सुचित्रा सेननं फक्त तीन चित्रपटांमध्ये हिंदी चित्रपटांच्या इतिहासामध्ये सुवर्णाक्षरात आपलं नाव कोरावं हे असाधारण कर्तृत्व आहे. सौंदर्यापेक्षा प्रभावी व्यक्तिमत्त्व हा तिचा हुकमी एक्का होता. या अधिकारात तोरा आणि उद्दामपणा नव्हता, माणसांना त्यांची जागा दाखवून देण्याची हिंमत त्यात होती.  देवदाससारख्या माणसानं आपलं आयुष्य या स्त्रीपायी उद्ध्वस्त करून घ्यावं असा तिचा प्रभाव तिच्यात होता आणि पक्षातल्या बुजुर्गानीही दबून राहावं असा दरारा त्या व्यक्तिमत्त्वात होता. म्हणूनच पार्वतीचा करारीपणा आणि आरतीचा खंबीरपणा यांना तिनं न्याय दिला.
दर शुक्रवारी नवा चित्रपट लागावा तसं नियमितपणे गेली दोन वर्षे भारतीय चित्रपटाच्या इतिहासातलं एकेक सोनेरी पान गळून पडतंय. सुरुवात झाली देव आनंदपासून. मग शम्मी कपूर.. नंतर राजेश खन्ना. पाठोपाठ प्राण आणि आता सुचित्रा सेन.
तिनं फक्त सहा हिंदी चित्रपट केले. त्यांच्यापैकी दोनच काय ते तिच्याभोवती फिरणारे होते. ‘ममता’ आणि ‘आँधी.’ यांच्याबरोबर ‘देवदास’चं नाव घ्यायलाच हवं. पण तिथे तिला हिंदी चित्रपटाच्या परमेश्वराबरोबर- अर्थात दिलीपकुमार! दुसरा कोण? -आणि त्या काळात तिच्यापेक्षा स्टार म्हणून मोठं नाव असलेल्या वैजयंतीमालाबरोबर ‘जागा वाटून’ घ्यावी लागली होती. काय दिमाखानं सुचित्रा सेन दोघांसमोर उभी राहिली! त्याआधी केलेल्या ‘मुसाफिर’मध्येही ती दिलीपकुमारबरोबर दिसली होती. पण फक्त दिसलीच होती. तिची बंगाली जादू तेव्हा दिसली नव्हती. त्यातच ‘मुसाफिर’ सपशेल तोंडघशी पडला. त्याची चर्चाही झाली नाही. इथे सुचित्रा सेनच पाहिजे, असं वाटावं अशी भूमिका त्या चित्रपटात तिला नव्हती.
ती कसर ‘देवदास’नं भरून काढली. मात्र ती भूमिका तिला अपघातानं मिळाली होती. पार्वतीच्या भूमिकेसाठी बिमल रॉयना मीनाकुमारी हवी होती. कमाल अमरोहींनी पैशाच्या बाबतीत ताणून धरलं  म्हणून बिमलदांनी सुचित्रा सेनला बोलावलं. त्यांनी आधीच तिला बोलवायला हवं होतं, असं ‘देवदास’ पाहिल्यावर वाटलं. मीनाकुमारीची मी निस्सीम चाहती असूनही! मानिनी पार्वतीसाठी मीनाकुमारीच्या ऋजू व्यक्तिमत्त्वाऐवजी सुचित्राच्या करारी व्यक्तिमत्त्वाची गरज होती. पार्वतीला तिच्या रूपाचा गर्व आहे, असा आरोप करून देवदास तिच्या कपाळावर छडीचा प्रहार करतो, त्या दृश्यात हे प्रकर्षांने जाणवलं. पार्वती त्या छडीपेक्षाही मोठा प्रहार करत देवदासला तोडीस तोड जबाब देते: ‘‘तुला तुझ्या घराण्याच्या बडेपणाचा अभिमान आहे, मग मला माझ्या रूपाचा का नसावा?’’
