशी जन्मापासून विवाहापर्यंतचे अनेक ‘मुहूर्त’ साधण्याचा प्रयत्न होत आहे. तर या दिवसाचा योग साधून वेगवेगळ्या प्रांतात विक्रमही स्थापित करण्याचा प्रयत्न काहीजण करणार आहेत. अमेरिकेतील सँडी वादळग्रस्तांसाठीची भव्य मैफल या दिवसाची स्मृती सुरांतून अनेक वर्षांपर्यंत कायम राखणार आहे.
१२ मुले होणार १२ वर्षांची!
ऑस्ट्रेलियातील १२ मुला-मुलींसाठी १२/१२/१२ चे विशेष अप्रूप आहे कारण या दिवशी ही मुले १२ वर्षांची होणार आहेत. वाढदिवसाचा केक कापण्याचा मुहूर्तही या मुलांनीच काढला असून तो दुपारी १२ वाजून १२ मिनिटांचा आहे! सिडनीचं उपनगर असलेल्या किंग्ज लेंग्ले येथील ख्रिश्चन आणि डॅनियल या जुळ्या भावांनी  वाढदिवसासाठी पालकांकडे किमान १२ भेटवस्तूंचा आग्रह धरला आहे. नॉर्दन बीचेस उपनगरातील जेम सिनक्लेअर, सोफी थॉमस, क्लॉडिआ बोडेन आणि रिले विल्सन यांनाही आपला जन्म या विशेष दिवशी झाल्याचा आनंद वाटतो. याआधी १/१/१ अर्थात एक जानेवारी २००१ आणि ८/८/८ अर्थात आठ ऑगस्ट २००८ मधील विवाहांना मागे टाकत १२/१२/१२ च्या मुहूर्तावर ऑस्ट्रेलियात १२३ जोडपी विवाहबद्ध होत आहेत. १२/१२/१२ या दिवशी दुपारी १२ वाजून १२ मिनिटांनी तुम्ही काय करीत आहात, त्याचे छायाचित्र काढून पाठविण्याचे आवाहन ‘द टेलिग्राफ’ या ऑस्ट्रेलियन दैनिकानेही केले आहे.
हाँगकाँग आणि सिंगापूरला शुभमंगलाचा धडाका
हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये १२/१२/१२ च्या मुहूर्तावर शुभमंगलांचा धडाका लागणार आहे. हाँगकाँगच्या विवाहनोंदणी कार्यालयात या दिवसासाठी ६९६ जोडप्यांनी अर्ज केला आहे. ऑक्टोबरमध्ये हा आकडा १७७ होता. त्या तुलनेत ही वाढ डोळ्यात भरणारी आहे. सिंगापूरमध्ये या दिवशी विवाहबद्ध होण्यासाठी नोंदणी कार्यालयात ५४० जोडप्यांनी अर्ज केला आहे. त्यामुळे हा दिवस विवाहसोहळे ज्या व्यवसायांवर अवलंबून आहेत त्यांच्यासाठीही पर्वणीचा ठरणार आहे. ‘द वेडिंग बटलर’ या विवाह आयोजन कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की या दिवशी कंपनी २० सोहोळे पार पाडत आहे. अर्थात या दोन्ही शहरांतील विवाहबद्ध होणाऱ्या चिनी आणि मुस्लीम समाजाची आकडेवारी उपलब्ध नाही.
फेंग शुईचा मुहूर्त नाही
हाँगकाँगमधील चिनी समाज या दिवशी विवाह टाळत आहे. याचे कारण फेंग शुई! फेंग शुई पंथाचे एक गुरु सामी औ यांनी हाँगकाँगच्या ‘द स्टँडर्ड’ वृत्तपत्राला सांगितले की, १२/१२/१२ हा मुहूर्त सर्वासाठीच लाभदायक नाही. त्याउलट १८ डिसेंबर आणि ३१ डिसेंबर हे दिवस विवाहासाठी लाभकारक आहेत.
जन्मदिवस ‘मॅनेज’ करण्याचे प्रयत्न
आपल्या अर्भकाचा पहिला टाहो १२/१२/१२ या दिवशीच ऐकायची इच्छा असलेल्या पालकांनी वाराणसीतील प्रसूती गृहातील डॉक्टरांना हैराण केले आहे. डॉ. शालिनी टंडन यांनी सांगितले की, काही मातांना प्रसूतीची तारीख १४ डिसेंबर आहे. पण त्यांचाही आग्रह १२ चा मुहूर्त साधण्यासाठीच आहे. नैसर्गिक प्रसूती होणे शक्य असतानाही हा मुहूर्त साधण्यासाठी माता शस्त्रक्रियेचा आग्रह धरीत आहेत पण असे करणे वैद्यकीयदृष्टय़ाही अयोग्य आहे, असे आम्ही समजावत आहोत. तरी पालकांचा हट्ट चालूच आहे. याआधी ११/११/११ या दिवशी बंगळुरूत ७० मुलांचा जन्म झाला होता. त्यातील काही प्रसूती या शस्त्रक्रियेद्वारेही केल्या गेल्या होत्या. हल्ली अशा ‘आकडेशास्त्रा’चा छंदच लोकांना जडला असून त्याला ज्योतिषाचीही जोड दिले जात असल्याने अशा प्रकारात वाढ होत आहे, असे डॉक्टरांचे मत आहे.
सँडीग्रस्तांसाठी जलसा
अमेरिकेतील सँडी वादळग्रस्तांच्या साह्य़ासाठी न्यूयॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअर गार्डनमध्ये या मुहूर्तावर मोठा जलसा होत आहे. यात संगीत व कला क्षेत्रातील दिग्गज कलावंत हजेरी लावणार आहेत. यात रोलिंग स्टोन, बॉन जोवी, ब्रुस स्प्रिंगस्टीन, एरिक क्लॅपटन यांचा समावेश आहे. या ‘१२/१२/१२’ मैफलीच्या आतापर्यंतच्या तिकिटविक्रीतून तब्बल तीन कोटी २० लाख डॉलर उभे राहिले असून मैफलीच्या दिवशीही तडाखेबंद तिकिटविक्री अपेक्षित आहे.
हसण्याचा बार
या मुहूर्तावर इंदूरच्या टिकम सिंग राय यांनी हसण्याचा विक्रम नोंदविणारा कार्यक्रम आयोजिला आहे. १२ डिसेंबरला दुपारी १२ वाजता हा कार्यक्रम सुरू होणार असून तो १२ तास १२ मिनिटे आणि १२ सेकंद चालणार आहे. त्यात १२ विनोदवीर सहभागी होणार असून विनोदाच्या माध्यमातून हसवता हसवता ते १२ सामाजिक संदेशही देणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 12, 2012 1:16 am

Web Title: story of twelve
Next Stories
1 आजचा मुहूर्त फलदायी नाही
2 मैत्र जीवांचे!
3 अमावस्येमुळे वाजले लग्नाचे १२-१२-१२!
Just Now!
X