प्रदीप नणंदकर

सोयाबीन लागवडीतील वाढत्या भांडवली खर्चाबद्दल अनेकदा चिंता व्यक्त केली जाते. यावर उपाय म्हणून घरीच बियाणे तयार करण्यावर आता भर दिला जात आहे. यातूनच सोयाबीनचा उन्हाळी हंगामाचा प्रयोग शासकीय प्रोत्साहनातून सुरू झाला आहे. हा प्रयोग यशस्वी झाला तर खात्रीचे बियाणे आणि भांडवली खर्चात कपात या दोन गोष्टी साध्य होतील.

Unicorns List India ranks third
Unicorns List: अमेरिका व चीनपाठोपाठ भारत तिसऱ्या स्थानावर
Will climate change be key issue in this years election What do youth think
विश्लेषण : यंदाच्या निवडणुकीत हवामान बदल हा कळीचा मुद्दा ठरेल का? तरुणाईला काय वाटते?
coal production
कोळसा उत्पादनानं पार केला १ अब्ज टनचा टप्पा; आयातीवरचं अवलंबित्व कमी होणार
India is the third most polluted country in the world What are the potential dangers of this
विश्लेषण : भारत जगातील तिसरा सर्वाधिक प्रदूषित देश! यातून कोणते धोके संभवतात?

खरिपाच्या हंगामातील सोयाबीन पेरणीच्या वेळी बाजारपेठेत गुणवत्ताधारक बियाणांचा अपुरा पुरवठा ही मोठी अडचण महाराष्ट्रात जाणवत होती. त्यातही गेल्या काही वर्षात सोयाबीन काढणीच्या वेळी पडणाऱ्या पावसामुळे सोयाबीनचा दर्जा खालावत होता. त्यामुळे बियाणांचा प्रश्न दरवर्षी अधिक तीव्रतेने भेडसावत होता. यावर्षी कृषी विभागाने पुढाकार घेत राज्यभर शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली व गुणवत्ताधारक घरचे बियाणे हवे असेल तर उन्हाळी हंगामात सोयाबीन पेरण्याचे आवाहन केले. या आवाहनाला राज्यातील शेतकऱ्यांनी भरभरून प्रतिसाद देत तब्बल १२ हजार हेक्टरवर सोयाबीनचा पेरा केला आहे. खरीप हंगामाइतकी उत्पादकता या सोयाबीनला नसली तरी मिळणारे उत्पादन हे बियाणांसाठी अतिशय दर्जेदार असल्याने तोंडावर येणाऱ्या खरीप हंगामातील सोयाबीनच्या बियाणाचा प्रश्न यामुळे निकाली निघणार आहे.

जगात सोयाबीनचा पेरा अमेरिकेत सर्वाधिक आहे. भारतातील सोयाबीनचा पेरा हा जगाच्या तुलनेत केवळ ३ टक्के आहे. गेल्या काही वर्षात आपल्याकडील शेतकरी सोयाबीनकडे मोठ्या प्रमाणावर वळत आहेत. मध्यप्रदेश हे देशातील सोयाबीनचे सर्वाधिक उत्पादन घेणारे राज्य असून दुसरा क्रमांक महाराष्ट्राचा आहे. महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात सोयाबीनचा पेरा मोठ्या प्रमाणावर आहे. राज्यात गतवर्षी ४० लाख हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला. लातूर जिल्ह्यात ४ लाख ६० हजार हेक्टरवर सोयाबीनचा पेरा राहिला. राज्यात सोयाबीनचे सर्वाधित क्षेत्र असणारा जिल्हा म्हणून लातूरची ओळख आहे.

गेल्या दोन, तीन वर्षापासून सोयाबीन काढणीच्या वेळी ऑक्टोबर ते नोव्हेंबर या दरम्यान अतिवृष्टीला विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागते आहे. शेतात उभा असलेला, काढलेला सोयाबीन पाण्यात राहण्याच्या प्रसंगांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागते. कशीबशी काढणी केल्यानंतर सोयाबीनमधील ओलाव्याचे प्रमाण अधिक असते. परिणामी हे सोयाबीन मिळेल त्या भावाने बाजारपेठेत विकण्याशिवाय शेतकऱ्यांना पर्याय नसतो, मात्र शेतकऱ्यांसमोर सर्वात जटिल प्रश्न येतो ते पुढील हंगामात बियाणासाठी सोयाबीन कुठून आणायचे? नेमका याचाच फायदा अनेक खासगी कंपन्यांनी उठवत बियाणांचे भाव अव्वाच्या सव्वा वाढवले. परिणामी शेतकऱ्यांची भांडवली गुंतवणूक वाढू लागली. सोयाबीनला भाव मिळत असला तरी बियाणे, खते, फवारण्या व काढणीचा खर्च यामुळे सोयाबीनची शेतीदेखील तोट्यात जात असल्याचे चित्र निर्माण झाले.

