25 February 2020

News Flash

प्रिय योगेन्द्र, हा तुझा प्रतिवाद..

काँग्रेस पक्ष कसाही असला तरी निवडणुकीच्या राजकारणात तोच भाजपचा विरोधक ठरतो एवढे नक्की.

(संग्रहित छायाचित्र)

सुहास पळशीकर

भारत हा कोणत्या प्रकारची, काय मगदुराची लोकशाही राहणार आहे, याविषयीचे राजकारण हे उदारमतवादी वा ‘पर्यायी’ राजकारणातून नव्हे, तर बहुश: ‘मध्यममार्गा’च्याच मैदानावर पुढल्या काळातही खेळले जाणार असल्यामुळे केवळ काँग्रेसच नव्हे, तर ज्या-ज्या पक्षांकडे भले दृष्टी कमी असूनही त्यांना बहुविधता मान्य आहे, त्या सर्वच पक्षांचा सहभाग मोलाचा ठरणार आहे..

नव्या राजकीय पर्यायासाठी काँग्रेसने मरण पत्करावे, असा दावा योगेन्द्र यादव यांनी केलेला आहे, त्यावर साधकबाधक चर्चा होण्यासाठी दुसरी बाजूही मांडावी लागेल. अर्थात, तसे करण्यात जोखीम आहे. हल्ली कुणावरही चटकन शिक्के मारले जातात, लेबले लावली जातात. अशा काळात काँग्रेस राहावी अशा अर्थाचा युक्तिवाद करणे म्हणजे, सध्याच्या प्रस्थापिततावाद्यांकडून तसेच परिवर्तनवाद्यांपैकी नैतिकतेचा मक्ता घेतल्यासारखे सर्वकाळ वागणाऱ्यांकडून ‘काँग्रेसची भलामण’ केल्याची टीका ओढवून घेणे. त्यामुळे आधीच स्पष्टपणे सांगतो की, हे लिखाण काँग्रेसचा कैवार घेण्यासाठी नसून भारतीय राजकारणाचा मूळ स्वभाव कोणता, याचे संदर्भ तपासतानाच ‘बिगरभाजप- बिगरकाँग्रेसी राजकारण’ हे का स्वप्नाळू ठरते याहीविषयी हे लिखाण आहे.

जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस इंदिरा गांधी यांच्यामुळे इतकी बदलली की, या पक्षाची जुनी ओळखच नाहीशी झाली. त्यामुळेच पुढल्या काळात- १९८० च्या दशकाच्या अखेरीपासून- तो पक्ष घसरणीला लागला. तेव्हापासून आजतागायत, काँग्रेसला स्वत:चे पुर्नसघटन करता आलेले नाही. कार्यकर्त्यांना नव्याने हेतूचे भान देता आले नाहीच, पण मतदारांनी का म्हणून पाठराखण करावी, हेही पटवून देता आले नाही, ही काँग्रेसची अवस्था तेव्हापासून होत गेलेली आहे. मग अनेकांना, अनेकदा असे मनापासून वाटत राहिले की, काँग्रेसची घसरण आणि त्या पक्षाचा अस्त हीच आपल्या देशातील नव्या राजकारणाची पहाट ठरेल. या तीनही दशकांच्या काळात ते नवे- पर्यायी राजकारण उदयास आणण्याकामी उदारमतवादी, डावे, जहाल अशा सर्वाना शोचनीय अपयश येत राहिले. यादव हे ज्या पर्यायी राजकारणाची नव्याने उभारणी करू पाहत आहेत, त्यात आधीपासूनच असलेले कच्चे दुवे हे या अपयशातून घट्ट होत गेल्याचे न ओळखता काँग्रेसवरच खापर फोडणे, हा सोपा मार्ग ठरतो.

पर्यायी राजकारणाचे स्वप्न बाळगतानाच योगेंद्र यादव हे सद्य:स्थितीचे विश्लेषणही करतात, त्यातून अलीकडेच त्यांनी असे मत नोंदविले होते की, एका अंधाऱ्या बोगद्यातून भारताचा अटळ प्रवास सुरू आहे. या रोगनिदानाशी सहमत व्हायचे, तर मग काँग्रेसच्या ‘उपयोगिते’कडे डोळेझाक करून चालणारच नाही. अशा काळात, भाजप आणि भाजपने राबविलेले सत्तायंत्र यांना प्रतिबंध करण्याचे काम काँग्रेस पक्ष किमान स्वसंरक्षणासाठी तरी करत राहील. या प्रक्रियेतून, ज्या पक्षांशी- गटांशी काँग्रेसचे फारसे पटत नाही त्यांच्याही संरक्षणाचेच काम काँग्रेस करील. विरोध करणाऱ्यांविरुद्ध, वैविध्यपूर्णतेच्या विरुद्ध भाजपचा संभाव्य दट्टय़ा इतका असेल की, त्याला थोपवू पाहणारा प्रतिरोधही आकाराने मोठाच हवा. आजघडीला काँग्रेस पक्ष घायाळ आहे आणि गेल्या पाच वर्षांत कुचकामीदेखील ठरलेला आहे हे कबूल आणि या एका निवडणुकीने लगेच भाजपला मोठा प्रतिरोध करण्याचे सामर्थ्य काँग्रेसकडे येऊ शकणार नाही हेही कबूल. तरीसुद्धा, लोकशाहीच संकटात असण्याच्या काळात एखादा पक्ष निव्वळ आकाराने मोठा असल्याचे काही फायदे असतात, जे योगेंद्र यादव, प्रकाश राज, कमल हासन किंवा कन्हय्याकुमार यांसारख्यांकडे असू शकत नाहीत. कारण या सर्वाची पत निर्विवाद असली, तरी पुरेशा शक्तीने कार्यरत होण्यासाठी या सर्वानी आपापल्या वर्तुळांच्या बाहेरही प्रभाव वाढवण्याची गरज आहे.

