अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्वत:च्या कमाईतून शिक्षण घेऊन, ह्य़ूमन रिसोस्रेस  (एचआर) मॅनेजमेंट या विषयात मुंबई विद्यापीठाचे सुवर्णपदक मिळवल्यानंतर आज त्या एचआर सल्लागार व कॉर्पोरेट ट्रेनर आहेत, लिबरेशन कोचेस प्रा. लि. या संस्थेच्या संस्थापक, संचालक आहेत. आज त्या अनेक आव्हानांना तोंड देत बेरोजगारांना काम मिळवून देत आहेत..
विजयालक्ष्मी सुवर्णा – नवदुर्गा ६
लिबरेशन कोचेस प्रा. लि. या संस्थेच्या संस्थापक संचालिका, लिबरेशन एज्युकेशन ट्रस्टच्या विश्वस्त, पोलीस विभागाच्या मास्टर ट्रेनर, ३०० हून अधिक कंपन्यांच्या एच. आर. कन्सल्टंट व कॉर्पोरेट ट्रेनर,  ‘मॉम टु सुपरमॉम’ या कार्यक्रमाच्या जनक व शेकडो कंपनी मालकांच्या बिझनेस कोच अशी त्यांची बहुविध ओळख आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून स्वत:चा मार्ग स्वत: शोधत आणि आपले आईपण सांभाळत त्यांनी आपल्या करिअरला दिलेला आकार निश्चितच आदर्शवत तर आहेच, शिवाय आपल्या अमोघ वक्तृत्वाने हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याऱ्या विजयालक्ष्मी यांचा प्रवास प्रेरणादायीही आहे.
विजयालक्ष्मी यांचा जन्म मुंबईतील माटुंग्याच्या झवेरी चाळीतील एका दहा बाय दहाच्या खोलीत झाला. बालपणीच जडलेला जीवघेणा दमा, घरची हलाखीची परिस्थिती आणि त्यातच दारूच्या आहारी गेलेले वडील, यामुळे बालपण फारच कठीण गेले. तशाही प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. नुसतेच पूर्ण  केले नाही तर ज्या वयात मुले -मुली परीक्षा संपवून सुट्टय़ांमध्ये मौज करण्याची वाट बघतात, त्या वयात त्यांनी पार्ट – टाइम नोकऱ्या करून व शिकवण्या घेऊन घरखर्चास हातभार लावला. बी. कॉम ची परीक्षा देऊन दुसऱ्याच दिवशीपासून अ‍ॅम्बॅसेडर हॉटेलमध्ये रिसेप्शनिस्टची नोकरी पत्करली व घरची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. त्या वेळी त्यांचे वय होते २०. त्या दिवसापासून धरलेली कष्टाची कास त्यांनी आजतागायत सोडलेली नाही.
आपल्या अत्यल्प पगारातून पसे वाचवून त्यांनी पदव्युत्तर शिक्षणाचा सपाटा सुरूच ठेवला. लग्नानंतरदेखील आपल्या दीड वर्षांच्या मुलाला खांद्यावर घेऊन त्यांनी एमबीए पदवी पूर्ण केली. ते करताना संपूर्ण मुंबई विद्यापीठातून पहिले येण्याचा, ह्य़ूमन रिसोस्रेस मॅनेजमेंट या विषयात मुंबई विद्यापीठाचे सुवर्णपदक मिळवण्याचा मान त्यांनी मिळवला. पती शलील यांचे मानसिक पाठबळ होते, मात्र त्यांची फिरतीची नोकरी असल्याने घर आणि करिअर यांची पूर्ण जबाबदारी आपल्यावरच आहे याची पुरती जाणीव विजयालक्ष्मींना होती. या जाणिवेचा पगडा इतका की त्या आपल्या दुसऱ्या बाळंतपणात अगदी शेवटच्या दिवसापर्यंत ऑफिसच्या कामात तर त्या गर्क होत्याच, पण प्रसूतीनंतर अगदी सातव्या दिवशी आपल्या सात दिवसांच्या मुलीला एका बास्केटमध्ये घेऊन ऑफिसात हजर झाल्यादेखील! बाळंतपणाची सुट्टी नाही की प्रसूतीमुळे कुठल्या मींटिंग्स रद्द नाहीत! याचे कारण सांगताना त्या म्हणाल्या, ‘‘माझे प्रेरणास्थान मजूर, कामगार आणि शेतकरी स्त्रिया आहेत. त्या कुठे बाळंतपणात सुट्टय़ा घेतात? त्यांना तर आपल्यासारखे पौष्टिक अन्नही मिळत नाही. पण त्या त्या काळातही काम करत असतात, अगदी कष्टाचे. माझी कामवालीच माझे स्फूíतस्थान आहे.’ त्यांच्या ह्य़ाच विचाराने आणि जिद्दीनेच त्यांना उद्योजिका म्हणून घडविले आहे.