प्रेमासाठीच मध्यरात्री घर सोडून देवदासकडे जाण्याचं आणि प्रेम व्यक्त करण्याचं धैर्य दाखविणारी पार्वती सौंदर्याच्या गर्वापोटी नाही, तर अस्मितेच्या रक्षणासाठी ही परतफेड करते. देवदासनं त्या प्रसंगी खाल्लेली कच आणि  दिलेल्या नकाराचा अपमान देवदासवर विलक्षण प्रेम असूनही माफ करणं तिच्या मानी स्वभावाला रुचत नाही. बापाच्या वयाच्या विधुर पुरुषाशी लग्नं करणं ती मान्य करते, पण देवदासला क्षमा करत नाही. तेवढय़ाच  विलक्षणपणानं ती देवदासला नाकारते, पण त्याच्यावरचं प्रेम संसार करतानाही विसरत नाही.
पार्वतीच्या स्वभावाचे हे कंगोरे सुचित्रानं लीलया दाखवले (आणि आपला बंगाली जादूटोणादेखील!) पार्वतीपेक्षा चंद्रमुखीच्या व्यक्तिरेखेकडे सहानुभूती जात असूनही पार्वती मनात भरते, ही सुचित्राच्या अस्सल अभिनयाची  किमया. आपल्याच वयाच्या सावत्र मुलीला सगळे दागिने देऊन टाकणारी, संसारातल्या सर्व जबाबदाऱ्या समर्थपणे पेलून पतीचं (आणि सावत्र मुलाचंही) मन जिंकणारी, गृहस्थाश्रमातही अलिप्त राहणारी अन तरीही मनानं देवदासबरोबर असणारी पार्वती ही सामान्य घरातली असली तरीही सामान्य स्त्री नाही. ती अवघड भूमिका सुचित्रा सेनच पेलू जाणे! ती जणू त्याच भूमिकेसाठी जन्मली होती.
गमतीदार गोष्ट अशी की, ‘ममता’ आणि ‘आँधी’ बघताना अगदी असंच वाटतं. ज्या सफाईनं तिनं ‘ममता’मध्ये आईचा आणि मुलीचा डबल रोल केला, त्याला तोड नाही. तरुण मुलीची भूमिका करण्याचं सुचित्राचं तेव्हा वय राहिलं नव्हतं. त्यातच तेव्हा नवोदित असलेला धर्मेंद्र तिचा नायक असल्यामुळे ही गोष्ट जास्तच जाणवते. (तो तर तिच्यापुढे पार दबून गेला आहे. अगदी ‘बाळू’ किंवा ‘बब्या’च म्हणावं. असो.) पण ‘ममता’मध्येही तिच्या अभिनयाची जादूची कांडी फिरते आणि तिच्या वयाचा केव्हाच विसर पडतो.  सहजसुंदरपणे ती एकामागून एक क्षण जिवंत करते.
‘ममता’ला पट्टीचा पटकथा लेखक लाभल्यामुळे एरवी पठडीतली झाली असती अशी नायिका विश्वासार्ह बनली आहे. वकिलीचा अभ्यास करणारी बुद्धिमान स्त्री,  प्रियकराशी आणि पित्यासमान ‘काका’शी बरोबरीने वागणारी, ‘बुढ्ढय़ा’ला चकवा देऊन ऑफिसमधून लवकर निघ, संध्याकाळच्या ‘शो’ची तिकिटं काढली आहेत, अशी चिठ्ठी प्रियकराला लिहिणारी बिनधास्त, खेळकर मुलगी सुचित्रानं लोभसपणे केली आहे. त्याच वेळी नादान नवऱ्यानं धंद्याला लावल्यानंतर  मुलीवर त्या बदनामीची सावली पडू नये म्हणून मन घट्ट करून तिच्यापासून वेळीच दूर होणारी, पण दुरून तिचं यश, तिचा अनुरूप जोडीदार डोळे भरून पाहणारी आई आणि मुलीलाही धंद्याला लावू पाहणाऱ्या हलकट नवऱ्याला यमसदनी धाडणारी करारी स्त्री हे प्रौढ रूप सुचित्रानं यथार्थपणे ओढून घेतलं आहे. वकील म्हणून या खुनी स्त्रीचा राग करणारी, पण तो खून तिनं का केला हे समजल्यावर तिच्या बाजूनं केस लढवणारी तडफदार, तरुण वकील आणि कर्तव्यदक्ष मुलगी, असं या डबल रोलचं वर्तुळ अगदी योग्य बिंदूशी पूर्ण होतं. दोन वेगवेगळ्या वयाच्या आणि वेगळ्या सामाजिक स्तरामधल्या स्त्रियांमधली आरोग्यपूर्ण भिन्नता सुचित्रानं ताकदीनं स्पष्ट केली आहे.