भारतीय लोकशाहीला टोकाचा उदारमतवादीपणा किंवा पुरोगामी क्रांतिकारकपणा सहजासहजी पचनी पडत नाही. स्वायत्त पण सशक्त अशा ‘पर्यायां’च्या राजकारणासाठीदेखील आपल्याकडे पुरेशी जागाच नाही. मुळात, हे पर्यायांचे राजकारण आधी समाजाला बदलून मग स्वत:ला राजकारणाच्या मध्यभागी आणू पाहते. समाजात जोवर चांगले बदल घडत नाहीत, तोवर पर्यायी राजकारण हे मुख्य धारेतल्याच कुणा ना कुणा राजकीय शक्तींचे बोट धरून चालवावे लागेल. त्यामुळेच, काँग्रेस संपली पाहिजे, असे म्हणताना स्वत:च्या राजकारणाची व्यवहार्यता यादव यांनी कदाचित पुरेशी जोखलेलीच नसावी असे म्हणावे लागते. माझे म्हणणे कुणाला साध्य-साधनवादी वाटेल, पण बदल घडवू पाहणाऱ्या राजकारणालाही राजकीय पाठिंबा लागतोच, त्यासाठी राजकीय वाहन लागतेच आणि राजकीयदृष्टय़ा मोठय़ा जनसमूहाची सहानुभूतीदेखील हवीच असते. म्हणजे गरज आहे म्हणून तरी काँग्रेसचा ‘वैद्य’ हवा, पण गरज सरल्यानंतर तो मरूनच जावा असे मी म्हणणार नाही, त्याला कारणे आहेत.

पहिले कारण म्हणजे, बिगरभाजप राजकीय शक्ती बऱ्याच विखुरलेल्या असूनसुद्धा प्रत्येक दहा मतांपैकी किमान दोन मते काँग्रेसला आजही मिळतात, तर भाजपला या दहापैकी तीन. काँग्रेसला मिळणारी मते ही त्या पक्षाच्या पूर्वापार मतांमधली, भाजपकडे जाऊन आता उरलेली अशी मते आहेत. तरीही काँग्रेसचा राजकीय अवकाश नगण्य नाही. म्हणजे जर काँग्रेसने मरायचे असेल, तर हा अवकाश केवळ भाजपच व्यापणार. दुसरे कारण असे की, सध्या तरी भाजपला वैचारिक उत्तर काँग्रेसच देताना दिसते. आज काँग्रेसची ही उत्तरे पुरेशी सक्षम नाहीत असे कुणी म्हणेल, ते मान्यच. पण प्रादेशिक पक्षांकडून दिली जाणारी हेतुहीन, तरीही कर्कश प्रत्युत्तरे लक्षात घेता, काँग्रेसने केलेला किमान युक्तिवाददेखील प्रतिकाराच्या शक्यता निर्माण करतो, एवढे तरी श्रेय त्या पक्षास द्यायला हवे.

तिसरे महत्त्वाचे कारण म्हणजे, काँग्रेस जर संपणारच असेल, तर विरोधी पक्ष म्हणून जो अवकाश उरेल तो भरण्यासाठी प्रादेशिक पक्षच सरसावतील. या पक्षांपैकी बहुतेक साऱ्या पक्षांनी कधी ना कधी भाजपशी एक तर आघाडी केलेली आहे किंवा आपापल्या राज्यात भाजपचा प्रवेश सुकर केला आहे- उदाहरणार्थ ओडिशा आणि बिहार. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, काँग्रेस पक्ष कसाही असला तरी निवडणुकीच्या राजकारणात तोच भाजपचा विरोधक ठरतो एवढे नक्की.

