अलिबाग तालुक्यातील कुरूळ गावातील सुधागड एज्युकेशन सोसायटीचे सृजन विद्यालय आज बहुभाषिक विद्यार्थ्यांचे अभ्यासकेंद्र बनले आहे. केवळ स्थानिक मराठीच नव्हे, तर या भागात देशातील विविध भागांतून स्थलांतरित झालेल्या मुलांवर मराठीतून शैक्षणिक संस्कार करण्याचे काम ही शाळा करते आहे. शिक्षणाला भाषेच्या मर्यादा नसतात हे या शाळेतील विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी खऱ्या अर्थाने सिद्ध करून दाखवले आहे.
ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणाची कवाडे खुली व्हावी यासाठी कुरूळ येथे सृजन विद्यालयाची मुहूर्तमेढ रोवली गेली. आज शाळेच्या प्राथमिक विद्यालयात १४०, तर माध्यमिक विद्यालयात २२० विद्यार्थी शिक्षण घेतात. शाळेत शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबर व्यक्तिमत्त्व विकासासाठी विशेष प्रयत्न घेतले जातात. अभिव्यक्तीची माध्यमे उपलब्ध करून देणे हा शिक्षणाचा पाया आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे विचार आणि भावनांना व्यक्त करण्यासाठी शाळा पूरक माध्यम असले पाहिजे, असा ठाम विश्वास संस्थाचालकांना वाटतो.
बहुभाषिक अध्यापन पद्धती
नोकरी-व्यवसायाच्या शोधात उत्तर भारतातील तरुण देशभरात स्थलांतरित झाले आहेत. याला आपला महाराष्ट्रही अपवाद राहिलेला नाही. स्थलांतरित होणाऱ्या कामगारांचे आणि कारागिरांचे जथेच्या जथे राज्यातील विविध भागांत स्थिरावले आहेत; पण अशा स्थलांतरित पालकांच्या मुलांचे शिक्षण हा गुंतागुंतीचा विषय बनला आहे. पालकांचा अशिक्षितपणा, गरिबी हा मुलांच्या शिक्षणातील मोठा अडसर असून भाषा माध्यम हीदेखील एक प्रमुख समस्या आहे. ही समस्या लक्षात घेऊन शाळेने बहुभाषिक अध्यापन पद्धतीचा स्वीकार केला आहे. शिक्षणाची भाषा ही मातृभाषा नसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अध्यापनातील भाषिक अडसर दूर व्हावा हा यामागचा मूळ उद्देश आहे.
कारण शाळेत दाखल होणारे ५० टक्के विद्यार्थी हे परप्रांतीय आहेत. अशा वेळी त्यांना मराठी भाषेबद्दल आत्मीयता निर्माण करणे, भाषेचे ज्ञान आत्मसात करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करणे गरजेचे होते. अशा वेळी जर त्यांच्या मातृभाषेबद्दल मुलांच्या मनात न्यूनगंड निर्माण झाला असता तर ती शिक्षणापासून दुरावली गेली असती. ही बाब लक्षात घेऊन प्रत्येक मुलाला सुरुवातीला त्याच्या भाषेत व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य शाळेने उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शालेय अध्यापनातील विषय सुरुवातीला मराठी आणि त्यांच्या मातृभाषेत समजावून देण्याचा प्रयत्न करून देण्यात आला. यासाठी शैक्षणिक साहित्य आणि चित्रांचा वापर मोठय़ा प्रमाणात करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या मातृभाषेतील शब्द स्वीकारून त्यांना पर्यायी समानार्थी मराठी शब्दांची ओळख करून देण्यात आली. सुरुवातीला मूल अशुद्ध बोलत असले तरी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले गेले. त्यांना संवाद साधण्यास प्रोत्साहन देण्यात आले.
या बहुभाषिक उपक्रमाला विद्यार्थ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. मुलांमधील शाळेची भीती दूर होत गेली. सुरुवातीला भाषेच्या अडसरामुळे लाजणारी मुले मनमोकळेपणाने व्यक्त होऊ लागली. भाषा म्हणून मराठी माध्यमाचा स्वीकार केला. शाळेबद्दल गोडी निर्माण झाली.
शाळेचे बोलफलक
लहान मुलांना िभतीवर लिहिण्याची आवड असते. त्यांच्या या आवडीला सकारात्मक दृष्टिकोनातून वापरण्याचा निर्णय शाळेने घेतला. प्रत्येक मुलाला वर्गातील एक कोपरा आपल्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी राखून ठेवण्यात आला. या कोपऱ्यात मुलांना चित्र काढणे, ती रंगवणे, सुविचार लिहिणे, कविता लिहिण्यास सांगण्यात आले. विद्यार्थ्यांनी या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद दिला. सुरुवातीला लाजणारी मुले हळूहळू व्यक्त होण्यास सुरुवात झाली. आपल्या हक्काच्या कोपऱ्यात आपले विश्व साकारू लागली. आजूबाजूच्या मुलांचे अनुकरण करू लागली. यातूनच वर्गातील िभती हे अभिव्यक्तीचे माध्यम ही संकल्पना उदयास आली. याला बोलफलक असे नामकरण करण्यात आले.