हिंदी चित्रपटांमध्ये इतका चांगला डबल रोल नायकांनीदेखील केल्याचं आठवत नाही. बहुतेकदा वेशांतर आणि नकली दाढी मिशा या युक्त्या वापरून हिंदीतले बडे हीरो डबल रोलच्या नावाखाली जास्तीत जास्त वेळ पडदा अडवतात. एकाच चित्रपटात दोन वेगळ्या भूमिका साकारण्याचं सामथ्र्य क्वचितच दिसतं. सुचित्रा सेननं-एका अभिनेत्रीनं ते दाखवावं यात कौतुक आहे, पण नावीन्य नाही. व्यावसायिक हिंदी चित्रपटात शुद्ध स्वाभाविक अभिनय खरं म्हणजे स्त्रियांनीच जपला व जोपासला आहे. कोणत्याही ठरीव लकबी, हातवारे, खटकेबाज ऊर्फ पुन्हा पुन्हा तीच ती वाक्यं बोलणं,  ठराविक पोशाख अन हेअरस्टाईल, भूमिकेपेक्षा स्वत:ची छबी जपणाऱ्या कोणत्याही अवडंबरात न अडकता सुचित्रासह मीनाकुमारी, नर्गिस, नूतन, वहिदा रहेमान यांनी सहजसुंदर आणि वास्तव अभिनयाचे एकाहून एक सरस नमुने सादर केले आहेत. पुरुषप्रधान समाजव्यवस्थेमुळे दिलीपकुमार, देव आनंद, राज कपूर आणि त्यांच्यानंतरच्या नायकांचाही याचा उदोउदो होतो, इतकंच. असो.
सुचित्रा सेननं फक्त तीन चित्रपटांमध्ये हिंदी चित्रपटांच्या इतिहासामध्ये सुवर्णाक्षरात आपलं नाव कोरावं हे असाधारण कर्तृत्व आहे. फार प्रतिकूल परिस्थितीत ती हिंदी चित्रपटात आली. तिच्या आगमनाच्या वेळी  मीनाकुमारी आणि नर्गिस तेजानं तळपत होत्या. नूतन आणि वैजयंतीमाला बहरल्या होत्या. वहिदा रहेमाननं श्रेष्ठ अभिनयगुणांची चुणूक दाखवली होती. निम्मी अधूनमधून चित्रपटात दिसत होती, पण मिळेल त्या भूमिकेचं चीज  करत होती. अभिनय आणि रूप यांचा  मनोहारी संगम असलेल्या या प्रस्थापित अभिनेत्रींसमोर टिकणं सोपं नव्हतं. मातृभाषा हिंदी नसलेल्या अभिनेत्रीकरिता तर ते मुळीच सोपं नव्हतं. सुचित्राच्या बंगाली जिभेला ‘र’ उच्चारणं जड जायचं. ‘औरत’चा उच्चार ती औडत’ करायची.
पण सुचित्रा सेन नुसती टिकली नाही, उण्यापुऱ्या तीन चित्रपटांमधून तिनं आपल्या नावाचा खोल ठसा उमटवला. स्वत:चं स्वतंत्र स्थान निर्माण करून मोठा चाहता वर्ग निर्माण केला. स्त्री म्हणजे पायाची दासी, या छापाच्या भूमिका त्या काळात कोणत्याच अभिनेत्रीला चुकल्या नाहीत. (अशा भूमिकांची टर उडविणाऱ्या डिम्पल कापडिया-खन्नालाही ‘पती  परमेश्वर’मध्ये नायकाच्या पवित्र चरणकमलांमधले जोडे काढावे लागले). सुचित्रा सेन मात्र अगदी पहिल्या चित्रपटापासून या अबला नारी साच्यापासून दूर राहण्यात यशस्वी झाली. तिचं मूळचं व्यक्तिमत्त्व स्वतंत्र आणि कणखर होतं. त्याला सणसणीत उंचीची आणि सडसडीत बांध्याची जोड होती. साहजिकच ‘आँधी’सारख्या भूमिकांमध्ये ती चपखल बसायची. ‘आँधी’चे दिग्दर्शक गुलजार याबद्दलचा कॉम्प्लिमेंट म्हणून तिला ‘मॅडम’ऐवजी सर म्हणायचे- शेवटपर्यंत!