यादव यांच्या म्हणण्याचा प्रतिवाद करण्याचे एक कारण यापेक्षा अधिक सखोल आणि मूलभूत आहे. पुरोगामी वा परिवर्तनवादी आकांक्षा कितीही शुद्ध असल्या तरी नजीकच्या भविष्यकाळातील निवडणूक-शर्यतीचा तसेच जनमताला आकार देण्याचा खेळ हा ज्यांना ‘ना अति डावीकडले ना अति उजवीकडले’ म्हणता येईल अशा मध्यममार्गी शक्यतांच्या परिघातच खेळला जाणार आहे. आज तरी भाजपनेच हा अवकाश प्रामुख्याने काबीज केला असून आम्हीच मध्यममार्गी आहोत असा त्यांचा दावा आहे. यापेक्षा निराळ्या पद्धतीने मध्यममार्गी असल्याचा दावा करण्याच्या शक्यता काँग्रेसमध्ये आहेत. काँग्रेसमध्ये ‘उजवे’ असोत की हिंदुवादी असोत की समाजवादी, साऱ्याच घटकांचा समावेश पूर्वापार होता, हा इतिहास सर्वज्ञात आहेच. काँग्रेस पक्षाने त्या साऱ्यांना सामावून घेण्याची शक्ती हल्ली गमावली असली, तरी त्या मध्यममार्गी स्वरूपाकडे नागरिकांना आकर्षित करून घेण्याची क्षमता अद्याप त्या पक्षाकडे बाकी आहे. अशा स्थितीत काँग्रेसने ‘मरण पत्करणे’ म्हणजे, परस्परांशी स्पर्धा करणाऱ्या दोन मध्यममार्गाऐवजी एकच- भाजपने ज्याचा प्रचार चालविला आहे तोच- मध्यममार्ग शाबूत राहणे. भारत हा कोणत्या प्रकारची, काय मगदुराची लोकशाही राहणार आहे, याविषयीचे राजकारण बहुश: या मध्यममार्गाच्याच मैदानावर खेळले जाणार असल्यामुळे केवळ काँग्रेसच नव्हे, तर ज्या-ज्या पक्षांकडे भले दृष्टी कमी असूनही त्यांना बहुविधता मान्य आहे, त्या सर्वच पक्षांचा सहभाग मोलाचा ठरणार आहे.

अशा स्थितीत एकटय़ा भाजपने ज्याला मध्यममार्ग म्हणतो त्याच मध्यममार्गाने हे मैदान मारले, तर तीन प्रमुख आव्हाने पुढे येतील. पहिले भाजपने हिंदुत्वाच्या केलेल्या पाठपुराव्याचे, ज्यामुळे सामान्य हिंदूंच्या धार्मिक भावना आधीच गढुळून टाकल्या गेल्या आहेत. दुसरे आव्हान विद्यमान नेतृत्वाचे किंवा नेतृत्वशैलीचे, ज्यामुळे प्रस्थापित उदारमतवादी लोकशाही अवकाशातून पळवाटा काढून काढून अधिकारांमध्ये व्यक्तिस्तोम माजविले गेले आहे. एक वेळ हिंदुत्वाचा पाठपुरावा हे आव्हान जरी समजा नसेलच, तरी नेतृत्वशैलीचे आव्हान हे या मध्यममार्गी अवकाशाचा संकोच करण्यासाठी पुरेसे आहे. तिसरे आव्हान असे की, भाजपने धारण केलेला मध्यममार्ग हा इतका तकलादू आहे की उद्या आदित्यनाथ वा प्रज्ञा ठाकूर यांनी ठरवले तर तो सहज मोडीत निघेल.. ही नावे म्हणजे जणू काही हिंदुत्ववादाच्या परिघावरचे लोक आहेत, ही समजूत चुकीची आहे. आजच्या भाजपचे तेच प्रतिनिधी आहेत. म्हणूनच भाजपचा तथाकथित मध्यममार्ग म्हणजे आपल्या देशामधील विविधतेवर, अनेकान्तवादावर थेट प्रहार, असा अर्थ होईल.

अलीकडच्या काही दिवसांत तर यादव स्वत:च भारताचा स्वभाव आणि स्वधर्म यांच्या पुनरुत्थानाची भाषा करीत असतात. या तत्त्वांच्या जपणुकीसाठी काँग्रेस आज काहीही करताना दिसत नसेल, परंतु तिचे अस्तित्व हे अनेक भारतीयांना आजही त्यांचा स्वधर्म जपण्याची मुभा देते- म्हणजे या भूमीत मुरलेली शहाणीव व्यक्त होऊ देते आणि भारतीयत्वाचा अंगभूत चारित्र्यगुण टिकवू देते.

First Published on May 23, 2019 12:59 am

Web Title: suhas palshikar reaction on yogendra yadav article congress must die
Next Stories
1 काँग्रेस मेली पाहिजेच; पण कशी?
2 आखाताच्या आकाशात युद्धाचे ढग
3 शेतीच्या प्रश्नांवरील आश्वासने कागदावरच
Just Now!
X