माहिती तंत्रज्ञानाच्या युगात समाजमाध्यम ही अभिव्यक्तिस्वातंत्र्याची माध्यमे बनत चालली आहेत. फेसबुक आणि ट्विटरच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या जाऊ लागल्या आहेत. त्याच धर्तीवर वर्गातील या िभती मुलांच्या अभिव्यक्तीचे माध्यम बनल्या आहेत. वर्गात शिकवले जाणारे विषय त्यांच्या पद्धतीने िभतीवर साकारू लागली आहेत.
वाचा आणि व्यक्त व्हा
मुलांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी यासाठी शाळा विशेष मेहनत घेते. शाळेतील प्रत्येक वर्गासाठी ग्रंथालयाचा एक तास असतो. या तासिकेत मुलांना त्यांच्या आवडीची पुस्तके वाचायला दिली जातात. वाचलेल्या पुस्तकावर मुलांना आपले मत मांडण्यास सांगितले जाते.
गणित आणि विज्ञान
गणित आणि विज्ञान हे विषय मुलांना जड जातात. त्यामुळे दोन्ही विषयांत विद्यार्थ्यांना गती निर्माण व्हावी यासाठी विशेष प्रयत्न केले जातात. गणित विषय समजावून देण्यासाठी ज्ञानरचनावादाचा स्वीकार केला जातो. शाळेतील शिक्षकांना यासाठी विशेष प्रशिक्षण दिले जाते. पुण्यातील नवनिर्मिती फाऊंडेशन शिक्षकांना यासाठी साहाय्य करते. भित्तिपत्रक, वर्तमानपत्रातील कात्रणे, तक्ते, कार्ड यांचा वापर करून शिक्षणात रंजकता आणण्याचा प्रयत्न केला जातो. शाळेच्या बहुभाषिक वर्ग आणि बोलफलक संकल्पनांची दखल राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे. टीचर पेजेस या यूटय़ूब वाहिनीने या उपक्रमांवर विशेष माहितीपट तयार केले आहेत. या माहितीपटांचे पुणे आणि मुंबई येथे झालेल्या अनेक कार्यशाळांमध्ये प्रसारण करण्यात आले आहे.
शाळेच्या वर्गाना कवींची नावे
माध्यमिक महाविद्यालयाच्या सर्व वर्गखोल्यांना राज्यातील ख्यातनाम कवींची नावे देण्यात आली आहेत. मुलांना अभिजात साहित्याबदल रुची निर्माण व्हावी, महाराष्ट्रातील साहित्यपरंपरा जोपासणाऱ्या साहित्यिकांची ओळख त्यांना व्हावी म्हणून प्रत्येक वर्गाला कवींची नावे देण्यात आली आहेत.
शाळेत दर वर्षी कालिदास दिन साजरा केला जातो. यात मुलांसाठी काव्यगायन स्पध्रेचे आयोजन केले जाते. यात विद्यार्थी स्वत: लिहिलेल्या कविता सादर करतात. विज्ञान दिनानिमित्त शाळेत वैज्ञानिक खेळण्यांच्या निर्मितीची स्पर्धा आयोजित केली जाते. यात विद्यार्थी टाकाऊ वस्तूपासून वैज्ञानिक उपकरणे आणि खेळणी बनवत असतात. दिवाळीत विद्यार्थ्यांसाठी किल्ला बनवण्याच्या स्पध्रेचे आयोजन केले जाते. मुलांनी बनवलेले हे किल्ले पाहण्यासाठी शिक्षक त्यांच्या घरी जातात. बनवलेल्या किल्ल्याची माहिती या वेळी मुले शिक्षकांना देतात. शाळेच्या वार्षकि संमेलनात या किल्ल्याच्या फोटोंचे प्रदर्शन भरवले जाते आणि पुरस्कारही दिले जातात.
मुलांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी यासाठी शाळा विशेष मेहनत घेते. शाळेतील प्रत्येक वर्गासाठी ग्रंथालयाचा एक तास असतो. या तासात मुलांना त्यांच्या आवडीचे पुस्तक वाचायला दिले जाते. वाचलेल्या पुस्तकावर मुलांना आपली मते मांडण्यास सांगितले जाते.

शालेय शिक्षणाबरोबर व्यावहारिक दृष्टिकोन, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न शाळेतून केला जातो. शिस्तीचा बडगा न उगारता मुलांचा व्यक्तिमत्त्व विकास कसा होईल याकडे आमचे लक्ष असते.
– सुजाता पाटील,
मुख्याध्यापिका सृजन विद्यालय, कुरूळ

20 people have recorded their testimony in the suicide case of nursing student in Nagpur
नागपुरात बी. एस्सी. विद्यार्थिनीच्या आत्महत्या प्रकरणात २० जणांनी नोंदवली साक्ष
Suicide student
जळगावात परिचारिका महाविद्यालयातील विद्यार्थिनीची आत्महत्या
Engineering Colleges Maharashtra
‘बीई’ करूनही मिळत नाहीये नोकरी!
Nursing student commits suicide in hostel
नागपूर : धक्कादायक! नर्सिंगच्या विद्यार्थिनीची वसतिगृहातच आत्महत्या

 

संकलन – रेश्मा शिवडेकर
reshma.murkar@expressindia.com