‘सरहद’ आणि ‘बम्बई का बाबू’ या चित्रपटांमध्ये सुचित्रानं ‘बम्बइय्या हिरॉईन’च्या पारंपरिक भूमिका करून पाहिल्या. दोन्ही चित्रपट बऱ्यापैकी होते. दोन्हींचा नायक देव आनंद होता. ‘सरहद’मध्ये ती  माणूसघाण्या नायकाला माणसात आणते, तर ‘बम्बई का बाबू’मध्ये ती ज्याच्या प्रेमात पडते, तो तिचा सख्खा भाऊ निघतो. या दोन चित्रपटांमधल्या नायकांचं एक्सटेन्शन’ म्हणजे ‘गाईड’चा राजू गाईड. त्यांनी देव आनंदची रंगीत तालीम झाली पण सुचित्राला त्यात काहीच वाव नव्हता. नाही म्हणायला देखने में भोला है दिल का सलोना’ मध्ये अवखळ गाणी रंगवण्याचं तिचं कसब डोळ्यात भरणारं होतं. ‘हसिनों का शहजादा है, हंसी ना उडा, ना जी अशी साळसूद टप्पल (अर्थात शाब्दिक) ती नायकाला मारते. त्यानंतरच्या कडव्यात एका सुरावटीनंतर ‘पॉझ’ घेऊन तबल्याचा अफलातून तुकडा ऐकायला मिळतो. तिथे सुचित्रानं धमाल केली आहे.
या दोन चित्रपटांच्या अपयशामुळे की काय, सुचित्रा सेननं मुंबईचा निरोप घेऊन कोलकात्याला प्रयाण केलं. बंगाली चित्रपटांची ती सम्राज्ञी होती. मुंबईत तेव्हा रंगीत चित्रपटांचा, शम्मी कपूरच्या धांगडधिंग्याचा आणि निर्थक प्रेमकथांचा जमाना होता. त्या परिस्थितीत मुंबईत थांबण्यात अर्थ नव्हता. तब्बल सात-आठ वषार्ंचं मध्यंतर घेऊन सुचित्रा सेन ‘ममता’मधून हिंदी चित्रपटाकडे परतली. मात्र ‘ममता’ सुपरहीट झाला तरी नवा चित्रपट न घेता तिनं पुन्हा बंगाली चित्रपटाला प्राधान्य दिलं. तिथे उत्तमकुमारबरोबर तिची छान जोडी जमली होती. तिचा हा गुणसंपन्न जोडीदारदेखील दोन-चार हिंदी चित्रपटांमध्ये दिसला. ‘छोटीसी मुलाकात’,  ‘अमानुष’, ‘आनंदाश्रम’, ‘दूरियां’ वगैरे वगैरे. पण सुचित्रासारखं यश त्याला लाभलं नाही.
‘ममता’नंतर पुन्हा मोठी रजा टाकून सुचित्रा ‘आँधी’करता पुन्हा एकदा मुंबईला आली. तो तिचा हिंदीतला शेवटचा चित्रपट.  हिंदीतल्या तिच्या अल्पस्वल्प कारकिर्दीचा तो पूर्णविराम खरा, पण तो कळसाध्यायही होता. अगदी योग्य चित्रपट करून सुचित्रानं  हिंदी चित्रपटाचा निरोप घेतला आणि योग्यवेळी. त्या वेळी ती पन्नाशीत असावी. ‘ममता’प्रमाणे इथेही तिचा हीरो तिच्यापेक्षा वयानं लहान होता- संजीवकुमार. त्यानं तिच्या तोडीस तोड काम केलं. स्त्रीप्रधान चित्रपटात काम करायला न कचरणारे आणि तिथेही आपला कस दाखवणारे हिंदीत दोनच नायक झाले-  पहिला संजीवकुमार आणि दुसरा ऋषीकपूर.