सोयाबीनची शेती लाभदायक आहे मात्र त्यातील भांडवली गुंतवणुकीमधील खर्च कमी केले पाहिजेत हे लक्षात घेऊन वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत. यांत्रिक पध्दतीने सोयाबीनची काढणी करता यावी यासाठीचे नवे वाण परभणी कृषी विद्यापीठ, राहुरी कृषी विद्यापीठ येथे उत्पादित केले जाते आहे. काही प्रमाणात हे बियाणे वापरले जात आहे मात्र सर्रास त्याचा वापर अजून वाढलेला नाही कारण या बियाणातही काही त्रुटी आहेत.

विद्यापीठाच्यावतीने यावर आगामी काळात संशोधन होईल. त्याचा लाभही शेतकऱ्याला होईल. बाजारपेठेत होणारी शेतकऱ्यांची बियाण्यातील लूट कमी व्हावी यासाठी कृषी विभागाने गेल्या दोन वर्षापासून शेतकऱ्यांनी घरचे बियाणे वापरावे असे आवाहन केले. बियाणांसाठीची साठवणूक कशी करावी? बियाणांची उगवणक्षमता कशी तपासावी? पेरणी करताना नेमकी काय काळजी घ्यावी? यासंबंधीची माहिती शेतकऱ्याला दिली गेली, मात्र यावर्षी ऐन काढणीच्या वेळी झालेल्या पावसाने घरी साठवता येईल असे सोयाबीन फारसे नसल्याने व पाऊसकाळ चांगला झाल्याने शेतकऱ्यांच्या शेतात पाणी उपलब्ध आहे. या पाण्याचा वापर उन्हाळी सोयाबीन घेण्यासाठी करता येईल अशी कल्पना कृषी विभागाच्या काही अधिकाऱ्यांच्या चर्चेतून पुढे आली व राज्यभर शेतकऱ्यांनी उन्हाळी सोयाबीन घ्यावे यासाठीचे विशेष प्रयत्न सुरू झाले.

नोव्हेंबर महिन्यापासूनच कृषी विभागाने यासाठीचा पाठपुरावा सुरू केला. सोयाबीन पेरणीचा काळ कोणता? नेमकी काय काळजी घ्यावी? यासंबंधी शेतकऱ्यांच्या गटामधून चर्चा सुरू झाल्या. २० डिसेंबर ते १५ जानेवारी हा कालावधी उन्हाळी सोयाबीन पेरणीसाठीचा योग्य कालावधी आहे. बिगर मोसमी पीक घेतले जात असल्याने तापमानाचा विचार करावा लागतो. बियाणे पेरणीनंतर ४५ दिवसाच्या आत फुलोरा येतो व फुलगळ होऊ नये यासाठी वातावरणातील तापमान ३० अंश सेल्सिअसपेक्षा कमी असावे लागते. त्यामुळेच हा कालावधी कृषी विभागाने सुचवला. मार्च महिन्यात मोठ्या प्रमाणावर ऊन असते. पेरणी उशिरा केली तर फुलगळीचे प्रमाण ५० टक्केपेक्षाअधिक होण्याचा धोका आहे. मुळात खरीप हंगामातील सोयाबीनची उत्पादकता एकरी क्विंटलच्या आसपास असते. उन्हाळी हंगामातील सोयाबीनची उत्पादकता घटत थेट एकरी क्विंटलपर्यंत खाली येते. यावर्षी मार्च महिन्यातच बाजारपेठेत सोयाबीनचा भाव ५४०० रुपये प्रर्तिंक्व टलपर्यंतचा आहे. हा भाव आणखीन किमान ५०० रुपयांपर्यंत वाढेल. उन्हाळी हंगामातील सोयाबीनचा वापर बियाणांसाठी होणार असल्याने शेतकऱ्याला ६५०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळू शकतो. त्याच्या शेतात जे सोयाबीन पेरायचे आहे त्यासाठी हक्काचे गुणवत्ताधारक बियाणे त्याला उपलब्ध होणार आहे.

