अग्निपरीक्षा आणखी किती?’

कोणत्याही क्षेत्रात स्वत:ला सिद्ध करण्यासाठी स्त्रियांना कायम वेगवेगळ्या अग्निपरीक्षेला तोंड द्यावे लागते. त्यांच्या प्रत्येक कृतीवर, विचारावर, क्षमतेवर शंका घेतली जाते. या अग्निपरीक्षेतून तावूनसुलाखून बाहेर पडलेली स्त्री ही बावनकशी सोन्यासारखी असते, असा सूर ‘अग्निपरीक्षा आणखी किती’ या परिसंवादातून उमटला. मात्र, सर्वोत्तम बनण्याच्या नादात स्वत:चे अस्तित्व विसरून जाणे योग्य नाही, याचे भानही परिसंवादातील वक्त्यांनी आणून दिले.

महिलाही पाय खेचतात

राजकारणात पदोपदी स्वत:ला सिद्ध करण्यासाठी स्त्रियांना अग्निपरीक्षा द्यावी लागते. राजकारणाची कोणतीही पाश्र्वभूमी नसताना या क्षेत्रात प्रवेश करायचा असल्यास सगळ्या गोष्टींची माहिती करून घ्या. कोणीही तुम्हाला सहाय्य करत नाही. मात्र, अशा वेळेला आपण आतून पेटून उठतो.  राजकारणच काय, कोणत्याही क्षेत्रात केवळ पुरुष सहकारीच नाही तर महिलाही आपले पाय खेचत असतात. त्यामुळे परिस्थिती कुठल्याही प्रकारे असली तरी आपण सत्याला धरून लढा देत राहिलो तर समाजात आपण उदाहरण बनून राहतो हे लक्षात घेतले पाहिजे. खंबीर आणि सकारात्मक मनाने स्त्रियांनी संकटाला तोंड दिले तर त्या कोणत्याही अग्निपरीक्षेतून बाहेर पडू शकतात.

शुभा राऊळ, माजी महापौर

अनेक पातळ्यांवरील अग्निपरीक्षा

केवळ चारित्र्याच्या संदर्भातच नव्हे, शनि चौथऱ्यावरील प्रवेशासारख्या  मुद्दय़ांवर भूमिका घेतानाही त्यांना अग्निपरीक्षेचा सामना करावा लागतो. दैनंदिन जीवनात महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. तसेच ‘विशाखा गाईड लाइन्स’चा कायदा झाल्यानंतरही कामाच्या ठिकाणी महिलांना अनेक वेळा कुचंबणा सहन करावी लागते. असे असले तरी ‘खाली बघून चालू किती’ अशी प्रश्न विचारणारी सशक्त महिला चळवळ सध्या महाराष्ट्रात तयार झाली आहे. आरक्षणामुळे महिलांना निवडणुकीत संधी देणारे पुरुष ‘मी तुझ्या हातांनी काम करीन, तुझ्या पावलांनी चालेन, तुझ्या डोळयांनी पाहीन जर तू माझ्या डोक्याने चाललीस तर..’,असेच एकप्रकारे तिला सांगत असतात हे चुकीचे आहे.

नीला लिमये, सरचिटणीस, महिला परिषद

स्वतकडेही पाहा..

स्त्रियांना आपल्या कारकीर्दीतही आणि गृहिणी म्हणून असणाऱ्या जबाबदाऱ्यांमध्येही सर्वोत्तम व्हायचे असते. मात्र ‘सुपरवुमन’ म्हणून सगळीकडे धावण्याचा जो ताण येतो त्याचे परिणाम विचित्र आजाराच्या रूपात सामोरे येतात. आपल्याक डे राण्यांचा आणि हिरकण्यांचा असे स्त्रियांचे दोन गट प्रामुख्याने पाहायला मिळतात. या हिरकण्यांच्या गटात मोडणाऱ्या स्त्रियांना एकीक डे आपापल्या क्षेत्रात पुढेही जायचे असते आणि घरात दह्याला विरजण लावण्यापासून सगळ्या गोष्टी करायच्या असतात. आपली जबाबदारी निभावत असताना  पळवाट आम्हाला शोधायची नाही. मात्र, काम करत असताना आपल्या हातून चुको होऊ शकतात, हे वास्तव स्वीकारून स्वत:त योग्य ते बदल करत वाटचाल केली पाहिजे.

अभिनेत्री, सोनाली कुलकर्णी