‘आँधी’ आणि सुचित्रा सेन; सुचित्रा आणि संजीवकुमार, सुचित्रा आणि गुलजार हा मणिकांचन योग  होता. सुचित्रा कॅमेऱ्यासाठी जन्मली होती आणि ‘आँधी’ तिच्यासाठी! इंदिरा आणि फिरोज गांधी यांच्या वैवाहिक जीवनाची पाश्र्वभूमी असलेला तो चित्रपट आणीबाणीच्या काळात प्रदर्शित झाला, हा दुर्दैवी योग. त्याच्यावर सेन्सॉरची बंदी आली, मात्र तोवर तो लोकांपर्यंत पोहोचला होता आणि त्याचा बोलबाला झाला होता. सुचित्राचा इंदिराजींचा गेटअप केसांतल्या त्या सुपरिचित पांढऱ्या झुपक्यासह तंतोतंत जमला होताच. तिच्या सुपरिचित कौशल्यानं ती भूमिकेच्या अंतरंगात शिरली होती. व्यक्तिचित्रण, अभिनय आणि रंगभूषा यांचा सुंदर मिलाफ त्या भूमिकेत होता.
हिंदी चित्रपटात तोवर सहसा पाहायला मिळाल्या नाही अशा करडय़ा छटा ‘आँधी’च्या नायिकेमध्ये पाहायला मिळाल्या. ‘देवदास’च्या पार्वतीप्रमाणे ‘ऑंधी’च्या आरतीकडे धाडस होतं, हिंमत होती, पण नको तितकी महत्त्वाकांक्षाही होती. दिग्दर्शकानं तिची ओळखच मुळी सनसनाटी करून दिली होती. पार्टीहून धुंद अवस्थेत परतलेल्या स्त्रीला एक पुरुष सावरतो, हा प्रसंग हिंदी सिनेमाच्या दृष्टीनं भलताच ‘बोल्ड’ म्हटला पाहिजे. त्या प्रसंगासह डावपेच खेळणारी राजकारणी स्त्री सुचित्रानं झोकात उभी केली आणि त्याच सहजतेनं प्रेयसी आणि गृहिणी या रुपांमधली मिस्किलता आणि लाघव तिनं साकारलं. प्रचाराचे फलक हिंदीत हवेत, हे सांगताना ती इंग्रजीत सांगते- ‘‘दे शूड बी मोअर इन हिंदी!’’ मखमलीच्या मोज्यातून चिमटा काढणारा हा खास गुलजार टच!
इंदिराजींच्या व्यक्तिमत्त्वातला अधिकार सुचित्राच्या व्यक्तिमत्त्वात होता. सौंदर्यापेक्षा प्रभावी व्यक्तिमत्त्व हा तिचा हुकमी एक्का होता. या अधिकारात तोरा आणि उद्दामपणा नव्हता, माणसांना त्यांची जागा दाखवून देण्याची हिंमत त्यात होती. नेतृत्वगुण होता. देवदाससारख्या माणसानं आपलं आयुष्य या स्त्रीपायी उद्ध्वस्त करून घ्यावं असा तिचा प्रभाव तिच्यात होता आणि पक्षातल्या बुजुर्गानीही दबून राहावं असा दरारा त्या व्यक्तिमत्त्वात होता. निर्भयता होती. म्हणूनच पार्वतीचा करारीपणा आणि आरतीचा खंबीरपणा यांना तिनं न्याय दिला.
हिंदीत तिला अगदीच कमी चित्रपट मिळाले, पण उत्तम दिग्दर्शक व लेखक तिला लाभले. तिच्या सुदैवानं त्या काळात हिंदी चित्रपटसृष्टी ‘हंड्रेड क्लब’वाली इंडस्ट्री बनली नव्हती. दिग्दर्शक कमी शिकलेले पण संवेदनशील होते. नायिकेकडे ‘ऑब्जेक्ट ऑफ डिझायर’ म्हणून पाहण्याचा पुरोगामी रानटीपणा त्यांच्यापाशी नव्हता. म्हणूनच तेव्हा ‘इश्क कमीना’ नव्हता. ‘मुहब्बत बदतमीज’ नव्हती आणि ‘जवानी हलकट’ नव्हती. नटय़ांपाशी रूप होतं आणि अभिनय होता. पूर्ण अंग झाकणाऱ्या कपडय़ांतही त्या ‘सेक्सी’ दिसायच्या. त्यांच्या नाटय़पूर्ण अभिनयाला वास्तवाची  झालर असायची, त्यांचं सौंदर्य त्यांना समाजातल्या सामान्य स्त्रियांपासून दूर नेणारं नव्हतं. त्यांचं स्टारपद त्यांच्या अभिनयगुणाच्या आड येत  नव्हतं.