लातूर, उस्मानाबाद, नांदेड या जिल्ह्यात बाजारातून दरवर्षी नवे बियाणे खरेदी करण्याची प्रथा पडली आहे. घरचे बियाणे वापरून धोका कशाला पत्करायचा? या गैरसमजातून दरवर्षी नवे बियाणे खरेदी केले जाते. बाजारपेठेतील बियाणे खरेदी केल्यानंतरही उगवण न झाल्याचे प्रकार अनुभवायला आल्यानंतर अनेक शेतकरी हवालदिल झाले व त्यानंतर शेतकऱ्यांची ओरड सुरू झाली. संकरित वाण पेरायचे असेल तर दरवर्षी नवीन बियाणे खरेदी करावे लागते मात्र सुधारित वाण पेरायचे असेल तर दर तीन वर्षानंतर बियाणे बदलले पाहिजे. शेतकऱ्यांनी आपल्या शेतात यासाठीचे प्रयोग केले पाहिजेत. दहा एकर सोयाबीन पेरणाऱ्या शेतकऱ्याने दरवर्षी एक पिशवी बाजारातील बियाणे खरेदी करायची व त्या सोयाबीनचा वापर पुढील वर्षी बियाणे पेरणीसाठी करायचा, असे चक्र सुरू ठेवले तर भांडवली खर्च कमी होईल.

गतवर्षी बाजारपेठेतील सोयाबीनच्या बियाणाचा भाव सरासरी ७० रुपये किलो व सोयाबीनचा भाव ३५ रुपये किलो होता. यावर्षी सध्या बाजारपेठेतील सोयाबीनचा भाव ५५ रुपये किलो आहे. तेव्हा जून महिन्यात बियाणाचा भाव १०० रुपये किलोपेक्षा कमी असणार नाही. उन्हाळी सोयाबीनमुळे काही अंशी शेतकऱ्यांचा बियाणावरील होणारा खर्च कमी होण्यास मदत होणार आहे. यावर्षी हा प्रयोग यशस्वी झाला तर पुढील काळात उन्हाळी सोयाबीन घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढेल. पर्यायाने बाजारातून बियाणे खरेदी करणेही काही प्रमाणात कमी होईल, त्यामुळे भांडवली वाढत्या खर्चाला आळा बसण्यास मदत होईल.

प्रायोगिक तत्त्वावर लागवड

खरीप हंगामातील बियाणांचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर ‘महाबीज’नेही उन्हाळी सोयाबीनचा उपक्रम हाती घेतला आहे. काही वर्षापूर्वी परभणी येथील शेतकऱ्यांनी हा प्रयोग केला होता. यावर्षीच्या प्रयोगाचा अनुभव लक्षात घेऊन पुढील वर्षीपासून यासाठी विशेष मोहीम हाती घेतली जाईल.

– एकनाथ डवले, सचिव, कृषी विभाग महाराष्ट्र

बियाणे बदलाची गरज

तीन वर्षापर्यंत एकच बियाणे शेतीत वापरता येते, मात्र गैरसमजामुळे अनेक जण दरवर्षी नवीन बियाणे खरेदी करतात. त्यामुळे अकारण भांडवली खर्च वाढतो. तो कमी व्हावा यासाठी शेतकऱ्यांना बियाणाच्या बाबतीतील गुणवत्ता व वापर याबद्दल जागृती निर्माण करून उन्हाळी सोयाबीनचा पेरा वाढवला आहे. त्याला राज्यातील शेतकऱ्यांनी पहिल्याच वर्षी भरभरून प्रतिसाद दिला आहे.

– दिलीप झेंडे, संचालक, निविष्ठा व गुणनियंत्रण महाराष्ट्र

अधिक काळजी करण्याची गरज

उन्हाळी हंगामातील सोयाबीन हा एक नवा प्रयोग आहे. खरिपाप्रमाणे उत्पादन अधिक होत नाही. पेरणीपासून प्रत्येक टप्प्यावर नीट लक्ष दिले, पिकाची स्थिती लक्षात घेऊन आवश्यक ती औषध फवारणी व गरजेनुसार पिकाला लागणारे पाणी दिले तर प्रयोग यशस्वी होतो. बियाणांच्या गुणवत्तेत हे सोयाबीन अतिशय उत्तम दर्जाचे असते. शेतकऱ्यांनी अनुभव हीच खात्री लक्षात घेतल्यानंतर याकडे बहुतांश शेतकरी नक्कीच वळतील.

– प्रा. अरुण गुट्टे, विस्तार कृषी विद्यावेत्ता, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी

गावनिहाय याद्या तयार

जिल्ह्यातील सोयाबीन घेणाऱ्या शेतकऱ्यांची नावे, क्षेत्र यासह याद्या तयार आहेत. कोणते शेतकरी बाजारातील बियाणे वापरतात व कोणते घरचे वापरतात याचीही माहिती संकलित करण्यात आली आहे. घरचे बियाणे वापरण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढावा यासाठी उन्हाळी सोयाबीनचा कार्यक्रम राबवण्यात आला आहे. जिल्हाभरात ४०० हेक्टरपेक्षादेखील अधिक क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा घेण्यात आला आहे.

– दत्तात्रय गवसाने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, लातूर