अ‍ॅम्बॅसेडर हॉटेल, हॉलिडे इन, यू. टी. व्ही. टून्स इत्यादी नामवंत कंपन्यांमध्ये उच्चपदांवर काम करताना आलेला अनुभव व एच.आर. विषयातल्या आपल्या ज्ञानाचा इतरांनाही लाभ व्हावा या हेतूने २००६ मध्ये त्यांनी ‘लिबरेशन कोचेस प्रा. लि. या ट्रेिनग व कन्सलटन्सी’ कंपनीची स्थापना केली. उद्योजिका म्हणून त्यांचा हा प्रवास तर निव्वळ एक प्रेरक संघर्षगाथा आहे. स्वत:चा उद्योग चालविण्याचा कुठलाही अनुभव नाही, हाती एक पैसादेखील भांडवल म्हणून नाही आणि त्यातच २००७ मध्ये आलेली जागतिक मंदी! मंदीच्या काळात जेव्हा आवक होईनाशी झाली तेव्हा विजयालक्ष्मींनी विविध महाविद्यालयांमध्ये सकाळ- दुपार – संध्याकाळ आणि रविवारीदेखील लेक्चर्स देऊन आपला व्यवसाय टिकवून धरला, कंपनी बंद पडू दिली नाही.
दुसऱ्या बाळंतपणात तर त्यांच्या ओटीपोटीत जखम झाली. जी उशिरा लक्षात आली. मात्र काम थांबवून चालणार नव्हते. अनेक लोक वा कुटुंबे त्याच्यावर अवलंबून होती. त्यांनी त्यातच काम सुरू केले. खरे तर डॉक्टरांनी उभे राहायला परवानगी नाकारली होती, पण पर्याय नव्हता. एमबीएच्या मुलांना त्या शिकवत. एकेका वर्गात ८० ते १०० मुले. अशी तीन तीन लेक्चर्स एका दिवशी असत. त्यामुळे दिवसभर उभे राहून शिकवण्याशिवाय पर्याय नव्हता. संध्याकाळपर्यंत पाय टम्म सुजत. याशिवाय महाविद्यालयामध्ये माईक नसतोच. इतक्या मुलांसमोर बोलायचे म्हणजे आवाजावरही ताण पडे. त्यात मुलगा पाच वर्षांचा होता. मुलगी नुकतीच जन्मलेली. त्या दोघांना अशा शारीरिक अवस्थेत सांभाळणे आव्हानच होते. अनेक वेळा तर त्यांनी लेकीला कडेवर घेऊन ट्रेिनग प्रोगाम्स घेतले, आपल्या क्लायंट्सबरोबर मीटिंग केल्या. स्वत: तीन वष्रे पगार न घेता आपल्या कर्मचाऱ्यांचा पगार मात्र वेळेवरच दिला. कोणत्याही कामात स्वत:ला झोकू न देण्याची तयारी, ‘कुठलीही कॅश स्वीकारणार नाही’ यासारखी समाजोपयोगी व्यापारी तत्त्वे अनुसरल्यामुळे अल्पावधीतच त्यांची ही कंपनी लोकप्रिय झाली. दोन राष्ट्रीय पुरस्कार व एक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळविणाऱ्या त्यांच्या या कंपनीमार्फत ३०० हून अधिक कंपन्या व दोन लाखांहून अधिक कर्मचारी प्रशिक्षित झालेत. २०११ मध्ये त्यांना टी. आय. ई. या संस्थेचा एक लाख रुपये रोख व स्मृतिचिन्ह असे स्वरूप असलेला ‘स्त्री शक्ती सम्मान’ हा पुरस्कार  आय. सी. आय. सी. आय. बँकेच्या अध्यक्ष चंदा कोचर यांच्या हस्ते मिळाला. आज महिन्द्रा आणि महिन्द्रा, नेसले इंडिया लि. आणि शेकडो नामवंत कंपन्यांमधील उच्चपदस्थ अधिकारी विजयालक्ष्मीच्या प्रशिक्षण कार्यक्रमांना आवर्जून वर्णी लावतात.
रिकाम्या झोळीने सुरू झालेली त्यांची ही कंपनी आज कोटींच्या घरात व्यवसाय करते. ठाणे जिल्ह्य़ातल्या १२० बेरोजगार युवक – युवतींना प्रशिक्षित करून त्यांना नोकरीस लावून देण्याचे काम त्यांच्या कंपनीने केले. ‘मॉम टु सुपरमॉम’ हा त्यांचा प्रशिक्षण कार्यक्रम पालकांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. स्वत: खडतर जीवन जगता जगता आपल्या तेरा वर्षांच्या मुलाला आणि आठ वर्षांच्या मुलीला त्यांनी स्वावलंबनाचे, जिद्दीचे धडे दिले आहेत. घरी अभ्यासासाठी लागणारे वातावरण आणि जागा दोन्ही नसल्यामुळे त्यांचे स्वत:चे आय.पी. एस. आधिकारी होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले. मात्र आज  पोलीस ट्रेिनग अकादमींमध्ये होणाऱ्या त्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात अनेक आयपीएस अधिकारी त्यांचे विद्यार्थी असतात.
संपर्क- ९८३३१२२९६६.
आपणही पाठवू शकता आपल्या आजूबाजूच्या दुर्गाविषयी, ज्यांनी प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत जगण्याचं आव्हान स्वीकारलं आहे. अशा स्त्रियांचा माहितीवजा लेख ८०० शब्दांपर्यंत आम्हाला पाठवा. पाकिटावर वा ई-मेल पाठवल्यास ‘सब्जेक्ट’मध्ये ‘शोध नवदुर्गेचा’ आवर्जून लिहा. सोबत त्यांचा फोटो आणि संपर्क क्रमांकही पाठवावा. आमचा पत्ता- प्लॉट नं. ईएल – १३८, टीटीसी इंडस्ट्रियल इस्टेट, महापे, नवी मुंबई- ४००७१०. आमचा ई-मेल durga.loksatta @expressindia.com