सुचित्रा सेन त्या सोनेरी जमान्याची सन्माननीय प्रतिनिधी होती. बंगाली चित्रपटाची ती अनभिषिक्त सम्राज्ञी होती. लाखात एक देखणी नव्हती, पण लाखांमध्ये उठून दिसेल अशी अभिनेत्री होती. हिंदी चित्रपट व्यवसायानं आणि भारत सरकारनं मात्र तिला प्रादेशिक कलाकाराची वागणूक दिली. मुंबईमध्ये दरसाल दर डझन भरणाऱ्या पुरस्कारांच्या जत्रेत सुचित्रा सेनला ‘जीवनगौरव’ पुरस्कार देण्याचं कुणालाही सुचलं नाही. तिचा ‘फाळके पुरस्कार’ जवळपास पक्का झाला होता, पण दिल्लीला जाण्याची तिची तयारी नव्हती. दोन वर्षांपूर्वीच तिची प्रकृती नाजूक बनली होती. प्राणला मुंबईत येऊन फाळके पुरस्कार देणारे मंत्रिमहाशय सुचित्राला कोलकात्याला जाऊन तेच पुण्याचं काम करू शकले असते, पण माशी कुठे शिंकली कोण जाणे!
अर्थात अशा पुरस्कारांशिवाय आणि तथाकथित सन्मानाविना सुचित्रा सेनचं काही नडलं नव्हतं. बंगाली प्रेक्षकांनी तिला भरभरून प्रेम दिलं. हिंदी चित्रपट प्रेक्षकांनी तिला अमाप आदर दिला. त्याला ती सर्वथैव प्राप्त होती. ‘वेगळेपण’ हा घासून गुळगुळीत झालेला शब्द नाही; तो गुण अद्यापही अस्तित्वात आहे,याचं ती जितंजागतं प्रमाण होती. पडद्यावरच नाही, तर पडद्यामागेही सुचित्रा सेन हे आगळंवेगळं व्यक्तिमत्त्व होतं. स्टुडिओ आणि आपलं घर यांच्या व्यतिरिक्त तिसऱ्या ठिकाणी ती क्वचितच दिसली. पाटर्य़ा, समारंभ, सामाजिक कार्याच्या मुखवटय़ाआडची प्रसिद्धी याचा तिला तिटकारा होता. प्रमोशन आणि मार्केटिंगच्या जमान्याशी तिचं मुळीच जमलं नसतं. बाकी त्या काळात जन्मूनही ती स्वत:च एक ब्रँड होती. पाचव्या- सहाव्या दशकात तिनं स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाची आधुनिक स्त्री पडद्यावर सातत्यानं उभी केली, तशीच ती कामगिरीदेखील साधली. हे तिचं वेगळेपण आणि मोठेपणसुद्धा!
ती  निवृत्त होता होता तिची मुलगी मुनमुन पडद्यावर आली, पण सुदैवानं चित्रपटाच्या जगात घराणेशाही चालत नाही. मुनमुनकडे सुचित्राचा अभिनयगुण राहोच, तिच्या प्रभावी व्यक्तिमत्त्वाचा शंभरावा हिस्सादेखील आला नाही. टीव्ही मालिकांमध्ये काम करणाऱ्या श्वेता तिवारीला बघून सुचित्रा सेनची आठवण होते, पण हे साम्य चेहरेपट्टीपाशीच थांबतं. सुचित्राच्या अभिनयगुणाचा थोडाफार वारसा तिच्या नातीला (रायमा सेन) मिळाला आहे. पण आजचा हिंदी चित्रपट तिला न्याय द्यायला समर्थ नाही. नायिकाप्रधान/ स्त्रीप्रधान चित्रपटच आता संपला आहे. ‘रेप’ आणि ‘मर्डर’ हे ‘चालू’ विषय असतील तरच आता स्त्रीप्रधान चित्रपट बनतो. असो. सत्य काय, तर सेन आडनाव आणि रक्तगट समान असला तरी कुणी सुचित्रा सेन बनू शकत नाही.  सुचित्रा सेन एक आणि फक्त एकच असू शकते!